Thursday 17 May 2012

पाणी टंचाई निवारणार्थ अतिरीक्‍त पुरक कृती आराखडा 2 कोटी 41 लक्ष रुपयाचा


    वर्धा,दि.17- पाणी टंचाई निवारणार्थ यावर्षी उन्‍हाळ्यात करावयाच्‍या उपाय योजनांचा अतिरीक्‍त पुरक कृती आराखडा तयार करण्‍यात आला असून, पाणी टंचाईचे 159 गावातील 203 उपाय योजनेसाठी 2 कोटी 41 लक्ष 98 हजार रुपयाचा खर्च अपेक्षित असल्‍याची माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता डि.एस.बोरकर यांनी दिली.
     पाणी टंचाई निवारणार्थ यापूर्वी माहे जानेवारी ते जून 2012 या कालावधीत 85 टंचाईग्रस्‍त गावांमध्‍ये शंभर उपाययोजनेवर 71 लक्ष 46 हजार रुपयाचा कृती आराखडा तयार करण्‍यात आला होता. आता पाणी टंचाई निवारणामध्‍ये अतिरीक्‍त पुरक कृती आराखडा तयार करण्‍यात आला असून, आता दोन्‍ही  मिळून एकत्रीतरित्‍या 244 टंचाईग्रस्‍त गावात एकूण 303 उपाय योजना राबविण्‍यात आल्‍यास  त्‍यासाठी 3 कोटी 13 लक्ष 44 हजार रुपये खर्च अपेक्षित असून, अतिरीक्‍त पूरक  कृती आराखडा प्रशासनाला सादर करण्‍यात आला आहे.         
जानेवारी ते जून 2012 सार्वजनिक विहीरीची संख्‍या  3 होती. आता अतीरिकत कृती आराखड्यामध्‍ये 8 वि‍हीरीची वाढ होऊन 11 झाली आहे. खाजगी विहीर अधिग्रहणाची संख्‍या पूर्वी 56 होती अतिरीक्‍त कृती आराखड्यामध्‍ये 39 ची वाढ होऊन एकूण 95 झालेली आहे. ट्रॅक्‍टर किंवा बैलगाडी व्‍दारे पाणी पुरवठा करणा-यांची संख्‍या यापूर्वी 10 होती. नवीन कृती आराखड्यामधे 8 ने वाढ होऊन 18 झाली आहे. नगरपालीका पाणी पुरवठा विशेष दुरुस्‍तीची कामे यापूर्वी 22 होती ती आता नवीन कृती आराखड्यानुसार 85 नी वाढ झाली असून 107 झाली आहे. तात्‍पुरत्‍या पुरक योजनेत नवीन कृती आराखड्यानुसार 3 कामाची वाढ झाली आहे. प्रगतीपथावरील एक नळ पाणी पुरवठा योजना तसेच यापूर्वी प्रस्‍तावित केलेल्‍या 7 विंधन विहीर व आता नव्‍याने कृती आराखड्यातील 57 एकत्रीत केल्‍यास 64 विंधन विहीरी घेण्‍यात येतील. विशेष विंधन विहीरीचे यापूर्वी दोन व आता कृषी आराखड्यामध्‍ये दोन विंधन विहीरीची एकत्रीत संख्‍या चार झाली आहे. पाणी टंचाईवर मात करण्‍यासाठी प्रशासन सज्‍ज झाले असूऩ ग्रामीण भागात तातडीने पाणी पुरवठ्यासाठी योग्‍य ती उपाययोजना करीत असल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगितले.
                              00000

No comments:

Post a Comment