Monday, 6 November 2017



        गौतम बुद्धाच्या पंचशील विचारांची आज जगाला  गरज
                                               - राजकुमार बडोले

5 कोटीच्या पर्यटन विकास कामांचे भूमिपूजन
• सांस्कृतिक ठेवा जपण्याची गरज- मदन येरावार
बोर धरण आणि केळझर येथील विकास कामांचा समावेश
वर्धा दि 5 (जिमाका) गौतम बुद्धांचा धम्म हा महासागरासारखा आहे.यात सर्व जाती, पंथ, विचार आचाराचे लोक सामावून घेण्याची क्षमता आहे. आजच्या जागतिक दहशतवादाच्या, आक्रमकतेच्या, निराशेच्या आणि  अनिशचिततेच्या वातावरणात गौतम बुद्धाच्या  पंचशील विचारांची गरज आहे असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
        केळझर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसराच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि
  कार्तिक पोर्णिमेनिमित्त आयोजित स्वागत समारोह व  धम्म परिषद कार्यक्रमात ते बोलत होते.
        यावेळी पर्यटन व ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार, खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर, समीर कुणावर, जिल्हा परिषद बालकल्याण सभापती सोनाली कलोडे अशोक कलोडे, सेलू पंचायत समितीच्या सभापती सुनिता खोडे,  भन्ते सदानंद ,सियाराम लोहकरे, सरपंच रेखा लोंढे, उपसरपंच फारुख शेख उपस्थित होते.
बोर धरण येथील बगीचा,
  केळझर येथील गणेश मंदिर परिसराचा विकास , डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसराचा विकास, हजरत पीर बाबा टेकडी परिसर विकास अशा एकूण 5 कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार आणि राजकुमार बडोले यांचे हस्ते करण्यात आले.
        यावेळी पुढे बोलताना
  ते म्हणाले, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली. ज्यामुळे माणसाला माणसासारखे वागवले जाते.पण त्याहीपेक्षा त्यांनी सामाजिक, आर्थीक, शैक्षणिक, राजकीय स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा धम्माची  ओळख समाजाला करून दिली. शोषित वर्गाचे हित साधल्याशिवाय देशाची उन्नती साधली जाणार नाही . असेही ते यावेळी म्हणाले.
        मदन येरावार:-  आजच्या नाविन पिढीसमोर गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची ओळख करून देण्याची गरज आहे.  केळझरच्या भूमीवरून मागील 40 वर्षांपासून धम्म परिषद आयोजित करून हा संदेश पोहचविण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यामुळे या परिसराचा विकास करण्यासाठी आणखी निधी देऊ असे मदन येरावार यावेळी म्हणाले. आज संपूर्ण जगात युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. तेव्हा आपल्याला  शांती चा संदेश देणाऱ्या बुद्धाची आठवण होते.आणि युद्ध नको बुद्ध हवा असे म्हणण्याशिवाय पर्याय राहत नाही.
         आपल्या पूर्वजानी संस्कृतीचा ठेवा पुस्तक रुपात जतन केला आहे.त्यामुळे या पुस्तकांसाठी सुसज्ज ग्रंथालय याच कामात
  निर्माण करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.  तसेच या सर्व विकास कामांसाठी पाठपुरावा करणारे आमदार पंकज भोयर यांचे कौतुकही केले.
        70 वर्षाच्या कालखंडात पहिल्यांदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संविधानावर संसदेत चर्चा घडवून आणली हे सांगताना खासदार रामदास तडस म्हणाले ,  बाबासाहेबांचा विचार आज घरा-घरापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. पहिल्यांदा जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी येतोय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाने 5  हजार कोटी रुपयाचे काम  सुरू झाले आहे. त्यात पुन्हा पर्यटन विकास कामांची भर पडली आहे.यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खासदार तडस यांनी पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांचे आभार मानले.
       केळझरला तीनही धर्माचे उत्कृष्ट आणि नावाजलेले धार्मिक स्थळे आहेत. त्यामुळे केलझारला अ वर्ग पर्यटनाचा  दर्जा मिळावा अशी मागणी आमदार पंकज भोयर यांनी प्रसंगी केली. आमदार समीर कुणावर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.
                                                            00000
प्र.प.644                                                              दि.5 नोव्हेंबर 2017
           मारुती सुझुकी इंडिया प्रशिक्षणार्थी भरती मेळावा
Ø आय टी आय उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा
वर्धा, दि 5 (जिमाका) कौशल्यप्राप्त युवकांना रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशाने जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालयाचे वतीने मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा आयोजित करण्यात येत आहे. 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता हिंगणघाट येथील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये सदर मेळावा पार पडणार आहे. यासाठी शासकीय औद्योगिक संस्थेतुन 2016 मध्ये उत्तीर्ण आणि जुलै 2017 मध्ये परीक्षा दिलेले विद्यार्थी पात्र ठरतील.
मारुती सुझुकी इंडीयाच्या गुरगाव, मानेसर, कार प्लॉन्ट, मानेसर पावरटेन प्लांन्ट  करीता सदर भरती मेळावा घेण्यात येत आहे. यामध्ये विद्युत, फीटर, यंत्रकार, यांत्रिकी मोटार वाहने, टुल ॲन्ड डाय मेकर, पेंटर, वेल्डर या व्यवसायाचे प्रशिक्षणार्थी या मेळाव्यात सहभागी होऊ शकतात. उमेदवाराची निवड ही  लेखी व परीक्षा व मुलाखत घेऊन करण्यात येईल. शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण काळात प्रशिक्षणार्थ्याना दरमहा विद्यावेतन 9 हजार 238 रुपये आणि हजेरी बोनस  3 हजार 120 रुपये मिळणार आहेत. शिवाय प्रशिक्षणादरम्यान जेवन व युनिफार्म कंपनीमार्फत पुरविण्यात येणार आहे. निवास व प्रवास खर्च स्वत: प्रशिक्षणार्थींना करावा लागेल.
उमेदवारांनी मेळाव्यासाठी येतांना पासपोर्ट आकाराचेही छायाचित्र, ओळखपत्र, आधारकार्ड , मुळ शैक्षणिक प्रमाणपत्र दोन प्रतित आणि आय टी आय प्रमाणपत्र दोन प्रतित सोबत ठेवावे. या भरती मेळाव्याचा लाभ आय.टी.आय. उत्तीर्ण बेरोजगारांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यु.आर. खारोडे यांनी केले आहे.





