Friday 11 November 2011

प्रादेशिक असमतोल ; केळकर समितीच्या कामकाजाला वर्धेत सुरुवात

प्रसिध्दी पत्रक   महाराष्ट्र शासन  जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.11/11/2011
------------------------------------------------------------------
           प्रादेशिक असमतोल ; केळकर समितीच्या
                कामकाजाला वर्धेत सुरुवात
      वर्धा, दि.11- प्रादेशिक असमतोल उपाय योजनेसाठीच्या डॉ.विजय केळकर समितीने वर्धा जिल्ह्यात आपल्या कामकाजास सुरुवात केली असून, आज एका उपसमितीने जिल्हाधिकारी जयश्री भोज यांच्याशी याबाबत चर्चा करुन माहिती घेतली.
     या उपसमितीची ही वर्धा जिल्ह्यात पहिली भेट होती. प्रादेशिक असमतोलाबाबत असणा-या कारणांचा अभ्यास ही समिती करणार असून, त्याबाबतच्या सूचनांचा अहवाल शासनास सादर करणार आहे.
     या उपसमितीत केळकर समितीचे विदर्भ समन्वयक डॉ.श्रीहरी चावा, हिस्लॉप महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. स्नेहा देशपांडे, बेंजामिन महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. ज्योत्स्ना देशपांडे तसेच जागतिक बँकेचे सल्लागार डॉ.श्रीकांत बारहाते यांचा समावेश होता.
     जिल्ह्यातील आर्थिक आणि भौतिक विकास कसा असावा आणि तो प्रत्यक्षात कसा होत आहे. जीवनमान उंचावण्यासाठी शासन यंत्रणेचा सहभाग तसेच निधीचा विनियोग या विषयावर जिल्हाधिकारी भोज यांनी यावेळी माहिती दिली.
     कृषी, उद्योग, आदिवासींचे जमिनीचे प्रश्न, सिंचन आणि वीज, आरोग्य सुविधा तसेच रस्तेविकास आदी विविध विषयांवर या बैठकीत चर्चा झाली.
     ही उपसमिती जिल्ह्यातील एक विकसनशील आणि एक मागास तालुका असणा-या समुद्रपूर आणि कारंजा या तालुक्याच्या ठिकाणी भेट देणार आहे. 22 नोव्हेंबर रोजी या ठिकाणांवर तालुका स्तरावरील अधिकारी आणि शेतकरी यांच्या भेटी घेऊन त्यांच्या कडून आलेल्या सूचनांचे संकलन समिती करेल.
     येणा-या काळात जिल्ह्यातील खासदार तसेच आमदार व इतर लोकप्रतिनिधी, शेतकरी नेते, शेतकरी तसेच पत्रकार यांच्यासोबत भेट घेऊन वर्धा जिल्ह्याच्या स्थितीत बदल घडविण्याबाबत सूचनांवर चर्चा करणार आहे. आजच्या बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ब-हाटे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले आदींची उपस्थिती होती.
                                                            0000
    

No comments:

Post a Comment