Thursday 22 December 2011

डायल 102



      खास दूरध्‍वनी क्रमांक आपणास हमखास पाठ होतात. जसं पोलिसांना दूरध्‍वनी लावायचा तर 100 हा क्रमांक आहे आणि अग्‍नीशामक दलाचा 101 तसा आता पुढील काळात 102 हा क्रमांक गरोदर माता आणि नवजात बालकांचे आरोग्‍य यासाठी कायमस्‍वरुपी व 24 तास सेवेत उपलब्‍ध राहणार आहे.त्‍याबाबत माहिती देणारा हा लेख.                  - प्रशांत दैठणकर                                                         

     शासनाने गर्भवतींचे मृत्‍यू राखण्‍यासाठी तसेच जन्‍मलेल्‍या बालकांना सदृढपणा यावा ते आजारी होवू नयेत. आजारी पडल्‍यास पूर्ण शासनखर्चाने त्‍यांची काळजी घेता यावी याकरिता जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम सुरु केला आहे. या अंतर्गत खास दूरध्‍वनी क्रमांक उपलब्‍ध करुन देण्‍यात आला आहे.
     या कार्यक्रमात गरोदर स्त्रियांना प्रसूती साठी तसेच 30 दिवसांपर्यंतच्‍या नवजात आजारी बालकांना मोफत आरोग्‍य सेवा पुरवणे असे ध्‍येय्य ठेवलेले आहे.
     गरोदरपणात, बाळंतपणात व प्रसुती पश्‍चात 42 दिवसांपर्यंत सेवा देण्‍यात येईल. सामान्‍य प्रसुतीसाठी 3 दिवस शस्‍त्रक्रियेव्‍दारे बाळंतपण झाल्‍यास सात दिवसापर्यंत मोफत आहार देण्‍यात येईल. घरापासून प्राथमिक आरोग्‍य केंद्र किंवा शासकीय रुग्‍णालयापर्यंत संदर्भ सेवेसाठी जाण्‍यासाठी तसेच प्राथमिक आरोग्‍य केंद्र शासकिय
रुग्‍णालयातून घरी परत जाण्‍यासाठी मोफत वाहन व्‍यवस्‍था करण्‍यात येईल. मोफत प्रयोगशाळा तपासण्‍या, रक्‍त पुरवठा व औषधोपचार करण्‍यात येईल. कोणत्‍याही सेवेचे शुल्‍क आकारले जाणार नाही अशी यात सोय आहे.
      30 दिवसापर्यंतच्‍या जनवजात आजारी बालकांसाठी मोफत औषधोपचार करण्‍यात येईल. घरापासून प्राथमिक आरोग्‍य केंद्र किंवा शासकिय रुग्‍णालयापर्यंत, संदर्भ सेवेसाठी प्राथमिक आरोग्‍य केंद्र किंवा शासकिय रुग्‍णालयापर्यंत जाण्‍यासाठी तसेच रुग्‍णालयातून घरी परत जाण्‍यासाठी मोफत वाहन व्‍यवस्‍था करण्‍यात येईल, तसेच रक्‍त पुरवठा व प्रयोगशाळा तपासण्‍या, औषधोपचार मोफत करण्‍यात येतील.
     गरोदर माता व नवजात अर्भकांच्‍या तपासण्‍या, उपचार व आहार इतयादी सेवा पूर्णपणे मोफत देण्‍यात येईल. ज्‍यामुळे बाल मृत्‍यू व माता मृत्‍यू कमी होण्‍यास मदत होईल. जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय, वर्धा येथे 24 तास सेवा देण्‍यासाठी कॉल सेंटर सुरु करण्‍यात आले असून त्‍याचा टोल फ्री क्रमांक 102 किंवा (07152)245198 असा आहे. या क्रमांकावर कोणीही कितीही वाजता तात्‍काळ प्रसंगी फक्‍त बाळंतपणाच्‍या माता व अति आजारी बालकांकरीता संपर्क करु शकतात. संपर्क करणा-यांनी पूर्ण नांव, पत्‍ता व जवळची खूण सांगितल्‍यानंतर जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयाकडून तेथून जवळ असणा-या रुग्‍णालयाची रुग्‍णवाहिका पाठविण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात येईल. या कार्यक्रमामुळे प्रत्‍येक बालकाची आणि त्‍याच्‍या मातेची अखंड काळजी घेतली जाणार आहे. त्‍यासाठी हा `डायल 102`  लक्षात ठेवायचा इतकच.
-         प्रशांत दैठणकर

No comments:

Post a Comment