Friday 11 June 2021

 




          पालक सचिव जयश्री मुखर्जी यांच्याकडून जिल्ह्याचा आढावा

ऑक्सिजन ऑडिट, खाटा व्यवस्थापन, घरपोच आठवश्यक सेवा, आणि घरगुती नळ जोडणीचे कामाचे कौतुक

        वर्धा, दि 11 जून (जिमाका):-  वर्धा जिल्ह्याच्या पालक सचिव तथा अल्पसंख्यांक विकास विभागाचा अप्पर मुख्य सचिव जयश्री मुखर्जी यांनी आज  दुरदृश्य प्रणालीद्वारे वर्धा जिल्ह्यातील विकासात्मक कामे, कोविड संसर्ग आणि तयारी बाबत आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्ह्यात कोरोना काळात राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे तसेच  ऑक्सिजन बचत, खाटा उपलब्धतेसाठी केलेल्या उपाययोजना आदी कामाबाबत कौतुक केले.

 

        यावेळी त्यांनी आरोग्य, कृषी विभाग, महिला व बालकल्याण,  एकात्मिक बाल विकास, शिक्षण विभाग , समाजकल्याण , ग्रामीण पाणीपुरवठा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा इत्यादी विभागांचा आढावा घेतला. 

         जल जीवन मिशन अंतर्गत सन 2021- 22 मध्ये 56 हजार 30 नळ जोडणी देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी एप्रिल व  मे महिन्यात 4 हजार 40 नळ जोडणी देण्यात आल्या बाबत त्यांनी समाधान व्यक्त करून प्रत्येक कुटुंबापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहचायला हवे यासाठी उर्वरित जोडण्या यावर्षी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्यात. 

          तसेच ग्रामीण भागात मुलींना शिक्षण घेण्यासाठी इयत्ता आठवीनंतर बाहेरगावी जावे लागते. त्यासाठी मुलींना जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून सायकल घेण्यासाठी अनुदान देण्यात येते. 2020 21 मध्ये 207 विद्यार्थिनीना लाभ देण्यात येणार असून त्यापैकी आतापर्यंत128 मुलींच्या खात्यात अनुदान जमा करण्यात आले आहे. श्रीमती मुखर्जी यांनी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या या योजनेचे कौतुक केले. 

महाआवास योजनेचा आढावा घेताना श्रीमती मुखर्जी यांनी ज्यांच्याकडे घरकुल बांधण्यासाठी जमीन नाही त्यांना       जमीन खरेदी करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून द्यावे अशा सूचना केल्या.

        तसेच जिल्ह्याने कोरोना संसर्ग काळात राबविलेल्या ऑक्सिजन ऑडिट, खाटांचे व्यवस्थापन करण्यासाठी रेफरल प्रोटोकॉल, औषधांच्या उपलब्धतेसाठी पारदर्शक प्रणाली, जिल्ह्याच्या सीमेवर राबवलेली कडक नाकाबंदी,आणि लॉकडाऊन कालावधीत नागरिकांना घरपोच अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा आणि शेतकऱ्यांना बांधावर खते आणि बियाणे पोहचविणे यासाठी केलेल्या उपाययोजनाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

         यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातुन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओंबासे, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके उपस्थित होते तर इतर अधिकारी त्यांच्या कार्यालयातून सहभागी झाले होते.

                                                0000

No comments:

Post a Comment