Tuesday, 1 November 2011

भेसळयुक्त खाद्यतेलाची विक्री केल्याबद्दल दंड व शिक्षा

                                 महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा दि. 2 नोव्हेंबर 2011
-----------------------------------------------------------
             
            वर्धा,दि.2- भेसळयुक्त जवस तेल विक्री केल्याप्रकरणी वर्धा येथील किराणा व्यापा-यास नुकतेच मुख्य न्यायदंडाधिकारी,वर्धा यांनी आरोपीस 1 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व रु. 5000 दंड व दंड न भरल्यास 1 महिन्याची शिक्षा सुनावली आहे.
     मे.विजय तेल भंडार, कच्छी लाईन, वर्धा येथून अन्न व औषध प्रशासन, वर्धा येथील अन्न निरीक्षक सु.पै.नंदनवार यांनी दि. 26 ऑक्टोंबर 2002 रोजी जवस तेलाचा नमुना अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा 1954 व त्याअंतर्गत नियम नुसार विश्लेषक,पुणे यांचेकडे पाठविला होता. विश्लेषणाअंती जवस तेल भेसळयुक्त असल्याचे निष्पन्न झाल्यावरुन आरोपीविरुध्द मुख्य न्यायदंडाधिकारी, वर्धा यांच्या न्यायालयात नंदनवार यांनी अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्या अंतर्गत खटला दाखल केला होता. सदर खटल्याचा निकाल दि. 22 सप्टेंबर 2011 रोजी लागला असुन, आरोपीस दंड व शिक्षा सुनावण्यात आली आहे.
     सदर खटल्याचा पाठपुरावा अन्न निरीक्षक  स्मिता बाभरे यांनी सहाय्यक आयुक्त राजेश शहा व पर्यवेक्षक (अन्न) दिलीप संगत यांचे मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या केला. शासनातर्फे सहायक सरकारी वकील एम.एम.महाजन यांनी विविध न्यायालयाचे न्यायनिवाडे न्यायालयात सादर केले व शासनाची बाजु न्यायालयात योग्यरित्या मांडली. असे सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन, वर्धा कळवितात.
                        000000

महात्मा साखर कारखान्याच्या गळीत हंगाम मोठया थाटात शुभारंभ शेतक-यांना आर्थिक दृष्टया समृध्द करावे - मुख्यमंत्री धुमल


                     महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा दि.1नोव्हेंबर 2011
-------------------------------------------------------------

