Wednesday, 2 November 2011

पदवीधर अंशकालीन उमेदवारांना सुचना


                      महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक        जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि. 2 नोव्हेंबर 2011
-------------------------------------------------------------------- ---------------------
                  
      वर्धा,दि.2- जिल्ह्यातील सर्व पदवीधर अंशकालीन उमेदवारांना सुचीत करण्यात येते की  जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यालयात पदवीधर अंशकालीन उमेदवार म्हणून 3 वर्षे काम केल्याबाबत नोंद केलेल्या अनुभव प्रमाणपत्राची मूळ प्रत घेऊन तात्काळ जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, तळ मजला, सिवहील लाईन, वर्धा या कार्यालयात तपासणीसाठी सकाळी 11 ते 4 या वेळेत उपस्थित रहावे.
तसेच येतांना सेवायोजन नोंदणी कार्ड व अंशकालीन कर्मचारी म्हणून काम केलेल्या अनुभव प्रमाणपत्राच्या दोन छायांकीत प्रती सोबत आणाव्यात.
      याबाबत सर्व पदवीधर अंशकालीन उमेदवारांना पत्रे पाठविली आहेत. अपु-या पत्यामुळे काही ऊमेदवारांना पत्र मिळाले नसल्यास संबंधित उमेदवारांनी जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यालय,वर्धा येथे संपर्क साधावे. असे सहाय्यक संचालक,रोजगार व स्वयंरोजगार, वर्धा यांनी कळविले आहे.
                              00000000

जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा आवेदनाच्या तारखेत मुदतवाढ


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक       जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि. 2 नोव्हेंबर 2011
-------------------------------------------------------------------- --
           
      वर्धा, दि.2- जवाहर नवोदय विद्यालय, सेलू काट, जि. वर्धा येथे वर्ग 6 मध्ये प्रवेश घेण्यास ईच्छुक विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा 12 फेब्रुवारी 2011 रोजी होणार असून त्याकरीता आवेदनपत्र 31 ऑक्टोंबर 2011 ऐवजी 15 नोव्हेंबर 2011 पर्यंत आवेदन पत्र गटशिक्षणाधिकारी कार्यालयात स्विकारण्यात येणार आहेत. असे प्राचार्य यु. राजा रेड्डी यांनी कळविले आहे.
                                00000

Tuesday, 1 November 2011

जिल्हास्तर शालेय कॅरम स्पर्धा

                                       महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा दि.2 नोव्हेंबर 2011
------------------------------------------------------------
             
     वर्धा,दि.2- जिल्हास्तर शालेय कॅरम स्पर्धेचे आयोजन दिनांक    8 ते 9 नोव्हेंबर 2011 या दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल, वर्धा येथे सकाळी 10 वाजेपासून करण्यात येणार आहे. या स्पर्धा फक्त 19 वर्षे वयोगट शालेय मुला मुलींकरीता आहे.
     ज्या शाळांनी किंवा महाविद्यालयांनी आपला प्रवेश निश्चित केला असेल त्या शाळेतील  किंवा महाविद्यालयातील मुख्याध्यापक व शारीरिक शिक्षक यांनी नोंद घ्यावी व शारीरिक शिक्षकांनी आपल्या संघास दिनांक 8 नोव्हेंबर 2011 रोजी सकाळी 9.30 वाजता जिल्हा क्रीडा संकुल,वर्धा येथे उपस्थित राहावे.
     अधिक माहितीकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सेवाग्राम रोड,वर्धा येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
                        000000

भेसळयुक्त खाद्यतेलाची विक्री केल्याबद्दल दंड व शिक्षा

                                 महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा दि. 2 नोव्हेंबर 2011
-----------------------------------------------------------
             
