Thursday, 12 April 2018






गरीब माणूस वैद्यकिय सेवेच्या केंद्रस्थानी असावा
                                                      -सुधीर मुनगंटीवार
Ø 8 सुवर्णासह रितिका ठरली गुणवंत  विद्यार्थिनी
Ø डॉ. सुभेदार यांना डी.एम.एस्सी
Ø दत्ता मेघे आर्युविज्ञान विद्यापिठाचा 9वा दीक्षांत समारोह
वर्धा दि 12 जिमाका :- शरीर शास्त्राचे उच्चतम ज्ञान संपादन करण्यासाठी गरीब आणि बेवारस शरीर आपल्या ज्ञानसाधनेचे केंद्र होते. त्यातून आत्मसात केलेले कौशल्य आणि  ज्ञानाचा  उपयोग त्याच  गरीब आणि अभावग्रस्त माणसांच्या सेवेसाठी व्हावा. वैद्यकिय क्षेत्रात मिशन म्हणुन काम करतांना आपल्या अमूल्य  सेवेचे केंद्रच समाजातील गरीब माणुस असावा, असे प्रतिपादन वित्त, नियोजन, तथा जिल्ह्याचे  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी  केले. दत्ता मेघे आर्युविज्ञान विद्यापिठाच्या   9 व्या दीक्षांत समारोह प्रसंगी ते बोलत होते.
           सावंगी मेघे येथील विद्यापीठ सभागृहात झालेल्या या दीक्षांत समारोहाला  अभिमत विद्यापीठाचे कुलपती  दत्ता मेघे, कराडच्या कृष्णा आर्युविज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ वेदप्रकाश मिश्रा,  कुलगुरू डॉ. राजीव बोरले, प्र. कुलगुरु डॉ. निलम मिश्रा, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य अशोक चांडक,  मध्य भारतातील ख्यातनाम आरोग्य तज्ञ डॉ. बि.जे. सुभेदार, कुलसचिव डॉ. ए.जे. अंजनकर आदी मान्यवर  उपस्थित होते.
            वैद्यकिय क्षेत्र हे  अतिशय कष्टाचे आहे हे सांगताना श्री. मुनगंटीवार यांनी   कुटुंबातील डॉक्टर नातेवाईकांचा दाखला दिला. एका पदवीच्या प्रमाणपत्रासाठी  17 ते 18 वर्ष ज्ञानसाधना करावी लागते. त्यामुळे या ज्ञानसाधनेचा खरा लाभ गरिबांना मिळाला पाहिजे. दुःख आणि वेदना घेऊन येणारा  गरीब रुग्ण आपल्या उपचाराने आणि सेवेने  चेहऱ्यावर आनंद आणि हास्य घेऊन परतला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  डॉक्टरचे जीवन हे एका उच्च ध्येयाप्रति समर्पित असते. ईश्वरानंतर केवळ डॉक्टर हाच रुग्ण आणि मनुष्याचे जीवन वाचविण्यासाठी देवदुत ठरतो. तो करीत असलेले काम हे ईश्वरीय कार्य  आहे. असे सांगून त्यांनी पदवी प्राप्त सर्व नवीन डॉक्टरांचे अभिनंदन करून त्यांना यशस्वी होण्याच्या शुभेच्छा दिल्यात.
            यावेळी डॉ वेदप्रकाश मिश्रा यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना डॉ भालचंद्र सुभेदारांचा आदर्श समोर ठेवावा असे सांगितले. रुग्णसेवेचे व्रत सांभाळताना एका ध्येयाने काम करा असेही ते म्हणाले.
यावेळी विद्यापीठाने
  प्रो. डॉ भालचंद्र सुभेदार यांना डॉक्टरेट इन मेडिकल सायन्सेस  ही  मानद पदवी देऊन सन्मानित केले.
या दीक्षांत समारंभात एकूण 700 विद्यार्थ्याना पदवी प्रमाणपत्र देण्यात आले. त्यामध्ये  88 सुवर्ण ,4 रजत आणि 13 इतर बक्षिसांचा समावेश आहे.
• 8 सुवर्णासह रितिका ठरली गुणवंत
  विद्यार्थिनी
           एम बी बी एस ची
  रितिका त्रिपाठी हिने सर्वात जास्त 11 पदक घेऊन गुणवंत विद्यार्थिनींचा सन्मान मिळवला. तिला मिळालेल्या बक्षिसांमध्ये 8 सुवर्ण आणि 3 इतर बक्षीसांचा समावेश आहे. डॉ तन्मय रमेश गांधी यांना 7 सुवर्ण, भेष्णा साहू 3 सुवर्ण,व एक बक्षीस, अश्लेषा शुक्ला 3 सुवर्ण, डॉ हरमनदिप सिंग 4 सुवर्ण, सत्यजित साहू 3 सुवर्ण, वसुधा उमाटे 3 सुवर्ण आणि एक रजत पदकांची मानकरी ठरली.


