Wednesday 19 May 2021

 

शेतकऱ्यांना बांधावर खते बियाणे मिळण्यास अडचण

आल्यास कृषी सहय्यकाशी संपर्क साधावा 

                 -जिल्हाधिकारी

Ø कोविड अनुकूल वर्तणूक स्विकारणे आवश्यक

Ø शेतकऱयांनी पीक पद्धतीत बदल करावा

Ø 100 मी मी पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये



Ø बी जी 3 सारखे अप्रमाणित बियाणे विकत घेऊ नये

Ø सोयाबीनची उगवण शक्ती तपासणे महत्वाचे

Ø कृषी केंद्राने खताचा जुना साठा नवीन दराने विक्री करू नये

          वर्धा दि 19(जिमाका):-  शेतीचा खरीप हंगाम सुरू होत  असल्यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक असलेले बियाणे आणि खत बंधावरच पोहचविण्याचा निर्णय घेतला असून हा शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचवणारा आहे. शेतकऱ्यांना खत व बियाणे मिळण्यास काही अडचण असल्यास त्यांनी गावातील कृषी सहाय्यकाशी संपर्क साधावा, त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्राधान्य देईल, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली. 

         कोविड 19 आणि संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी दूरदृश्य माध्यमाद्वारे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ विद्या मानकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी अभयकुमार चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे जिल्हाधिकारी  कार्यालयातून उपस्थित होत्या, तर पत्रकार ऑनलाईन जुळले होते. 

      कोविड परिस्थितीमुळे आपल्याला यापुढे कोविड योग्य वर्तणूक स्विकारावी लागेल. गर्दी टाळणे हा आपला मुख्य उद्देश आहे. गर्दीमुळे कोविडचे संक्रमण  होते, त्यामुळे आपल्याला काही बंधने घालावी लागतात. पण आपण वारंवार अशी बंधने लावू शकणार नाही. त्यामुळे आपल्याला अनेक सेवा घरपोच देणे आणि घरपोच  सेवा स्वीकारणे याची सवय करून घ्यावी लागेल. पुढील काळात हेच आपल्या जिल्ह्यातील कोरोना संक्रमण कमी करण्याचा मार्ग राहील,असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

     शेतकऱ्यांसाठी काही बाबी शिथिल केल्या आहेत. त्यामुळे शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांची अडवणूक किंवा त्याला त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. खतांच्या किमती वाढल्या आहेत त्यामुळे कृषी केंद्राने त्यांच्याकडील जुना साठा शेतक-यांना नवीन दराने विकू नये. असे करताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच कृषी केंद्राकडील साठयाची माहिती कृषी विभागाला देणे बंधनकारक केले असून  साठा तपासणीसाठी भरारी पथके नेमण्यात आली आहेत.

       जम्बो हॉस्पिटलचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता, मात्र शासनाने आता बदललेल्या धोरणानुसार त्यात काही दुरुस्त्या सुचवल्या आहेत. त्या करून त्यासाठी 50 टक्के निधीची तरतूद करून सदर प्रस्ताव पुन्हा शासनाकडे तातडीने सादर करण्यात येईल. तसेच ऑक्सिजन स्वयंपूर्णतेसाठी 11 ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प प्रत्येक ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयाला आपण उभारत आहे. त्याचेही काम लवकरच सुरू होईल अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. 

       शेतकऱयांनी मागील वर्षीची सोयाबीनची परिस्थिती बघता यावर्षी पीक पद्धतीत बदल करावा, तूर - सोयाबीन, तूर - मूग असे आंतरपीक घ्यावे. तसेच सोयाबीनची उगवण शक्ती तपासल्यानंतरच त्या बियाण्यांची पेरणी करावी. यामुळे निकृष्ट बियाणे पेरणीपूर्वीच ओळखता येईल आणि शेतकऱयांचे नुकसान टळेल. तसेच वर्धेत धूळ पेरणी करण्याची पद्धत आहे. मात्र लवकर पेरणी केल्यामुळे कापूस पिकावर गुलाबी बोन्ड अळी आणि बोन्डसड  रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शेत -शिवारात 100 मिली मीटर  पाऊस झाल्याशिवाय कोणतीही पेरणी करू नये, यामुळे दुबार पेरणीचे आणि किडीचे संकट शेतकऱयांना टाळता येईल, असे विद्या मानकर यांनी सांगितले.

        बी जी - 3 हे अप्रमाणित बियाणे आहे, हे बियाणे उगवत नाही. त्यामुळे शेतकऱयांनी हे बियाणे घेऊ नये. शेतकऱयांनी परवानाधारक कृषी केंद्रकडून  बियाणे खरेदी करावे, आणि बियाणे खरेदीची पावती आणि त्याचा पिशवी जपून ठेवावी. असे अप्रमाणित बियाणे आढळल्यास 07152- 250091 या क्रमांकावर तक्रार करावी असेही श्रीमती मानकर म्हणाल्या.

                                              00000000000

No comments:

Post a Comment