Wednesday 14 February 2018



            आपद्ग्रस्ताना प्रशासनाची तात्काळ मदत
वर्धा, दि 14:-  जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या अवकाळी पाऊस व  गारपिटीमुळे काही गावात नुकसान झाले असून घरांची पडझड आणि गारपिटीमुळे जखमी झालेल्या नागरिकांना आर्वी महसूल प्रशासनाने तात्काळ पाहणी करून  आपद्ग्रस्ताना मदत  केली. आर्वी  तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी यांनी धाव घेऊन नागरिकांना वेळीच दिलासा दिला.
          12 फेब्रुवारी
  रोजी रोहणा आणि विरुळ सर्कल मध्ये गारपिटीमुळे काही घरांची पडझड आणि शेतमालाचे नुकसान झाल्याची माहिती सायंकाळी  7 वाजता  समजताच नायब तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, विरुळचे  मंडळ अधिकारी  आनंद देवकर, भास्कर कुकडे आणि रोहणा तलाठी  एकापुरे यांचे पथक रवाना झाले. पथकाने जखमी लोकांना योग्य व तातडीने उपचार करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात  संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून पूर्वकल्पना दिली.  तिथे पोहचल्यावर खाजगी गाडीने लोकांना दवाखान्यात दाखल केले. रोहणा पासून वाई आणि पुढे पिंपळधरी मार्गात अनेक झाडे व विद्युत तारा  पडून रस्ता बंद झालेला होता.  तो पथकाने खुला केला आणि पथक पिंपळधरी येथे पोहोचले.
            पिंपळधरी येथे पथकाने तेथील घरांची पडझड झालेल्या स्थानिक नागरिकांची जिल्हा परिषद
  शाळा व अंगणवाडी येथे राहण्याची सोय केली. तसेच रोहणा प्राथमिक आरोग्य केंद्रात उर्वरित जखमींना दाखल केले. पिंपळधरी येथील नागरिकांची जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय संबंधित स्वस्त धान्य दुकानदार ,प्रशासन, सामाजिक कार्यकर्ते  यांच्या मार्फत केली. रोहणा येथील खाजगी मंडप डेकोरे्टर्स कडून अंथरून व  पांघरूण उपलब्ध करून दिले. नंतर पथक रोहणा गावातील  पडझड झालेल्या ठिकाणी गेले आणि लोकांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करून पुढे गौरखेडा गावातील पाहणी करण्यासाठी रवाना झाले .
       तसेच 13 फेब्रुवारी  रोजी आर्वीचे  तहसीलदार विजय पवार  यांच्यासह नायब तहसीलदार म्हस्के आणि मंडळ अधिकारी  देवकर यांचे पथक  सकाळी 10 वाजता  पिंपळधरी या गावात दाखल झाले. पथकाने  सोबत नाश्ता,बिस्कीट पुडे आणि  पाणी नेले होते. ते तेथील आपद्ग्रस्ताना वितरित केले. आपद्ग्रस्त भागातील नुकसानीचे पंचनामे तलाठी रोहणा यांच्यामार्फत चालू केले आणि नागरिकांच्या जेवणाची सोय तिथे करण्यात आली. नागरिकांना स्थानिक समाजसेवा गटामार्फत ब्लॅंकेट उपलब्ध करून दिले. नागरिकांना सानुग्रह अनुदान स्वरूपात तात्काळ 10 किलो धान्य(तांदूळ व गहू)आणि 5 लिटर केरोसीन प्रति कुटुंब या प्रमाणे उपविभागीय अधिकारी प्रकाश शर्मा  यांच्या उपस्थितीत देण्यात आले.नागरिकांच्या रात्रीच्या जेवणाची सोय तेथेच करण्यात आली आणि पथक इतर नुकसानग्रस्त सायखेडा,गौरखेडा,मारडा भागाची पाहणी करण्यास गेले.
                                                                        0000





No comments:

Post a Comment