Sunday 6 June 2021

 






पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या प्रांगणात उभारली शिवशक राजदंड गुढी

शिवस्वराज्य दिन जिल्ह्यात उत्साहात साजरा

 

     वर्धा, दि 6 जून (जिमाका):-  महाराष्ट्राच्या जनतेला एका चैत्यन्य सूत्रात बांधून महाराष्ट्राचे सत्व आणि स्वत्व जोपासणाऱ्या राजकीय इतिहासाची पायाभरणी  छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. दीर्घकाळ परकीयांची राजवट आणि अनागोंदी अनुभवणाऱ्या महाराष्ट्राच्या रयतेला स्वातंत्र्य आणि सुबत्ता मिळवून दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला होता. हा सुवर्ण दिवस राज्यशासनाने शिवस्वराज्य दिन म्हणून संपूर्ण राज्यात साजरा करण्याचे ठरवले. आज जिल्हा परिषदेच्या प्रांगणात पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी शिवशक राजदंड गुढी उभारून जनतेला शिवस्वराज्य दिनाच्या शुभेच्छा दिल्यात.

याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रगित आणि महाराष्ट्र गीताने सांगता झाली. यावेळी खासदार रामदास तडस, जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, आमदार रणजित कांबळे, आमदार दादाराव केचे, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, जिल्हा परिषद उपाध्यक्षा वैशाली येरावार, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे, अरीरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, जिल्हा परिषद सदस्य व इतर अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात प्रत्येक पंचायत समिती आणि ग्रामपंचायत मध्ये आज स्वराज्याची गुढी उभारून शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला.

11 रुग्णवाहिकांचे लोकार्पण

राज्यशासनाच्या निधीतून प्राप्त झालेल्या 11 रुग्णवाहिकांचे लोकार्पण यावेळी पालकमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते रुग्णवाहिका चालकाला गाडीची कागदपत्रे व किल्ली देऊन करण्यात आले. या 11 रुग्णवाहिका आंजी, वायफळ, सारवाडी, खरंगाणा गोडे, अंतोरा आणि जळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला तसेच देवळी, पुलगाव ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट  आणि दोन  सामान्य रुग्णालय वर्धा येथे देण्यात आल्यात. दुसऱ्या लाटेत एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढल्यामुळे रुग्णांसाठी  खाजगी रुग्णवाहिका अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. या 11 रुग्णवाहिका पुढे अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.

00000

 

प.क्र- 416                                                                    दि.6.06.2021

 

कोरोना नियमांचे पालन करूनच नागरिकांनी व्यवहार सुरू ठेवावेत

                                      -  पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

 

Ø  कोविड परिस्थितीचा घेतला आढावा

Ø  नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे

Ø  लसच आपल्याला तिसऱ्या लाटेपासून वाचवेल.

 

     वर्धा, दि 6 जून (जिमाका):- आपला जिल्हा शासनाने ठरवून दिलेल्या निकषातील तिसऱ्या टप्प्यात येत असल्यामुळे जिल्ह्यात  सर्वच बाबतीत शिथिलता देण्यात आली असली तरी नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून व्यवसाय आणि व्यवहार करणे आवश्यक आहे. अति उत्साहामुळे आपल्या कुटुंबाला आणि जिल्ह्याला आपण पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत घेऊन जाणार नाही याची काळजी प्रत्त्येक नागरिकाने घ्यावी असे आवाहन करून प्रशासनाने नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी अशा सूचना  पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा वर्धा  जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड संसर्ग परिस्थितीचा आढावा घेताना श्री केदार बोलत होते. यावेळी आमदार रणजित कांबळे, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सचिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अजय डवले, सेवाग्राम आयुर्विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ नितीम गंगणे, सावंगी रुग्णालयाचे डॉ अभ्युदय मेघे, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, मुख्याधिकारी विपीन पालिवाल उपस्थित होते.

कोविड चाचणी करण्यात जिल्हा सहाव्या स्थानावर असल्याबाबत समाधान व्यक्त करतानाच श्री केदार यांनी जिल्ह्यात टेस्टिंग वाढविण्याच्या सूचना केल्यात. तसेच कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना चाचण्या वाढवल्या पाहिजेत असेही ते म्हणाले. 

जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला मधल्या काळात चांगला वेग मिळाला होता. त्यामुळे जिल्ह्यात 45 ते 60 व त्यापुढील वयोगटातील लोकांचे 40 टक्के लसीकरण झाले याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र लसीच्या तुटवडयामुळे तो वेग कमी झाला. आता पुन्हा जिल्ह्याला 41 हजार लसी प्राप्त असून ग्रामीण भागात जनतेला लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. जुलै महिन्याच्या अखेरीस आपल्या जिल्ह्यातील 50 टक्केपेक्षा जास्त लसीकरण व्हायला पाहिजे. लसीकरणच आपल्याला तिसऱ्या लाट पासून वाचवू शकेल. लस घेतल्यामुळे शरीरात कोरोना विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी शरीरात प्रतिपिंडे तयार होतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही किंवा झाला तरी त्याची लक्षणे अगदी सौम्य असतात. यामुळे लोकांचे प्राण, वेळ आणि पैसा दोन्हीची पुढील काळात बचत होईल. त्यामुळे  ग्रामीण भागातील नागरिकानी त्यांचा पहिला आणि दुसरा डोज पूर्ण करावा असे आवाहन यावेळी श्री केदार यांनी केले.आरोग्य विभागाने याबाबत जनजागृती करावी अशा सूचना त्यांनी दिल्यात.

शासनाने पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिका खरेदी करून जिल्ह्याला पाठविल्या आहेत. आपल्या जिल्ह्याला 11 रुग्णवाहिका मिळाल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना यामुळे लवकर रुगणालायात पोहचविणे सोपे होईल.

म्युकर मायकोसिस आजाराचे जिल्ह्यात आतापर्यंत 93 रुग्ण आढळून आलेत. त्यापैकी 4 रुग्णांचा मृत्यू झाला तर 21 रुग्ण बरे झाले आहेत. उर्वरित 68 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  कोविड मधून बऱ्या झालेल्या रुग्णांनी या आजाराबाबत दक्ष असावे. काहीही लक्षणे वाटल्यास तात्काळ डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत. त्यासाठीचे औषधी आपल्याकडे पुरेशा प्रमाणात आहेत असेही श्री केदार यावेळी म्हणाले.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कोविड संदर्भात माहिती देताना जिल्ह्याचा आज संपलेल्या आठवड्याचा पॉझिटिव्हीटी दर 4.59 टक्के असल्याचे सांगितले. तसेच मृत्युदर 1. 89 असून  रुग्ण दुप्पट होण्याचा वेग हा 200 दिवस असल्याची माहिती दिली.

 

000000000

 

 

 


No comments:

Post a Comment