Tuesday 20 September 2016

जलयुक्‍त शिवार अभियान अंमलबजावणीत
               वर्धा जिल्‍हा विभागात आघाडीवर
Ø 25 हजार हेक्‍टर सिंचन क्षमता
Ø 37 हजार द.श.ल.क्ष. घनमीटर पाणीसाठा निर्मीती
वर्धा,दि.20-पावसाच्‍या पाण्‍यावरील शेतक-यांचे अवलंबित्‍व कमी करुन शेत-शिवारात विकेंद्रीत जलसाठे निर्माण व्‍हावेत या उद्देशाने राज्‍यशासनामार्फत राबविण्‍यात येत असलेल्‍या जलयुक्‍त शिवार अभियानाच्‍या अंमलबजावणीत वर्धा जिल्‍हा आघाडीवर आहे. नागपूर विभागातील सहा जिल्‍हयांपैकी सर्वाधिक पाणी साठवण क्षमता वर्धा जिल्‍हयात निर्माण झाली असुन यामुळे 25 हजार हेक्‍टर संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्‍ध झाली आहे.
            जिल्‍हयात 4 लाख 48 हजार 285 हेक्‍टर क्षेत्रावर यावर्षी खरीपाची लागवड झाली आहे. त्‍यामध्‍ये केवळ 27 टक्‍के क्षेत्र सिंचनाखाली असुन उर्वरित 73 टक्‍के क्षेत्र कोरडवाहू आहे. त्‍यामुळे पावसाची अनियमितता आणि शेतीची उत्‍पादकता यांचा थेट संबंध आपल्‍या जिल्‍हयात पहायला मिळतो. यावर्षी सुध्‍दा शेतक-यांना हा अनुभव आलाच. पण ज्‍या गावांमध्‍ये जलयुक्‍त शिवारची कामे झालीत तेथील शेतक-यांना मात्र तिथे साठलेल्‍या पाण्‍याने तारले. ऑगस्‍ट महिन्‍यात पावसाने महिनाभर खंड दिला. पिके कोमेजायला लागलीत तेव्‍हा सिमेंट बंधारा, शेततळे  नाल्‍यातील पाण्‍यामुळे पिकांना नवसंजिवनी मिळाली .
            जलयुक्‍त शिवार अभियानात 2015-16 मध्‍ये 214 गावांची निवड करण्‍यात आली होती. त्‍यापैकी 115 गावांमध्‍ये 100 टक्‍के काम पूर्ण झाले आहे. तर 44 गावांमध्‍ये 80 टक्‍के पेक्षा जास्‍त काम झाले आहे. या 159 गावांमधील शेतक-यांनी खंड काळात नाल्‍यामध्‍ये व सिमेंट बंधा-यामुळे साठलेल्‍या पाण्‍याचा उपयोग डिझेल पंप लावून पिके वाचविण्‍यासाठी केला.
            मागील वर्षी 214 गावांमध्‍ये 3206 कामे घेण्‍यात आली होती. यापैकी 2896  कामे पूर्ण झाली आहेत. या सर्व कामांमुळे जिल्‍हयात 37 हजार 459 दशलक्ष घनमिटर पाणीसाठा निर्माण झाला आहे. या पाण्‍याचा उपयोग कापुस पिकासाठी एकदा पाणी दिल्‍यास 24 हजार 972 हेक्‍टर क्षेत्रात सिंचन होवू शकते. तर दोनदा पाणी वापरल्‍यास 12 हजार 486 हेक्‍टर सिंचन होवू शकते. त्‍यामुळे यावर्षी जिल्‍हयातील किमान 25 हजार हेक्‍टरवरील शेतक-यांना तरी पावसाच्‍या लहरीपणाचा फटका बसणार नाही.
            याशिवाय नाला खोलीकरण आणि सिमेंट नाला बांधमुळे विहिरीच्‍या पाणी पातळीत दीड ते 2 मिटरने वाढ झाल्‍याचे निदर्शनास आले आहे. याचा थेट फायदा शेतक-यांना पावसाच्‍या खंड काळात तसेच रब्‍बी पिकासाठी होणार आहे. त्‍यामुळे एका धरणामुळे जे शक्‍य झाले नसते ते जलयुक्‍त शिवारमध्‍ये झालेल्‍या विकेंद्रीत जलसाठयामुळे साध्‍य झाले आहे.
>

No comments:

Post a Comment