Wednesday, 30 January 2019







                         विदर्भ  कुस्तीची पंढरी होईल.
                                                                       -सुधीर मुनगंटीवार
 
        • महिला राज्यस्तर कुस्ती स्पर्धेचा समारोप.
  वर्धा दि 30 :- आपल्या देशात प्राचीन काळापासून कुस्ती या खेळाला राजाश्रय होता..मात्र अलीकडच्या काळात कुस्तीला राजाश्रय कमी पडला. खासदार रामदास तडस यांच्यासारख्या कुस्तीवर प्रेम करणाऱ्या नेत्यांनी विदर्भात  कुस्तीला रुजविण्यासाठी घेतलेला पुढाकार हा एक दिवस विदर्भाला कुस्तीची पंढरी केल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन वित्त व नियोजनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
        देवळी येथे नगर परिषद प्रांगणात आयोजित महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, वर्धा कुस्तीगीर परिषद आणि सार्वजनिक बजरंग व्यायाम शाळेच्या वतीने आयोजित  21 वी वरिष्ठ महिला व तिसरी सब ज्युनियर महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ, राज्य शासन वैशिष्ट्यपूर्ण निधी मधून बांधण्यात आलेल्या नवीन स्टेडियमचे लोकार्पण आणि वैशिष्ट्यपूर्ण निधीतून 10 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन, शाहिद स्मारकाचे लोकार्पण  कार्यक्रम पार पडला, यावेळी श्री मुनगंटीवार बोलत होते. या समारंभाला खासदार रामदास तडस, आमदार रामदास आंबटकर, देवळीच्या नगराध्यक्ष सुचिता मडावी, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, राज्य कृषी मूल्य आयोगाचे सदस्य प्रशांत इंगळे, शोभा तडस, नांदगाव खंडेश्वर चे नगराध्यक्ष संजय पोकळे, सुनील गफाट आदी मान्यवर उपस्थित होते. 
          खेलो इंडिया च्या माध्यमातून देशात खेळाचे वातावरण आणि खेळाडू तयार करण्याचे प्रयत्न होत आहेत. देशाची खेळातील प्रगती पाहता पुढील दहा वर्षांत ऑलिम्पिक मध्ये सर्वात जास्त पदके मिळविण्यात आपला देश दुसऱ्या क्रमांकावर राहील यात शंका नाही असे श्री मुनगंटीवार म्हणाले. चंद्रपूर सारख्या जिल्ह्यातील आदिवासी मुले- मुली 29 हजार फूट उंचीवर आपला तिरंगा फडकवण्याची कामगिरी करतात. याचा अर्थ  विदर्भातही चांगले खेळाडू घडविण्याची शक्ती आहे.  अशा स्टेडियमच्या माध्यमातून विदर्भात उत्तम खेळाडू तयार होतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. कुस्तीसाठी इनडोअर स्टेडियमसाठी 5 कोटी रुपये निधी देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. या निधीतून उत्कृष्ट इनडोअर स्टेडियम तयार करावे. तसेच कुस्ती व कबड्डी ची मॅट खरेदी करण्यासाठी सुद्धा 14 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची  हमी त्यांनी यावेळी दिली.  या स्टेडियमच्या माध्यमातून विविध खेळाचे खेळाडू तयार होतील. कुस्ती  खेळणाऱ्या मुलींसाठी वित्तमंत्री म्हणून काही करता आले तर यासारखा दुसरा आनंद असणार नाही असेही ते यावेळी म्हणाले. कुस्तीच्या प्रचार- प्रसारासाठी काम करणारा नेता म्हणून खासदार तडस यांची ओळख आहे.ती ओळख त्यांनी अशीच कायम ठेवावी अशा शुभेछा त्यांनी यावेळी दिल्यात. तसेच विविध जिल्ह्यातून आलेल्या कुस्तीगीरांना त्यांनी उत्कृष्ट खेळ करण्यासाठी  शुभेच्छा दिल्या.

