Tuesday 1 November 2011

राज्यातील 196 नगरपरिषदा / नगरपंचायतींच्या निवडणुकींसाठी 8 डिसेंबर रोजी मतदान

नागपूर, दि. 01 : राज्यातील 196 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींची मुदत डिसेंबर 2011 ते फेब्रुवारी 2012 या कालावधीत संपत असल्याने त्यांचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आज येथे जाहीर केला. सर्व ठिकाणी गुरूवार, दि. 8 डिसेंबर 2011 रोजी मतदान घेण्यात येणार असून मतमोजणी त्याच दिवशी सायंकाळी 6.30 वाजता किंवा दुसऱ्या दिवशी होईल. संबंधित नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचार संहिताही लागू झाली आहे, असेही श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले.

नागपूर येथील रविभवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत श्रीमती सत्यनारायण यांनी ही माहिती दिली. राज्य निवडणूक आयोगाचे अपर मुख्य सचिव चाँद गोयल यावेळी उपस्थित होते. आज जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्रे 16 ते 22 नोव्हेंबर 2011 या दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेच्या कालावधीत दिली व स्वीकारली जातील. 20 नोव्हेंबर रोजी रविवारची सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्र देण्यात येणार नाहीत. बुधवार, दि. 23 नोव्हेंबर 2011 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करून वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत मंगळवार, दि. 29 नोव्हेंबर 2011 पर्यंत असेल. बुधवार, दि. 30 नोव्हेंबर 2011 रोजी निवडणूक चिन्हाचे वाटप आणि अंतरिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. गुरूवार, दि. 1 डिसेंबर 2011 रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. गुरुवारी, दि. 8 डिसेंबर 2011 रोजी सकाळी 7.30 वाजेपासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. संबंधित जिल्हाधिकारी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन मतदानाच्याच दिवशी सायंकाळी 6.30 वाजता किंवा सर्व मतदान केंद्रांवर मतदान समाप्तीनंतर अथवा शुक्रवार, दि. 9 डिसेंबर 2011 रोजी मतमोजणी होईल.

लातूर, चंद्रपूर नगरपरिषदांचे शासनाने महापालिकांमध्ये रुपांतर केल्यामुळे तेथील नगर परिषदांच्या निवडणुका होणार नाहीत. या नव्या महानगरपालिकांच्या निवडणुका यथावकाश घेण्यात येतील. निवडणूक होणाऱ्या 196 पैकी दापोली, शिर्डी, अर्धापूर आणि माहूर या चार नगरपंचायती आहेत. तर उर्वरित 192 नगरपरिषदा आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी नगरपरिषद; तर नांदेड जिल्ह्यातील माहूर व अर्धापूर येथे नव्याने नगरपंचायत अस्तित्वात आल्याने त्यांच्या प्रथमच निवडणुका होत आहेत. सर्व ठिकाणी बहुसदस्यीय पद्धतीने निवडणुका होणार असून त्यासाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर केला जाणार आहे. एकूण 4,303 जागांसाठी या निवडणुका होणार असून त्यातील 50 टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. उमेदवारांच्या निवडणूक खर्चातही राज्य निवडणूक आयोगाने वाढ केली असून तो पुढील प्रमाणे असेल (कंसात पूर्वीची खर्च मर्यादा): `अ` वर्ग नगरपरिषद- 3,00,000 (45,000), `ब` वर्ग नगरपरिषद- 2,00,000 (45,000), `क` वर्ग नगरपरिषद- 1,50,000 (45,000), नगरपंचायत- 1,50,000 (45,000)

या निवडणुकांच्या आनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांच्या निकषांमध्ये सुधारणा केल्या असून मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्र दोन किलोमीटरच्या आत व मध्यवर्ती ठिकाणी राहील; तसेच मतदान केंद्रे मुख्यत: शासकीय, निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इमारतीत असतील. ती बहुतांश तळमजल्यावर असतील. मतदान केंद्रात पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह; तसेच वृद्ध, गरोदर स्त्रिया व अपंग व्यक्ती यांच्यासाठी रॅम्पची व्यवस्था करण्यात येईल. मतदान केंद्रांवर लांब रांगा लागू नयेत व मतदारांना सुलभरीत्या मतदान करता यावे यासाठी नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकींच्या मतदान केंद्रांची कमाल मतदार संख्या 600 करण्यात आली आहे.

निवडणूक होणाऱ्या नगरपरिषदा/नगरपंचायतींची जिल्हानिहाय संख्या:

रायगड- 10, रत्नागिरी- 5, सिंधुदुर्ग- 3, नाशिक- 6, धुळे- 2, जळगाव- 12, अहमदनगर- 8, नंदुरबार- 1, पुणे- 10, सोलापूर- 9, सातारा- 8, सांगली- 4, कोल्हापूर- 9, वर्धा- 6, चंद्रपूर- 4, भंडारा- 3, गडचिरोली- 2, अमरावती- 9, अकोला- 5, यवतमाळ- 8, बुलडाणा- 9, वाशीम- 3, औरंगाबाद- 5, बीड- 6, नांदेड- 11, परभणी- 8, उस्मानाबाद- 8, लातूर- 4, जालना- 4, हिंगोली- 3, नागपूर- 9 आणि गोंदिया- 2.

दृष्टिक्षेपात निवडणूक कार्यक्रम :

· नामनिर्देशनपत्रे देणे व स्वीकारणे- 16 ते 22 नोव्हेंबर 2011

· नामनिर्देशनपत्रांची छाननी व वैध उमेदवारींची यादी प्रसिद्ध करणे- 23 नोव्हेंबर 2011

· नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत- 29 नोव्हेंबर 2011

· चिन्हांचे वाटप व उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे-30 नोव्हेंबर 2011

· मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करणे- 1 डिसेंबर 2011

· मतदान- 8 डिसेंबर 2011 मतमोजणी- मतदानाच्या दिवशी सायंकाळी 6.30 वाजता किंवा 9 डिसेंबर 2011

No comments:

Post a Comment