Friday, 3 November 2017



शाळा फक्त 'ती'च्यासाठी
Ø जिल्हा परिषद  चालविते एका मुलीसाठी शाळा
वर्धा, दि 30 (जिमाका)   तनूला शाळेत कोणीही मित्र-मैत्रिणी नाहीत. ती एकटीच डबा खाते. एकटीच घरी येते. असं नाही की तिचं कुणाशी पटत नाही. ते असं आहे... तिच्या शाळेत ती एकटीच शिकते! वर्ध्याच्या कोपरा गावातली प्राथमिक जिल्हा परिषदेची ही शाळा.  'त्या' शाळेची विद्यार्थी संख्या आहे  फक्त एक
          मुलींचा जन्मदर वाढवा म्हणून बेटी बचाओ बेटी पढाओ  ही योजना  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केली. मुलगी शिकली आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली तर आईवडिलांना  मुलींच्या भवीतव्याची चिंता करण्याची गरज राहणार नाही. शिवाय मुलीकडे  पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोनही बदलेल. शासनाचा हाच उद्देश ही शाळा पूर्ण करण्याचा ध्यास  ठेवते.

          तिसरीत शिकणारी तनू जेव्हा शाळेत पोहोचते तेव्हा शाळा रोज रिकामीच असते. इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या
  या शाळेत तनू मडावी ही एकमेव विद्यार्थिनी आहे.
          वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील कोपरा गावात ही शाळा आहे. गेल्यावर्षी पहिली ते पाचवीच्या या शाळेत दोनच विद्यार्थी होते. त्यातला एक विद्यार्थी पाचवी पास झाला आणि यंदाच्या शैक्षणिक वर्षांत फक्त तनू मडावी ही एकटीच विद्यार्थिनी शिल्लक राहिली.
  एकच विद्यार्थिनी असल्याने ही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर होती.
         शाळा बंद पडली तर तनुचं शिक्षण बंद होईल. तिला कदाचित आईसोबत शेतमजुरीलाही जावं लागेल.
म्हणूनच वर्धा जिल्हा परिषदेनं या एका विद्यार्थिनीसाठी दरमाही ६० ते ७० हजार रुपये खर्च करून ही शाळा सुरू ठेवली आहे.शाळेची इमारत धोकादायक झाल्यानं तनूची शाळा शेजारील किचनशेडमध्ये भरते.

