Wednesday 25 January 2012

लोकशाही प्रणाली मजबूत करण्‍यासाठी प्रत्‍येक व्‍यक्‍तीने मतदान करावे - जिल्‍हाधिकारी


    वर्धा,दि.25- भारतीय संविधानाने लोकशाही प्रणाली स्विकारल्‍यानंतर  गरीब व श्रीमंत असा भेदाभेद न करता प्रत्‍येक व्‍यक्‍तीला एका मतदानाचा हक्‍क दिलेला आहे. परंतू गेल्‍या दशकापासून मतदारांमध्‍ये मतदानाची अनास्‍था निर्माण झाली असून   अनेक निवडणूकांमध्‍ये मतदानाची टक्‍केवारी घटताना दिसत आहे. मतदार हा सुजान नागरिक असून, लोकशाही प्रणाली मजबूत करण्‍यासाठी प्रत्‍येक व्‍यक्तिने मतदान करावे. असे आवाहन जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी केले आहे.

    येथील विकास भवनात राष्‍ट्रीय मतदान दिवस मोठ्या उत्‍साहाने आज साजरा करण्‍यात आला. त्‍याप्रसंगी त्‍या बोलत होत्‍या. यावेळी जि.प. मुख्‍य कार्यकारी अधिकारी बि.एम.मोहन, उपजिल्‍हाधिकारी शैलेश मेश्राम, उपजिल्‍हाधिकारी आर.बि. खजांची व तहसिलदार शुसांत बन्‍सोडे आदी मान्‍यवर मंचावर उपस्थित होते.
     निवडणूकीत घटत असलेले मतदानाचे प्रमाण हा चिंतेचा विषय असून मतदान शतप्रतिशत व्‍हावे यासाठी शासनाने राष्‍ट्रीय मतदान दिवसा निमित्‍त अनेक उपक्रम हाती घेण्‍यात आले असल्‍याचे सांगून जिल्‍हाधिकारी भोज म्‍हणाल्‍या की, ज्‍या  तरुणांचे वय 18 वर्ष पूर्ण झाले आहेत त्‍यांना मतदानाचा हक्‍का सोबत त्‍यांना त्‍यांच्‍या कर्तव्‍याप्रती जाणीव निर्माण व्‍हावी यासाठी महाविद्यालयीन स्‍तरांवर निबंध स्‍पर्धा आयोजित करण्‍यात आल्‍या तसेच पथनाट्य सादर करण्‍यात आली. प्रत्‍येक मतदारांनी सुजाण नागरिकांचा परिचय देवून त्‍यांनी त्‍यांचे कर्तव्‍याप्रती जागरुक  झाले पाहीजे. लोकशाही प्रणालीत शतः  प्रतिशत लोकांनी मतदान करुन लोकप्रतिनिधी निवडून दिल्‍यास  देशाच्‍या विकासात फार मोठे योगदान ठरु शकेल. तसेच दिशा देण्‍याचे कार्य  करता येईल. संपूर्ण जगांमध्‍ये भारत असा देश आहे की या देशामध्‍ये लोकसंख्‍या मोठी असली तरीपण येथे लोकशाहीची मुल्‍ये जतन होत आहे. मतदानाच्‍या दिवशी सुट्टी जाहीर करण्‍यात येत असते. परंतु अनेक नागरीक मतदानाबाबत विविध कारणांनी अनास्‍था दाखवून मतदान करीत नाही. त्‍या मतदारांना मतदानाविषयी महत्‍व पटवून दिले पाहिजे. मतदारांनी कोणत्‍याही प्रलोभनाला बळी न पडता आपले अमुल्‍य  मत मत पेटीत टाकून मतदानाचा हक्‍क निर्धास्‍तपणे बजवावा असेही आवाहन त्‍यांनी केले.
    प्रास्‍ताविक करताना उपजिल्‍हाधिकारी  शैलेश मेश्राम यांनी राष्‍ट्रीय मतदान दिवसाचे महत्‍व विषद केले तसेच  या कालावधीत घेण्‍यात आलेल्‍या उपक्रमाची माहिती सांगितली.
   यावेळी भारत निवडणूक आयोगाने मतदारांना आवाहन करणारा संदेश क्लिपच्‍या माध्‍यमातून सांगण्‍यात  आला तसेच उपस्थित मतदारांना जिल्‍हाधिकारी भोज यांनी प्रतिज्ञा दिली. यावेळी 18 वर्षावरील मतदारांना ओळखपत्राचे वितरण करण्‍यात आले. तसेच मतदार राजा जागृत हो या विषयावरील पथनाट्य सादर करण्‍यता आले.
     कार्यक्रमाचे संचलन लोखंडे यांनी तर आभार प्रदर्शन शुसांत बन्‍सोडे यांनी केले. याप्रसंगी मोठ्या संख्‍येने अधिकारी, कर्मचारी, नव्‍याने झालेले मतदार व नागरिक उपस्थित होते.
                               0000

No comments:

Post a Comment