       यावेळी सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सांघिक विजेतेपद मिळविणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याला ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सब ज्युनियर मुलींच्या कुस्ती स्पर्धेत पुणे जिल्ह्याला सांघिक विजेतेपदाची ट्रॉफी देण्यात आली.
           यावेळी बोलताना खासदार तडस म्हणाले, खेळाडूला जात पात, धर्म नसतो. तो केवळ देशासाठी खेळतो आणि देशाचे नाव उज्वल करतो.  देवळीला यापूर्वी कुस्तीचा आखाडा नव्हता. आता नवीन स्टेडियमच्या माध्यमातून इथे इनडोअर आखाडा करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी निधीची मागणी त्यांनी वित्तमंत्र्यांकडे केली. महाराष्ट्रात मुली कुस्ती खेळायला लागल्या असून आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये त्या उत्तम कामगिरी करत आहेत. या स्टेडियमच्या माध्यमातून कुस्तीच प्रशिक्षण केंद्र वर्धेत तयार करण्याचा मानस असून विदर्भात कुस्तीचे खेळाडू तयार करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सार्वजनिक बजरंग व्यायामशाळेचे व्यवस्थापक पंकज तडस यांनी केले. संचालन पंकज चोरे, दीपक फुंडकर, आभार नगर परिषद उपाध्यक्ष नरेंद्र मदनकर यांनी केले.कार्यक्रमाला राणा रणनवरे, पंकज सायंकार, मयुरी सयाम, विद्या भुजाडे, किशोर गव्हाळकर इत्यादी मान्यवरांसह खेळाडू, प्रशिक्षक, नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
                                                                        0000

Saturday, 26 January 2019










               राज्य शासन शेतक-यांच्या पाठीशी
-         प्रकाश महेता
Ø प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
Ø विविध पुरस्काराचे वितरण

   
        वर्धा, दि. 26 :  राज्य शासन वर्धा जिल्हयाच्या विकासासाठी अनेक प्रकल्प राबवित आहे. विकासाची फळे शेवटच्या घटकापर्यंत पोहचावित असे प्रत्येक राज्यकर्त्याला वाटत असते. राज्याच्या दुष्काळी परिस्थितीत शेतक-यांच्या अडचणी वाढल्याची जाणिव शासनालस असून राज्य शासन कायम शेतक-यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे राहिल, असे प्रतिपादन राज्याचे गृह निर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी केले.
          भारतीय प्रजासत्ताकाच्या 69 व्या वर्धापन दिन कार्यक्रमाच्या मुख्य शासकिय ध्वजारोहण प्रसंगी जनतेला संबोधित करतांना ते बोलत होते.
जिल्हा क्रिडा संकुल येथे पार पडलेल्या कार्यक्रमाला आमदार डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, जिल्हा पोलिस अधिक्षक बसवराज तेली,  अपर जिल्हाधिकारी संजय दैने, अपर पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी उत्तम दिघे यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रकाश महेता यांनी  परेड निरिक्षण करुन सर्व स्वातंत्र संग्राम सैनिक आणि शहिदांना विनम्र  अभिवादन करुन  उपस्थित नागरिकांना  शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी गृह विभाग, होमगार्ड, एन.सी.सी., स्काऊट, गाईड पथकांनी पथसंचलन  करुन मान्यवरांना मानवंदना दिली. तसेच  सामान्य रुग्णालयातर्फे  प्रधानमंत्री मातृत्व  योजनेवर उत्कृष्ट झाकी ,  आपात कालीन वैद्यकिय सेवा,  पोलिस विभागाचे श्वान पथक, दंगल नियंत्रण व वज्र वाहन पथक, स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाचा चित्ररथ आदी चित्ररथाव्दारे जनजागृतीपर संदेश देण्यात आला. 
यावेळी पुढे बोलतांना श्री. महेता म्हणाले, यावर्षी कमी पाऊस पडल्यामुळे शासनाने राज्यात 151 तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित केला असून दुष्काळावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत.वर्धा जिल्हयातही तीन तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ असून या ठिकाणी पिण्याचे पाणी आणि  जनावरासाठी चा-याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणुन प्रशासनाच्या वतीने योग्य नियोजन करण्यात आले आहे.

          जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था असलेला देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. आपण साजरा करीत असलेला प्रजासत्ताक दिन हा लोकशाहीचा उत्सव असून विविध प्रयत्नांमुळे आपली लोकशाही अधिकाधिक मजबूत होत असल्याचे श्री महेता म्हणाले.  लोकशाही विकेंद्रीकरणाची कास धरणा-या राष्ट्रपिता महात्मा गांधींचे 150 वे जयंती वर्ष साजरे होत असतांना त्यांच्या स्वप्नांची पुर्तता करणा-या 73 व 74 व्या घटना दुरुस्तीचे सुध्दा हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे  वर्षभरात  व त्यापुढे होणा-या सर्व निवडणूकांमध्ये सर्व मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून सहभाग घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन श्री. महेता यांनी केले.
          राज्य शासनाने जिल्ह्यातील विकास कामांना प्राधान्य दिले आहे. गांधी जिल्हा म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करण्यासाठी सेवाग्राम विकास आराखड्याच्या माध्यमातून सेवाग्राम , पवनार व वर्धा या तीन गावांत पर्यंटनाच्या दृष्टीने पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहे. यासोबतच विदर्भातील दळणवळणाच्या सुविधेसाठी नागपूर-वर्धा -तुळजापूर रस्त्याचे चौपदरीकरण, शहरातील  अंतर्गत रस्ते , वर्धा बसस्थानकाचे आधुनिकीकरण व नुतणीकरण, जिल्हाधिकारी कार्यालय आणि कृषि कार्यालयाच्या नविन इमरातीचे भूमीपूजन, भूयारी गटार योजना, पाणी पुरवठा योजना   अशा अनेक आघाड्यांवर जिल्हयातील विकास कामांना गती मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.  
          वृक्षलागवड अंतर्गत वन विभागाच्या 154 हेक्टर झुडपी जागेवर 20 ठिकाणी ‘ऑक्सीजन पार्क’ हा नाविण्यपूर्ण प्रकल्प राबविण्यात येत आहे. वर्धा जिल्हयाचे ऑक्सीजन पार्कचे मॉडेल राज्यभर राबविण्याचा मानस वन मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. यासाठी त्यांनी वन विभाग आणि जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले.
         