वर्धा, दि.1: विदर्भात शेतीला सिंचनाची अपूरी जोड असल्यामुळे येथील शेतकरी आर्थिकदृष्टया डबघाईला आला आहे. या समस्येवर मात करण्यासाठी शेतक-यांच्या शेतीला सिंचनाची पूरेशी व्यवस्था झाल्यास त्यांना शेतीतून भरघोष असे उत्पन्न मिळेल व तो आर्थिक दृष्टया समृध्द होईल असा विश्वास हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांनी व्यक्त केला.
पूर्ती उघोग समुहव्दारा संचालीत महात्मा शुगर अन्ड पॉवर लिमीटेड जामणी ता.सेलू येथे महात्मा साखर कारखान्याचा गळीत हंगामाच्या शुभारंभ मोठया थाटात आज हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल व राज्यसभा विरोधी पक्ष नेते अरुण जेटली व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला त्या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मंचावर राज्यसभेचे खासदार पियुष गोयल, आमदार दादाराव केचे,  सुर्यप्रकाश साही,  डॉ. शिरीष गोडे, माजी खासदार सुरेश वाघमारे, रामदास तडस, जि.प.सदस्य मिलिंद भेंडे, अरुण अडसड आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतक-यांना मुलभुत सोयी पुरविल्यास भविष्यांत त्यांची प्रगतीकडे वाटचाल होऊ शकते असे सांगून मुख्यमंत्री धुमल म्हणाले की, शेतक-यांच्या हिताचे नवनविन उपक्रम पूर्ती उद्योग समुहाने राबविले असून याचा लाभ शेतक-यांनी घेतल्यास त्यांच्या आर्थिक परिस्थिती मध्ये निश्चितपणे बदल घडून येईल असेही ते म्हणाले.
राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते अरुण जेटली म्हणाले की, विदर्भाचा शेतकरी हालाखीचे जीवण जगत असून त्यांनी पूर्ती उद्योग समुहाचे नवनविन तंत्रज्ञान आत्म्सात करुन अनूदानांवर साहित्याची खरेदी केल्यास शेतक-यांना आर्थिक प्रगती सोबत उज्वल भविष्याकडे वाटचाल करता येईल असे ते म्हणाले.
यावेळी भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नितिन गडकरी यांनी पुर्ती उद्योग समुहाव्दारे  शेतक-यांच्या हिताचे करण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देवून भविष्यांत शेतक-यांच्या जीवनांत आनंदाची पर्वणी येईल असे निर्णय घेण्यांत येतील असे ते म्हणाले.
यावेळी आमदार दादाराव केचे व इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
तत्पूर्वी मान्यवरांनी उसाचा गठ्ठा संयत्रात टाकून साखर गळीत हंगामाचे उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी कृषी प्रदर्शनीला भेट देवून पाहणी केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर दिवे यांनी केले तर संचालन बाळ कुळकर्णी यांनी व आभार प्रदर्शन विजय मुडे यांनी केले या कार्यक्रमाला परिसरांतून मोठया संख्येने ग्रामस्थ पदाधिकारी ग्रा.प.सदस्य उपस्थित होते.

राज्यातील 196 नगरपरिषदा / नगरपंचायतींच्या निवडणुकींसाठी 8 डिसेंबर रोजी मतदान

नागपूर, दि. 01 : राज्यातील 196 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींची मुदत डिसेंबर 2011 ते फेब्रुवारी 2012 या कालावधीत संपत असल्याने त्यांचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आज येथे जाहीर केला. सर्व ठिकाणी गुरूवार, दि. 8 डिसेंबर 2011 रोजी मतदान घेण्यात येणार असून मतमोजणी त्याच दिवशी सायंकाळी 6.30 वाजता किंवा दुसऱ्या दिवशी होईल. संबंधित नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचार संहिताही लागू झाली आहे, असेही श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले.

नागपूर येथील रविभवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत श्रीमती सत्यनारायण यांनी ही माहिती दिली. राज्य निवडणूक आयोगाचे अपर मुख्य सचिव चाँद गोयल यावेळी उपस्थित होते. आज जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्रे 16 ते 22 नोव्हेंबर 2011 या दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेच्या कालावधीत दिली व स्वीकारली जातील. 20 नोव्हेंबर रोजी रविवारची सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्र देण्यात येणार नाहीत. बुधवार, दि. 23 नोव्हेंबर 2011 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करून वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत मंगळवार, दि. 29 नोव्हेंबर 2011 पर्यंत असेल. बुधवार, दि. 30 नोव्हेंबर 2011 रोजी निवडणूक चिन्हाचे वाटप आणि अंतरिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. गुरूवार, दि. 1 डिसेंबर 2011 रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. गुरुवारी, दि. 8 डिसेंबर 2011 रोजी सकाळी 7.30 वाजेपासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. संबंधित जिल्हाधिकारी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन मतदानाच्याच दिवशी सायंकाळी 6.30 वाजता किंवा सर्व मतदान केंद्रांवर मतदान समाप्तीनंतर अथवा शुक्रवार, दि. 9 डिसेंबर 2011 रोजी मतमोजणी होईल.

