Friday, 9 July 2021

 




प.क्र-505                                                                     दि.09.07.2021

रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन वर्धा जिल्हा अपघातमुक्त करावा

                                   - खासदार रामदास तडस

       वर्धा जिल्हयात सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय  महामार्गाच्या माध्यमातुन  अनेक  मोठे प्रकल्प  प्रगतीपथावर  आहे. वर्धा-आर्वी , आर्वी –तळेगाव,  वर्धा हिंगणघाट हॅव्रीट ॲनेवीटी  अंतर्गत  सार्वजनिक बांधकाम विभागाचे  कामे सुरु आहे.  या कामामध्ये  रस्ता सुरक्षा  विषयक बाबीची पुर्तता करण्यात येते किंवा नाही  याचे मुल्यांकन करुन अहवाल सादर करुन रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून वर्धा जिल्हा अपघातमुक्त करण्याच्या सुचना  खासदार रामदास तडस  यांनी दिल्यात.

          केंद्र शासनाच्या अधिसुचनेनुसार  गठण झालेल्या संसद सदस्य  रस्ता सुरक्षा समितीची  बैठक खासदार रामदास तडस यांचे अध्यक्षतेखाली झाली यावेळी त्यांनी सुचना केल्या. बैठकिला जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर, सार्वजनिक बांधकाम विभाग वर्धाचे  कार्यकारी अभियंता प्रकाश बुब, आर्वी कार्यकारी अभियंता सुनिल कुंभे, राष्ट्रीय महामार्गाचे नागपूर राजन पाला, अमरावतीचे एम.एच.राठोड,यवतमाळचे चंदनसिंह बायस, अशोक वनकर, वसंत नाल्हे, अंकुश  केने, औरंगाबादचे बी.एस.कसबे, वाहतुक पोलिस निरिक्षक राजेश कडू, महामार्ग जामचे वाहतुक पोलिस निरिक्षक, अशासकिय सदस्य किरण उरकांदे,  प्रणव जोशी,  शिरिष  भांगे आदी उपस्थित होते.

           संसद सदस्य  रस्ता सुरक्षा समितीच्या अधिसुचनेतील तरतुदीनुसार   वर्धा जिल्हयात  स्वतंत्र वाहतुक पार्कची निर्मिती  करावी, युवकांमध्ये  अपघात  टाळण्याकरीता   जनजागृती करावी  व नव्याने  घोषित करण्यात आलेल्या जालना ते पुलगाव  महामार्गाचे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून  आडिट करुन  उपाययोजना  कराव्या याबाबत श्री. तडस यांनी सुचना केल्या केल्या. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी  जाहिर सभेत  घोषित केलेल्या  हिंगणघाट  शहरातून  जाणा-या  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वर (जुना) उडान पुल बांधण्याकरीता  समितीमध्ये एक मताने ठराव करुन कलोडे चौक व  अशोक हॉस्पीटल चौक या स्थळाची  तातडीने  दुरुस्ती करण्याबाबत  भारतीय राष्ट्रीय राजमार्ग  प्राधिकरण नागपूर यांचे ठराव पाठविण्यात आले व सोबतच  जिल्हयातील 32 ब्लॅक स्पॉट  दुरस्तीबाबत  एक मताने  निर्णय घेण्यात आला.

          रस्ते अपघात टाळण्याकरीता  सर्व विभागांनी समन्वयाने  कार्य करुन   रस्ते सुरक्षा उपाययोजनाचे तंतोतंत पालन करावे याबाबत  व विशेष करुन  पावसाच्या दिवसात विशेष काळजी  घेण्याच्या सुचना  जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी अधिकारी वर्गांना दिल्यात.

          यावेळी  अशासकिय सदस्य  किरण उरकांदे व प्रणय जोशी यांनी सुध्दा रस्ता सुरक्षाबात आपल्या समस्या मांडल्या.

          बैठकिला शिक्षण विभागाचे  सुनिल कोहळे, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. नितीन निमोदिया यांची उपस्थिती होती.

                                                0000

 




उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बापूकुटीला दिली भेट

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी  सेवाग्राम येथील बापूकुटीला  भेट देऊन आश्रमाची  पाहणी केली व प्रार्थनेत सहभागी झाले. यावेळी त्याचे सोबत माजी खासदार अनंत गुढे,  शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल देवतारे आदी उपस्थित होते.   सर्वप्रथम सेवाग्राम आश्रमप्रतिष्ठानचे मंत्री मुंकुद मस्के यांनी  उदय सामंत यांचे सुतमालेने स्वागत केले.

