Monday, 11 June 2018










सोलर प्रकल्पामुळे भारत आणि चीनचे संबध दृढ होईल
                                                      -चांग झीयुन
वर्धा, दि 11 (जिमाका) :- चीन हा देश नेहमी महात्मा गांधी यांचे तत्व मानणारा देश आहे. त्यामुळे भारत आणि चीनचे संबध चांगले मैत्रीपूर्ण राहावे  तसेच महात्मा गांधी यांचे ग्रामीण भागातील शेतक-याचा विकास व्हावा हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी  त्यांच्या पावन भूमीत शेतक-यांना  बारमाही  सिंचनाची सुविधा व्हावी यासाठी   सोलर सिंचन प्रकल्प सुरु करण्यात आला असून या प्रकल्पाच्या माध्यमाने येथील शेतक-यांनी बारमाही शेती करावी,  असे प्रतिपादन या प्रकल्पाचे हस्तांतरण आणि प्रकल्पाची पाहणी करतांना  चीन सरकारचे भारतातील मुबंई येथील दुतावास कार्यालयातील  अधिकारी( कॉन्सलर जनरल) चांग झीयुन यांनी  ग्रामपंचायत पिंपळगाव (भोसले) येथे केले.
चीनच्या सौर उर्जा प्रौद्योगिकी नवाचार आणि सहयोगाने गरीबी उन्मूलनच्या पायलट कार्यक्रमा अतंर्गत मुबंई आधारीत चीन वाणिज्यिक दूतावास युन्नान अक्षय उर्जा कंपनी मर्यादित च्या पिंपळगाव (भोसले) व नटाळा येथे प्रायोगिक तत्वावर चीन सरकार व जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरु करण्यात आला. सोलर सिंचन प्रकल्पाच्या हस्तांतरण  कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी चीन सरकारचे मुबंई येथील दूतावासातील अधिकारी (वाणिज्यिक कॉन्सलर)  वाँग शिलकाई, प्रकल्पाचे मार्गदर्शक कोकण विभागाचे माजी आयुक्त नानाजी सत्रे, श्री. वांग ली, श्रीमती अश्विनी, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, आर्वीच्या सभापती शिला पवार, सरपंच जिवन राऊत, उपस्थित होते.
पुढे बोलतांना श्री. चाँग म्हणाले, चीन हा देश नेहमी भारतसोबत मैत्रीचे संबंध ठेवण्यासाठी प्रयत्ररत असून आजचा दिवस योगायोगाने चांगला आहे. कारण भारताचे पंतप्रधान नरेद्र मोदी चीन दो-यावर भारताचे संबध चांगले राहावे यासाठी चर्चा करीत आहे. आणि इथे चीन सरकारच्या वतीने सोलर सिंचन प्रकल्पाचे हस्तांतरण करण्यात येत आहे. ही आनंदाची बाब आहे. चीन हा देश कृषी प्रधान देश असून चीन मध्ये सौर उर्जेवर तांत्रिक पध्दतीची शेती करण्यात येते त्याप्रमाणे येथील शेतक-यांनी सुध्दा तांत्रिक पध्दतीची शेती करावी. तसेच शेतीमध्ये बारमाही पिके घ्यावी याकरीता   शेतक-यांसाठी  हा सोलर सिंचन प्रकल्प मदत नसून  भारताला सहकार्य करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या मदतीने प्रायोगिक तत्वावर सोलर सिंचन प्रकल्‍प सुरु करण्यात आला. अशाच प्रकारच्या योजना  चीन सरकारच्या वतीने सुरु करण्यात येईल असेही श्री चाँग म्हणाले.
चीनच्या सहकार्याने सुरु करण्यात आलेला हा प्रकल्प राज्यातील पहिला सोलर सिंचन प्रकल्प असून या प्रकल्पामुळे पिंपळगाव व नटाळा येथील जवळपास 50 शेतक-यांना बारमाही सिंचनाचा  लाभ होणार आहे. यामुळे या परिसरातील 22 हेक्टर शेती सोलर सिंचनखाली येणार आहे. तसेच 30 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्यात आली असल्याचे शैलेश नवाल म्हणाले. या प्रकल्पामध्ये शेतक-यांना समप्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे यासाठी वेगवेगळया ठिकाणी 5 पाणी वितरण नलिकेचे चेंबर बनविण्यात आले असून यामध्ये 10 उपनलिका तयार करण्यात आल्या आहे.  या प्रकल्पामुळे येथील शेतक-यांना बारमाही सिचनाची सुविधा होणार असल्याने शेतक-यांनी बारमाही शेती पिके घ्यावी, असेही आवाहन शैलेश नवाल यांनी केले.
भारतासोबतचे चीन सबंध मैत्री व सलोख्याचे राहावे, यासाठी चीन सरकारच्या वतीने भारतात विविध प्रकल्प उभारण्यासाठी प्ररत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणुन सोलर सिंचन प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. या सोलर सिंचन प्रकल्पासाठी चीन सरकारच्या वतीने  1 कोटी 60 हजार रुपये तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने 30 लाख खर्च झालेला  असून धरणातून पाणी पुरवठा करण्यासाठी 30 एच.पी. मोटर पंप बसविण्यात आलेआहे . या सोलस सिंचन प्रकल्पाचा येथील शेतक-यांनी लाभ घेऊन सिंचन करावे, असे आवाहन तानाजी सत्रे यांनी यावेळी शेतक-यांना केले.
यावेळी कार्यक्रमाला प्रकल्पाचे समन्वयक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी माजी अधिकारी श्री. शिंदे,  उपविभागीय अधिकारी प्रकाश शर्मा, जलसंपदा विभाभागाचे उपअभियंता श्री.साबळे, जिल्हा परिषदच्या लघु सिचन विभागाचे उपअभियंता श्री. लांडगे, श्री. ससाने, पोलिस पाटील सतिश इंगोले व नागरिक मोठया प्रमणावर उपस्थित होते.
यावेळी चीन प्रतिनिधींनी प्रकल्पाची पाहणी करुन समाधान व्यक्त केले.
                                      0000

