Tuesday 7 September 2021

 

                                जिल्ह्यात समूह उद्योग स्थापन करण्यास प्राधान्य द्यावे

                                                                        -जिल्हाधिकारी

       वर्धा, दि 7 सप्टेंबर (जिमाका):- जिल्ह्यात विविध क्षेत्रात स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी  जिल्हा उद्योग केंद्र, आरसेटी, उमेद अभियान, खादी व ग्रामोद्योग महामंडळ, नाबार्ड आणि एम गिरी यांनी प्रशिक्षणा सोबतच समूह उद्योग स्थापन करण्यासाठी काम करावे.जिल्ह्यात निर्माण होऊ शकणाऱ्या आणि मागणी असणाऱ्या उद्योगांना प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिल्यात.

       जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समूह उद्योग विकास बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओंबासे, जिल्हा उद्योग केंद्राचे श्री मुद्देमवार, लीड बँक व्यवस्थापक वैभव लहाने, एमगिरीचे व्यंकट राव,  नाबार्डचे व्यवस्थापक, मविमच्या जिल्हा समन्वयक  अस्मिता भोंगाडे, तसेच उमेदच्या स्वाती वानखेडे उपस्थित होत्या.

       बैठकीत उद्योगासाठी लागणारी विविध कौशल्ये आणि वस्तूंचा दर्जा सुधारण्यासाठी प्रशिक्षकांची चमू तयार करायची आहे. यासाठी एम गिरी, आरसेटी, जिल्हा उद्योग केंद्र या संस्था प्रशिक्षण आयोजित करेल. एमगिरीने राज्य किंवा केंद्र कौशल्य विकास प्राधिकरणासोबत करार करून घ्यावा. तसेच प्रशिक्षणासाठी डायटचे इमारत वापरावी. यासोबतच खादी ग्रामोद्योग महामंडळाने शेतकऱ्यांना मध संकलनासाठी सुद्धा प्रशिक्षण द्यावे असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

        उमेदच्या महिलांचे  चार समूह प्रकल्पाला अंतिम स्वरूप देण्यात आले. यात सेलूमध्ये -डेअरी क्लस्टर, सिंधी मेघे येथे  बॅग आणि टेराकोटा ज्वेलरी क्लस्टर, नाचनगाव येथे गारमेंट स्टिचिंग क्लस्टर विकसित केले जाईल. यासाठी खादी व ग्रामोद्योग महामंडळाकडे असलेल्या स्फूर्ती योजनेमध्ये  या प्रकल्पाना अनुदान मिळण्यासाठी अहवाल तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात.

                                                                        0000

No comments:

Post a Comment