लातूर, चंद्रपूर नगरपरिषदांचे शासनाने महापालिकांमध्ये रुपांतर केल्यामुळे तेथील नगर परिषदांच्या निवडणुका होणार नाहीत. या नव्या महानगरपालिकांच्या निवडणुका यथावकाश घेण्यात येतील. निवडणूक होणाऱ्या 196 पैकी दापोली, शिर्डी, अर्धापूर आणि माहूर या चार नगरपंचायती आहेत. तर उर्वरित 192 नगरपरिषदा आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी नगरपरिषद; तर नांदेड जिल्ह्यातील माहूर व अर्धापूर येथे नव्याने नगरपंचायत अस्तित्वात आल्याने त्यांच्या प्रथमच निवडणुका होत आहेत. सर्व ठिकाणी बहुसदस्यीय पद्धतीने निवडणुका होणार असून त्यासाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर केला जाणार आहे. एकूण 4,303 जागांसाठी या निवडणुका होणार असून त्यातील 50 टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. उमेदवारांच्या निवडणूक खर्चातही राज्य निवडणूक आयोगाने वाढ केली असून तो पुढील प्रमाणे असेल (कंसात पूर्वीची खर्च मर्यादा): `अ` वर्ग नगरपरिषद- 3,00,000 (45,000), `ब` वर्ग नगरपरिषद- 2,00,000 (45,000), `क` वर्ग नगरपरिषद- 1,50,000 (45,000), नगरपंचायत- 1,50,000 (45,000)

या निवडणुकांच्या आनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांच्या निकषांमध्ये सुधारणा केल्या असून मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्र दोन किलोमीटरच्या आत व मध्यवर्ती ठिकाणी राहील; तसेच मतदान केंद्रे मुख्यत: शासकीय, निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इमारतीत असतील. ती बहुतांश तळमजल्यावर असतील. मतदान केंद्रात पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह; तसेच वृद्ध, गरोदर स्त्रिया व अपंग व्यक्ती यांच्यासाठी रॅम्पची व्यवस्था करण्यात येईल. मतदान केंद्रांवर लांब रांगा लागू नयेत व मतदारांना सुलभरीत्या मतदान करता यावे यासाठी नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकींच्या मतदान केंद्रांची कमाल मतदार संख्या 600 करण्यात आली आहे.

निवडणूक होणाऱ्या नगरपरिषदा/नगरपंचायतींची जिल्हानिहाय संख्या:

रायगड- 10, रत्नागिरी- 5, सिंधुदुर्ग- 3, नाशिक- 6, धुळे- 2, जळगाव- 12, अहमदनगर- 8, नंदुरबार- 1, पुणे- 10, सोलापूर- 9, सातारा- 8, सांगली- 4, कोल्हापूर- 9, वर्धा- 6, चंद्रपूर- 4, भंडारा- 3, गडचिरोली- 2, अमरावती- 9, अकोला- 5, यवतमाळ- 8, बुलडाणा- 9, वाशीम- 3, औरंगाबाद- 5, बीड- 6, नांदेड- 11, परभणी- 8, उस्मानाबाद- 8, लातूर- 4, जालना- 4, हिंगोली- 3, नागपूर- 9 आणि गोंदिया- 2.

दृष्टिक्षेपात निवडणूक कार्यक्रम :

· नामनिर्देशनपत्रे देणे व स्वीकारणे- 16 ते 22 नोव्हेंबर 2011

· नामनिर्देशनपत्रांची छाननी व वैध उमेदवारींची यादी प्रसिद्ध करणे- 23 नोव्हेंबर 2011

· नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत- 29 नोव्हेंबर 2011

· चिन्हांचे वाटप व उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे-30 नोव्हेंबर 2011

· मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करणे- 1 डिसेंबर 2011

· मतदान- 8 डिसेंबर 2011 मतमोजणी- मतदानाच्या दिवशी सायंकाळी 6.30 वाजता किंवा 9 डिसेंबर 2011

सन 2011-12 मधील उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालयासाठी पुरस्कार योजना


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक  जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.1/11/11
-------------------------------------------------------------
             