    जिल्हाधिकारी  यांनी जिल्हयात राबविलेल्या नाविण्यपूर्ण व रोजगारभिमुख प्रकल्पाची राज्य शासनाने राज्यस्तरावर दखल घेतली असून  यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणुन निवड केली आहे. या  उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचे अभिनंदन केले.
          यावेळी मंत्रिमहोदयाचे हस्ते उत्कृष्ट पथसंचलनाचा पुरस्कार एन.सी.सी. कॅडेट देवळी, जे.बी. सायन्स कॉलेज आणि महिला पोलिस पथक यांना देण्यात आला.  चित्ररथामध्ये पोलिस श्वान पथक, वृक्ष लागवडीचा संदेश देणारे सायकल स्वार श्री. अडसूड तसेच स्वच्छतेचा संदेश देणारा नगर परिषद विभागाचा चित्ररथ याशिवाय सांस्कृतिक सादरीकरणामध्ये  पिपरी येथील  अग्रग्रामी शाळा,  गो.से. वाणिज्य महाविद्यालय व न्यु. इंग्लीश  शाळेच्या चमूला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
          यावेळी विविध विभागाचे वतीने देण्यात येणा-या पुरस्काराचे वितरणी करण्यात आले यामध्ये जिल्हा स्तरीय लघु उद्योजक पुरस्कार हिंगणघाट येथील मे. गोलछा बायोसायन्स प्रा.लि. आणि मे. कलोडे अग्रो. इंडस्ट्रिज  देवळी यांना प्रथम व व्दितीय पुरस्कार देण्यात आला. तर भारत स्काऊट गाईड चळवळी अंतर्गत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त गाईड व हिरकापंख प्राप्त बुलबुल यांना मंत्री महोदयाचे हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच यावेळी केरळ राज्यात पुर परिस्थतीमध्ये उत्कृष्ट वैद्यकिय सेवा दिलेल्या वैद्यकिय चमूला , क्रिडा क्षेत्रात संघटक , प्राविण्य प्रात्प खेळाडू , माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या लाभार्थ्यांना मुदती ठेव प्रमाणपत्र ,आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांना प्रशस्ती प्रमाणपत्र, संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांना रोख पारितोषिक, पोलिस उपअधिक्षक अभय वानखेडे यांना विशेष सेवा पदक तसेच निखिल शेंडगे यांना मंत्रिमहोदयाचे हस्ते दिव्यांग व्यक्ती प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
          यावेळी स्वातंत्र्य संग्राम सैनिक , मोठया संख्येने शालेय विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अतुल राजपायले यांनी केले.
                                                0000

Saturday, 5 January 2019










गुणवंत शेती करायला लागतील तेव्हा शेती उद्योगाला प्रकाशवाट मिळेल
                                             - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
- कृषी महोत्सवाचे उदघाटन

-

          वर्धा दि 5 (जिमाका ) :- नोकरी सोडून जेव्हा अनेक गुणवंत विद्यार्थी शेती करायला  तयार होतील तेव्हाच शेतीतील अंधाराला प्रकाशाची वाट मिळेल. शेतीतील उत्कर्षाची ती नांदी असेल आणि लालबहादूर शास्त्रींनी दिलेला जय जवान जय किसान चा नारा तेव्हाच खऱ्या अर्थाने पूर्णत्वास जाईल, असे प्रतिपादन अर्थ, नियोजन व वन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार  यांनी केले.
 
