Thursday 23 March 2017



              महिलांनी लघुउद्योगासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा आधार घ्यावा.
                                   
                                     - सभापती गंगाधर कोल्हे
           हिंगणघाट व समुद्रपूर येथील मेळाव्यात 2 कोटी  रुपयांचे कर्ज वितरण
        वर्धा दि 23 (जिमाका ):- महिलांच्या आर्थिक विकासाशिवाय  देशाचा  संपूर्ण  विकास  होऊ शकत नाही. त्यामुळे महिलांनी नोकरी सोबतच स्वतःमध्ये असलेल्या कौशल्याच्या आधारे लघु उद्योग उभारावा.त्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा लाभ घ्यावाअसे आवाहन  हिंगणघाट पंचायत समितीचे सभापती गंगाधर कोल्हे यांनी केले.  हिंगणघाट येथे कलोडे सभागृहात आयोजित प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते.
           या कार्यक्रमाला पंचायत समिती  उपसभापती धनंजय रिठे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक वामन कोहाड, जिल्हा  माहिती अधिकारी मनीषा सावळे, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक देवकुमार कांबळे तसेच बँकांचे  व्यवस्थापक  उपस्थित होते.
               
पाणी हे  जीवन समजून त्याचा चांगला उपयोग करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा असेही आवाहन श्री कोल्हे त्यांनी जागतिक जलदिनी केले.
                 
यावेळी मार्गदर्शन करताना श्री कोहाड म्हणालेबँका, बचत गटांना मोठ्या प्रमाणात कर्ज देतात.त्याचा उपयोग करून  आज ग्रामीण भागात छोटे मोठे गृह उद्योग सुरु आहेत. महिलांनी शिक्षण - प्रशिक्षणाकडे लक्ष देऊन व्यवसाय सुरु करण्यासाठी योग्य ज्ञान आत्मसात करावे. उत्तम कौशल्य गुणांच्या आधारे कोणताही व्यवसाय महिला करू शकतात. मुद्रा योजनेचा लाभ पारंपारिक  व्यवसाय करणा-यांसोबतच नवीन व्यवसाय सुरु करणा-याला सुद्धा होऊ शकतो. कोणतेही तारण न ठेवता या योजनेतुन   कर्ज सहज उपलब्ध होत असल्यामुळे महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेतून कर्ज उपलब्ध होणे साठी  अडचण आल्यास कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहनही  वामन कोहाड यांनी केले.
                यावेळी बोलताना म. ग्रा. जी. अ. चे व्यवस्थापक देवकुमार कांबळे यांनी सर्व महिलांचे वैयक्तिक खाते बँकेत  उघडून द्यावे, अशी विनंती सर्व बँकांना केली.  महिलाबचत गटाच्या माध्यमातून केलेल्या बचतीमुळे देशाच्या विकासात महत्वाचा  सहयोग देत आहेत.  मुद्रा बँक योजनेतून महिलांनी स्वयंरोजगार करून देशाच्या आर्थिक विकासात भर घालावी. आपल्या योजना या मोबाईल अँप चा वापर करून योजनांचा लाभ घ्यावा  असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
असाच मेळावा समुद्रपूर येथेही घेण्यात आला.दोन्ही मेळाव्यात 187 बचत गटांना 2 कोटी 15 लाख रुपयांचे कर्ज मंजूरीचे पत्र देण्यात आले.
यावेळी बचत गटाच्या महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
                                                            0000

No comments:

Post a Comment