Friday, 1 June 2018


नागरिकांनी दुधातील भेसळ ओळखून विक्रेत्याविरुध्द प्रशासनाकडे तक्रार करावी
                                                      -जिल्हाधिकारी
वर्धा, दि.1- नागरिकांना दुधाच्या शुध्दतेबाबत शंका आल्यास  नागरिकांनी घरच्या घरी दुधातील भेसळ ओळखून दूध विक्रेत्याविरुध्द अन्न व औषध प्रशासन विभागाकडे किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार करावी.  असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी  केले. जिल्हा स्तरीय दुध भेसळ आळा घालणा-या समितीच्या बैठकित केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकिला पोलिस विभागाचे प्रतिनिधी, जिल्हा दुध संघाचे व्यवस्थापकिय संचालक, जिल्हा दुग्धशाळा विकास अधिकारी,  अन्न सुरक्षा अधिकारी, उपस्थित होते.
मागिल दोन वर्षात अन्न व औषध प्रशासनाव्दारे 49 नमुने विश्लेशनाकरीता घेण्यात आले होते. त्यापैकी 43 नमुने प्रमाणित घोषित झाले असुन मात्र 6 नमुने कमी दर्जाचे घोषित झालेले आहे. 6 नमुन्यापैकी कोणत्याही अन्न नमुन्यामध्ये युरीया ,माल्टो डेकस्ट्रीन, शुगर इत्यादी रासायनिक पदार्थाद्वारे भेसळ केल्याचे आढळून आलेले नाही. सदर नमुने फक्त फॅक्ट व एस.एन.एफ. या मानदामध्ये कमी दर्जाचे आढळून आले. सदर मानद दुधात पाणी टाकल्यामुळे किंवा जनावरांना योग्य प्रमाणात खुराक न दिल्यामुळे कमी दर्जाचे घोषित होऊ शकतात. परंतु सदर दुधात शरीराला अपायकारक असणा-या घटकांची भेसळ केल्याचे आढळून आलेले नाही. सदर कमी अर्जाच्या नमुन्यापैकी 5 प्रकरणात एकुण 27 हजार 500 रुपये दंड वसुल करण्यात आलेला असून एका प्रकरणात कारवाई सुरु असल्याचे यावेळी  अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी  बैठकित माहिती देतांना सांगितले
नागरिकांनी दुधातील भेसळ कशी ओळखावी
दुधातील भेसळ ओळण्यासाठी दुधात जर पिस्टमय पदार्थ (स्टार्च) ची भेसळ केली असल्यास दुधामध्ये आयोडीनचे थेंब टाकल्यास दुधास निळा रंग येतो. तसेच पाणी जास्त टाकुन असल्यास थेंब गुळगुळीत उतरत्या पृष्ठ भागावर टाकल्यास पाणी मिश्रीत दुधाचा थेंब लवकर खाली ओघळतो तर शुध्द दुधाचा थेंब सावकाश खाली ओघळतो. परंतु चाचणीत स्थिम मिल्क पावडर मिसळलेल्या दुधास लागु होत नाही.    

Monday, 21 May 2018





वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदार संघात
Ø 99.72 टक्के मतदान; चार उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत
Ø वर्धा  जिल्ह्यात 99.35 टक्के मतदान.

