Wednesday 4 September 2013

शेवगा बहरला बांधावर...

वर्धा, दिनांक 5 – शेवग्याला (मुंगना) बाजारात  मोठ्याप्रमाणात  मागणी  आहे. राज्‍यासह  आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्‍यांतही  शेवग्‍याच्‍या  शेंगांना  असलेली  मागणी  लक्षात  घेवून  वर्धा  जिल्‍ह्यातील  शेतक-यांनी शेवग्‍याची  लागवड करावी यासाठी  प्रायोगिक  स्‍तरावर  सात गावातील सुमारे  300 शेतक-यांनी  शेताच्‍या  बांधावर शेवग्याची लागवड केली आहे. बांधावरील शेवग्‍याची  लागवडीला आता बहारु लागली आहे.
       आमगाव जंगली या आदिवासी गावात 95 शेतक-यांनी सुमारे 7 हजार  शेवगा आपल्‍या बांधावर लावला आहे. कृषी विभागातर्फे  शेवग्याच्‍या बिया मोफत उपलब्‍ध करुन दिल्‍यामुळेच येथील शेतक-यांनी  आपल्‍या  शेताच्‍या बांधावर  शेवग्‍याची  लागवड केली आहे. दौलतराव कुळमेथे  या आदिवासी  शेतक-याने  बांधावर  50 झाडे  लावली  असून, आज ती  डौलाने  उभी  आहेत. शेवग्‍याच्‍या  शेंगा  कधीही  न पाहिलेल्‍या  या आदिवासी  शेतक-यांनी  यशस्‍वीपणे  लागवड करून  आज ते प्रत्‍येक  झाडाचे संगोपन करत आहेत.  अडीच ते तीन महिन्‍यांनी  या झाडाला  शेंगा लागून उत्‍पन्‍न  येईल, अशी  त्‍यांना खात्री आहे.
          सेलू तालुक्‍यातील  रिदोरा, वडगाव जंगली, नवरगाव, आमगाव जंगली, सोंडी, शिवणगाव  आदी या सात गावातील  300 शेतक-यांनी  सुमारे  20 हजार  झाडे आपल्‍या  शेताच्‍या  बांधावर लावली  आहेत. ही  झाडे आज दोन ते अडीच फुटापर्यंत वाढली आहेत. जिल्‍हा  अधीक्षक कृषी  अधिकारी भाऊसाहेब  ब-हाटे,  तालुका कृषी  अधिकारी  श्री. नानोटे  तसेच कृषी सहायकांच्‍या  मार्गदर्शनाखाली  ही लागवड  यशस्‍वी  होत आहे.
          महात्‍मा  ज्‍योतिबा फुले  जलभूमी  अभियानांतर्गत  विदर्भात  शेवगा लागवडीचा  अभिनव प्रयोग  राबविण्‍यात आला आहे. अहमदनगर येथून  तीन हजार रुपये किलोप्रमाणे शेवग्‍याच्‍या  बिया  खरेदी  करुन  15 किलो बिया  प्रायोगिक  तत्‍त्‍वावर  सेलू  तालुक्‍यातील  300 शेतक-यांना   मोफत  वितरित करण्‍यात  आल्‍या आहेत.  सरासरी  एका झाडासाठी  केवळ  एक रुपया खर्च  आलेला आहे. कृषी  विभागाने  शेतक-यांच्‍या  शेतात  पाणी साठविण्‍यासाठी  खोल समतल सलग चर खोदले आहेत. चर खोदतानाच  बांध तयार झाले असून, या बांधावर शेवग्‍याची  लागवड  करण्‍यात आली आहे.
शेवग्‍याला मिळणार बाजारपेठ
          विदर्भात  पहिल्‍यांदाच  शेवगा लागवडीचा उपक्रम राबविण्‍यात येत असून, या लागवडीनंतर  सुमारे  दीड ते  दोन हजार क्विंटल  शेवग्‍याच्‍या  शेंगा  विक्रीसाठी  उपलब्‍ध  होणार आहेत. कृषी  विभागातर्फे  शेतक-यांना  विक्रीची व्‍यवस्‍थासुध्‍दा  करण्‍यात येणार आहे. आमगाव जंगली या गावात  प्रगतीशील  शेतकरी   श्‍यामराव  चावरे , बबनराव येवले, दत्‍तूजी चावरे, वसंतराव जावरे, प्रमोद येवले, श्री. चारोडे  आदी  शेतक-यांनी  या उपक्रमामध्‍ये  सहभागी  होवून  ही  लागवड  यशस्‍वी  केली आहे.
          शेवग्‍याच्‍या  शेंगांना नागपूरसह विदर्भातील सर्वच बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी  आहे. परंतु अत्‍यंत  कमी प्रमाणात शेवग्‍याच्‍या शेंगा बाजारात उपलब्‍ध  होतात. त्‍यामुळे  चांगला भावसुद्धा  शेतक-यांना मिळतो. शेताच्‍या बांधावरसुद्धा  शेवग्‍यामुळे  उत्‍पादन घेणे शक्‍य  होत आहे. इतर पिकांसोबत  शेतक-यांना आर्थिक  उत्‍पन्‍नाचे  स्‍त्रोत उपलब्‍ध  होणार आहेत. विदर्भात  पहिल्‍यांदाच  अशाप्रकारची  लागवड  झाल्‍यामुळे   शेतक-यांनाही  शेवग्‍याच्‍या  शेंगाबद्दल  चांगलीच  उत्‍सूकता  आहे. जिल्‍हा अधीक्षक कृषी  अधिकारी भाऊसाहेब  ब-हाटे  आणि सर्व कृषी  अधिकारी  शेवगा लागवडीच्‍या  यशस्‍वीतेसाठी  शेतक-यांना  नियमित  मार्गदर्शन करीत आहेत. त्‍यामुळे  बांधावर शेवग्‍याची लागवड हा प्रयोग  निश्चितच यशस्‍वी  होणार आहे.
                                 -अनिल गडेकर,
                                    9890157788
                                      

          

No comments:

Post a Comment