     वर्धा,दि.1- महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्यताप्राप्त सार्वजनिक ग्रंथालयाचा गुणात्मक विकास व्हावा, त्यांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे याउद्देशाने दरवर्षी उत्कृष्ट ग्रंथालये व ग्रंथालय चळवळीतील उत्कृष्ट कार्यकर्ते व सार्वजनिक ग्रंथालयामधील कर्मचारी यांना शासनातर्फे पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
     या योजनेतून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार यांचे नावे शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या शहरी व ग्रामीण पातळीवरील अ,ब,क,ड वर्गातील प्रत्येकी एक अशा एकूण 8 पुरस्कारासाठी प्राप्त प्रस्तावांतून निवड समितीकडून निवड करण्यात येते. तसेच डॉ.एस.आर.रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार यांचे नावे ग्रंथालय चळवळीच्या विकासाच्या विकासासाठी योगदान देणा-या कार्यकर्त्यांना व सेवाभावी वृत्तीने काम करणा-या उत्कृष्ट सेवकाना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने राज्यस्तरावर प्रत्येकी एकेक व महसूली विभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 14 पुरस्कारासाठी निवड समितीकडून निवड करण्यात येते.
     2011-12 या वर्षासाठी या पुरस्कार योजनेमध्ये सहभागी होऊ इच्छिणा-या शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी तसेच ग्रंथालय चळवळीत ज्या कार्यकर्त्यांनी व सेवकांनी किमान 15 वर्ष ग्रंथालयीन सेवेत योगदान दिलेले आहे. अशा पात्र  ठरणा-या इच्छुक ग्रंथालये, कार्यकर्ते, सेवक यांनी आपल्या विभागाच्या सहाय्यक ग्रंथालय संचालक या कार्यालयाकडे अर्जाची मागणी करुन व्दिप्रतीत परिपूर्ण प्रस्ताव सहाय्यक ग्रंथालय संचालक कार्यालयाकडे दिनांक 30 नोव्हेंबर 2011 पूर्वी सादर करावे. असे आवाहन ग्रंथालय संचालनालयाचे संचालक चव्हाण यांनी केले आहे.

Wednesday, 26 October 2011

दिवाळीच्या शुभेच्छा...


एकच पण ती










एकच पण ती.. ना  आहे एकाकी
एकच पणती.जरी न दे लकाकी
तिमिराला लढा द्यायला ती उभी..
टिम-टिम तिचा शांत या नभी..

आकाश चांदण्यांचे असू दे किती
दूरच तारे.. दूरवरचेच हे नजारे..
अंगणी आशांचे किरण जागवित.
ही पणती जिवाला गे दे उभारे..

जिवनाच्या याच रंगाचा हा गौरव
दिवाळी त्या पणती चा गं मिरव..
जरी अल्प तरी हा एक स्वल्प..
आयुष्यातला हा हसरासा संकल्प..

गुणगुणण्या आयुष्याचे हे गीत..
निभावण्यास ही सारी जनरित..
ती लढते..वा-याशी..तिमिराशी..
उजळूनी सारे.  अंधार पायाशी

चला प्रकाशाचे गीत हे गायला
पणतीचे जीवन जगायला...
आठवण करण्या या सा-याला
चला दीपावली.. साजरी करायला



प्रशांत दैठणकर

Wish you A very Happy Dipawali

Monday, 24 October 2011

शासकीय वसतीगृहाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्याचे हस्ते



महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक  जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा,  दि.24ऑक्टोंबर2011
-----------------------------------------------------------------------------------------------

