Wednesday 2 January 2019






               सुनंदा चौधरी  यांचा  मुख्यमंत्र्यांशी संवाद
• स्वतःच घर मिळाल्यामुळे आता आईच्या घरी राहावे लागणार नाही
• विविध आवास योजनेतील लाभार्थ्यांचा मुख्यमंत्र्यांशी संवाद

·        आवास योजनेतील लाभार्थ्यांना मिळणार 5 ब्रॉस रेती
           वर्धा दि. 2 (जि.मा.का.):   पंडित दिनदयाळ उपाध्याय योजनेतून जागा खरेदीसाठी पन्नास हजार मिळाले, प्रधानमंत्री आवास योजनेतून घर बांधण्यासाठी पैसे मिळाले अन स्वच्छता गृहासाठी रोहयोमधून अनुदान मिळाले त्यामुळे आम्हाला आता आईच्या घरी  राहावे लागणार नाही अशी भावनिक प्रतिक्रिया उमरी मेघे  येथे हक्काचे स्वतःचे पक्के घर मिळालेल्या सुनंदा अनिल चौधरी  यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधताना व्यक्त केली.

       आज मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील विविध घरकुल योजनेतील लाभार्थ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधुन त्यांच्या भावना आणि योजनेतील अडचणी जाणून घेतल्या. यावेळी वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयातील व्हिडीओ कॉन्फरन्स सभागृहातुन  उमरी मेघे येथील सुनीता अनिल चौधरी,  कविता निरंजन  दखणे, कविता आणि जितेश कोट्टेवार रा. समर्थ वाडी, सविता सुरेशराव गायकवाड  रा वर्धा यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी प्रधानमंत्री आवास योजना
(ग्रामीण, शहरी ), रमाई आवास योजनेतील एकूण 19
  लाभार्थी उपस्थित होते.

          सुनीता चौधरी यांचे 2010 मध्ये लग्न झाले असून त्यांच्या यजमानांचे स्वतःचे घर नसल्यामुळे  लग्नानंतर आईच्या घरी एका छोट्याश्या खोलीत त्यांचा संसार सुरू आहे. त्यांचे यजमान गवंडी काम करत असूनही आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे स्वत:चे घर बांधू शकत नसल्याचे दुःख होते. घर बांधायला त्यांच्याकडे जागाही नव्हती. पंडित दीनदयाळ घरकुल जागा खरेदी योजनेतून त्यांना घरासाठी 50 हजार रुपयांची जागा उपलब्ध करून दिली. तसेच 2018 मध्ये त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मंजूर झाले. सद्यस्थितीत त्यांचे  घर स्लॅब पर्यंत बांधून झाले असून मार्च महिण्यात नवीन घरात गृहप्रवेशाचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे त्यांनी  मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना सांगितले. 
 
          कविता निरंजन दखणे  यांनी  आपण पूर्वी  मातीच्या कच्या घरात राहत होतो. 2017 -18 मध्ये  प्रधानमंत्री आवास योजनेमुळे पक्के घर मिळाले. आता मी माझे पती आणि दोन मुल अतिशय आनंदात या घरात राहत असून या घरासाठी 1 लाख 20 हजार रुपये अनुदान मिळाल्याचे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना सांगितले.
           आरती जितेश कोट्टेवार म्हणाल्या वर्धेतील गजबजलेल्या राजकला टॉकीजवळ  आजूबाजूला सर्व मोठी घरे असताना केवळ माझेच एक झोपडे होते. त्यांच्या घराकडे बघून माझेही पक्के घर असावे असे वाटत होते. मात्र आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे घराचे स्वप्न पूर्ण  होईल असे ध्यानीमनी नव्हते. पण प्रधानमंत्री आवास योजनेत घर मंजूर झाले असून घराचे बांधकाम सुरू आहे. दुसरा टप्प्याचा निधी मिळाला नाही असे सांगितले.  यावेळी मुख्यमंत्र्यांनी वर्धा जिल्ह्यात रेतीचा प्रश्न आहे का? अशी विचारणा केली. त्यावर कोट्टेवार यांनी रेती उपलब्ध नसल्यामुळे दुप्पट भावाने खरेदी करावी लागत असल्याची वस्तुस्थिती मांडली. यावर घरकुल योजनेतील घरे बांधताना मुख्यतः वाळूची समस्या भेडसावत होती. आता  ५ ब्रास पर्यंतची वाळू कोणतीही रॉयल्टी न घेता या योजनेतील लाभार्थ्याना देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे हा प्रश्न सुटेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तसेच पुढील हफ्तेही लवकरच मिळतील अशी ग्वाही दिली.
             धुणीभांडी करणाऱ्या सविता गायकवाड यांनी घरकुल मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी गरिबांना स्वत:चे हक्काचे घर देण्यासाठीच ही योजना असल्याचे सांगितले.
  तसेच लाभार्थ्यांचे कुंटूंब, मुलांचे शिक्षण आणि घराच्या बांधकामाविषयी मुख्यमंत्र्यांनी आस्थेने विचारपूस केली.
          राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १२ लाख घरांचे २०१९ च्या अखेर पर्यंत नियोजन असून आता पर्यंत ६ लाख घरे बांधली आहेत. उर्वरित ६ लाख घरे यावर्षात पूर्ण होतील. मातीच्या, कुडाच्या घरात राहणाऱ्या, पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन जीवन जगणाऱ्या गरिबांचे स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण होईपर्यंत ही योजना सुरू राहील असे सांगून मुख्यमंत्र्यांनी घर पूर्ण करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या अधिकारी ,कर्मचारी यांचे अभिनंदन केले. मजबूत भारत करण्यासाठी, सर्वाना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करू असेही त्यांनी  यावेळी सांगितले..
                                                    0000

No comments:

Post a Comment