Saturday 5 January 2019










गुणवंत शेती करायला लागतील तेव्हा शेती उद्योगाला प्रकाशवाट मिळेल
                                             - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
- कृषी महोत्सवाचे उदघाटन

-

          वर्धा दि 5 (जिमाका ) :- नोकरी सोडून जेव्हा अनेक गुणवंत विद्यार्थी शेती करायला  तयार होतील तेव्हाच शेतीतील अंधाराला प्रकाशाची वाट मिळेल. शेतीतील उत्कर्षाची ती नांदी असेल आणि लालबहादूर शास्त्रींनी दिलेला जय जवान जय किसान चा नारा तेव्हाच खऱ्या अर्थाने पूर्णत्वास जाईल, असे प्रतिपादन अर्थ, नियोजन व वन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार  यांनी केले.
 
         पोलीस मैदान येथे कृषी विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
  5 दिवस चालणारया कृषी महोत्सवाचे उदघाटन श्री मुनगंटीवार यांचे हस्ते झाले, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार रामदास तडस, आमदार रामदास आंबटकर, आमदार डॉ पंकज भोयर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कांचन नांदूरकर,  नगराध्यक्ष अतुल तराळे
कृषी सभापती मुकेश भिसे, शिक्षण व आरोग्य सभापती
  जयश्री गफाट, सुनीता कलोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, पंचायत समिती सभापती नीता गजाम , वर्धा पंचायत समिती सभापती महानंदा ताकसांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
            यावेळी बोलताना ते म्हणाले की,कृषी विद्यापीठांनी राजुरी विद्यापीठासारखे अडीच एकरात साडेचार लाख उत्पन्न मिळवून देण्याचे संशोधन करावे. यासाठी पाहिजे तेवढा निधी बजेट मधून देण्यात येईल. राज्याच्या तोजोरीवर शेतकऱ्याचा पहिला हक्क आहे. त्यामुळे शेती उदयोग फायद्याचा करण्यासाठी असे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहचवीणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
       शेतीच क्षेत्र जे पूर्वी सरासरी 4. 28 हेक्टर होतं ते आता 1.44 हेक्टर एवढं कमी झालं आहे. त्यातही बहुपिक पद्धती संपुष्टात आली असून अधिक उत्पन्न घेण्याच्या नादात आपण शेतीला विषयुक्त केलेलं आहे. त्यामुळे शेतीला विषमुक्त, करण्यासाठी सेंद्रिय शेतीची नितांत गरज आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा देशात सेंद्रिय शेतीसाठी पदम पुरस्कार देण्यात आला. मातीची सेवा केल्याशिवाय त्यातून सोन निघू शकत नाही हे सांगताना ते म्हणाले की, जगात कितीही शोध लागले तरी शेतीशिवाय अन्नधान्याचा पिकवण्याचा शोध अद्याप लागलेला नाही. त्यामुळे जगाचे पोट भरण्याची ताकद फक्त आणि फक्त शेतकऱ्यांमध्ये आहे.
त्यामुळे शेतकऱयांनी सुद्धा जे जगाच्या बाजारात विकू शकतो त्याचे उत्पादन घ्यावे असे आवाहन केले.  भूमातेची सेवा करणारया  शेतकऱ्यासाठी हा कृषी महोत्सव धन प्राप्त करणारे पर्व ठरावे अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. श्री मुनगंटीवार यांनी यावेळी महित्सवात लागलेल्या स्टॉलची पाहणी केली.
        यावेळी बोलताना खासदार रामदास तडस म्हणाले,  नाशिकच्या धर्तीवर विदर्भातील शेतमाल एक्स्पोर्ट करायला हवा.  फळबाग लावण्यासाठी प्रोत्साहित करून विदर्भातील शेतकरी सधन करण्याचे काम होत आहे. नाविन्यपूर्ण योजनेतून 'गोट मार्केट' ला निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. 
         कृषी महोत्सवाची सुरुवात अर्थमंत्र्यांनी केली असे डॉ पंकज भोयर म्हणाले. मागील वर्षी जाहीर केलेल्या कृषी भवनाचे आज  भूमिपूजन झाले. यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उओलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले. पाटील यांचे सीताफळ अंबानी विकत घेतात पण कृषी विभागालाच याची माहिती नाही . शेतकऱ्यांच्या समस्यांची गंभीरपणे दखल घेतली जात नाही.याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.  कामचुकार अधिकाऱ्यांकडे संपूर्ण विभाग बदनाम होत असतो असेही ते म्हणाले.  शेतकरी आत्महत्येचा जिल्ह्याला लागलेला कलंक पुसण्याचे काम अधिकाऱयांनी करावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
 
           यावेळी सर्वाधिक उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱयांचा पुरस्कार देण्यात आला यामध्ये विक्रमी सीताफळाची उत्पादन घेणारे  समुद्रपूर तालुक्यातील हळदगाव येथील  सुरेश पाटील, पवनारचे कुंदन वाघमारे  सुल्तानपूर हिंगणघाट चे रतनलाल बोरकर, भाजीपाला व फुलशेतीमध्ये  जया उघडे यांना  प्रथम क्रमांकाचे  पारितोषिक, सुधाकर शेंडे धानोली गावंडे, गोपाळ वाघमारे सेंद्रिय शेतीसाठी  सविता येळणे,  श्रीकांत  सर्वाधिक कापुस उत्पादन घेणारे  येरणगाव येथील महेश मुधोळकर यांना प्रथम पुरस्कार देण्यात आला. तसेच गुलाबीबॉण्डअळींचे व्यवस्थापन , विविध पिकांवरील रोगांचे व्यवस्थापन  आणि  कृषी विषयक योजनाची माहिती देणाऱ्या माहिती  पुस्तिकेचे  विमोचन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  यांनी केले. महोत्सवाला शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


000



No comments:

Post a Comment