            वर्धा,दि.2- भेसळयुक्त जवस तेल विक्री केल्याप्रकरणी वर्धा येथील किराणा व्यापा-यास नुकतेच मुख्य न्यायदंडाधिकारी,वर्धा यांनी आरोपीस 1 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व रु. 5000 दंड व दंड न भरल्यास 1 महिन्याची शिक्षा सुनावली आहे.
     मे.विजय तेल भंडार, कच्छी लाईन, वर्धा येथून अन्न व औषध प्रशासन, वर्धा येथील अन्न निरीक्षक सु.पै.नंदनवार यांनी दि. 26 ऑक्टोंबर 2002 रोजी जवस तेलाचा नमुना अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा 1954 व त्याअंतर्गत नियम नुसार विश्लेषक,पुणे यांचेकडे पाठविला होता. विश्लेषणाअंती जवस तेल भेसळयुक्त असल्याचे निष्पन्न झाल्यावरुन आरोपीविरुध्द मुख्य न्यायदंडाधिकारी, वर्धा यांच्या न्यायालयात नंदनवार यांनी अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्या अंतर्गत खटला दाखल केला होता. सदर खटल्याचा निकाल दि. 22 सप्टेंबर 2011 रोजी लागला असुन, आरोपीस दंड व शिक्षा सुनावण्यात आली आहे.
     सदर खटल्याचा पाठपुरावा अन्न निरीक्षक  स्मिता बाभरे यांनी सहाय्यक आयुक्त राजेश शहा व पर्यवेक्षक (अन्न) दिलीप संगत यांचे मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या केला. शासनातर्फे सहायक सरकारी वकील एम.एम.महाजन यांनी विविध न्यायालयाचे न्यायनिवाडे न्यायालयात सादर केले व शासनाची बाजु न्यायालयात योग्यरित्या मांडली. असे सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन, वर्धा कळवितात.
                        000000

महात्मा साखर कारखान्याच्या गळीत हंगाम मोठया थाटात शुभारंभ शेतक-यांना आर्थिक दृष्टया समृध्द करावे - मुख्यमंत्री धुमल


                     महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा दि.1नोव्हेंबर 2011
-------------------------------------------------------------

वर्धा, दि.1: विदर्भात शेतीला सिंचनाची अपूरी जोड असल्यामुळे येथील शेतकरी आर्थिकदृष्टया डबघाईला आला आहे. या समस्येवर मात करण्यासाठी शेतक-यांच्या शेतीला सिंचनाची पूरेशी व्यवस्था झाल्यास त्यांना शेतीतून भरघोष असे उत्पन्न मिळेल व तो आर्थिक दृष्टया समृध्द होईल असा विश्वास हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांनी व्यक्त केला.
पूर्ती उघोग समुहव्दारा संचालीत महात्मा शुगर अन्ड पॉवर लिमीटेड जामणी ता.सेलू येथे महात्मा साखर कारखान्याचा गळीत हंगामाच्या शुभारंभ मोठया थाटात आज हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल व राज्यसभा विरोधी पक्ष नेते अरुण जेटली व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला त्या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मंचावर राज्यसभेचे खासदार पियुष गोयल, आमदार दादाराव केचे,  सुर्यप्रकाश साही,  डॉ. शिरीष गोडे, माजी खासदार सुरेश वाघमारे, रामदास तडस, जि.प.सदस्य मिलिंद भेंडे, अरुण अडसड आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतक-यांना मुलभुत सोयी पुरविल्यास भविष्यांत त्यांची प्रगतीकडे वाटचाल होऊ शकते असे सांगून मुख्यमंत्री धुमल म्हणाले की, शेतक-यांच्या हिताचे नवनविन उपक्रम पूर्ती उद्योग समुहाने राबविले असून याचा लाभ शेतक-यांनी घेतल्यास त्यांच्या आर्थिक परिस्थिती मध्ये निश्चितपणे बदल घडून येईल असेही ते म्हणाले.
राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते अरुण जेटली म्हणाले की, विदर्भाचा शेतकरी हालाखीचे जीवण जगत असून त्यांनी पूर्ती उद्योग समुहाचे नवनविन तंत्रज्ञान आत्म्सात करुन अनूदानांवर साहित्याची खरेदी केल्यास शेतक-यांना आर्थिक प्रगती सोबत उज्वल भविष्याकडे वाटचाल करता येईल असे ते म्हणाले.
यावेळी भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नितिन गडकरी यांनी पुर्ती उद्योग समुहाव्दारे  शेतक-यांच्या हिताचे करण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देवून भविष्यांत शेतक-यांच्या जीवनांत आनंदाची पर्वणी येईल असे निर्णय घेण्यांत येतील असे ते म्हणाले.
यावेळी आमदार दादाराव केचे व इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
तत्पूर्वी मान्यवरांनी उसाचा गठ्ठा संयत्रात टाकून साखर गळीत हंगामाचे उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी कृषी प्रदर्शनीला भेट देवून पाहणी केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर दिवे यांनी केले तर संचालन बाळ कुळकर्णी यांनी व आभार प्रदर्शन विजय मुडे यांनी केले या कार्यक्रमाला परिसरांतून मोठया संख्येने ग्रामस्थ पदाधिकारी ग्रा.प.सदस्य उपस्थित होते.