        या एका विद्यार्थिनीला शिकवण्यासाठी अरुण सातपुते हे शिक्षक  रोज शाळेत येतात. तिच्यासाठीच रोज प्रत्येक विषयाचे तास होतात.शाळेत वीजही नसते. पण अशा प्रतिकूल परिस्थितीतही शाळा सुरू आहेच.
         हिंगणघाट तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी ललितकुमार बारसागडे यांनी सांगितलं की, "धोकादायक इमारत असल्यास तिथे विद्यार्थ्यांना बसवू नये असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत." कोपरा गावातील प्राथमिक शाळेत तनू मडावी ही एकमेव विद्यार्थिनी आहे. "विद्यार्थी संख्या कमी असल्यानं शाळेची नवीन इमारत उभी राहू शकत नाही. परंतु,  तनूची गैरसोय होऊ नये म्हणून शाळेशेजारील किचन शेडमध्ये तिच्या शिक्षणाची सोय केली आहे."
        या गावातले काही विद्यार्थी दुसऱ्या गावी गेल्याने इथे आता दखलपात्र विद्यार्थी शिल्लकच नाहीत. एखाद्या गावात विद्यार्थी संख्या पुरेशी नसल्यास जे थोडेबहुत विद्यार्थी असतात, त्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे दुसऱ्या गावातील शाळेत पाठवलं जातं. मात्र तनुच्या बाबतीत ते शक्य नव्हतं.
      याबाबत गटशिक्षणाधिकारी बारसागडे यांनी सांगितले की,
  "एखाद्या गावात कमी विद्यार्थी संख्या असली तर आम्ही त्यांना शासनाच्या नियमानुसार जिल्हा परिषदेच्या अन्य शाळेत वर्ग करतो." "मात्र या गावापासून तीन किलोमीटरपर्यंत कोणतीही शाळा नाही. तसंच शाळेत येण्यासाठी रस्ते चांगले नाहीत. या गावात जेमतेम १४ घरं आहेत. त्यामुळे दखलपात्र विद्यार्थ्यांची संख्या कमीच आहे." त्यामुळे तनुसाठी ही शाळा सुरू ठेवणे क्रमप्राप्त होते. तिची शिक्षण घेण्याची इच्छा पाहून ही शाळा सुरू ठेवण्यात आली आहे".  यातून शासनाची मुलींच्या शिक्षणाप्रति असलेले सकारात्मक  प्रयत्न दिसून येतात. 
        तनुच्या शिकण्याच्या इच्छेला तिच्या पालकांनीही बळ दिलं आहे, हे उल्लेखनीय. ''ती शिकते याचं पालक म्हणून मला समाधान वाटतं," असं तिचे वडील राजू मडावी यांनी सांगितलं."शाळेत विद्यार्थी नसल्याने ती एकटीच असते. वर्गात मैत्रिणीही नाहीत. तरीही तिने शिकून मोठं व्हावं, असंच आम्हांला वाटतं," त्यांनी पुढे सांगितलं.
       या शाळेचे एकमेव शिक्षक अरुण सातपुते गेल्या सहा वर्षांपासून या शाळेत शिकवत आहेत. चार महिन्यांच्या पावसाळ्यामध्ये तर ते पायीच शाळा गाठतात.
         कोपरा गावातील जिल्हा परिषदेची ही शाळा पाचवीपर्यंत आहे. कोपरा गावाचं पुनर्वसन झाल्याने नागरिक दुसऱ्या गावी स्थलांतरित झाले आहेत. सध्या या गावाची लोकसंख्या फक्त 64 आहे. त्यामुळे मुलांची संख्या वाढेल, याची चिन्हं काही दिसत नाहीत.त्यामुळे कदाचित पाचवीपर्यंत तनूला या शाळेत एकटीनेच जावं लागेल, असं सध्यातरी चित्र दिसत आहे.
    तनुला डॉक्टर व्हायचं आहे...
शाळेची परिस्थिती प्रतिकूल असली तरी तनू मात्र आनंदी आहे. तनूशी गप्पा मारल्यावर
  तिने सांगितलं, "मला मोठं होऊन डॉक्टर व्हायचं आहे." यातून तिची शिकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती दिसून आली.
0000








