Monday 17 October 2016

उज्‍वला योजनेत जिल्‍ह्यांचा लक्षांक वाढवणार
-          खा. रामदास तडस
Ø जिल्‍ह्यात 10 हजार लाभार्थ्‍यांना वाटप
Ø जिल्‍हा धूरमुक्‍त करणार
Ø जिल्‍ह्यात 8 हजार लोकांनी गॅस सबसीडी सोडली
वर्धा, दि.17- स्‍वयंपाकासाठी लाकडे गोळा करताना गरीब महिलांना अतिशय कष्‍ट  तर पडतातच पण त्‍यापासुन होणा-या धुरामुळे महिला व त्‍यांच्‍या कुंटुंबाचे शारिरिक स्‍वास्‍थ बिघडते. महिलांची अशा कष्‍टदायी कामातुन मुक्‍ती करण्‍यासाठी आणि त्‍यांच्‍या चांगल्‍या आरोग्‍यासाठी जिल्‍ह्याचा उज्‍वला योजनेतील लक्षांक 5 हजाराने वाढवण्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍याची ग्‍वाही खासदार रामदास तडस यांनी आज दिली.
विकास भवन येथे पेट्रोलियम व प्राकृतिक गॅस मंत्रालयाच्‍या प्रधानमंत्री उज्‍वला योजनेतील लाभार्थ्‍यांना एल.पी.जी कनेक्‍शन देण्‍याच शुभारंभ आज करण्‍यात आला. याप्रसंगी श्री. तडस बोलत होते. यावेळी जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल, जिल्‍हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड, उज्‍वला योजनेचे नोडल  अधिकारी आदित्‍य टांक, विनोद साळुंके, विश्‍वास कमाने उपस्थित होते.
     पुढे बोलताना श्री. तडस म्‍हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना महिलांच्‍या कष्‍टांची जाणीव आहे. त्‍यामुळे महिलांची या सर्व कष्‍टातुन सुटका करुन त्‍यांना सन्‍मान देण्‍यासाठी त्‍यांनी उज्‍वला योजना सुरु केली. त्‍याचबरोबर सधन कुटुंबांनी गॅसचे अनुदान सोडण्‍यासाठी मोठ्या प्रमाणात अभियान राबविले. जिल्‍ह्यातही 8 हजार लोकांनी गॅसचे अनुदान सोडले आहे.  त्‍याचा फायदा गरीब कुटुंबाना उज्‍वला योजनेत समाविष्‍ट करण्‍यासाठी झाला आहे.
यावेळी बोलताना जिल्‍हाधिकारी म्‍हणाले, चुलीच्‍या धुरामुळे संपूर्ण कुटुंबाला आरोग्‍याच्‍या समस्‍या भेडसावतात. उज्‍वला योजनेमुळे महिलांचे कष्‍ट व वेळ वाचेल आणि त्‍यांना मुलांकडे जास्‍त लक्ष देता येईल. संपूर्ण जिल्‍हा धूरमुक्‍त करण्‍यासाठी प्रयत्‍न करावे लागतील. उज्‍वला योजनेचा लाभ घेतलेल्‍या महिलांनी याचा कायम उपयोग करावा असे आवाहन त्‍यांनी केले.
यावेळी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते 150 लाभार्थ्‍यांना एल.पी.जी जोडण्‍यांचे वाटप करण्‍यात आले. हिंदुस्‍थान पेट्रोलियमचे विनोद साळुंके यांनी गॅस वापरताना घ्‍यावयाची काळजी यासंबंधी माहिती दिली. तसेच प्रास्‍ताविक करताना आदित्‍य टांक यांनी देशभरात 3 वर्षात 5 कोटी लाभार्थ्‍यांना या योजनेचा लाभ देण्‍याचे उदिष्‍ट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ठेवले आहे. यासाठी 1600 रुपये अनुदान केंद्र शासन देत आहे. 1 मे, 2016 रोजी उत्‍तरप्रदेशमधील बलिया या गावात या योजनेचा प्रधानमंत्र्यांनी शुभारंभ केला. आता पर्यंत 80 लाख जोडण्‍या देण्‍यात आल्‍या आहेत. वर्धा जिल्‍ह्यात 10 हजाराचे लक्षांक देण्‍यात आले आहे. त्‍याचा आजपासुन प्रारंभ होत असुन 1 महिन्‍यात सर्व 10 हजार बी.पी.एल कुटुंबांकडे उज्‍वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्‍शन देण्‍यात येणार आहे अशी माहिती त्‍यांनी दिली. या कार्यक्रमाचे संचालन आतिफ इब्राहिम यांनी केले तर आभार आदित्‍य टांक यांनी मानले. यावेळी उज्‍वला योजनेतील लाभार्थी उपस्थित होते.
0000000




No comments:

Post a Comment