Monday 17 October 2016




वर्धा , दि. 17  (जिमाका) :  जिल्‍ह्याच्‍या महत्‍वाच्‍या पदावर जेव्‍हा महिला अधिकारी विराजमान होते, तेव्‍हा महिलांचे विषय किती संवेदनशीपणे हाताळले जातात. याचा अनुभव सध्‍या जिल्‍हा परिषदमध्‍ये काम करणा-या महिला कर्मचा-यांना येत आहे. महिलांना मासिक पाळीच्‍या काळात लागणारी सॅनिटरी नॅपकीन ही अत्‍यंत निकडीची वस्‍तु आहे. याची जाणीव ठेवून जिल्‍हा परिषद मुख्‍य कार्यकारी अधिकारी म्‍हणुन रुजु होताच नयना गुंडे यांनी तीन महिन्‍याच्‍या आत सॅनिटरी नॅपकीन उपलब्‍ध करुन देणारी आणि त्‍याची विल्‍हेवाट लावणारी व्‍हेण्‍डींग मशीन बसवून नोकरी करणा-या महिलांची मासिक पाळीच्‍या वेळी होणारी कुचंबना थांबली आहे.
          जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष चित्रा रणनवरे यांच्‍या हस्‍ते या सॅनिटरी नॅपकीन व्‍हेन्‍डींग मशीनचे उद् घाटन करण्‍यात आले. यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे उपस्थित होत्‍या.
          नोकरी करणा-या महिलांना कामावर असताना अचानक सुरु होणा-या मासिक पाळीमुळे अडचणींना सामोरे जावे लागते. अनेकदा सोबत सॅनिटरी नॅपकीन नसल्‍यामुळे त्‍यांची स्थिती अवघडल्‍यासारखी होते. महिलांच्‍या या अतिशय संवेदनशील आणि निकडीच्‍या विषयाला मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांनी हात घातला. या मशिनमध्‍ये पाच रुपयांचे नाणे टाकल्‍यास एक सॅनिटरी नॅपकीन बाहेर येते. त्‍यामुळे ऐनवेळी महिलांची होणारी तारांबळ यामुळे थांबेल. तसेच वापरलेले नॅपकिनची विल्‍हेवाट लावण्‍यासाठी सुध्‍दा मशीन आहे. त्‍यामुळे जिल्‍हा परिषद महिला कर्म-यांमध्‍ये आनंद व्‍यक्‍त होतोय.
          वास्‍तविक हा विषय स्‍वच्‍छ भारत अभियानाच्‍या दृष्‍टीने अतिशय महत्‍वाचा आहे. रेल्‍वेस्‍थानक, बसस्‍थानक, शासकीय कार्यालये, महाविद्यालये, शाळा तसेच खाजगी आस्‍थापना येथील महिलांची प्रसाधनगृहे बघितल्‍यास तेथे वापरलेले सॅनिटरी नॅपकीन कोंबलेले, इतरततः पडलेले दिसतात. कारण त्‍याची विल्‍हेवाट लावण्‍यासाठी कोणतीच व्‍यवस्‍था अद्याप या ठिकाणी उभी झाली नाही. त्‍यामुळे नाईलाजाने महिलांना ती अशी इतरत्र फेकावी लागतात. या सर्व ठिकाणी सॅनिटरी नॅपकीनची विल्‍हेवाट लावणारी आणि उपलब्‍ध करुन देणारी व्‍हेण्‍डींग मशीन लावल्‍यास स्‍वच्‍छ भारत अभियानास तर हातभार लागेलच पण महिलांची कुचंबनाही थांबेल.
000000
         


No comments:

Post a Comment