Friday 1 February 2013

बीबीएफ पध्‍दतीमुळे एक हजार हेक्‍टर क्षेत्रातील कापसाच्‍या उत्‍पादनात भरीव वाढ



                  * विदर्भ प्रवाही सिंचन विकास कार्यक्रम
            * 54 गावातील 1 हजार 150 हेक्‍टरवर यशस्‍वी प्रयोग  
            * जिल्‍ह्यात पंन्‍नास हजार हेक्‍टर पर्यंत क्षेत्रात वापर
            * शेतकरी समुहाला 48 बेडमेकरचे वाटप
वर्धा दि.1-  विदर्भ प्रवाही सिंचन विकास कार्यक्रमा अंतर्गत रुंद सरी वरंभा पध्‍दत (बीबीएफ) तंत्रज्ञानाव्‍दारे जिल्‍ह्यात प्रायोगिक तत्‍वावर 54 गावातील 1 हजार 150 हेक्‍टर क्षेत्रावर कापसाचे उत्‍पादन घेण्‍यात आले असून परंपरागत पध्‍दतीमध्‍ये बदल केल्‍यामुळे कापसाच्‍या उत्‍पादनात एकरी 3 ते 5 क्विंटलपेक्षा जास्‍त वाढ झाली आहे.
बीबीएफ हे तंत्रज्ञान उत्‍पादन वाढीसाठी अत्‍यंत उपयुक्‍त ठरत असल्‍यामुळे शेतक-यांना प्रशिक्षण देवून सुमारे 50 हजार हेक्‍टरपेक्षा जास्‍त क्षेत्रात पुढील हंगामात वापर करण्‍याच्‍या दृष्‍टीने नियोजन करण्‍यात येत असल्‍याची माहिती जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांनी दिली. तूर पिकासाठीही हे तंत्रज्ञान उपयुक्‍त ठरले आहे.
          केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार वर्धा येथील कार्यक्रमासाठी आले असता वर्धा जिल्‍ह्यातील बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करुन कापूस उत्‍पादन वाढीच्‍या उपक्रमाची माहिती घेतली. उत्‍पादन वाढीसाठी व कापसाला आवश्‍यक पाणी उपलब्‍ध करुण देणा-या उपक्रमाची माहिती सर्व शेतक-यांना देवून या उपक्रमामध्‍ये सहभागी करुन घेण्‍याची सूचनाही त्‍यांनी यावेळी दिली.
          वर्धा जिल्‍ह्यात सुमारे 1 लाख 65 हजार हेक्‍टर क्षेत्रात कापसाची पेरणी केल्‍या जाते निर्सगाच्‍या अनियमिततेमुळे उत्‍पादनावरही त्‍याचा विपरीत परिणाम होतो परंतु बीबीएफ तंत्रज्ञानाव्‍दारे पडलेल्‍या पावसामुळे बेडमेकर यंत्राव्‍दारे तयार केलेला बेड ओला झाल्‍यानंतर पेरणी केल्‍या जाते. दोन बेडमध्‍ये अंतर असल्‍यामुळे अतिपाऊस झाल्‍यास पाणी साचत नाही तसेच कमी पाऊस झाल्‍यास बेडमध्‍ये पाणी शोसून ठेवता येते त्‍यामुळे पिकाच्‍या वाढीलाही मदत होते.
            जिल्‍ह्यात शेतकरी समुहाला 48 बेडमेकर कृषी विभगातर्फे उपलब्‍ध करुण देण्‍यात आले असून टॅक्‍टरला हे यंत्र जोडून शेतामध्‍ये बेड सहजपणे तयार करता येतात या यंत्रामध्‍ये बदल करण्‍यात आला असून सरीच्‍या माथ्‍यावर पाणी अडविण्‍यासाठी तसेच खत पेरणीही सुविधा उपलब्‍ध झाली आहे. बेडमेकरच्‍या माध्‍यमातून माती व शेणखत एकत्र करुण बेड तयार करणे सहज सुलभ झाले आहे. बेडमेकरची किंमत 23 हजार 800 रुपये असल्‍यामुळे शेतकरी समुह वैयक्तिकरित्‍यासुध्‍दा खरेदी करु शकतो.
                         50 हजार हेक्‍टर वर बीबीएफ
        बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करुण कापूस उत्‍पादन वाढीला प्रोत्‍साहन मिळावे यासाठी जिल्‍ह्यातील एक हजार हेक्‍टरवर उत्‍पादन घेणा-या शेतक-यांचे अनुभव इतर शेतक-यापर्यंत पोहचविण्‍यासाठी तसेच या तंत्राचा प्रसार व्‍हावा म्‍हणून शेतकरी प्रशिक्षणाचे कार्यक्रम 15 मे पासून सुरु करण्‍यात येत आहे.
          बीबीएफ तंत्रज्ञान अभियाना अंतर्गत शंभर शेतक-यांचा गट करुण प्रत्‍येक तालुक्‍यात या उपक्रमाची माहिती प्रत्‍यक्ष शेतक-यांना देण्‍यात येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे हेक्‍टरी 20 हजार रुपयापेक्षा जास्‍त उत्‍पादन घेणे सुलभ असल्‍याचे जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी सांगीतले.
          विदर्भ प्रवाही सिंचन कार्यक्रमा अंतर्गत शेतीला विशेषतः कापूस उत्‍पादनासाठी सरासरी 750 ते 800 मि.मिटरी पावसाची गरज आहे. जिलह्यात प्रत्‍यक्ष सरासरी एक हजार मि.मिटर पाऊस पडतो परंतु पाऊस कधी जास्‍त तर कधी कमी पडत असल्‍यामुळे पावसाने विश्रांती दिली तर येणारे पीकही घेणे शक्‍य होत नाही. परंतु रुंद सरी वरंभा पध्‍दतीमुळे शेतातील पाणी शेतातच साठवून ठेवणे शक्‍य होते. त्‍यामुळे पिकानाही आवश्‍यकतेनुसार ओलावा मिळतो. असेही जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांनी यावेळी सांगीतले.
0000

No comments:

Post a Comment