Thursday 9 November 2017



जलयुक्त शिवारची कामे जुन पर्यंत पूर्ण करा
                                          प्रा. राम शिंदे
Ø जलयुक्त शिवार विभागीय आढावा बैठक संपन्न
Ø यशोगाथाचे संकलन करुन ठेवावे
Ø टंचाईग्रस्त गावांचा प्राधान्याने समावेश करा
वर्धा, दि 9 (जिमाका)  जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत नागपूर विभागात चांगली कामे झाली असून त्याचा फायदा शेतकरी व लोकांना  होतो आहे,  ही समाधानाची बाब आहे. 2016-17 मधील कामे 31 मार्च पर्यंत तसेच सन 2017-18 मधून प्रस्तावित आराखडयातील कामे जुन 2018 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिले.
आज विकास भवन येथे नागपूर विभागातील सहा जिल्हयांचा जलयुक्त शिवार अभियानाच्या तीन वर्षातील कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी खासदार रामदास तडस, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, आमदार समिर कुणावार, रोहयो व जलसंधारण सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त अनुपकुमार, रोहयो उपायुक्त पराग सोमन, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, नागपूर चे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, भंडाराचे सुहास दिवसे , गोंदियाचे अभिमन्यू काळे,  गडचिरोलीचे एस.आर.नायक, चंद्रपूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्री उपस्थित होते.
प्रा. शिंदे म्हणाले कि, जलयुक्त  शिवार ही लोकचळवळ झाली आहे. त्यामुळे यावर्षी कमी पाऊस असतांनाही त्याची झळ फारशी बसलेली नाही. अभियानाचे हे तिसरे वर्ष असून या योजनेविषयी लोकांचे अभिप्राय घेऊन त्यानुसार योजनेत दुरुस्ती करण्याची गरज आहे. सन 2015-16 आणि 2016-17 मध्ये झालेल्या कामांमुळे अनेक यशोगाथा तयार झाल्या आहे. गोंदिया जिल्हयात जलयुक्त शिवारमुळे जसे धानाचे प्रति हेक्टरी उत्पादन वाढले तसेच इतर जिल्हयातही अशाच प्रकारचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. या सर्व यशोगाथा प्रत्येक जिल्हयांने माहितीपट, छायाचित्र पुस्तिका, यशकथा पुस्तिका स्वरुपात तयार करुन त्या प्रसारमाध्यमातून व चित्ररथाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवाव्यात. यामुळे निराशावादी लोकांनाही यातून प्रेरणा मिळून चांगले काम होत राहील.
सन 2017-18 मध्ये निवडलेल्या गावांचा माथा ते पायथा या परिमानानुसार  आराखडा तयार करुन त्याला विभागीय आयुक्तांकडून तातडिने मान्यता घ्यावी. तसेच ही कामे 15 जुन पर्यंत पूर्ण करण्यासाठी  नियोजन पध्दतीने अंमलबजावणी करावी. अशा सुचना त्यांनी यावेळी दिल्यात. नालाखोलीकरण करतांना पाणी वाहून जाणार नाही याची दक्षता घेतांना मध्येमध्ये अडथळे करावे. तसेच नाल्याच्या दोन्ही बाजुला पिचींग करावी. म्हणजे माती पुन्हा नाल्यात वाहून येणार नाही. कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे सर्व अधिकार नोडल अधिकारी म्हणुन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. त्यामुळे काम वेळेत पूर्ण न करणा-या कत्राटदारांवर नियमानुसार कारवाई करावी. मागील दोन वर्षात निवडण्यात आलेल्या गावांमध्ये टंचाईग्रस्त  गावे सुटली असल्यास त्यांना प्रथम प्राधान्याने घेण्यात यावे. प्रत्येक गावात काम सुरु करतांनाच कामाचा फलक लावण्यात यावा.
ज्या जिल्हयांमध्ये जलयुक्त  शिवारचे कामासाठी यंत्राची आवश्यकता आहे. तिथे जिल्हा नियोजन आराखडयातून खरेदी करावी. तसेच 15 टक्के निधी  जलयुक्त शिवार कामासाठी राखून ठेवावा,  अशा सुचना सर्व जिल्हाधिका-यांना दिल्या.
प्रास्ताविक करतांना विभागीय आयुक्त यांनी जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत विभागात  झालेल्या कामाबाबत सविस्तर  माहिती दिली. विभागात सन 2015-16 मध्ये जलयुक्त शिवार अभियानात 1077 गावांमध्ये 23 हजार 379 विविध जलसंधारणाची  कामे पूर्ण झाली असून 156 कामे प्रगतीपथावर आहे. लोकसहभाग व शासकिय यंत्रणेच्या माध्यमातून तलाव व नाल्यामधून 75.23 लक्ष घन मीटर गाळ काढण्यात आला आहे. या सन 2015-16 मध्ये सर्व गावे जलपरिपूर्ण झालेली असून यातून 1 लाख 9 हजार 108 हेक्टर क्षेत्र सवंरक्षित सिंचनाखाली आले आहे.
सन 2016-17 मध्ये 915 गावांमध्ये 22 हजार 95 विविध जलसंधाराणाच्या कामाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. आज अखेंर 19 हजार 732 कामे पूर्ण झाले असून 843 कामे प्रगतीपथावर आहे. 915 पैकी 712 गावे जलपरिपूर्ण झाली असून यामुळे 43 हजार 713 हेक्टर संरक्षित सिंचनाखाली आले आहे. सन 2017-18 मध्ये 757 गावाची निवड करण्यात आली असुन यामध्ये 21 हजार 120 काम प्रस्तावित केली आहे. यापैकी 955 कामे सुरु झाली असून शासनाकडून 146 कोटी 65 लक्ष रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी नागपूरचे मुख्यकार्यकारी अधिकारी कांदबरी भगत ,चंद्रपूरचे  जितेंद्र पापळकर, भंडाराचे मनोजकुमार सुर्यंवंशी, गडचिरोलीचे शंतुन गोयल, गोंदियाचे आर.एच.ठाकरे, वर्धेच्या नयना गुंडे तसेच जलयुक्त शिवार अभियानाची अंमलबजावणी करणा-या यंत्रणाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अतुल  राजपायले  यांनी केले.
प्रारंभी जलयुक्त शिवार अभियान 2017-18 मधील गावामध्ये जनजागृती करणा-या चित्ररथाचा जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी फीत कापून शुभारंभ  केला. दरम्यान सकाळी पुलगाव येथील दारुगोळा भांडार यांच्या अखत्यारित असलेल्या नाचनगाव येथील दर्गा टेकडीवरील जलयुक्त शिवार कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी तिथे वृक्षरोपन करुन जलयुक्त शिवार अभियान राबविण्यासाठी सहकार्य करणारे दारुगोळा भंडारचे सर्व प्रशासकिय अधिकां-याचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला. तसेच  कवठा रेल्वे येथील जलयुक्त शिवार अभियान कामाचीही पाहणी केली.   
                                      0000





No comments:

Post a Comment