         पोलीस मैदान येथे कृषी विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
  5 दिवस चालणारया कृषी महोत्सवाचे उदघाटन श्री मुनगंटीवार यांचे हस्ते झाले, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार रामदास तडस, आमदार रामदास आंबटकर, आमदार डॉ पंकज भोयर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कांचन नांदूरकर,  नगराध्यक्ष अतुल तराळे
कृषी सभापती मुकेश भिसे, शिक्षण व आरोग्य सभापती
  जयश्री गफाट, सुनीता कलोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, पंचायत समिती सभापती नीता गजाम , वर्धा पंचायत समिती सभापती महानंदा ताकसांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
            यावेळी बोलताना ते म्हणाले की,कृषी विद्यापीठांनी राजुरी विद्यापीठासारखे अडीच एकरात साडेचार लाख उत्पन्न मिळवून देण्याचे संशोधन करावे. यासाठी पाहिजे तेवढा निधी बजेट मधून देण्यात येईल. राज्याच्या तोजोरीवर शेतकऱ्याचा पहिला हक्क आहे. त्यामुळे शेती उदयोग फायद्याचा करण्यासाठी असे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहचवीणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
       शेतीच क्षेत्र जे पूर्वी सरासरी 4. 28 हेक्टर होतं ते आता 1.44 हेक्टर एवढं कमी झालं आहे. त्यातही बहुपिक पद्धती संपुष्टात आली असून अधिक उत्पन्न घेण्याच्या नादात आपण शेतीला विषयुक्त केलेलं आहे. त्यामुळे शेतीला विषमुक्त, करण्यासाठी सेंद्रिय शेतीची नितांत गरज आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा देशात सेंद्रिय शेतीसाठी पदम पुरस्कार देण्यात आला. मातीची सेवा केल्याशिवाय त्यातून सोन निघू शकत नाही हे सांगताना ते म्हणाले की, जगात कितीही शोध लागले तरी शेतीशिवाय अन्नधान्याचा पिकवण्याचा शोध अद्याप लागलेला नाही. त्यामुळे जगाचे पोट भरण्याची ताकद फक्त आणि फक्त शेतकऱ्यांमध्ये आहे.
त्यामुळे शेतकऱयांनी सुद्धा जे जगाच्या बाजारात विकू शकतो त्याचे उत्पादन घ्यावे असे आवाहन केले.  भूमातेची सेवा करणारया  शेतकऱ्यासाठी हा कृषी महोत्सव धन प्राप्त करणारे पर्व ठरावे अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. श्री मुनगंटीवार यांनी यावेळी महित्सवात लागलेल्या स्टॉलची पाहणी केली.
        यावेळी बोलताना खासदार रामदास तडस म्हणाले,  नाशिकच्या धर्तीवर विदर्भातील शेतमाल एक्स्पोर्ट करायला हवा.  फळबाग लावण्यासाठी प्रोत्साहित करून विदर्भातील शेतकरी सधन करण्याचे काम होत आहे. नाविन्यपूर्ण योजनेतून 'गोट मार्केट' ला निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. 
         कृषी महोत्सवाची सुरुवात अर्थमंत्र्यांनी केली असे डॉ पंकज भोयर म्हणाले. मागील वर्षी जाहीर केलेल्या कृषी भवनाचे आज  भूमिपूजन झाले. यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उओलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले. पाटील यांचे सीताफळ अंबानी विकत घेतात पण कृषी विभागालाच याची माहिती नाही . शेतकऱ्यांच्या समस्यांची गंभीरपणे दखल घेतली जात नाही.याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.  कामचुकार अधिकाऱ्यांकडे संपूर्ण विभाग बदनाम होत असतो असेही ते म्हणाले.  शेतकरी आत्महत्येचा जिल्ह्याला लागलेला कलंक पुसण्याचे काम अधिकाऱयांनी करावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
 
           यावेळी सर्वाधिक उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱयांचा पुरस्कार देण्यात आला यामध्ये विक्रमी सीताफळाची उत्पादन घेणारे  समुद्रपूर तालुक्यातील हळदगाव येथील  सुरेश पाटील, पवनारचे कुंदन वाघमारे  सुल्तानपूर हिंगणघाट चे रतनलाल बोरकर, भाजीपाला व फुलशेतीमध्ये  जया उघडे यांना  प्रथम क्रमांकाचे  पारितोषिक, सुधाकर शेंडे धानोली गावंडे, गोपाळ वाघमारे सेंद्रिय शेतीसाठी  सविता येळणे,  श्रीकांत  सर्वाधिक कापुस उत्पादन घेणारे  येरणगाव येथील महेश मुधोळकर यांना प्रथम पुरस्कार देण्यात आला. तसेच गुलाबीबॉण्डअळींचे व्यवस्थापन , विविध पिकांवरील रोगांचे व्यवस्थापन  आणि  कृषी विषयक योजनाची माहिती देणाऱ्या माहिती  पुस्तिकेचे  विमोचन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  यांनी केले. महोत्सवाला शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


000