Tuesday, 15 May 2018


आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांचे
जेंडर टास्क फोर्स करणार सर्वेक्षण
                                   - अनूप कुमार
* आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांच्या प्रश्नांचा आढावा
* शेतकऱ्याच्या विधवा पत्नीची वारसान म्हणून होणार नोंद

वर्धा, दि.10: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबातील महिलांचे प्रश्न सोडविणे तसेच कुटूंबाचे विविधांगी सर्वेक्षण करण्याच्या दृष्टीने वर्धा जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालीजेंडर टास्क फोर्सची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी दिली.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षात विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली वर्धा जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील महिलांच्या प्रश्नांसंदर्भात बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीत जिल्हाधिकारी वर्ध्याचे शैलेश नवाल, उपायुक्त सुधाकर तेलंग, तहसीलदार रविंद्र माने, महिला किसान अधिकार मंचच्या श्रीमती सीमा कुळकर्णी, सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी श्रीमती सुवर्णा दामले, श्रीमती नुतन माळवी, श्रीमती शुभदा देशमुख, श्रीमती आरती बैस आदी उपस्थित होते.
वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी तसेच शेतकरी कुटूंबियांचे समुपदेशन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. घरातील कर्त्या पुरुषाने आत्महत्या केल्यानंतर कुटूंबातील महिलांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेत जिल्हा प्रशासनाच्या वतीने अशा कुटूंबियांचे सर्वेक्षण करून महिलांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्या अनुषंगाने वर्धा जिल्ह्यात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या अध्यक्षतेखाली जेंडर टास्क फोर्सची स्थापना करण्यात येईल. जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांच्या मदतीने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील महिलांची आर्थिक, सामाजिक व मानसिक स्थिती, मुलांचे शिक्षण, प्राप्त मदत अशा विविध बाबींचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जेंडर टास्क फोर्स मध्ये जिल्हाधिकारी तसेच सदस्य सचिव म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, महिला किसान अधिकार मंचचे प्रतिनिधी, महिला उपजिल्हाधिकारी, समाज कल्याण संस्था प्रतिनिधी यांचा समावेश राहील, असे विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी सांगितले.
शेतकरी आत्महत्येपासून परावृत्त व्हावे यासाठी तयार करण्यात आलेल्या समुपदेशन चमूच्या बळकटीकरणासाठी प्रशिक्षण देण्यासोबतच कार्यशाळा देखील घेण्यात येईल. वर्धा जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हेल्पलाईन तयार करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन तसेच महिला किसान अधिकार मंचच्या मदतीने या हेल्पलाईन केंद्राचे कामकाज चालेल.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी बनेल वारसान
शेतकरी आत्महत्यानंतर त्यांच्या विधवा पत्नीची वारसान नोंद होणे अपेक्षित आहे. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीची वारसान नोंद न झाल्याने त्या शासकीय योजनापासून वंचित आहेत. शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीना त्यांचा हक्क मिळावा यादृष्टीने जिल्हानिहाय विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
                                                                        0000


Thursday, 10 May 2018






नांदोरा गावात गावक-यांसोबत जिल्हाधिकारी यांनी केले श्रमदान
               वर्धा, दि. 10 –कारंजा तालुक्यातील नांदोरा आणि लिंगा (मांडकी) या गावामध्ये पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी होऊन  गावक-यांनी उत्स्फुर्तपणे श्रमदानाला सुरवात केली. काल जिल्हाधिकारी यांनी गावच्या वन तलावाची पाहणी करुन गावक-यांसोबत श्रमदान केले.
            वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांमध्ये जास्तीत जास्त पाणी डविण्यासाठी श्रमदान करण्याची चुरस निर्माण झाली त्यामुळे नागरिकांसोबतच प्रशासन आणि सामाजिक संस्थाचा सहभाग वाढत आहे. यामध्ये प्रशासनाचे प्रमुख म्हणुन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी नांदोरा आणि लिंगा (मांडवी) येथे श्रमदान करुन गावक-यांना प्रोत्साहित केले.
            तसेच या गावांमध्ये मग्रारोहयोची कामे वाढावित जेणेकरुन गावक-यांना मोबदलाही मिळेल अशा सुचना त्यांनी कारंजा वनपरिक्षेत्र अधिकारी यांना दिल्यात.
            पिपरी येथे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेचा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. 5 हजार हेक्टर क्षेत्र असलेल्या या तलावातुन 5 हजार घनमीटर गाळ काढण्यात येणार आहे. हा तलाव जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाच्या मालकीचा आहे. 8 ते 10 दिवसात गाळ काढण्याचे कामपूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात. तलावातुन निघालेला गाळ शेतक-यांनी घेऊन जावा.असेही आवाहन त्यांनी केले.
 यावेळी कारंजाचे तहसिलदार श्री.कुमावत, वनपरिक्षेत्र अधिकारी, गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
                                                                       