 




प.क्र-505                                                                     दि.09.07.2021

व्हेंटिलेटर्सचा आरोग्य यंत्रणेने योग्य उपयोग करावा

                                -उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत 

Ø जिल्ह्याला मिळाले तीन व्हेंटिलेटर्स

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने राज्यात प्रत्येक जिल्ह्यात अत्याधुनिक व्हेंटिलेटर्स वाटप करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने या व्हेंटिलेटर्सचा योग्य उपयोग करावा, कोणत्याही इतर खाजगी रुग्णालयांना ते हस्तांतरित करू नये  अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्हेंटिलेटर्स लोकार्पण प्रसंगी दिल्यात. 

           जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ सचिन तडस यांना  मंत्री उदय सामंत यांनी 3 व्हेंटिलेटर्स वितरित केले. यावेळी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, माजी खासदार अनंत गुढे, शिवसेना जिल्हाध्यक्ष अनिल शिवतारे, प्रशांत शहागडकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ नाईक उपस्थित होते.

          यावेळी श्री सामंत म्हणाले, मुख्यमंत्री राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांच्याशी समनव्य ठेऊन कोरोनाचा लढा देत आहेत. वर्धा जिल्ह्याचा कोरोनाच्या काळातील पॉझिटिव्हीटी दर 20 टक्क्यांपेक्षा पुढे गेला होता. तो आता 5 टक्क्यांच्या आत आहे. कोरोना रुग्ण व्हेंटिलेटरवर जाऊ नये यासाठीच डॉक्टरांनी प्रयत्न करावेत असेही ते म्हणाले.

दुसऱ्या लाटेचा जसा आपण सामना केलात तशीच तयारी तिसरी लाट येणारच नाही यासाठी केली पाहिजे. तिसरी लाट ही लहान मुलांना जास्त बाधित करणार आहे असे तज्ञांचे मत आहे.  याला प्रतिबंध करताना आपण पूर्वीपासूनच तयारीत असले पाहिजे अशी महाराष्ट्र शासनाची भूमिका आहे. त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रशासनसोबत काम करताहेत.

वैद्यकीय सेवा केवळ मेट्रो सिटी मध्ये पोहचुन उपयोगाची नाही तर ती राज्यात सर्व जिल्ह्यात पोहचली पाहिजे हा उद्देश मुख्यमंत्री महोदयांचा आहे.  त्यासाठी पक्ष म्हणून आम्हीही प्रयत्न करीत आहोत असेही श्री सामंत यांनी सांगितले. 

                                                          0000000000

Thursday, 8 July 2021

 







प.क्र-505                                                                     दि.08.07.2021

मुख्यमंत्री महा आरोग्य कौशल्यविकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन उदघाटन

जिल्ह्यात पाहिल्या टप्प्यात 240 प्रशिक्षणार्थींना मिळणार प्रशिक्षण

आरोग्य क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध

     वर्धा, दि 8 जुलै (जिमाका):- राज्यामध्ये कोविड १९ या साथीच्या आजारावरील रुग्णावर उपचार करण्यासाठी आवश्यक असणा-या पॅरामेडीकल क्षेत्रातील प्रशिक्षित मानव संसाधणाची तीव्र कमतरता जाणवत असुन या क्षेत्रात कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे राज्यस्तरीय उद्घाटन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते आज दुरदृश्य प्रणालीद्वारे पार पडले.

जिल्ह्यात विनोबा भावे रुग्णालय सावंगी मेघे, जिल्हा सामान्य रुग्णालय वार्ध आणि उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथून या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन  करण्यात आले. यावेळी सावंगी येथे दीप प्रज्वलन आणि प्रशिक्षणार्थींना किट वाटप करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महिरे, आचार्य विनोबा भावे रुग्णालयाचे व्यवस्थापक   अभ्युदय मेघे, डॉ महाकाळकर, भाग्यश्री वाघमारे उपस्थित होते तर जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सचिन तडस उपस्थित होते.

जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा येथे होम हेल्थ एड, उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट व आचार्य विनोबा भावे ग्रामिण रुग्णालय, सावंगी मेघे, येथे इमरजेंसी मेडिकल टेक्निशिएन या प्रशिक्षणासाठी  एकुण ६० उमेदवार उपस्थित होते.

