Tuesday 25 May 2021

 

..क्र-375                                                                     दि.25.05.2021

              कोविड नंतरचा पाहुणा ‘म्यूकरमायकोसिस’ घातकच

पण वेळीच उपचार घेतल्यास रुग्ण होतो बरा

                               -डॉ. एस.पी. कलंत्री

    वर्धा दि.25(जिमाका) कोविड-१९ विषाणूनंतर राज्यात नव्हे तर देशात पाहूणा म्हणून पावले उमटवित असलेला म्यूकरमायकोसिस हा आजार वेळीच निदान न झाल्यास घातकच आहे. असे असले तरी रुग्णाने वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांकडून औषधोपचार घेतल्यास रुग्ण बरा होऊ शकतो. त्यामुळे या पाहूण्या आजाराला घाबरण्याचे कारण नाही. केवळ नागरिकांनी दक्ष राहून विशिष्ट काळजी घेण्याची गरज असल्याचे सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. पी. कलंत्री यांनी सांगितले आहे.

         पूर्वीच विविध आजारांची लागण असलेले व्यक्ती तसेच अनेक व्यक्ती कोविडमुक्त झाल्यावर बिनधास्त होतात. कोविडमुक्त झाल्यावर सुरूवातीच्या काळात अनेकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते याच काळात म्यूकर हा सूक्ष्म  फंगस मनुष्याच्या शरिरात नाकाद्वारे प्रवेश करतो.  त्यानंतर तो मनुष्याच्या शरिरातील डोळे, नाक या अवयवांना इजा पोहोचविण्यास सूरूवात करतो. नाक बुजणे, दात दुखणे, गालावर सुज येणे, डोळ्यांनी अंधुक दिसणे आदी याची प्राथमिक लक्षणे आहेत. याच काळात या आजाराचे निदान झाल्यास रुग्ण लवकर बरा होऊ शकतो.  तर त्यानंतर हा आजार गंभीर रुप धारण करीत असल्याने रुग्णही गंभीर होतो. सीटीस्कॅनद्वारे या आजाराची नुकसानपातळी तपासता येत असली तरी सध्या म्यूकरमायकोसिस बाधितांवर उपचार करताना लागणा-या आवश्यक महागड्या औषधांचा काळाबाजार होण्यास सुरूवात झाल्याने औषधेही दुर्मिळ झाली आहेत. असे असले तरी शासनाने म्यूकरमायकोसिस बाधितांवर उपचार करण्यासाठी महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ४० हजारांचे पॅकेज दिल्याने शासनाचे हे पॅकेज रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना दिलासा देणारे आहे. त्यामुळे नागरिकांनी या पाहूण्या आजाराला न घाबरता लक्षणे आढळल्यास नजीकच्या रुग्णालयात जावून तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा, असेही डॉ. कलंत्री यांनी स्पष्ट केले आहे.

                                      0000

No comments:

Post a Comment