Tuesday 3 September 2013

पर्यावरणपूरक गणेशोत्‍सव मंडळांसाठी स्‍पर्धा

जिल्‍हा माहिती कार्यालय,सा‍माजिक वनीकरण विभागाचा उपक्रम


             वर्धा, दि.3- सार्वजनिक गणेश मंडळांनी पर्यावरणपूरक गणेशोत्‍सव साजरा करावा. तसेच देखाव्‍यांच्‍या माध्‍यमातून पर्यावरण संवर्धनात्‍मक जनजागृती करावी, या उद्देशाने जिल्‍हा माहिती कार्यालय व सा‍माजिक वनीकरण विभागाच्‍या संयुक्‍त विद्यमाने पर्यावरणपूरक गणेशोत्‍सव 2013 या स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले आहे. वर्धा जिल्‍हयातील सर्व सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांसाठी या स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले आहे.
         सार्वजनिक गणेशोत्‍सवाच्‍या माध्‍यमातून पर्यावरण संवर्धनाला चालना मिळावी. तसेच श्री गणेशोत्‍सव आयोजना सोबतच पर्यावरणासाठी जनतेचाही सहभाग वाढावा यासाठी या स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले आहे. स्‍पर्धेत उत्‍कृष्‍ठ ठरणा-या मंडळांना रोख पारितोषिके स्‍मृतीचिन्‍ह देऊन गौरविण्‍यात येणार आहे.   श्रीगणेशाची स्‍थापना केवळ पर्यावरण पूरक,मा‍तीच्‍या मूर्तीच्‍या माध्‍यमातून व्‍हावी. तसेच गणेशोत्‍सवातील देखावेसुद्धा पर्यावरण संवर्धन पूरक असावेत, ही या स्‍पर्धेची प्रमुख अट राहील.
          स्‍पर्धेसाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी स्‍पर्धेत भाग घेण्‍यासाठी श्री गणेश मूर्तीचा फोटो त्‍यासोबत  पर्यावरण संवर्धनासाठी केलेल प्रयत्‍न, मंडळाच्‍या प्रमुखांची नावे, पत्‍ते आणि संपर्क क्रमांकासह दि. 15 सप्‍टेंबर 2013 पर्यंत संपूर्ण माहिती जिल्‍हा माहिती कार्यालय, प्रशासकीय भवन, दुसरा माळा, वर्धा तसेच उपसंचालक, सामाजिक वनीकरण विभाग,वर्धा यांच्‍या कार्यालयात कार्यालयीन वेळेत पाठविणे आवश्‍यक आहे.  स्‍पर्धेसाठी कोणतेही शुल्‍क आकारण्‍यात येणार नसून प्रवेशिकेवर सार्वजनिक गणेश मंडळाने पर्यावरणपूरक देखावा आणि मूर्तीबाबत थोडक्‍यात माहिती लिहावी. सार्वजनिक गणेश मंडळाचे संपूर्ण नाव, पत्‍ता आणि संपर्क क्रमांकही लिहावयाचा आहे.  त्‍याचबरोबर मूर्ती, देखाव्‍याचे रंगीत छायाचित्रही प्रवेशिकेसोबत जोडावे लागणार आहे. प्रवेशिकेवरील माहिती को-या कागदावर सुवाच्‍च हस्‍ताक्षरात किंवा टंकलिखित स्‍वरूपात मंडळाच्‍या अध्‍यक्ष व सचिवांच्‍या स्‍वाक्षरीने दाखल करावयाची आहे.  स्‍पर्धेसाठी आलेल्‍या प्रवेशिकांतून पर्यावरणप्रेमी संस्‍थांचे प्रतिनिधी, कार्यालयीन प्रतिनिधी असलेल्‍या निवड समितीद्वारे विजेत्‍यांची निवड करण्‍यात येणार आहे. निवड समिती प्रत्‍यक्ष गणेश मंडळांच्‍या देखाव्‍यांची, मूर्तींची पाहणी करणार आहेत. पाहणीनंतर तीन विजेत्‍यांची निवड करण्‍यात येणार आहे. प्रथम विजेत्‍या स्‍पर्धकाला रूपये 1001, द्वितीय स्‍पर्धकास 701 आणि तृतीय स्‍पर्धकाला 501 रूपयांचे रोख पारितोषिक, स्‍मृतीचिन्‍ह आणि प्रमाणपत्र एका विशेष समारंभ देऊन गौरविण्‍यात येणार आहे. त्‍याचबरोबर बालगणेशोत्‍सव मंडळांचाही पर्यावरण संवर्धनात वाटा असावा, या उद्देशाने बाल गणेश मंडळांनाही विशेष पुरस्‍कार देऊन गौरविण्‍यात येणार आहे. 
         निवड समितीने दिलेला निकाल हा अंतिम असेल. त्‍यावर कोणत्‍याही आक्षेपाचा विचार करण्‍यात येणार नाही, याची स्‍पर्धकांनी नोंद घ्‍यावी.  तसेच या सामाजिक उपक्रमात, स्‍पर्धेत अधिकाधिक सार्वजनिक गणेश मंडळांनी सहभागी होऊन पर्यावरणपूरक गणेशोत्‍सव साजरा करावा, असे आवाहन जिल्‍हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक प्रवीणकुमार बडगे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment