Thursday 15 July 2021

 



प.क्र. 531                                                                    दिनांक 15 जुलै 2021

                उद्योग सुरू राहण्यासाठी उद्योग क्षेत्राने कोविड

                 अनुकूल वर्तणुकीचा अवलंब करणे आवश्यक

                                                    - जिल्हाधिकारी

कार्यक्षेत्राच्या ठिकाणी किंवा परिसरात कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करावी

          वर्धा, दि 15 (जिमाका):- कोविड 19 च्या संसर्गाच्या परिस्थितीचा सामना करताना लॉकडाऊन काळातही आपले उद्योग सुरू ठेवण्यासाठी  कार्यक्षेत्राच्या ठिकाणी कोविड अनुकूल वर्तणुकीसोबतच कार्यक्षेत्राच्या ठिकाणी कर्मचारयांच्या राहण्याची व्यवस्था, त्यांचे लसीकरण आणि अत्यावश्यक परिस्थितीत त्यांना आरोग्य सुविधा देण्यासाठी छोटे रुग्णालय सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिल्यात. 

        जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड संसर्गाच्या अनुषंगाने तिसऱ्या लाटेतही उद्योग सुरू राहावेत यासाठी उद्योजकांची बैठक घेण्यात आली. यावेळी उद्योजकांनी करावयाच्या तयारी संदर्भात चर्चा करण्यात आली, यावेळी श्रीमती देशभ्रतार बोलत होत्या.

          कोविड संसर्ग काळात रुग्णसंख्या वाढल्यास शासनाला लॉक डाऊन करण्यापलीकडे पर्याय उरत नाही. अशावेळी लॉकडाऊनचा परिणाम आपल्या उद्योग आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेवर होतो. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आपण आरोग्यायसंदर्भात सर्व तयारी करतोय, तशीच तयारी आपल्याला उद्योग सुरू ठेवण्यासाठी सुद्धा करायची आहे. त्यासाठी प्रत्येक उद्योगाने त्यांच्या कार्यक्षेत्राच्या ठिकाणी आवश्यक ती तयारी आणि संसर्गाच्या अनुषंगाने बदल करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. 

अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना  घर ते कार्यस्थळ यादरम्यान वाहतूक करण्यासाठी वाहतूक व्यवस्था तयार करावी. बस 50 टक्के क्षमतेने चालवावी . असे करणे शक्य नसल्यास संबंधित कर्मचारी स्वतःच्या वाहनाने प्रवास करीत असल्यास त्यांना घर ते कार्यस्थळाशिवाय इतरत्र बाहेर फिरण्यास प्रतिबंध करावा. कर्मचारी कंटेन्मेंट झोन मध्ये येत असल्यास त्यांना कार्यस्थळी येण्यास प्रतिबंध करावा.          कार्यस्थळी तापमान तपासणी, मास्कचा वापर, आणि कार्यस्थळाचे रोज निर्जंतुकीकरण या बाबी कटाक्षाने पाळण्यात याव्यात. तसेच जेवणाच्या ठिकाणी गर्दी होणार नाही याप्रमाणे जेवणाच्या वेळांचे नियोजन करावे असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

          प्रत्येक उद्योगाने त्यांच्या कर्मचाऱ्याचे व त्यांच्या कुटुंबियांचे लसीकरण करून घ्यावे. किती कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले नाही याची माहिती पाठवावी, यावरून एम आय डी सी मध्ये लसीकरण केंद्र देण्यासंदर्भात विचार करता येईल. क्षमता असणाऱ्या उदयोग आस्थापनाने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी खाजगी स्तरावर लसीकरण करून घ्यावे.  त्याचबरोबर मोठ्या उद्योगांनी त्यांच्या परिसरात कर्मचाऱ्यांसाठी बाह्यरुग्ण विभाग, विलगिकरण कक्ष, आणि मूलभूत औषधी, आणि छोटे रुग्णालय इत्यादी व्यवस्था करणे भविष्याच्या दृष्टीकोणातून आवश्यक राहणार आहे. 100 पेक्षा जास्त कर्मचारी असणाऱ्या उद्योगांनी अशी व्यवस्था करावी असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. रुग्णालयासाठी आवश्यक मनुष्यबळ तयार करण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण कौशल्य विकास विभागाचा वतीने उपलब्ध करून देण्यात येईल असेही त्या म्हणाल्या. 

उद्योगांनी त्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून 500 जम्बो सिलिंडर शासकीय रुग्णालयांना उपलब्ध करून द्यावेत, तसेच लहान मुलांसाठी आवश्यक असणाऱ्या बाबी उपलब्ध करून द्याव्यात. तसेच यापूर्वी उद्योगांनी केलेली मदत सुद्धा प्रशासनाला कळवावी अशा सूचना देशभ्रतार यांनी दिल्यात. 

या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, जिल्हा उद्योग केंद्र व्यवस्थापक शिवकुमार मुद्देमवार, शेखर शेंडे, प्रवीण हिवरे, आर के शर्मा, पी एम जावदंड, आर बी वैरागडे, प्रसाद कुकेकर, विवेक पाटील, आयुष सिंघनिया, दिलीप गायकवाड, बी एस शहाणे आदी उद्योजक उपस्थित होते.

                                                 0000000

No comments:

Post a Comment