Thursday 30 June 2011

दुग्ध व्यवसायामुळे बचत गटाची आर्थिक समृध्दी च्या दिशेने वाटचाल


ग्रामीण क्षेत्रातील महिलांची प्रगती बचत गटाच्या माध्यमातून होत आहे. वर्धा जिल्यातील हिंगणघाट तालुक्यात येणार येथील जिजामाता महिला बचत गटाने दुग्ध व्यवसायाला श्रमाची जोड दिल्याने त्यांची वाटचाल आर्थिक समृध्दीच्या दिशेने सुरु असून या दुग्ध व्यवसायातून प्रत्येक सदस्याला ३ हजार पर्यंत आर्थिक लाभ मिळत आहे.

जिजामाता महिला बचत गट हा दा‍रिद्रय रेषेखालील आहे. या गटाच्या अध्यक्षा गिरजा मसराम असून सचिव पदी सुनंदा गोतमारे या आहेत. बचत गटाच्या संकल्पनेबाबत माहिती सांगताना गिरजा मसराम म्हणाल्या की, ग्रामीण क्षेत्रामध्ये बचत गट स्थापन करण्याची चळवळ २००६ च्या दरम्यान मोठया प्रमाणावर जिल्ह्यात सुरु होती गावात दवंडी देवून व वृत्तपत्रातील बातम्यांमुळे आम्ही सुध्दा या चळवळीत सहभागी होणाचा निश्चय केला सुरवातीला सचिव सुनंदा गोतमारे यांच्या घरी बैठक झाली पहिल्यांदा या बैठकीला कमी प्रतिसाद मिळाल्याने दुस-या आठवडयात दिनांक २२ जानेवारी २००६ रोजी बैठक घेण्यात आली यात बचत गटातील १२ सदस्य सहभागी झाले लगेच बचत गटाची स्थापना करण्यात आली. या बचत गटाला जिजामाता बचत गट असे नाव देण्यात आले या बचत गटाचे अध्यक्ष म्हणून गिरजा मसराम व सचिव म्हणून सुनंदा गोतमारे यांची निवड करण्यात आली या बैठकीला पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री.मुरार यांनाही पाचारण करण्यात आले होते त्यांनी आमच्या बचत गटाला उत्तम असे मार्गदर्शन केले.
श्रीमती मसराम म्हणाल्या की, जानेवारी २००६ पासून बचत गटाच्या सदस्यांनी ५० रुपये दर महिन्याला बँक ऑफ इंडियाचे पासबुक काढून जमा करणे सुरु केले डिसेंबर २००६ मध्ये रु.७ हजार २०० व डिसेंबर २००७ मध्ये ७ हजार २०० असे एकुण १४ हजार ४०० रुपये जमा झाले. प्रत्येक सदस्याला या रकमेतून दोन टक्के व्याजाच्या मासिक कर्ज दिल्यामुळे व्याजाची रक्कम व मासिक वर्गणीमुळे एकुण भांडवलात रकमेत वाढ होत गेली आहे. सदस्यांनी मागणी केलेल्या कर्जाची रक्कम एक तर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या आजारपणासाठी व शिक्षणाच्या कामासाठी खर्च करण्यात येत असे. बचत गटातील सदस्यांच्या कौटुंबिक गरजा पूर्ण होत असल्यामुळे ज्यांना सावकाराकडे हात पसरावे लागले नाही. सावकारी पाशा पासून आज आम्ही दूर झालो आहोत. बचत गटाच्या कार्यामुळे आता आम्हाला सुखासमाधानाने जीवन जगता येत आहे अशी त्यांनी यावेळी मनातील व्यथा बोलून दाखविली.

पंचायत समिती हिंगणघाटच्या कार्यालयाशी आम्ही सतत संपर्कात राहत होतो व मासिक बैठकीत पंचायत समितीचे विस्तार अधिकारी मुरार यांना पाचरण करुन त्यांच्या कडून व्यवसायांबाबत मार्गदर्शक सुचना घेण्यात आल्यामुळे बचत गटातील सदस्यांनी सर्वानुमते दुग्ध व्यवसाय करण्यासाठी आपली मते नोंदविली दरम्यान या बचत गटाची पहिली प्रतवारी १० जानेवारी २००८ रोजी झाली. आमच्या बचत गटाला २५ हजाराचे खेळते भांडवल मिळाले बचत गटातील सदस्यांना गरजेनुसार कर्ज देण्यात आले.

बचत गटाची दुसरी प्रतवारी ६ नोव्हेंबर २००९ रोजी झाली बचत गटाच्या प्रामाणिकपणामुळे व कर्जाची वेळेवर परतफेड करीत असल्यामुळे बँकेत सुध्दा बचत गटाची एकुणच पत वाढली त्यामुळे जिजामाता महिला बचत गटाने १ जानेवारी २०१० रोजी सादर केलेल्या म्हैस खरेदीचा प्रस्ताव मंजूर केला. २२ नोव्हेंबर २०१० रोजी प्रत्यक्षात जिजामाता महिला बचत गटाला ३ लाख ३० हजाराचे कर्ज मंजूर झाले. या कर्जमंजुरीतून ३ लाखाच्या दुभत्या म्हशी घेण्यात आल्या. एका सदस्याला २५ हजाराची एक अशा एकुण १२ सदस्यांना म्हशी खरेदी करुन दिल्या. 
श्रीमती गोतमारे म्हणाल्या की, बचत गटाला म्हशी खरेदी करुन दिल्यामुळे भविष्यातील येणा-या संकटापासून सुटका झाली आहे.आमची एक म्हैस दिवसातून ८ लिटर दूध देत आहे आमच्या गावाच्या दूरवर अंतरावर हिंगणघाट हे शहर व्यापारी पेठ म्हणून गणल्या जाते त्यामुळे दूधाला चांगली मागणी आहे. दूधात पाणी मिसळवित नसल्यामुळे दूधाचा उच्चतम दर ३० रुपये होता. साधारणत: २४० रुपये एका दिवसाचे तर ३० दिवसाची एकुण उत्पन्न ७ हजार २०० रुपये होते यातून म्हशीला लागणारा पौष्टीक आहाराचा खर्च रु १८०० व राखणदारी कर्मचा-यांचे वेतन एकून ८० रुपये प्रमाणे ३० दिवसाचे २४०० असे एकुण ४२०० खर्च झाल्यानंतर शिल्लक ३ हजार रुपये निव्वळ दुग्धव्यवसायापासून प्रत्येक सदस्याला मिळत आहे. १ जानेवारी २०११ पासुन ३७५० रुपये बँक ऑफ इंडीया मध्ये नियमीतपणे परतफेड करणे सुरु असून गटातील सदस्यांना व्याजाने रक्कम देणे सुरु आहे. बचत गटातील एका सदस्याला दुग्ध व्यवसायापासुन महिन्याला ३ हजार रुपये मिळत असून १२ सदस्यांची एकत्रीत रक्कम ३६ हजार रुपये ही रक्कम ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारी आहे.

जिजामाता बचत गटाला बँक ऑफ इंडिया शाखा हिंगणघाट यांनी प्रामाणिकपणाची पोच पावती दिली असून या बचत गटाची उत्कर्षासाठी वाटचाल अशीच सुरु राहावी अशी अपेक्षा अध्यक्षांनी बोलून दाखविली.

  • मिलींद आवळे



  • साभार महान्यूज..... दि. २८ जून २०११

  • No comments:

    Post a Comment