Thursday 12 April 2018






गरीब माणूस वैद्यकिय सेवेच्या केंद्रस्थानी असावा
                                                      -सुधीर मुनगंटीवार
Ø 8 सुवर्णासह रितिका ठरली गुणवंत  विद्यार्थिनी
Ø डॉ. सुभेदार यांना डी.एम.एस्सी
Ø दत्ता मेघे आर्युविज्ञान विद्यापिठाचा 9वा दीक्षांत समारोह
वर्धा दि 12 जिमाका :- शरीर शास्त्राचे उच्चतम ज्ञान संपादन करण्यासाठी गरीब आणि बेवारस शरीर आपल्या ज्ञानसाधनेचे केंद्र होते. त्यातून आत्मसात केलेले कौशल्य आणि  ज्ञानाचा  उपयोग त्याच  गरीब आणि अभावग्रस्त माणसांच्या सेवेसाठी व्हावा. वैद्यकिय क्षेत्रात मिशन म्हणुन काम करतांना आपल्या अमूल्य  सेवेचे केंद्रच समाजातील गरीब माणुस असावा, असे प्रतिपादन वित्त, नियोजन, तथा जिल्ह्याचे  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी  केले. दत्ता मेघे आर्युविज्ञान विद्यापिठाच्या   9 व्या दीक्षांत समारोह प्रसंगी ते बोलत होते.
           सावंगी मेघे येथील विद्यापीठ सभागृहात झालेल्या या दीक्षांत समारोहाला  अभिमत विद्यापीठाचे कुलपती  दत्ता मेघे, कराडच्या कृष्णा आर्युविज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ वेदप्रकाश मिश्रा,  कुलगुरू डॉ. राजीव बोरले, प्र. कुलगुरु डॉ. निलम मिश्रा, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य अशोक चांडक,  मध्य भारतातील ख्यातनाम आरोग्य तज्ञ डॉ. बि.जे. सुभेदार, कुलसचिव डॉ. ए.जे. अंजनकर आदी मान्यवर  उपस्थित होते.
            वैद्यकिय क्षेत्र हे  अतिशय कष्टाचे आहे हे सांगताना श्री. मुनगंटीवार यांनी   कुटुंबातील डॉक्टर नातेवाईकांचा दाखला दिला. एका पदवीच्या प्रमाणपत्रासाठी  17 ते 18 वर्ष ज्ञानसाधना करावी लागते. त्यामुळे या ज्ञानसाधनेचा खरा लाभ गरिबांना मिळाला पाहिजे. दुःख आणि वेदना घेऊन येणारा  गरीब रुग्ण आपल्या उपचाराने आणि सेवेने  चेहऱ्यावर आनंद आणि हास्य घेऊन परतला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  डॉक्टरचे जीवन हे एका उच्च ध्येयाप्रति समर्पित असते. ईश्वरानंतर केवळ डॉक्टर हाच रुग्ण आणि मनुष्याचे जीवन वाचविण्यासाठी देवदुत ठरतो. तो करीत असलेले काम हे ईश्वरीय कार्य  आहे. असे सांगून त्यांनी पदवी प्राप्त सर्व नवीन डॉक्टरांचे अभिनंदन करून त्यांना यशस्वी होण्याच्या शुभेच्छा दिल्यात.
            यावेळी डॉ वेदप्रकाश मिश्रा यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना डॉ भालचंद्र सुभेदारांचा आदर्श समोर ठेवावा असे सांगितले. रुग्णसेवेचे व्रत सांभाळताना एका ध्येयाने काम करा असेही ते म्हणाले.
यावेळी विद्यापीठाने
  प्रो. डॉ भालचंद्र सुभेदार यांना डॉक्टरेट इन मेडिकल सायन्सेस  ही  मानद पदवी देऊन सन्मानित केले.
या दीक्षांत समारंभात एकूण 700 विद्यार्थ्याना पदवी प्रमाणपत्र देण्यात आले. त्यामध्ये  88 सुवर्ण ,4 रजत आणि 13 इतर बक्षिसांचा समावेश आहे.
• 8 सुवर्णासह रितिका ठरली गुणवंत
  विद्यार्थिनी
           एम बी बी एस ची
  रितिका त्रिपाठी हिने सर्वात जास्त 11 पदक घेऊन गुणवंत विद्यार्थिनींचा सन्मान मिळवला. तिला मिळालेल्या बक्षिसांमध्ये 8 सुवर्ण आणि 3 इतर बक्षीसांचा समावेश आहे. डॉ तन्मय रमेश गांधी यांना 7 सुवर्ण, भेष्णा साहू 3 सुवर्ण,व एक बक्षीस, अश्लेषा शुक्ला 3 सुवर्ण, डॉ हरमनदिप सिंग 4 सुवर्ण, सत्यजित साहू 3 सुवर्ण, वसुधा उमाटे 3 सुवर्ण आणि एक रजत पदकांची मानकरी ठरली.

No comments:

Post a Comment