        वर्धा दि21 :- – महाराष्ट्र विधान परिषदेच्या वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज 21 मे रोजी दुपारी 4 पर्यंत 99.72 टक्के मतदान झाले. आजच्या मतदानासोबतच चार उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून 24 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
सकाळी आठ ते सायंकाळी चार पर्यंत आज मतदान झाले असून सायंकाळी 4 पर्यंत एकूण 1059 मतदारांपैकी 1056 मतदारांनी मतदान केले.  वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या मतदार संघात अंतिम चार उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये जगदीश अचलदास टावरी-अपक्ष, सौरभ राजू तिमांडे-अपक्ष, रामदास भगवानजी आंबटकर-भाजपा,  इंद्रकुमार सराफ-भाराकॉ यांचा समावेश आहे. आजच्या निवडणुकीत आर्वी, हिंगणघाट, चामोर्शी या मतदान केंद्रावर प्रत्येकी एक मतदाराने आपला हक्क बजावला नाही.  अन्य 17 पैकी 14 मतदान केंद्रावर 100 टक्के मतदान झाले.
      या स्थानिक प्राधिकारी मतदार संघासाठी वर्धा जिल्हयातील 308, चंद्रपूर येथील 469 व गडचिरोली जिल्हयातील 282 असे एकूण 1059 मतदार आहेत.  या मतदानासाठी 17 मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. वर्धा जिल्हयात तहसिल कार्यालय आर्वी-(98.75 टक्के), वर्धा-(100 टक्के) व हिंगणघाट-(98.70 टक्के), चंद्रपूर जिल्हयात तहसिल कार्यालय चिमूर, ब्रम्हपूरी, वरोरा, मूल, चंद्रपूर, बल्लारपूर, गोंडपिपरी, राजूरा- (सर्व ठिकाणी 100 टक्के) व गडचिरोली जिल्हयात तहसिल कार्यालय कुरखेडा-(100 टक्के), देसाईगंज-(100 टक्के), गडचिरोली-(100 टक्के), चार्मोशी-(98.08 टक्के), अहेरी-(100 टक्के) व एटापल्ली-(100 टक्के) मतदान झाले. चंद्रपूरमध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी गोंडपिपरी येथे तर महापौर अंजली घोटेकर यांनी चंद्रपूर येथे मतदान केले.
वर्धा  जिल्ह्यात 99.35 टक्के मतदान.
       महाराष्ट्र विधान परिषदेच्या वर्धा -चंद्रपूर- गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदार संघाची निवडणूक आज जिल्ह्यात शांततेत पार पडली. आर्वी, वर्धा, हिंगणघाट हे तीन मतदान केंद्र मिळून एकूण 99. 35 टक्के मतदान झाले. यामध्ये जिल्ह्यातील 308 मतदारांपैकी 306 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 154 पुरुष मतदारांपैकी 153 पुरुषांनी मतदान केले. तर 154 महिला मतदारांपैकी 153 महिलांनी मतदान केले.
         या निवडणुकीसाठी आर्वी, वर्धा आणि हिंगणघाट येथील तहसील कार्यालयात मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते. संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांनी मतदान केंद्राध्यक्ष म्हणून काम पाहिले.  आर्वीमध्ये 80 मतदारांपैकी 79 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात 39 पुरुष तर 41 महिला मतदारांचा समावेश आहे. वर्धा केंद्रावर 151 पैकी 151 म्हणजे 100 टक्के मतदान झाले. यामध्ये 74 पुरुष आणि 77 महिला मतदारांनी मतदान केले. हिंगणघाट केंद्रावर 77 पैकी 76 मतदारांनी मतदान केले. यात 42 पुरुषांपैकी 41 पुरुष तर 35 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला.
या मतदार संघासाठी मतमोजणी 24 मे रोजी चंद्रपूर येथे होणार आहे. या निवडणुकीची मतमोजणी दिनांक 24 मे 2018रोजी चंद्रपूर येथे होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी दिली आहे.