जिल्ह्याच्या समतोल विकासासाठी कटिबद्ध
                                            – सुधीर मुनगंटीवार
         *35 कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन
          वर्धा दि 12:- उत्तम रस्ते  हे प्रगतीचे व विकासाचे राजमार्ग ठरतात. विदर्भाचा सर्व बाबींमध्ये असलेला अनुशेष दूर करण्यासाठी सर्व शक्तिनिशी काम करीत असून वर्धा जिल्ह्याचा समतोल विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन   वित्त व नियोजन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.  शिवाजी चौक ते जुनापाणी चौक या तीन किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे सिमेंटीकरण आणि सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन आज कारला चौक येथे पालकमंत्री यांचे हस्ते संपन्न झाले.  यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार पंकज भोयर, पिपरी मेघेचे सरपंच अजय गौळकार व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
हा रस्ता तयार करण्यासंदर्भात नगर परिषद
  निवडणुकीच्या वेळी दिलेला शब्द आज पूर्ण करीत असल्याचे श्री. मुनगंटीवार यांनी  सांगितले. यासाठी आमदार पंकज भोयर यांनी पाठपुरावा केला.  विशेष बाब म्हणून या रस्त्यांसाठी 35 कोटी रुपये मंजूर करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या रस्त्याचे काम सोपवले आहे. सर्व कामे पूर्ण करण्याची इच्छा असुनही काही मर्यादांमुळे ते होऊ शकत नाहीत. ते पूर्ण करण्यासाठी जनतेच्या आशीर्वाद रुपी शक्तीची गरज असून ती शक्ती अशीच पाठीशी असू द्या असेही श्री मुनगंटीवार यावेळी म्हणाले. जिल्ह्यात महात्मा गांधी शिक्षण विद्यापीठ स्थापन करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
                                                00000

Saturday, 31 March 2018






         पैश्याच्या विकेंद्रीकरणाची व्यवस्था निर्माण करणार
                                                      -सुधीर मुनगंटीवार
Ø कारंजा पं.स. व ट्रामाकेअर इमारतीचे लोकार्पण

वर्धा दि 31 :- शेतक-यांच्या दुख:,वेदना दुर करण्यासाठी शासनाने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. कृषि पंपाचे विज कनेक्शन, सिंचन सुविधा, नैसर्गिक आपत्तीत शेतक-यांना मदत आणि  शेतकरी कर्ज माफी करण्यासोबतच शासनाने आता शेतक-यांचे प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अशा छोटया प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातुन पैश्याच्या विक्रेद्रीकरणाची व्यवस्था निर्माण करण्यासाठी शासन कटीबध्द आहे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त व नियोजन तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
 कारंजा येथील  पंचायत समितीच्या नवनिर्मित प्रशासकिय इमारतीच्या तसेच ट्रामाकेअरचे लोकार्पण सोहळयाप्रसंगी श्री. मुनगंटीवार बोलत होते.  यावेळी   आमदार अमर काळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कांचन नांदुरकर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, पंचायत समिती सभापती मंगेश खवशी, जिल्हा परिषद सभापती निता गजाम, गटविकास अधिकारी उमेश नंदागवळी,  माजी आमदार दादाराव केचे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.
या प्रशासकिय इमारतीसाठी 3 कोटी 21 लाख रुपये तर ट्रामा केअरसाठी 3 कोटी 77 लाख रुपये खर्च करुन वास्तु बांधण्यात आल्या  आहेत. या वास्तुंचे लोकार्पण करतांना ते म्हणाले, ही वास्तु निर्जिव होता कामा नये, गावाच्या उत्थानासाठी मदतगार ठरणारे कार्य मंदिर व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुख्य मार्ग ते पंचायत समिती इमारतीपर्यंतच्या रस्त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 30 लाख रुपये आणि इमारतीमधील फर्नीचरसाठी 50 लक्ष रुपये मंजुर करण्यात येईल, अशी हमी त्यांनी  यावेळी दिली.
सन 2000 मध्ये पहिल्यांदा 68 शेतक-यांनी आत्महत्या केली होती. तेव्हाच नियोजनपुर्वक शेतक-यांच्या गरजा ओळखून धोरणात्मक निर्णय घेतले असते तर शेतकरी आत्महत्येचा आकडा वाढला नसता  या शासनाने शेतक-यांची  महत्वाची गरज म्हणजे सिंचनावर भर दिला. त्याचबरोबर विदर्भ आणि मराठवाडयातील  पाच – सहा वर्षापासुन प्रलंबित  असलेले  कृषि विज पंपाची विज जोडणी देण्यावर भर दिला.  आता केवळ चालू वर्षाची विज जोडणी  प्रलंबित असून त्यासाठी सुध्दा निधी उपलब्ध करुन दिला आहे.
मुबंई- पुणे कडे जाणारा निधी आता समृध्दी  महामार्गाव्दारे विदर्भाकडे येईल. हा निधी गरजु लाभार्थ्यापर्यंत पोहोचतो कि नाही यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. कारंजा येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रश्न मुबंईला बैठक लावून सोडविण्यात येईल. तसेच कारागिरांसाठी विद्यापीठ तयार करण्याचा विचार असून यामुळे येथे येणा-या उद्योगासाठी कौशल्य पूर्ण युवक तयार होतील. त्याचबरोबर प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून नव उद्योजकांना उभे राहण्यासाठी कर्ज पुरवठा करण्यात येत आहे. आज नोकरी मागणा-यांपेक्षा नोकरी देणारे तयार करण्याची गरज आहे, असे श्री. मुनगंटीवार म्हणाले.
यावेळी आमदार अमर काळे यांनी ट्रामा केअर युनिटसाठी कर्मचारी व डॉक्टर लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. बोंडअळी , गारपीटमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना पॅकेज दयावे, एमआयडीसी जमिन खरेदीसाठी शासनाने परवाणगी दयावी, आदिवासी भागातील विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी 220 केंव्हीचे उपकेंद्र मंजूर करावे आदी मागण्या केल्यात.
यावेळी माजी आमदार दादाराव केचे, सभापती मंगेश खवशी यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत तीन बचत गटांना कर्ज मंजुरीचे पत्र मान्यवरांचे हस्ते  देण्यात आले.
                                                     *****        