वर्धा, दि.24- सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गिय मुलांचे शासकिय वसतीगृहाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आज थाटात पार पडला.
देवळी येथील वस्ती‍गृहाचे लोकार्पण करुन शिलाण्यासाचे उदघाटन
प्रसंगी मुख्यमंत्री चव्हाण 
     याप्रसंगी सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे, पाणी पुरवठा राज्यमंत्री रणजित कांबळे, पालकमंत्री राजेंद्र मुळक, खासदार दत्ताजी मेघे, जि.प. अध्यक्ष विजय जयस्वाल, जिल्हाधिकारी जयश्री भोज, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर चन्न, माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे, माजी होमगार्ड समादेश प्रविण हिवरे, अधिक्षक अभियंता बळवंत लूंगे, कार्यकारी अभियंता प्रशांत जनबंधू, विभागीय समाज कल्याण अधिकारी माधव वैद्य, समाज कल्याण अधिकारी माधव झोड आदी मान्यवर उपस्थित होते.
     मागासवर्गीयाची शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नती होऊन त्यांचे राहणीमान सुधारावे व शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी  तालुका पातळीवर वसतीगृह बांधण्यात येत आहे. देवळी येथे 100 विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहामध्ये सर्व सोयी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यासाठी 4 कोटी 38 लक्ष खर्च आला असल्याचे सांगण्यात आले.
     यावेळी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
                     0000000

आर्थिक बळकटीमुळे राज्याची प्रगतीकडे वाटचाल - मुख्यमंत्री


  महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक  जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा,   दि.24ऑक्टोंबर2011
---------------------------------------------------------------------------------------------
            
