Wednesday 11 July 2012

लोकसंख्‍येला आळा घालण्‍यासाठी प्रयत्‍नाची गरज - जि.प.अध्‍यक्ष


              वर्धा,दि.11- लोकसंख्‍या वाढीचे दुष्‍परिणाम अन्‍न, वस्‍त्र व निवारा या माणसाच्‍या मुलभूत सोयी व सुविधांवर होतांना दिसत आहे. यासाठी समाजाने सकारात्‍मक दृष्‍टी ठेवून लोकसंख्‍येला आळा घालण्‍यासाठी  समाजातील प्रत्‍येकांनी पुढाकार घेण्‍याची गरज आहे असे प्रतिपादन जि.प. अध्‍यक्ष नानाभाऊ ढगे यांनी केले.
एका मुलीवर शस्‍त्रक्रिया करणा-या दाम्‍पत्‍याचासत्‍कार करताना जि.प. अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे बाजूला
प्रभारी जिल्‍हाधिकारी शेखर चन्‍ने 
            आरोग्‍य विभाग जिल्‍हा परिषदेच्‍या वतीने आज जागतिक लोकसंख्‍या दिन व डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्‍कार वितरण सोहळा येथील विकास भवन येथे संपन्‍न झाला त्‍यावेळी ते अध्‍यक्ष पदावरुन बोलत होते. यावेळी जि.प. उपाध्‍यक्ष संजय कामनापुरे, प्रभारी जिल्‍हाधिकारी शेखर चन्‍ने, आरोग्‍य सभापती प्रा. उषाकिरण थुटे, जि.प. सदस्‍य काशिनाथ मंगेकर, जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. मिलिंद सोनोने, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. दिलीप माने, जिल्‍हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. एस.डी. निमगडे, डॉ. प्रविण धाकटे आदि मान्‍यवर मंचावर उपस्थित होते.
           जागतिक लोकसंख्‍या वाढी बरोबर देशाची व राज्‍याची लोकसंख्‍या वाढत असल्‍याचे सांगून जि.प. अध्‍यक्ष ढगे म्‍हणाले की या लोकसंख्‍येच्‍या वाढीमुळे अनेक विकासाची कामे पूर्ण न होता ती अपूर्ण राहतात. लोकसंख्‍येचे वाढीमुळे अनेक अडचणीला तोंड द्यावे लागत असून, विकास कामाचे केलेले नियेाजन कोलमडून पडत असते. वंशाचा दिवा म्‍हणून पुत्र प्राप्‍तीसाठी कुटूंबाची संख्‍या वाढत जाते परिणामी कुटूंबाच्‍या पालन पोषनाकडे  कुटूंब प्रमुखाचे दूर्लक्ष होत असते. मुलांप्रमाणे आज मुलींना बरोबरीचा सवैधानिक अधिकार दिलेला असल्‍यामुळे मुलगा व मुलीमध्‍ये भेदाभेद  न करता कुटूंबसंख्‍या सीमीत ठेवल्‍यास लोकसंख्‍येला निश्चित आळा बसू शकेल असेही ते म्‍हणाले.
          यावेळी बोलतांना आरोग्‍य सभापती श्रीमती थुटे म्‍हणाल्‍या की, ग्रामीण क्षेत्रात आरोग्‍याच्‍या सर्व सोयी शासनाने उपलब्‍ध करुन दिलेल्‍या आहेत त्‍याचा उपयोग ग्रामस्‍थांनी केला पाहीजे. देशाची तथा राज्‍याची लोकसंख्‍या दर दहा वर्षानी वाढत आहे. याला आळा घालण्‍यासाठी जनजागृती सोबत प्रभावी उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. अलिकडील काळात शासनाने आरोग्‍य संवर्धनासाठी विविध योजना कार्यान्वित केल्‍या आहेत त्‍याचा लाभ ग्रामीण क्षेत्रातील लोकांनी घेतला पाहीजे. स्त्रिभृण हत्‍या हा सामाजिक अपराध असून, त्‍यासाठी समाजात जागृती करणे आवश्‍यक आहे. कुटूंब सिमीत ठेवणे हे प्रत्‍येक पालकाचे कर्तव्‍य आहे. आरोग्‍य यंत्रणेने उत्‍कृष्‍ठ व गौरवपूर्ण कार्य केलेले असून, आरोग्‍य विभागाने ध्‍येय समोर ठेवून असेच गौरवपूर्ण कार्य करुन राज्‍यात जिल्‍ह्याचे नाव लौकीक करण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले.