राज्यातील 196 नगरपरिषदा / नगरपंचायतींच्या निवडणुकींसाठी 8 डिसेंबर रोजी मतदान

नागपूर, दि. 01 : राज्यातील 196 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींची मुदत डिसेंबर 2011 ते फेब्रुवारी 2012 या कालावधीत संपत असल्याने त्यांचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आज येथे जाहीर केला. सर्व ठिकाणी गुरूवार, दि. 8 डिसेंबर 2011 रोजी मतदान घेण्यात येणार असून मतमोजणी त्याच दिवशी सायंकाळी 6.30 वाजता किंवा दुसऱ्या दिवशी होईल. संबंधित नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचार संहिताही लागू झाली आहे, असेही श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले.

नागपूर येथील रविभवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत श्रीमती सत्यनारायण यांनी ही माहिती दिली. राज्य निवडणूक आयोगाचे अपर मुख्य सचिव चाँद गोयल यावेळी उपस्थित होते. आज जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्रे 16 ते 22 नोव्हेंबर 2011 या दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेच्या कालावधीत दिली व स्वीकारली जातील. 20 नोव्हेंबर रोजी रविवारची सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्र देण्यात येणार नाहीत. बुधवार, दि. 23 नोव्हेंबर 2011 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करून वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत मंगळवार, दि. 29 नोव्हेंबर 2011 पर्यंत असेल. बुधवार, दि. 30 नोव्हेंबर 2011 रोजी निवडणूक चिन्हाचे वाटप आणि अंतरिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. गुरूवार, दि. 1 डिसेंबर 2011 रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. गुरुवारी, दि. 8 डिसेंबर 2011 रोजी सकाळी 7.30 वाजेपासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. संबंधित जिल्हाधिकारी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन मतदानाच्याच दिवशी सायंकाळी 6.30 वाजता किंवा सर्व मतदान केंद्रांवर मतदान समाप्तीनंतर अथवा शुक्रवार, दि. 9 डिसेंबर 2011 रोजी मतमोजणी होईल.

लातूर, चंद्रपूर नगरपरिषदांचे शासनाने महापालिकांमध्ये रुपांतर केल्यामुळे तेथील नगर परिषदांच्या निवडणुका होणार नाहीत. या नव्या महानगरपालिकांच्या निवडणुका यथावकाश घेण्यात येतील. निवडणूक होणाऱ्या 196 पैकी दापोली, शिर्डी, अर्धापूर आणि माहूर या चार नगरपंचायती आहेत. तर उर्वरित 192 नगरपरिषदा आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी नगरपरिषद; तर नांदेड जिल्ह्यातील माहूर व अर्धापूर येथे नव्याने नगरपंचायत अस्तित्वात आल्याने त्यांच्या प्रथमच निवडणुका होत आहेत. सर्व ठिकाणी बहुसदस्यीय पद्धतीने निवडणुका होणार असून त्यासाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर केला जाणार आहे. एकूण 4,303 जागांसाठी या निवडणुका होणार असून त्यातील 50 टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. उमेदवारांच्या निवडणूक खर्चातही राज्य निवडणूक आयोगाने वाढ केली असून तो पुढील प्रमाणे असेल (कंसात पूर्वीची खर्च मर्यादा): `अ` वर्ग नगरपरिषद- 3,00,000 (45,000), `ब` वर्ग नगरपरिषद- 2,00,000 (45,000), `क` वर्ग नगरपरिषद- 1,50,000 (45,000), नगरपंचायत- 1,50,000 (45,000)

या निवडणुकांच्या आनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांच्या निकषांमध्ये सुधारणा केल्या असून मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्र दोन किलोमीटरच्या आत व मध्यवर्ती ठिकाणी राहील; तसेच मतदान केंद्रे मुख्यत: शासकीय, निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इमारतीत असतील. ती बहुतांश तळमजल्यावर असतील. मतदान केंद्रात पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह; तसेच वृद्ध, गरोदर स्त्रिया व अपंग व्यक्ती यांच्यासाठी रॅम्पची व्यवस्था करण्यात येईल. मतदान केंद्रांवर लांब रांगा लागू नयेत व मतदारांना सुलभरीत्या मतदान करता यावे यासाठी नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकींच्या मतदान केंद्रांची कमाल मतदार संख्या 600 करण्यात आली आहे.