Thursday, 12 April 2018






गरीब माणूस वैद्यकिय सेवेच्या केंद्रस्थानी असावा
                                                      -सुधीर मुनगंटीवार
Ø 8 सुवर्णासह रितिका ठरली गुणवंत  विद्यार्थिनी
Ø डॉ. सुभेदार यांना डी.एम.एस्सी
Ø दत्ता मेघे आर्युविज्ञान विद्यापिठाचा 9वा दीक्षांत समारोह
वर्धा दि 12 जिमाका :- शरीर शास्त्राचे उच्चतम ज्ञान संपादन करण्यासाठी गरीब आणि बेवारस शरीर आपल्या ज्ञानसाधनेचे केंद्र होते. त्यातून आत्मसात केलेले कौशल्य आणि  ज्ञानाचा  उपयोग त्याच  गरीब आणि अभावग्रस्त माणसांच्या सेवेसाठी व्हावा. वैद्यकिय क्षेत्रात मिशन म्हणुन काम करतांना आपल्या अमूल्य  सेवेचे केंद्रच समाजातील गरीब माणुस असावा, असे प्रतिपादन वित्त, नियोजन, तथा जिल्ह्याचे  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी  केले. दत्ता मेघे आर्युविज्ञान विद्यापिठाच्या   9 व्या दीक्षांत समारोह प्रसंगी ते बोलत होते.
           सावंगी मेघे येथील विद्यापीठ सभागृहात झालेल्या या दीक्षांत समारोहाला  अभिमत विद्यापीठाचे कुलपती  दत्ता मेघे, कराडच्या कृष्णा आर्युविज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ वेदप्रकाश मिश्रा,  कुलगुरू डॉ. राजीव बोरले, प्र. कुलगुरु डॉ. निलम मिश्रा, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य अशोक चांडक,  मध्य भारतातील ख्यातनाम आरोग्य तज्ञ डॉ. बि.जे. सुभेदार, कुलसचिव डॉ. ए.जे. अंजनकर आदी मान्यवर  उपस्थित होते.
            वैद्यकिय क्षेत्र हे  अतिशय कष्टाचे आहे हे सांगताना श्री. मुनगंटीवार यांनी   कुटुंबातील डॉक्टर नातेवाईकांचा दाखला दिला. एका पदवीच्या प्रमाणपत्रासाठी  17 ते 18 वर्ष ज्ञानसाधना करावी लागते. त्यामुळे या ज्ञानसाधनेचा खरा लाभ गरिबांना मिळाला पाहिजे. दुःख आणि वेदना घेऊन येणारा  गरीब रुग्ण आपल्या उपचाराने आणि सेवेने  चेहऱ्यावर आनंद आणि हास्य घेऊन परतला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  डॉक्टरचे जीवन हे एका उच्च ध्येयाप्रति समर्पित असते. ईश्वरानंतर केवळ डॉक्टर हाच रुग्ण आणि मनुष्याचे जीवन वाचविण्यासाठी देवदुत ठरतो. तो करीत असलेले काम हे ईश्वरीय कार्य  आहे. असे सांगून त्यांनी पदवी प्राप्त सर्व नवीन डॉक्टरांचे अभिनंदन करून त्यांना यशस्वी होण्याच्या शुभेच्छा दिल्यात.
            यावेळी डॉ वेदप्रकाश मिश्रा यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना डॉ भालचंद्र सुभेदारांचा आदर्श समोर ठेवावा असे सांगितले. रुग्णसेवेचे व्रत सांभाळताना एका ध्येयाने काम करा असेही ते म्हणाले.
यावेळी विद्यापीठाने
  प्रो. डॉ भालचंद्र सुभेदार यांना डॉक्टरेट इन मेडिकल सायन्सेस  ही  मानद पदवी देऊन सन्मानित केले.
या दीक्षांत समारंभात एकूण 700 विद्यार्थ्याना पदवी प्रमाणपत्र देण्यात आले. त्यामध्ये  88 सुवर्ण ,4 रजत आणि 13 इतर बक्षिसांचा समावेश आहे.
• 8 सुवर्णासह रितिका ठरली गुणवंत
  विद्यार्थिनी
           एम बी बी एस ची
  रितिका त्रिपाठी हिने सर्वात जास्त 11 पदक घेऊन गुणवंत विद्यार्थिनींचा सन्मान मिळवला. तिला मिळालेल्या बक्षिसांमध्ये 8 सुवर्ण आणि 3 इतर बक्षीसांचा समावेश आहे. डॉ तन्मय रमेश गांधी यांना 7 सुवर्ण, भेष्णा साहू 3 सुवर्ण,व एक बक्षीस, अश्लेषा शुक्ला 3 सुवर्ण, डॉ हरमनदिप सिंग 4 सुवर्ण, सत्यजित साहू 3 सुवर्ण, वसुधा उमाटे 3 सुवर्ण आणि एक रजत पदकांची मानकरी ठरली.