कॉटन टू क्लॅाथ ठरणार शेतक-यांसाठी वरदान
               • साटोडा गावात स्थापन झाले  कापड निर्मिती केंद्र
         • 16 महिलांना मिळाला रोजगार 
                 • आणखी 28 महिलांना रोजगारासाठी देणार प्रशिक्षण
वर्धा,दि 11(जिमाका) शेतक-यांनी पिकवलेल्या पांढ-या सोन्याला चांगला भाव मिळवून द्यायचा असेल तर कापसावर आधारित  प्रक्रिया उद्योग उभारण्याशिवाय पर्याय नाही. याला मूर्त रूप देण्यासाठी कृषी समृद्धी समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाने पुढाकार घेतला असून याची  छोटी सुरुवात साटोडा या गावापासून झाली  आहे.  गावातील 16  महिलांनी  कापसापासून खादी कापड तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली असून  त्यांना  रोजगाराचे नवीन साधन उपलब्ध झाले आहे. कॉटन टू क्लाथ ही संकल्पना साकारणारा हा प्रकल्प  शेतकऱयांसाठी  निश्चितच वरदान ठरणार आहे. 
विदर्भात कापसाचे पीक मोठया प्रमाणात घेतले जाते.पण शेतक-यांना कापूस हा कच्चा माल म्हणून विकण्याशिवाय पर्याय नाही.कारण शेतक-यांच्या मालकीच्या  सूतगिरण्या किंवा वस्त्रोद्योग नाहीत.  त्यामुळे पिकवलेला कापूस आहे त्या भावाने व्यापाऱ्याना  देण्यापलिकडे त्याच्याकडे दुसरा  पर्याय नाही.  वर्षानुवर्षे सुरू  असलेली ही प्रथा आजही कायम आहे.  शेतक-यांच्या या परिस्थितीत  बदल घडविण्यासाठी स्थापन झालेला  केम प्रकल्प यासाठी काम करीत आहे. शेतक-यांना विविध  शेतीपूरक उद्योगाकरिता कृषी समृद्धी समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाद्वारे विविध योजना राबविण्यात येत आहेत.  यामध्ये शेतकरी बचत गटाच्या दालमील, शेळीपालन, मशरूम शेती, शेतक-यांचा उत्पादन खर्च कमी करणे आणि शेतक-यांनी कापूस व्यापाऱ्यांना विकता कापूस गाठी तयार करण्यासाठी प्रोत्साहन व सहकार्य  याचा समावेश आहे. मागील दोन वर्षांपासून 10 गावातील शेतकरी स्वत:च कापूस गाठी तयार करून विकत आहेत.  पण यातील नफ्याचे खरे गणित कापड आणि वस्त्रे तयार करण्यात आहे,  हे लक्षात घेऊन कॉटन टू  क्लाथ या संकल्पनेवर काम करण्यास केमने सुरुवात केली.
वर्धा शहराला लागून असलेल्या साटोडा या गावातील विठाई, संस्कृती, महालक्ष्मी, भिमाई या महिला बचत गटाच्या 20 महिलांना  हातमाग चालविण्याचे प्रशिक्षण दिले. मुख्य म्हणजे यातील महिला या शेतकरी व शेतमजूर कुटुंबातील आहेत. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विधायक कृतिशील कार्यापासून प्रेरणा घेऊन निवेदिता निलंयम ही संस्था  काम करते. या संस्थेचे किशोरभाई यांनी या महिलांना  हातमाग चालविण्याचे प्रशिक्षण दिले आहे. तसेच केमसाठी  हातमाग युनिटही  तयार करून  दिलेत. केमने 30 टक्के अनुदानावर 4 हातमाग युनिट या गावात स्थापन केले आहेत. एका युनिटची किंमत 3 लाख रुपये असून यासाठी  समन्वित  शेतकरी उत्पादक कंपनी आणि ग्लोबल इंटरप्रयजेस यांनी सहकार्य केले आहे.
दोन महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर ऑगस्ट महिन्यापासून  16  महिलांनी 500 मीटर खादी कापड तयार केले आहे. मुख्य म्हणजे समन्वित शेतकरी उत्पादक कंपनी आणि  ग्लोबल इंटरप्रयजेस या कंपनीला तयार कापड विकण्याचा करार केल्यामुळे 150 रुपये प्रति मीटरने खादी कापड विकला जात आहे. यामध्ये महिलांना 200 रुपये प्रतिदिन मजुरी सोबतच कापड विक्रीतून होणा-या नफ्यातील हिस्साही मिळणार आहे. 
याच गावात आणखी 7 हातमाग युनिट लवकरच बसविण्यात येणार असून  आणखी 28 महिलांना रोजगाराची संधी गावातच  मिळणार आहे. शिवाय गावातील शेतक-यांना या हंगामात कापूस व्यापा-यांना विकण्याऐवजी थेट कापड तयार करून विक्रीचा पर्यायही उपलब्ध झाला आहे. 


            शेतक-यांना 1 क्विंटल कापसाचे हमीभावाप्रमाणे 5 ते 6 हजार रुपये  मिळतात. पण त्यावर प्रक्रिया करून थेट खादी कापड विकला तर याच्या चारपट म्हणजे  सुमारे 23 हजार रुपये नफा खर्च वजा जाता मिळू शकतो. त्यामुळे शेतक-यांनी याचा फायदा करून घ्यावा.
 
 निलेश वावरे 
  समन्वयक 
  कृषी समृद्धी समन्वित कृषी विकास प्रकल्प 
  वर्धा

0000