       जिल्हयाचा माता व बालमृत्युदर शुन्यावर आणणार - जिल्हाधिकारी
Ø  टास्क फोर्स समिती बैठक
      वर्धा दि 21 (जिमाका):-जिल्हयाचा माता मृत्युदर व बाल मृत्युदर शुन्यावर आनण्याकरिता 28 मे ते 9 जुन या कालावधित 0 ते 5 वयोगटातील बालकांचे अतिसारामुळे होणारे मृत्यु टाळण्यासाठी विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा राबविण्यात येणार आहे. या कालावधित कार्यक्षेत्रातील 0 ते 5 व वर्ष वयोगटातील बालकांचे आशा कार्यकर्तीमार्फत सर्वेक्षण करुन अतिसाराने आजारी असलेल्या बालकांना ओआरएस व झिंक गोळया देऊन उपचार करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.
मातांना ओआरएस द्रावण तयार करण्याचे प्रात्याक्षिक करुन दाखविण्यात येणार आहे. तसेच ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत निवड केलेल्या जिल्हयातील हिवरा व कवठा (झोपडी) या गावामध्ये विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमे अंतर्गत लसीकरणापासुन वंचित राहिलेल्या गरोदर माता व बालके तसेच अर्धवट लसीकरण झालेली गरोदर माता व बालके यांचे सर्वेक्षण करुन त्यांचे संपूर्ण लसीकरण करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी  जिल्हा टास्क फोर्स समितीच्या बैठकित केल्यात.
            यावेळी बैठकिला मुख्यकार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. आर.पी.गहलोत, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. विनोद वाघमारे, वैद्यकिय अधिकारी डॉ. मंगेश रेवतकर, फॉक्झी प्रतिनिधी डॉ. शुभदा जाजु, आय.एम.ए.चे सचिव डॉ. शंतनु चव्हाण, डॉ. सुरेखा तायडे यांची उपस्थिती होती.
            बैठकित जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. डवले यांनी सांगितले कि, प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेला प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व  योजनेअंतर्गत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये खाजगी प्रसुती तज्ञ यांच्या सेवा विनामुल्य उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यामुळे सर्व गरोदर मातांची प्रसुतीपुर्व तपासणी तज्ञ डॉक्टर कडून केल्या जाते. त्यामुळे माता मृत्यु  निरंक आणण्याचे प्रयत्न आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच आजारी बालकांना बालरोगतज्ञा व्दारे तपासणी करुन अर्भकमृत्यु शुन्यावर आनण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामिण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयामध्ये गरोदर मातांना आवश्यक असणारी सर्व औषधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच नियमित लसीकरण कार्यक्रम अंतर्गत प्रत्येक गावात लसीकरण सत्र आयोजित करुन सर्व गरोदर माता व बालकांना पूर्ण संरक्षित करण्याबाबत, नियोजन करण्यात आले,  असल्याचेही श्री. डवले यांनी यावेळी सांगितले.


नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यास प्रशासनाने सज्ज राहावे. - जिल्हाधिकारी
•जिल्हाधिका-यांनी घेतला मान्सूनपूर्व आढावा
          वर्धा दि 21 (जिमाका):- जीर्ण झालेल्या अति धोकादायक शासकीय इमारती पावसाळा सुरू होण्यापूर्वी पाडून टाकाव्यात . तसेच नैसर्गिक आपत्तीत जीव वाचवणारी आवश्यक साधने जसे बोट, लाईफ जॅकेट्स,दोर, या साधनांची पुरेशी व्यवस्था करण्यासोबतच, ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयात  औषधांचा पुरेसा साठा करून ठेवावा. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे,  अशा सूचना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल्यात. मान्सूनपूर्व आढावा बैठक घेताना ते बोलत होते.
          यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने, निवासी उपजिल्हाधिकारी राजलक्षमी शहा,  अतिरिक्त कार्यकारी अधिकारी करुणा जुईकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि विभाग प्रमुख आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर सोनटक्के उपस्थित होते.
          नैसर्गिक आपत्तीच्या काळात कार्यालयात  वीज पुरवठा खंडित झाल्यास कार्यालयाचे काम बंद पडू नये यासाठी  नादुरुस्त डिझेल इंजिन कार्यालयाने तातडीने दुरुस्त करून घ्यावे. त्यासाठी निधी आवश्यक असल्यास त्याची मागणी करावी.  उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयात औषधी, डॉक्टरांची चमू, वीज पुरवठा, इमर्जन्सी ऑपरेशन थिएटर, तयार ठेवावे.  तसेच रुग्णालयाची तात्पुरती डागडुजी करून घ्यावी. यासाठी रुग्णकल्याण समितीला 5 लक्ष रुपये देण्यात येतील. हे काम रुग्ण कल्याण समितीने करावे. या सर्व रुग्णालयांची  तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी पाहणी करून खातरजामा करावी.
          ग्रामीण भागात अवैध दारू व्यवसायांवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच आपत्ती काळात तत्पर कार्य करण्यासाठी प्रत्येक गावात ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करावी. मे अखेर पर्यंत ग्राम सुरक्षा दल स्थापन करून जून च्या पहिल्या आठवड्यात तहसीलदारांनी त्यांची बैठक घ्यावी. सर्व विभाग प्रमुखानी नैसर्गिक आपत्तीच्या काळात जबाबदारीने काम करावे. हलगर्जीपणा करणा-या अधिक-यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.