Sunday 10 February 2013

होमगार्डना आवश्‍यक सुविधा व माणधनात भरीव वाढ -आर.आर.पाटील


                                       नागरी सुरक्षा जागृती अभियानाचे उदघाटन
वर्धा दि.10- राज्‍यातील 40 हजार होमगार्ड यांना अत्‍यंत कमी मानधन मिळत असून त्‍यांना मिळणा-या सुविधा व मानधनात भरीव वाढ करण्‍यात येईल अशी घोषणा गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी आज केली.
          वर्धा गृहरक्षक दलातर्फे नागरी सुरक्षा जनजागृती अभियानाचे उदघाटन गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्‍या हस्‍ते झाले त्‍याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
          वर्धा येथील होमगार्ड जिल्‍हा प्रशिक्षण केंद्राच्‍या  परिसरात आयोजित कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्‍यक्ष आमदार प्रा. सुरेश देशमुख होते. यावेळी प्रहारचे कर्णल सुनिल देशपांडे,सुनिल राऊत, स‍मीर देशमुख, जिलहा समादेशक प्रा. मोहन गुजरकर, किशोर माथनकर, रामभाऊ सातव,विजय मुळे आदि उपस्थित होते.
          नैसर्गीक आपत्‍ती,कायदा व सुव्‍यवस्‍था आदि आपत्‍ती निवारणासाठी होमगार्ड सदैव पोलीसांच्‍या मदतीसाठी तत्‍पर असल्‍याचे सांगतांना गृहमंत्री आर.आर.पाटील म्‍हणाले की, होमगार्डना दिले जाणारे मानधन अत्‍यंत अपूरे असल्‍यामुळे त्‍यांच्‍या मानधनात व सुविधेत वाढ करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला असून लवकरच त्‍याला शासनाची मान्‍यता घेण्‍यात येईल. होमगार्डना पोलीस भरतीसाठी प्राधान्‍य असल्‍याचेही त्‍यांनी यावेळी सांगीतले.
          जनतेच्‍या जीवनाचे व मालमत्‍तेचे रक्षण करण्‍यासोबतच अतिरेकी हल्‍ल्‍्यासारख्‍या प्रसंगामध्‍येही सतर्कपणे पोलीसांना मदत करतांनाच वृध्‍द नागरीकांनाही सहाय्य करण्‍याचे धोरण स्विकारण्‍याचे आवाहन करतांना गृहमंत्री म्‍हणाले की, वृध्‍द व्‍यक्‍तींच्‍या असहायतेचा लाभ घेवून मुंबईसह मोठ्या शहरामध्‍ये
मालमत्‍तेच्‍या लुटीसोबत खून करण्‍याचेही प्रकरण होत असल्‍यामुळे त्‍यांच्‍या संरक्षणासाठी व त्‍यांना विश्‍वास देण्‍यासाठी मुंबई प्रमाणे महिन्‍यातून एक दिवस अशा वृध्‍दांची भेट घेवून त्‍यांना मदतीचा उपक्रम राबवावा अशा सूचनाही त्‍यांनी यावेळी दिल्‍या.                                        
          प्रारंभी नागरीसुरक्षा जागृती अभियाना अंतर्गत पथसंचलनाची मानवंदना स्विकारुन नैसर्गीक आपत्‍ती बॉम्‍बस्‍पोट आदि परिस्थिती हाताळतांना होमगार्डची भूमिका या विषयाच्‍या अनुषंगाने सादर केलेल्‍या प्रात्‍यक्षिकाची माहिती घेतली.तसेच समाज प्रहरी या स्‍मरणिकेचेही गृहमंत्र्यांनी विमोचन केले.
          होमगार्ड मधून उत्‍तम सेवा बजावणा-या नागरिकांचा यावेळी प्रमाणपत्र देवून गौरव करण्‍यात आला. तसेच निसर्ग सेवा समितीतर्फे स्‍वातंत्र्य सैनिकांच्‍या स्‍मृती प्रित्‍यर्थ लावण्‍यात आलेल्‍या वृक्षाचे रोपनही गृहमंत्र्यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.
          प्रारंभी जिल्‍हा समादेशक मोहन गुजरकर यांनी स्‍वागत करुण प्रास्‍ताविकात नागरी सुरक्षा जनजागृती अभियानाची माहिती दिली. गृहरक्षक दलात सातशे नागरीकांना भर्ती करण्‍यात आले असून त्‍यांना प्रशिक्षणही देण्‍यात आले आहे. बालगृह रक्षक दल,गृह रक्षक मैत्रीनी आदि उपक्रम राबवून नागरी चळवळ उभारण्‍याची संकल्‍पनाही त्‍यांनी यावेळी सांगितली. यावेळी मोठ्या संखेने नागरीक उपस्थित होते.
00000

No comments:

Post a Comment