जिल्ह्यात ४५० उमेदवारांनी विविध कौशल्य प्रशिक्षणासाठी नोंदणी केली असून यामध्ये 12 अभ्यासक्रम निश्चित करण्यात आले आहेत. यात होम हेल्थ एड, इमर्जन्सी मेडिकल टेक्निशियन, फ्लेबोटोमिस्ट, हॉस्पिटल फ्रंट डेस्क कॉर्डिनेटर, जनरल ड्युटी असिस्टंट, रुग्णवाहिका चालक, मेडिकल ड्रेसर, डायबेटीस असिस्टंट, इत्यादी प्रशिक्षण अभ्यासक्रमाचा समावेश आहे. जिल्ह्यातील सावंगी मेघे वैद्यकीय महाविद्यालयासहित  एकूण 11 रुग्णालयांची प्रशिक्षण संस्था म्हणून निवड करण्यात आली आहे. यात जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, हिंगणघाट, आर्वी, ग्रामीण रुग्णालय सेलू, भिडी, देवळी, पुलगाव, आष्टी, समुद्रपूर, वडनेर आणि कारंजा रुग्णालयाचा समावेश आहे.

          या कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमामुळे जिल्ह्यात आरोग्य क्षेत्रात आवश्यक असे कुशल मनुष्यबळ निर्माण होईल आणि कोरोना सारख्या महामारीच्या काळात इतर क्षेत्रात रोजगार कमी झाले असताना  आरोग्य क्षेत्रात तरुणाना रोजगाराच्या नवीन संधी प्राप्त होणार आहेत.

        यावेळी मुख्यमंत्री यांनी कार्यक्रमाचे उदघाटन करुन सर्वांना मार्गदर्शन केले. सदरउद्घाटनीय कार्यक्रमास मुंबई येथून उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेबथोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई, कौशल्य विकास रोजगार वउद्योजकता मंत्री  नवाब मलिक, आरोग्य मंत्री राजेश टोपे,वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख,  कौशल्यविकास रोजगार व उद्योजकता  राज्यमंत्री शंभुराज देसाई,  सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकिय शिक्षण राज्यमंत्री  राजेंद्र पाटील-यड्रावकर उपस्थित होते.

                                                00000

Friday, 11 June 2021

 







                 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सरपंचांशी संवाद

            सरपंचांनी राबवलेल्या अभिनव संकल्पनांचे केले कौतुक

Ø वर्धा जिल्ह्याच्या रसुलाबाद येथील सरपंचांना मिळाली मुख्यमंत्र्यांशी संवाद करण्याची संधी

Ø गावातील प्रत्येकाची आरोग्य तपासणी केल्याने गाव कोरोनामुक्त करण्यात मिळाले यश

      वर्धा, दि 11 जून (जिमाका):-  गावातील प्रत्येक कुटुंबाची आरोग्य तपासणी, तरुण मुलामुलींचे आरोग्य सेवक पथक, गावातील निर्जंतुकीकरण आणि गावातीलच पण मोठया शहरांमध्ये सेवा देणा-या दोन तरुण डॉक्टर मुलांच्या मार्गदर्शन आणि सहकार्याने रसुलाबाद गाव आज कोरोनामुक्त करण्यात यश मिळाले अशी महिती रसुलाबादचे सरपंच राजेश सावरकर यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना दिली.

           आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर,अमरावती आणि औरंगाबाद महसूल विभागातील सरपंचांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रत्येक जिल्ह्यातील एका सरपंचांकडून त्यांनी त्यांच्या गावात कोरोना संसर्ग थांबविण्यासाठी केलेल्या  उपाय योजनांची माहिती जाणून घेतली. 

          यावेळी सरपंच राजेश सावरकर यांनी रसुलाबादची लोकसंख्या 3781 असून 1035 कुटुंब आहेत असे सांगून यांनी पहिल्या लाटेत  कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समजताच गावाने सर्वानुमते बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी गावबंदीचा निर्णय घेतला. पण त्याचबरोबर गावातील प्रत्येक कुटुंबाची आरोग्य तपासणी करून घेतली. गावात तरुण मुलामुलींचे 50- 50 व्यक्तींचे दोन गट स्थापन करून त्यांना गावातील प्रत्येकाच्या घरी कोण आजारी आहे  याची विचारपूस करण्याची जबाबदारी सोपवली.

        रसुलाबाद येथील दोन डॉक्टर मुलांचे मार्गदर्शन खूप महत्वाचे ठरल्याचे यावेळी सावरकर यांनी सांगितले. गावातील आशा , अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, पोलीस पाटील आणि शिक्षकांनी त्यांची जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली.  गावात दुसऱ्या लाटेत 35 रुग्ण होते. त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला. आज गावात कुणीही कोरोना रुग्ण नाही असेही त्यांनी सांगितले.

        कोरोना लसीकरणाबाबत गावातील लोकांमध्ये असलेले गैरसमज दूर करून गावात 75 टक्के लसीकरण करून घेतले. त्याचबरोबर कोरोना काळात रक्तदान आणि प्लाझ्मादान करण्यासाठी सुद्धा लोकाना प्रोत्साहित केले असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आभार मानले.

         मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी सरपंचाना  मार्गदर्शन करताना म्हणाले की, महाराष्ट्रातील सर्व सरपंचांचा मला अभिमान असून त्यांनी मुख्यमंत्र्यांना आपलेपणाने नेहमीच सहकार्य केले आहे. सर्व सरपंचांनी कोरोना कालावधीत उत्तम काम केले असून त्यांनी राबविलेल्या अभिनव संकल्पनासाठी त्यांचे अभिनंदन केले. मात्र यापुढेही गावात कोरोनाला प्रवेश द्यायचा की नाही ते आपणच ठरवायचे आहे. आता कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे असे समजून आपण   गाफील राहू नये. कोरोना हा बेसावध असतानाच गाठतो.  त्यामुळे रुग्णसंख्या थोडीही वाढली तरी लगेच उपाययोजना सुरू करा. गावातील प्रत्येक वस्तीमध्ये टीम करून त्यांना घरे वाटून प्रत्येकाची विचारपूस करायला सांगा. चाचण्यांची संख्या कमी करू नका. पावसाळा सुरू झाल्यामुळे साथीचे आजार वाढतील त्यामुळे त्याकडेही लक्ष द्या. 

         लसी उपलब्ध होतील तसा लसीकरणाचा वेग वाढेल. पण लस घेतळ्यामुळे कोरोना होणार नाही असे समजू नका. पण लस घेतल्यामुळे कोरोना तुमच्यासाठी घातक ठरणार नाही. मास्क हीच आपली या शत्रूशी लढण्यासाठीची ढाल आहे. त्यामुळे मास्क, हाताची स्वच्छता आणि शारीरिक अंतर या त्रिसूत्रीचा कायम अवलंब करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि औरंगाबाद येथून महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनीही मार्गदर्शन केले.

          यावेळी वर्धा जिल्ह्यातून जिल्हाधिकारी कार्यालयातून  जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओंबासे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव, आर्वी तालुक्यातील रसुलाबादचे सरपंच राजेश सावरकर आणि सेलू तालुक्यातील  कोटंबा गावच्या सरपंच रेणुका कोटंबकर सहभागी झाल्या होत्या.

                                0000

 

पावसाळ्यात आवश्यक दक्षता पालनाबाबत प्रशासनाकडून ‘डूज अँड डोन्टस् जारी

     वर्धा दि 11 जून (जिमाका):-  पावसाळ्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडतो. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष प्रेरणा देशभ्रतार यांनी केले आहे.

   काय करावे

     वादळी वारा, वीज चमकत असल्यास घरात असल्यास घराच्या खिडक्या-दरवाजे बंद ठेवा. घराचे दरवाजे, खिडक्या व कुंपणापासून दूर राहा. मेघगर्जना झाल्यापासून तीस मिनीटे घरातच राहा. घराबाहेर असल्यास सुरक्षित निवारा शोधून तिथे थांबा. ट्रॅक्टर, सायकल, बाईक, शेती अवजारे यांच्यापासून दूर राहा. गाडी चालवत असल्यास सुरक्षित स्थळी थांबा. उघड्यावर असाल व सुरक्षित निवारा जवळपास नसेल तर शेवटचा पर्याय म्हणून लगेच गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व डोके दोन्ही गुडघ्यांत झाकावे. जमीनीशी कमीत कमी संपर्क असावा. मोकळ्या व लोंबकळणा-या वीज तारांपासून दूर राहा. जंगलात असाल तर दाट, लहान झाडाखाली व उताराच्या जागेवर निवारा घ्यावा. इतर खुल्या जागेवर, दरीसारख्या खोलगट जागेवर जाण्याचा प्रयत्न करा.

दुर्देवाने वज्राघात झाल्यास

    दुर्देवाने वीज पडल्यास बाधित व्यक्तीला वैद्यकीय मदत मिळवून द्यावी. ओल्या व थंड परिस्थितीत बाधित व्यक्ती व जमीनीमध्ये संरक्षणात्मक थर ठेवावा जेणेकरून हायपोथेरमियाचा (शरीराचे अतिकमी तापमान) धोका कमी होईल. इजा झालेल्या व्यक्तीचे श्वसन बंद झाल्यास तोंडावाटे पुनरुत्थान (माऊथ टू माऊथ) प्रक्रिया अवलंबावी. हृदयाचे ठोके बंद झाल्यास कुठलीही वैद्यकीय मदत मिळेपर्यंत रुग्णाची हृदयगती सीपीआर करुन सुरु ठेवावी.

