Saturday 2 October 2021

 





                       गांधीजींनी रुजवलेला करुणेचा झरा करुणाश्रमच्या रुपात जिवंत

                                                                 -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

 

वर्धा, दि 2 ऑक्टोबर (जिमाका) महात्मा गांधींनी देशवासीयांमध्ये प्राण्यांप्रती करुणेचा भाव निर्माण केला. याच करुणेचा जिवंत झरा आज वर्धेत करुणाश्रमाच्या रूपाने पहायला  मिळत आहे. हीच बापुना खरी श्रद्धांजली असलयाचे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले. 

आज राज्यपाल वर्धेच्या दौऱ्यावर असताना त्यांनी वन्यजीवांची शुश्रूषा करणाऱ्या करुणाश्रम आश्रमाला भेट दिली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी आश्रमात प्राण्यांची शुश्रूषा करणाऱ्या सेवकांचा सत्कार केला तसेच संस्थेला 10 लाखाची मदतही जाहीर केली.

        देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे हाच गांधीजींच्या स्वतंत्रता आंदोलनाचा एकमेव उद्देश नव्हता, असे सांगून ते म्हणाले, देशाचे नागरिक आत्मनिर्भर  व्हावेत यासाठी सुद्धा त्यांनी संस्थांची निर्मिती करून विचारांची पायाभरणी केली. देशाचा विकास होण्यासाठी  देशात शांतीपूर्ण वातावरण असायला पाहिजे या हेतूने महात्मा गांधींनी सर्व आंदोलने अहिंसात्मक पद्धतीने केलीत असेही श्री कोश्यारी यावेळी म्हणाले.

आश्रमाचे संचालक आशिष गोस्वामी, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे - वर्मा, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार,  उपवन संरक्षक राकेश सेपट उपस्थित होते.

No comments:

Post a Comment