निवडणूक होणाऱ्या नगरपरिषदा/नगरपंचायतींची जिल्हानिहाय संख्या:

रायगड- 10, रत्नागिरी- 5, सिंधुदुर्ग- 3, नाशिक- 6, धुळे- 2, जळगाव- 12, अहमदनगर- 8, नंदुरबार- 1, पुणे- 10, सोलापूर- 9, सातारा- 8, सांगली- 4, कोल्हापूर- 9, वर्धा- 6, चंद्रपूर- 4, भंडारा- 3, गडचिरोली- 2, अमरावती- 9, अकोला- 5, यवतमाळ- 8, बुलडाणा- 9, वाशीम- 3, औरंगाबाद- 5, बीड- 6, नांदेड- 11, परभणी- 8, उस्मानाबाद- 8, लातूर- 4, जालना- 4, हिंगोली- 3, नागपूर- 9 आणि गोंदिया- 2.

दृष्टिक्षेपात निवडणूक कार्यक्रम :

· नामनिर्देशनपत्रे देणे व स्वीकारणे- 16 ते 22 नोव्हेंबर 2011

· नामनिर्देशनपत्रांची छाननी व वैध उमेदवारींची यादी प्रसिद्ध करणे- 23 नोव्हेंबर 2011

· नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत- 29 नोव्हेंबर 2011

· चिन्हांचे वाटप व उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे-30 नोव्हेंबर 2011

· मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करणे- 1 डिसेंबर 2011

· मतदान- 8 डिसेंबर 2011 मतमोजणी- मतदानाच्या दिवशी सायंकाळी 6.30 वाजता किंवा 9 डिसेंबर 2011

सन 2011-12 मधील उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालयासाठी पुरस्कार योजना


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक  जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.1/11/11
-------------------------------------------------------------
             
     वर्धा,दि.1- महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्यताप्राप्त सार्वजनिक ग्रंथालयाचा गुणात्मक विकास व्हावा, त्यांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे याउद्देशाने दरवर्षी उत्कृष्ट ग्रंथालये व ग्रंथालय चळवळीतील उत्कृष्ट कार्यकर्ते व सार्वजनिक ग्रंथालयामधील कर्मचारी यांना शासनातर्फे पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
     या योजनेतून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार यांचे नावे शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या शहरी व ग्रामीण पातळीवरील अ,ब,क,ड वर्गातील प्रत्येकी एक अशा एकूण 8 पुरस्कारासाठी प्राप्त प्रस्तावांतून निवड समितीकडून निवड करण्यात येते. तसेच डॉ.एस.आर.रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार यांचे नावे ग्रंथालय चळवळीच्या विकासाच्या विकासासाठी योगदान देणा-या कार्यकर्त्यांना व सेवाभावी वृत्तीने काम करणा-या उत्कृष्ट सेवकाना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने राज्यस्तरावर प्रत्येकी एकेक व महसूली विभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 14 पुरस्कारासाठी निवड समितीकडून निवड करण्यात येते.
     2011-12 या वर्षासाठी या पुरस्कार योजनेमध्ये सहभागी होऊ इच्छिणा-या शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी तसेच ग्रंथालय चळवळीत ज्या कार्यकर्त्यांनी व सेवकांनी किमान 15 वर्ष ग्रंथालयीन सेवेत योगदान दिलेले आहे. अशा पात्र  ठरणा-या इच्छुक ग्रंथालये, कार्यकर्ते, सेवक यांनी आपल्या विभागाच्या सहाय्यक ग्रंथालय संचालक या कार्यालयाकडे अर्जाची मागणी करुन व्दिप्रतीत परिपूर्ण प्रस्ताव सहाय्यक ग्रंथालय संचालक कार्यालयाकडे दिनांक 30 नोव्हेंबर 2011 पूर्वी सादर करावे. असे आवाहन ग्रंथालय संचालनालयाचे संचालक चव्हाण यांनी केले आहे.