       काय करू नये

        गडगडाटीचे वादळ आल्यास उंच जागांवर, टेकड्यांवर, मोकळ्या जागांवर, दळणवळणाची टॉवर्स, ध्वजाचे खांब, वीजेचे खांब, उघडी वाहने, पाणी आदी ठिकाणे टाळावीत. घरात असाल तर फोन, मोबाईल, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक उपकरणे वीज जोडणीला लावू नये. विजा चमकताना व गडगडाट असेल तर वीज उपकरणांचा वापर टाळा. अशावेळी आंघोळ करणे, हात धुणे, भांडी किंवा कपडे धुणे टाळा. काँक्रिटच्या ठोस जमीनीवर झोपू नये किंवा उभे राहू नये. धातुची दारे, खिडक्यांची तावदाने, वायरिंग, इलेक्ट्रिक मीटर आदी प्रवाहकीय पृष्ठभागांशी संपर्क टाळावा. घराबाहेर असाल तर मेघगर्जनेच्या वेळी झाडाखाली किंवा झाडाजवळ उभे राहू नका. वाहनांच्या धातू किंवा वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. अधांतरी लोंबकळणा-या वीजेच्या किंवा कुठल्याही तारेपासून लांब राहा, असे आवाहन केले आहे.

                                                                        0000

 

 




          पालक सचिव जयश्री मुखर्जी यांच्याकडून जिल्ह्याचा आढावा

ऑक्सिजन ऑडिट, खाटा व्यवस्थापन, घरपोच आठवश्यक सेवा, आणि घरगुती नळ जोडणीचे कामाचे कौतुक

        वर्धा, दि 11 जून (जिमाका):-  वर्धा जिल्ह्याच्या पालक सचिव तथा अल्पसंख्यांक विकास विभागाचा अप्पर मुख्य सचिव जयश्री मुखर्जी यांनी आज  दुरदृश्य प्रणालीद्वारे वर्धा जिल्ह्यातील विकासात्मक कामे, कोविड संसर्ग आणि तयारी बाबत आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्ह्यात कोरोना काळात राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे तसेच  ऑक्सिजन बचत, खाटा उपलब्धतेसाठी केलेल्या उपाययोजना आदी कामाबाबत कौतुक केले.

 

        यावेळी त्यांनी आरोग्य, कृषी विभाग, महिला व बालकल्याण,  एकात्मिक बाल विकास, शिक्षण विभाग , समाजकल्याण , ग्रामीण पाणीपुरवठा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा इत्यादी विभागांचा आढावा घेतला. 

         जल जीवन मिशन अंतर्गत सन 2021- 22 मध्ये 56 हजार 30 नळ जोडणी देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी एप्रिल व  मे महिन्यात 4 हजार 40 नळ जोडणी देण्यात आल्या बाबत त्यांनी समाधान व्यक्त करून प्रत्येक कुटुंबापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहचायला हवे यासाठी उर्वरित जोडण्या यावर्षी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्यात. 

          तसेच ग्रामीण भागात मुलींना शिक्षण घेण्यासाठी इयत्ता आठवीनंतर बाहेरगावी जावे लागते. त्यासाठी मुलींना जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून सायकल घेण्यासाठी अनुदान देण्यात येते. 2020 21 मध्ये 207 विद्यार्थिनीना लाभ देण्यात येणार असून त्यापैकी आतापर्यंत128 मुलींच्या खात्यात अनुदान जमा करण्यात आले आहे. श्रीमती मुखर्जी यांनी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या या योजनेचे कौतुक केले. 

महाआवास योजनेचा आढावा घेताना श्रीमती मुखर्जी यांनी ज्यांच्याकडे घरकुल बांधण्यासाठी जमीन नाही त्यांना       जमीन खरेदी करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून द्यावे अशा सूचना केल्या.

        तसेच जिल्ह्याने कोरोना संसर्ग काळात राबविलेल्या ऑक्सिजन ऑडिट, खाटांचे व्यवस्थापन करण्यासाठी रेफरल प्रोटोकॉल, औषधांच्या उपलब्धतेसाठी पारदर्शक प्रणाली, जिल्ह्याच्या सीमेवर राबवलेली कडक नाकाबंदी,आणि लॉकडाऊन कालावधीत नागरिकांना घरपोच अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा आणि शेतकऱ्यांना बांधावर खते आणि बियाणे पोहचविणे यासाठी केलेल्या उपाययोजनाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

         यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातुन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओंबासे, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके उपस्थित होते तर इतर अधिकारी त्यांच्या कार्यालयातून सहभागी झाले होते.

                                                0000