Friday 16 February 2018



कृषी, शिक्षण, आरोग्य व  रोजगारासाठी वार्षिक योजना निधीचा उपयोग करा
- सुधीर मुनगंटीवार
जिल्हा नियोजन समिती राज्यस्तरीय बैठक
वर्धा दि 16(जिमाका):-  जिल्हा वार्षिक योजनेचा निधी हा नियोजनपूर्वक  जिल्ह्याच्या  विकासासाठी खर्च झाला पाहिजे. या निधीचा उपयोग मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी व्हायला हवा. कृषी,आरोग्य, शिक्षण आणि रोजगार या क्षेत्रामधील पायाभूत सुविधा बळकट करून सामान्य नागरिकांच्या समस्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करा. वाढीव निधी देताना या घटकांना अधिक प्राधान्य दिले जाईल असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वने तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
आज नागपूर येथे विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात नियोजन समितीची राज्य स्तरीय  बैठक संपन्न झाली.  यावेळी गृह, वित्त व नियोजन राज्य मंत्री दिपक केसरकर, खासदार रामदास तडस, अशोक नेते, आमदार पंकज भोयर, समीर कुणावर, अप्पर मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती,  विभागीय आयुक्त अनुप कुमार,  नियोजन उपसचिव विजयसिंह वसावे,  जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, नियोजन उपायुक्त बी. एस. घाटे उपस्थित होते.
वर्धा जिल्ह्याचा जिल्हा वार्षिक योजना प्रारूप आराखडा 102 कोटी 4 लक्ष रुपयांचा  आहे. जिल्ह्याने 210 कोटी 68 लक्ष रुपयांची अतिरिक्त मागणी यावेळी केली. यामध्ये जिल्हाधिकारी यांनी अतिशय आवश्यक बाबींसाठी किमान 85 कोटी देण्याची  आग्रहाची  विनंती केली. जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील खर्चाच्या आराखड्याची प्राथमिकता असणाऱ्या विषयांची मांडणी केली. 
शहराच्या हद्दीत येणारे अनियंत्रित वाढ असणारी गावे व त्यांच्या समस्या यावर यावेळी चर्चा झाली. शौचालय  बांधकाम, पांदण रस्ता निर्मिती , वायगाव हळद निर्मिती, आदींसाठी वाढीव निधीची मागणी त्यांनी केली. जिल्ह्यात राबविण्यात येत असलेली पांदण रस्ता योजना मॉडेल म्हणून राज्यस्तरावर स्विकारावे अशी मागणी विभागीय आयुक्तांनी यावेळी केली. जिल्ह्यामध्ये बचत गटाचे बळकटीकरण, तलाव तेथे मासोळी, मायक्रो ए टी एम, बचत गटांना सेतू केंद्राचे वाटप, रूरल मॉल व आठवडी बाजार आदी  उपक्रमाबाबत जिल्हाधिकारी यांनी माहिती दिली. यावेळी  खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर यांनी जिल्ह्यामध्ये तालुकास्तरीय क्रीडा क्षेत्रातील प्रोत्साहन योजना, ग्रामपंचयात जनसुविधा व मोठ्या ग्रामपंचायतींना  नागरी सुविधा यासाठी निधी देण्याबाबत चर्चा केली.
श्री मुनगंटीवार यांनी यावेळी जिल्ह्यामध्ये पायाभूत सुविधाना बळकटी आणणा-या योजनांना प्राधान्य देण्याची सूचना केली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि नियोजन भवन इमारतीसाठी प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे सांगितले. तसेच या दोन्ही इमारती सेवाग्राम विकास आराखडा कामासोबतच  पूर्ण करण्यात येतील असेही सांगितले. आमदार पंकज भोयर यांनी जिल्हा ग्रंथालयाची इमारत पूर्ण झाली असून इमारतीच्या उदघाटनासाठी पालकमंत्री यांनी वेळ देण्याची विनंती केली.




No comments:

Post a Comment