Wednesday, 7 March 2018



देवळीला होणार अत्याधुनिक वाहन चालक प्रशिक्षण केंद्र
वर्धा दि 7 :-  भारतात रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण मोठे आहे. वाहनचालकाची चूक आणि  अपघाताच्यावेळी  परिस्थिती हाताळण्याचे तंत्राचा अभाव यामुळे 78 टक्के अपघात होत आहेत. म्हणूनच रस्त्यावर व्यक्तीची सुरक्षितता हे ध्येय ठेऊन रस्ते  परिवहन व महामार्ग मंत्रालय प्रत्येक जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे वाहन चालक प्रशिक्षण केंद्र  सुरू करणार आहे. जिल्ह्यात देवळी येथे अत्याधुनिक वाहन चालक प्रशिक्षण केंद्रास मान्यता मिळाली असून लवकरच हे केंद्र  तयार होईल.
या केंद्राध्ये हलके वाहन,  4 चाकी, व 6 चाकी जड वाहन चालकांना  वाहन चालविण्याचे  परिपूर्ण प्रशिक्षण देण्यात येईल.  तसेच वाहन चालकांना रिफ्रेशर कोर्स सुद्धा  करता येणार आहे. यामध्ये वाहन चालकाची संगणकीकृत  चाचणी घेण्यात येईल. प्रत्यक्ष वाहन चालवतांना मध्येच एखादी व्यक्ती, वाहन, जनावर आल्यास वाहनचालक त्या परिस्थितीला कसा हाताळतो हे सुध्दा या चाचणीत तपासले जाईल. तसेच अपघाताच्या वेळी त्याचे मानसिक, शारीरिक संतुलन याचा सुद्धा अभ्यास केला जाईल.  या चाचण्यांमध्ये अयशस्वी झालेल्या वाहनचालकांना पुन्हा प्रशिक्षण घ्यावे लागेल.
या प्रशिक्षण केंद्रातील  अभ्यासक्रम हा 30 दिवसांचा राहणार आहे. यामध्ये  वाहन चालकाची वर्तणूक , व्यवहार आणि ताण व्यवस्थापन , बचावात्मक चालक तंत्र, वाहतुकीचे नियम आणि कायदे,  आणीबाणीची परिस्थिती  हाताळण्याचे तंत्र, वाहन देखभाल व इंधन संवर्धन, प्रदूषण आणि पर्यावरण, अपघात घटना, अपघात कारणाचे विश्लेषण, कुणाचा दोष होता आणि ते कसे टाळता आले असते, वारंवार अपघात घडलेल्या वाहनचालकांसाठी सुरक्षितता यावर प्रशिक्षण इत्यादी बाबींचा समावेश येथील अभ्यासक्रमात राहणार आहे.
वाहनचालकांचे प्रात्यक्षिक कौशल्य चाचणी आणि वर्तणूक विश्लेषण चाचणी घेण्यात येईल. या केंद्रात प्रशिक्षणार्थींची राहणे- आणि खाण्यापिण्याची व्यवस्था असणार आहे. तसेच वाहनचालकाची चाचणी घेण्यासाठी ट्रॅक सुद्धा असणार आहे.