Wednesday 3 August 2016

महिला सबलीकरण माहिमेचा शुभारंभ
                             महसूल सप्‍ताह महिलांसाठी समर्पित  
                                                  -जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल
Ø  7 ऑगस्ट पर्यंत व्‍यापक  जनसंपर्क मोहिम

            वर्धा, दि.-1 – स्त्री ही घराची लक्ष्मी आहे. शेतीच्या सातबा-यावर लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत महिलाच्‍या नावाची नोंद होऊन जमिनीचा फायदा महिलांना झाला पाहिजे, महिलांचे सक्षमिकरण होणे गरजेचे असून हा महसूल सप्‍ताह महिलांसाठी समर्पित आहे. शासनाच्या विविध योजनेतंर्गत महिलांचे अर्ज निकाली काढण्यास या सप्‍ताहात  प्राधान्य दिल्या जाईल. त्‍यामुळे जास्‍तीत जास्‍त महिलांनी या सप्‍ताहाचा लाभ घेऊन आपल्‍या समस्‍याचे निराकरण करुन घ्‍यावे असे आवाहन जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज केले.  
महसूल सप्‍ताहानिमित्‍त महसूल विभागाच्या वतीने  महाराजस्व अभियान अंतर्गत महिला सबळीकरण योजना मोहिमेचा शुभारंभ विकास भवन येथे आयोजित  कार्यक्रमात करण्यात आला. कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानावरुन  जिल्हाधिकारी  बोलत होते. यावेळी   उपविभागीय  अधिकारी  स्मिता पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक  पुरुषोत्‍तम मडावी व्यासपिठावर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
महिला सबळीकरण योजने अंतर्गत  महिलांसाठी  एक दिवसीय आरोग्य  शिबीराचे आयोजन सामान्य रुग्णालयाच्या वतीने विकास भवन येथे करण्यात आले होते. यावेळी   महिलांची मेमोग्राफी, रक्तदाब, मधुमेहाची तपासणी करुन  महिलांना आरोग्याविषयी  माहिती  देण्‍यात आली. त्‍याचबरोबर महिलांची  शेतीच्या सातबा-यावर लक्ष्मी मुक्ती योजनेतंर्गत पतीच्या विनंतीवरुन पत्नीचे सहधारक म्हणून नाव नोंद घेणे , ग्रामपंचायत येथील  नमूना 8-अ मध्ये पतीच्या नावासमोर पत्नीच्या नावाची नोंद घेणे,  आदिवासी व समाजकल्याण विभागामार्फत शालेय विद्यार्थींनीना  ‍ शिष्यवृत्ती तसेच शालेय गणवेशाचे वाटप करण्‍यात आले.
          यावेळी जिल्हाधिकारी  शैलेश नवाल  यांचे हस्ते  अर्थसहाय्य धनादेश, उत्पन्न प्रमाणपत्र, संजयगांधी निराधार योजना प्रमाणपत्र,श्रावणबाळ योजना प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, अनिवासी प्रमाणपत्र, असे विविध प्रमाणपत्राचे  वाटप महिलांना करण्यात आले.
नगर परिषद व ग्रामपंचायत क्षेत्रातील वैयक्तीक  स्वच्छता गृहाची उभारणी, इंदिरा आवास घरकुल योजनेतंर्गत महिलांना घरकुलाचे वाटप, राशन कार्डवर महिलांना कुटूंब प्रमुख म्हणून नाव नोंदविणे, दुय्यम नविन राशन कार्ड वितरण,  महिलांना वाहन चालविण्याचा परवाना देणे, अहिल्याबाई होळकर शालेय विद्यार्थ्यीनींना मोफत एस.टी. ची पास वितरीत करणे,  महिलांची आधार कार्ड तसेच  मनरेगा मध्‍ये  जॉब  कार्ड नोंदणी आणि आत्महत्याग्रस्त कुटूंबातील महिलांना  शिलाई  मशिन वाटपा करीता अर्ज  स्विकारण्‍यात आले. याशिवाय  जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, व सेतू मार्फत होणा-या इतर प्रमाणपत्राचे वाटप  , ग्रामपंचायती अंतर्गत घरबांधकाम आराखडा मंजुरी व परवानगी संबंधी जनजागृती करणे,  महिला बचत गटांना प्रशिक्षण, कर्ज मेळावे, पीक कर्ज इत्यादी  माहिती संबंधित  येत्रणेमार्फत  या कार्यशाळेत देण्यात आली.  
            यावेळी  उपविभागीय अधिकारी   स्मिता पाटील ,जिल्हा शल्यकित्सक पुरुषोत्‍तम  मडावी  उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात  तहसिलदार एस.आर.पाराजे यांनी  आयोजित कार्यशाळेविषयी  माहिती दिली.  कार्यक्रमाला जिल्ह्यातील महिला, महिला बचत गटातील  महिला प्रतिनिधी मोठ्या संखेने  उपस्थित होते.
            अशाच प्रकारचे शिबिर  आज सर्व तालुका स्‍तरावर आयोजित करण्‍यात आले होते. यामध्‍ये वर्धा तालुक्‍यात 417 अर्जापैकी सर्व अर्ज निकाली काढण्‍यात आले. हिंगणघाट तालुक्‍यात 801 अर्ज प्राप्‍त झाले असून यापैकी 599 अर्ज निकाली काढण्‍यात आले तसेच सेलू तालुक्‍यात 1155 अर्जापैकी 343 अर्ज तात्‍काळ निकाली काढण्‍यात आले. या सप्‍ताहात प्रत्‍येक मंडळस्‍तरावर शिबिर आयोजित करण्‍यात येणार असून यामध्‍ये महिलांपर्यंत विविध योजनांचा लाभ पोहोचविण्‍यात येणार आहे.
                                                            0000

             

No comments:

Post a Comment