Thursday 19 July 2012

सरी वरंभा पध्‍दतीने पिकांना मिळाले जीवनदान कृषी आयुक्‍तांकडून कपाशीच्‍या पिकांची पाहणी


         वर्धा, दि. 19 – सरी वरंभा पध्‍दतीमुळे कपाशी व इतर पिकांना आवश्‍यकतेनुसार पाणी तसेच शेणखत, रासायनिक खते व पाण्‍याची बचत होत  असून  पीक चांगल्‍या पध्‍दतीने  घेणे  सुलभ होत असल्‍यामुळे  शेतक-याने  सरी वरंभा पध्‍दतीनेच  शेतीचे उत्‍पादन घ्‍यावे असे आवाहन  राज्‍याचे  कृषी आयुक्‍त  उमाकांत  दांगट यांनी केले आहे.
            देवळी तालुक्‍यातील  कापसासह विविध पिकांची पाहणी  कृषि आयुक्‍त श्री. दांगट यांनी केली. त्‍यावेळी शेतक-यांशी संवाद साधतांना  ते बोलत होते. यावेळी  कृषि सहसंचालक डॉ. जे.सी.भुतडा, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे, कृषि अधिकारी निगोट, श्री. उघाडे, श्री. कऊटकर आदी यावेळी उपस्थित होते.
       प्रगतीशील शेतकरी श्री. राऊत यांच्‍या शेताला विदर्भ सिंचन प्रभावी कार्यक्रमाअंतर्गत रुंद वरंभा व सरी या पध्‍दतीने कपाशीची लागवड करण्‍यात आली आहे.  अपुरा पाऊस पडत असला तरी  या पध्‍दतीने  कपाशीच्‍या  झाडांना  आवश्‍यकतेनुसार  पाणी उपलब्‍ध होत असल्‍यामुळे कपाशीच्‍या झाडांची वाढ  अपेक्षेनुरुप  आहे. सरी वरंभा पध्‍दतीमुळे शेणखत, रासायणीक खत, पाणी याची बचत होत असून  भूगर्भात  पाणीसुध्‍दा  साठविण्‍यास मदत होत आहे.
            कपाशीच्‍या  पांढ-या मुळांची  संख्‍या मोठ्या प्रमाणात वाढून उत्‍पादनामध्‍ये निश्चितच  वाढ होणार असल्‍याची  माहिती  शेतक-यांनी  यावेळी आयुक्‍तांना दिली. खताची कार्यक्षमता, पाणीयोग्‍य वापर, तणांचे नियंत्रण शक्‍य झाले असल्‍याने शेतक-यानेही  रुंद सरी  वरंभा पध्‍दतीनेच आपली शेती करावी  असे सांगून  पुढील वर्षी सुध्‍दा जास्‍तीत जास्‍त शेतक-यांनी  या पध्‍दतीने  कपाशीची लागवड  करावी यासाठी अनुदानांवर बेडमेकर पुरविण्‍याबाबतही  श्री. दानगट यांनी शेतक-यांशी संवाद साधतांना सांगितले.
            सोनेगाव आबाजी येथील ज्ञानेश्‍वर  वासुदेव चोरे या शेतक-यांनी सरी वरंभा पध्‍दतीवर  ठिंबक संचाचा वापर करुन कपाशीची लागवड केली आहे. त्‍यामुळे पिकांना उपयुक्‍त अशा खतांचा व औषधांचा वापर सुलभ झाले असून, जास्‍त पावसामुळे पाण्‍याचा योग्‍य निचरा होऊन कपाशीचे नुकसान टाळता येणे शक्‍य झाल्‍याची माहिती  ज्ञानेश्‍वर चोरे यांनी कृ‍षी आयुक्‍तांना दिली.
      आत्‍मा अंतर्गत 50 टक्‍के अनुदानावर  मानवचलीत बियाणे  टोकन यंत्राचे वाटप करण्‍यात आले असून, प्रत्‍येक तालुक्‍यामध्‍ये  12 अवजारे वाटप करण्‍यात आले आहे. या अभिनव उपक्रमाची  माहितीही कृषी आयुक्‍तांनी  घेतली. प्रारंभी  अधिक्षक कृषि अधिकारी  भाऊसाहेब ब-हाटे यांनी स्‍वागत करुन  जिल्‍ह्यात राबविण्‍यात येणा-या विविध उपक्रमांची माहिती दिली.
                   ब्राझील पॅटर्नने  कपाशीची लागवड
    देवळी तालुक्‍यातील  नागझरी  येथील  मोहन राऊत यांच्‍या शेतात ब्राझील पॅटर्न नुसार लावण्‍यात आलेल्‍या  कपाशीच्‍या  प्रात्‍यक्षिक  शेतीला  कृषि आयुक्‍त उमाकांत दांगट यांनी  भेट देऊन पाहणी केली.
          कृषि विभागातर्फे कपाशी पिकाची  उत्‍पादकता वाढविण्‍यासाठी कपाशी  धन लागवड व देशी वानांची लागवड तंत्रज्ञान (ब्राझील पॅटर्न) चा  उपक्रम राबविण्‍यात येत आहे. देशी वानांचा वापराला प्रोत्‍साहन  देण्‍यासाठी सात शेतक-यांना  प्रात्‍यक्षिक अनुदानावर  प्रोत्‍साहन  देण्‍यात आले आहे.  या उपक्रमा अंतर्गत पिकांचे  किड व रोग व्‍यवस्‍थापन  या संदर्भात मार्गदर्शन करुन  बी.टी. कपाशीचा वाढता उत्‍पादन खर्च कमी करुन  देशी वानाला  प्रोत्‍साहन देण्‍याचा प्रयत्‍न  या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून जिल्‍ह्यात राबविण्‍यात येत आहे. प्रात्‍यक्षिकाच्‍या  सर्व निविष्‍ठा शेतक-यांना देण्‍यात आल्‍या आहेत.
              देशी वानाच्‍या  लागवड तंत्रा अंतर्गत नागझरी येथील मोहन राऊत यांच्‍या 1.80 हेक्‍टर  क्षेत्रात हा उपक्रम राबविण्‍यात आला आहे. या उपक्रमाची  पाहणी करण्‍यासाठी  कृषि आयुक्‍त श्री. दांगट यांचेसह विभागीय कृषि  सहसंचालक जे.सी. भुतडा, भाऊसाहेब ब-हाटे, कृषि अधिकारी संतोष डाबरे आदी अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

                                                            00000

No comments:

Post a Comment