वर्धा,दि.24- येत्या पाच सहा वर्षापासून देशाची आर्थिक प्रगती झपाट्याने वाढत असून विकास दर 8 टक्क्या पर्यंत पोहचला आहे. या माध्यमातून राज्यातील महत्वाकांक्षी ठरलेल्या पंतप्रधान ग्राम सडक येाजना, सर्वशिक्षा अभियान, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, वसतीगृहे या सारख्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत असून, आर्थिक बळकटीमुळे राज्याची प्रगतीकडे वाटचाल सुरु असल्याची ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
देवळी येथील विविध विकास कामाचा लोकार्पण सोहळा प्रसंगी  मार्गदर्शन
करताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 
आज देवळी येथील नगर परिषद हायस्कुलच्या प्रांगणात महाराष्ट्र सुजल व निर्मल अभियान अंतर्गत सुधारीत पाणीपुरवठा  34.02 कोटी रु. मुस्लीम कब्रस्थान परिसरात सिमेंट रोड व सोलर लाईट 10 लक्ष रुपये, नागरी दलित वस्ती पाणी पुरवठा व स्वच्छ योजना 33 लक्ष रुपये, खत निर्मिती 49 लक्ष रुपये मुल्य कामाचे भुमिपुजन तर मटन मार्केट च्या इमारतीचे बांधकाम 49 लक्ष  रुपये, नगर पालीका क्षेत्रातील 23 सिमेंट रस्त्याचे बांधकाम व दलित वस्तीतील सिमेंट रस्त्याचे बांधकाम 1 कोटी 33 लक्ष रुपये कामाचा लोकार्पन सोहळा त्यांचे हस्ते संपन्न झाला त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे, जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्र मुळक, पाणी पुरवठा राज्यमंत्री रणजित कांबळे, खासदार दत्ताजी मेघे, जि.प.अध्यक्ष विजय जयस्वाल, उपाध्यक्ष सुनिल राऊत, जिल्हाधिकारी जयश्री भोज, मुख्य कार्यपालन अधिकारी शेखर चन्ने, न.पा.अध्यक्ष शेख गफ्फार शेख अजीज, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रा. किरण उरकांदे, माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे, प्रविण हिवरे मंचावर उपस्थित होते.
विकासाच्या योजना गावापातळी पर्यंत राबविण्यासाठी पायाभूत सोयी निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे नमुद करुन मुख्यमंत्री चव्हाण  म्हणाले की जिल्ह्यातील लोवरवणा या प्रकल्पाच्या  मुळ किमतीमध्ये वाढ झाली असून दरवर्षी 5 हजार हेक्टर सिंचन क्षमता वाढविण्यासाठी अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद करण्यात येईल.
     स्वातंत्र्य काळापासून प्रलंबीत असलेले नझूल जमीनीच्या पट्याचा कायम तोडगा करण्याचा निर्णय मंत्रीमंडळातील सहका-याच्या सहमतीने घेण्यात येईल. तसेच झुडपी जंगलाचा प्रश्न अंतीम टप्प्यात आला असून या बाबत शासन तातडीने पाऊले उचलणार आहे. नागपूर येथील मिहानचा प्रश्न निकाली काढण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार असून जमीन अधिग्रहीत करण्याच्या कामांना वेग देऊन विमानतळाच्या दुस-या धावपट्टीचा मार्ग मोकळा करण्यात येईल. जेणेकरुन या परिसरातील बेरोजगारांना कायम स्वरुपी रोजगार मिळेल. नियमीतपणे वीज मिळावी हा शासनाचा प्रयत्न असून तेलंगणा व ओरीसा येथील पुरेसा कोळसा उपलब्ध झाला नसल्यामुळे वीज संकटाला तोंड द्यावे लागत आहे. ही परीस्थीती कायमची राहणार नसून याबाबत सामान्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी प्रयत्न केल्या जातील असेही ते म्हणाले. केन्द्र शासनाने शेतक-यांना गेल्यावर्षी 70 हजार कोटी रुपयाचे कर्ज माफ करुन शेतक-यांना शासनाने दिलासा दिला असल्याचे त्यांनी स्पष्ट्र केले. देवळी व पुलगाव दरम्यान एम.आय.डी.सी.साठी जागा उपलब्ध करुन देण्यात येईल. त्यामुळे या परिसरातील लोकांना रोजगार मिळेल. कापसावर निर्यात बंदी करु नका असे केंद्र सरकाला सुचना केल्या असल्याचे ते यावेळी म्हणाले.
     यावेळी बोलताना सामाजिक न्याय मंत्री मोघे म्हणाले की, सामाजिक न्याय विभागात आमुलाग्र बदल झाला आहे. व्यसनमुक्तीला समाजाकडून सकारात्मक दृष्टीकोन आवश्यक आहे. घरकुलासाठी शासनाने 10 लाखाचे उद्दिष्ट ठरविले होते ते 15 लाखाचे करण्यात येईल. अंधश्रध्दा निर्मुलनाचा कायदा येत्या अधिवेशनात सादर करण्यात येईल असेही ते म्हणाले.
     पालकमंत्री मुळक म्हणाले की सर्वसामान्याचे हित जोपासण्यासाठी शासन कटिबध्द आहे.
     प्रास्ताविक करताना राज्यमंत्री कांबळे यांनी देवळीच्या विकास कार्यात शासनाने भरीव योगदान दिले असल्यामुळे देवळीचा सर्वांगीण विकास होणार आहे. सुधारीत न.पा. पाणी पुरवठा योजना ही 2042 वर्षातील लोकसंख्या गृहीत धरुन मंजूर करण्यात आली. यामध्ये स्वच्छता,सांडपाणी  व्यवस्था, घणकच-याची विल्हेवाट आदींचा समावेश आहे. देवळी-पुलगाव दरम्यान विस्तारीत एम.आय.डी.सी. मंजूर करण्याची यावेळी मंत्रीमहोदयांनी मागणी केली.
     यावेळी खासदार दत्ताजी मेघे यांचेही समयोचित भाषण झाले.
     यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा सत्कार न.पा.अध्यक्ष शेख अजिज यांनी केला तसेच मुख्यमंत्र्याच्या  हस्ते विकास कामाचे भुमिपूजन करुन शिलाण्यासाचे उदघाटन करण्यात आले.
     या कार्यक्रमाचे संचलन ज्योती तोटेवार व आभार शेख अजिज यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते.
                                                            00000