Tuesday 28 June 2011

स्कुल बस, रिक्षा कितपत सुरक्षित... !

विशेष लेख क्र 53/28                                                जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा                                           दि.27 जून 2011

     आता शाळा सुरु झाल्या आहेत त्यासोबत सुरु होते ती रिक्षातील कोंबाकोंबी. अपरिहार्य परिवहन व्यवस्था म्हणून स्कुल बस किंवा रिक्षाचा वापर होत असतो. हा पर्याय कितपत सुरक्षित आहे याबाबत पालक आणि शिक्षक जागरुक नाहीत, आणि पोलीस हेतूत: डोळेझाक करतात अशी परिस्थिती आहे याबद्दल थोडसं.
                                       -प्रशांत दैठणकर

     वाहनांच्या जगात रिक्षा नावाचं जे वाहन आहे ते निसर्गाच्या नियमांच्या विरुध्द असणारं वाहन आहे असं माझं मत आहे. कारण निसर्गात संतुलनाचा स्वत:चा असा नियम आहे. दोन ध्रुव, दोन पाय, दोन हात, दोन डोळे, चार पाय, आठ पाय असे अनेक पायांचे प्राणी असले तरी त्यात समान संतुलन दिसते निसर्गात 3 पायांचा प्राणी नाही आणि त्यामुळेच रिक्षा निसर्ग नियामाच्या विरुध्द असणारं वाहन आहे. ते मानव निर्मित आहे. कठिण प्रसंगी याची संतुलनाची ताकद इतरांपेक्षा कमी असल्याने याबाबत अपघाताचा धोका अधिक असतो.
हे सारं आठवण्याचं कारण म्हणजे आता शाळा सुरु झाल्या आहेत आणि जवळपास सर्व ठिकाण शाळेत मुलांची ने आण करण्याचे काम रिक्षातून होत असते काही ठिकाणी ते स्कुल बसने ही होते. तरीही ने आण करणारी वाहने तन्दुरुस्त आहेत की नाही याकडे आपण गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
     आपण नव्या पिढीला म्हणजेच मुलांना आपलं भविष्य म्हणतो या भविष्याच्या सुरक्षिततेबाबत आपण जागरुक रहायला हवं प्रत्येक पालकाची ही जबाबदारी आहे तीन जण बसण्याची क्षमता असणा-या रिक्षा 15-20 मुलं कोंबून नेली जातात हे आपणाला दिसत नाही का ? हे दिसतं पण आपण डोळेझाक करतो यात एखाद्यावेळी अपघात झाला तर काय होईल याची आपण कल्पना देखील करित नाही.
                                                                       दिल्लीत मुलांची वाहतूक करणारी रिक्षा नदीत बुडाल्याची दुर्घटना घडली होती. पनवेल मध्येही स्कुल बस जळाल्याची दुर्घटना घडली त्यात 5 मुलांचा भाजून मृत्यू झाला आम्ही बातमी वाचून हळहळतो आणि 24 तासांनी स्वत:च्या मुलांना तितक्याच असुरक्षित अशा रिक्षात पाठवतो पालक कधी जागा होईल, खूप मोठी चूक झाल्यावर होणार आहे का ?
     पालकांइतकीच जबाबदारी स्वत: बस वा रिक्षा सेवा देणा-याची आहे. परिवहन खात्याने घालून दिलेल्या नियमांचे पालन त्यांनी करावे. शाळा आणि संस्थाचालकांनी आपल्या स्तरावर या सर्व बस आणि रिक्षांवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे त्याच प्रमाणे जबाबदारी आहे ती वाहतूक पोलिसांची देवाण-घेवाण करुन अशी वाहनं सोडून द्यायची वाहनचालकांवर कारवाई करायची नाही असा प्रकार अल्प आर्थिक लाभापायी करताना अनेकदा बघितलय त्यांनी नियमांच्या पालनाबाबत आग्रही रहायला हवं
     अंतर वाढल्यानं मुलांना बस वा रिक्षातून पाठवणं अपरिहार्य जरुर आहे मात्र त्याबाबत सर्वांनीच सजग राहून आपापल्या कर्तव्याचं पालन केलं तर ग म भ न गिरविणारी नवी पिढी सुरक्षित राहणार आहे.     
                                          -प्रशांत दैठणकर

No comments:

Post a Comment