            यावेळी प्रभारी जिल्‍हाधिकारी शेखर चन्‍ने म्‍हणाले की, स्‍वातंत्र्यपूर्व काळात जागतिक व देशाची लोकसंख्‍या नियंत्रणात होती मात्र देशाला स्‍वातंत्र्य मिळाल्‍यानंतर देशाची लोकसंख्‍या दर दहा वर्षानी वाढत आहे. हा चिंताजनक विषय आहे. लोकसंख्‍या वाढीचे दुष्‍परीणाम सर्वांना या ना त्‍या कारणांनी सहन करावे लागत असते. अलिकडे मुलाच्‍या हव्‍यासापोटी स्त्रिभृण हत्‍येचे प्रमाण वाढत असून, मुलाच्‍या तुलनेत मुलीचे प्रमाण कमी होत आहे. स्त्रि- पुरुषाच्‍या  असमानतेमुळे भविष्‍यात समाजामध्‍ये विपरीत परिणाम होण्‍याची शक्‍यता दृष्‍टीपथास येत आहे. लिंग परिक्षण चाचणी करणा-यामध्‍ये शिक्षित व श्रीमंत लोकांचा अधिक समावेश आहे. समाजातील या शिक्षित व आर्थिक समृध्‍द लोकांनी मुलगी व मुलगा यांच्‍यामध्‍ये फरक न ठेवता प्रत्‍येकाला त्‍यांच्‍या बुध्‍दीमत्‍तेनुसार शिक्षण देण्‍यात यावे. अलिकडे राष्‍ट्रीय ग्रामीण आरोग्‍य सेवा तसेच शासनाच्‍या  अनेक योजनामुळे प्रत्‍येकाच्‍या  आरोग्‍यामध्‍ये सुधारणा होत असून मनुष्‍याचे आर्युमान वाढविण्‍याचा प्रयत्‍न सुरु आहे. असेही ते म्‍हणाले.
        जागतिक लोकसंख्‍या दिना निमित्‍ताने सुखाचा आधार छोटा परिवार हे घोष वाक्‍य देण्‍यात आले असून, लेक वाचवा अभियानाला सुध्‍दा यावेळी प्रारंभ करण्‍यात आला.
      आनंदीबाई जोशी गौरव पुरस्‍कार अंतर्गत प्रथम पुरस्‍काराचे मानकरी पुलगाव येथील ग्रामीण रुग्‍णालय ठरले असून, त्‍यांना  50 हजाराचे पारितोषिक, सन्‍मानपत्र व स्‍मृतीचिन्‍ह तसेच प्राथमिक आरोग्‍य  केंद्राअंतर्गत प्रथम पारितोषिक साहूर प्रा. आरोग्‍य केन्‍द्र यांना 25 हजार रुपये, व्दितीय क्रमांकाचे 15 हजार रुपयाचे पारितोषिक प्रा. आरोग्‍य केंद्र कन्‍न्‍मवार ग्राम व तृतीय क्रमांकाचे 10 हजाराचे पारितोषिक प्रा. आरोग्‍य केंद्रकानगांवला, आरोग्‍य उपकेंद्रा अंतर्गत प्रथम क्रमांकाचे 15 हजाराचे पारितोषिक पानवाडी, व्दितीय कमांकाचे 10 हजाराचे पारितोषिक तारासावंगा व तृतीय क्रमांकाचे  5 हजार रुपये पारितोषिक सालदरा यांना मिहाला असून,उपकेंद्राला पुष्‍पगुच्‍छ  व सन्‍मान पत्र देवून मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रदान करुन गौरव करण्‍यात  आला.
     तसेच एक मुलीवर शस्‍त्रक्रिया करणारे एकूण 10 जोडप्‍यांचा शाल, साडी व चोळी तसेच सावित्रीबाई फुले कन्‍या कल्‍याण योजने अंतर्गत 10 हजाराचे पारितोषिक मान्‍यवरांचे हस्‍ते प्रदान करण्‍यात आले.
            यावेळी  देवळी, हिंगणघाट व आष्‍टी येथील सर्जन,आरोग्‍य मित्र यपुरस्‍कारा अंतर्गत तालुका आरोग्‍य अधिकारी, कुटूंब कल्‍याण कार्यक्रमात सर्वोत्‍कृष्‍ट काम करणारे कर्मचारी , प्राथमिक आरोग्‍य केंद्र तसेच उपकेंद्रातील आरोग्‍य कर्मचारी, आरोग्‍य सेविका, आरोग्‍य सैनिक व इतर कम्रचारी यांना प्रशसती पत्र देवून मान्‍यवरांच्‍या हस्‍ते गौरव करण्‍यात आला.
     कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. माने यांनी केले तर संचलन चौधरी व आभार प्रदर्शन डॉ. निमगडे यांनी मानले. कार्यक्रमाला जि.प. सदस्‍य तसेच आरोग्‍य  विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.
                                                            0000000

No comments:

Post a Comment