Friday, 3 November 2017



*विशेष  लेख
जलयुक्त शिवार :  97 हजार हेक्टर संरक्षित सिंचन
रब्बी पिकात 15 हजार हेक्टरने वाढ
357 गावे वॉटर न्यूट्रल

     वर्धा दि 2 (जिमाका)  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचे दृष्य परिणाम राज्यात सर्वत्र दिसायला लागले आहेत. सरकारला तीन वर्ष पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर जलयुक्त शिवार ही सर्वात मोठी उपलब्धी ठरली आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे केवळ सिंचन क्षमताच वाढली नाही तर असंख्य गावांचा पाण्याचा ताळेबंद तयार झाला आहे. वर्धा  जिल्हयात मागील तीन  वर्षात जलयुक्त शिवारमध्ये 564  गावाची निवड करण्यात आली. निवड केलेल्या गावात जलयुक्त शिवार अंतर्गत झालेल्या कामामधून 95 हजार 473  हेक्टर संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. याचा लाभ असंख्य शेतकऱ्यांना मिळाला असून . जलयुक्त शिवार हे अभियान शेतीसाठी संजीवनी  ठरले आहे.

      पावसाचे जास्तीत जास्त पाणी गावाच्या शिवारातच अडवून भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करणे, विकेंद्रित जलसाठे निर्माण करणे, अस्तित्वात असलेल्या आणि निकामी झालेल्या जलस्रोतांच्या पाणी साठवण क्षमता पुनर्स्थापित करणे, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, आणि पाणी अडविण्याच्या कामात लोकसहभाग वाढविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. 2015 पासून सुरू करण्यात आलेली ही योजना जिल्ह्यात उत्तम पद्धतीने राबविल्या गेली. 

     कृषि विभाग, जलसंधारण (राज्य), जिल्हा परिषद  लघुसिंचन विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा,   वन विभाग, सामाजिक वनीकरण, पाटबंधारे विभाग, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा,  इत्यादी विभागाच्या माध्यमातून जिल्हयात जलयुक्त शिवारची कामे करण्यात आलीत . या सर्व विभागाच्या  नियोजनामुळे जलयुक्त शिवार अभियानाची यशस्वी वाटचाल जिल्ह्यात  पहायला मिळते.

     2015-16 मध्ये 8 तालुक्यातील 214 गावांची निवड या अभियानात करण्यात आली. 214  गावात विविध यंत्रणांमार्फत 2808 कामे पूर्ण करण्यात आली.  दुष्काळावर मात करण्यासाठी सुरु केलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा परिणाम पाहता वर्धा  जिल्हयात जलयुक्त शिवार योजनेत 2015-16 मध्ये समाविष्ट करण्यात आलेली सर्वच  214 गावे  शंभर टक्के वॉटर न्युट्रल झाली आहे. या कामामुळे जिल्हयात या वर्षात 41 हजार  290  हेक्टर संरक्षित सिंचन निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे पावसाच्या खंड काळात कोमेजणा-या किंवा कारपणा-या पिकांना जलयुक्त शिवार अभियान संजीवनी देणारे ठरले आहे.

     शिवारात पावसाचे पडलेले पाणी व अडवलेले आणि जिरवलेले पाणी यांचा ताळेबंद करण्याची पध्दत जलयुक्त शिवारमध्ये ठरवून दिलेली आहे. त्यानुसार गावाची सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता जलयुक्त शिवारच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामामुळे पावसाच्या पाण्याचा जमा खर्च व ताळेबंद तयार करणे म्हणजेच वॉटर न्युट्र्रल टक्केवारी होय.  

     सन 2016-17 मध्ये 212  गावाची निवड करण्यात आली असून या गावात 2323  कामे प्रस्तावित करण्यात आली होती. यापैकी  2228 कामे पुर्ण करण्यात आली आहेत. पूर्ण करण्यात आलेल्या जलयुक्त शिवारच्या कामामधून 54 हजार 183  हेक्टर संरक्षित सिंचन निर्माण झाले आहे. या वर्षात निवडण्यात आलेल्या 212  गावांपैकी 143  गावे शंभर टक्के वाटर न्युट्रल झाली आहेत तर 61 गावे 80 टक्क्यांच्या वर वाटर न्युट्रल झाली आहेत.

मागील दोन वर्षात जलयुक्त शिवार मध्ये झालेल्या कामामुळे जिल्ह्यात भाजीपाला पीक, फळपीक लागवड वाढली असून रब्बी पिकाच्या क्षेत्रात 15 हजार हेक्टरने वाढ झाली आहे.

     सन 2017-18 मध्ये जिल्हयातील 138  गावांची निवड करण्यात आली असून विविध यंत्रणांमार्फत 1400  कामे प्रस्तावित केली आहेत. यातील काही  कामे सुरु झाली असून सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर अंदाजे 30 हजार हेक्टर संरक्षित सिंचन निर्माण होणार आहे. जलयुक्त शिवारमध्ये शेततळे, सिमेंट नालाबांध, नाला खोलीकरण, भूमिगत बंधारे, रिचार्ज शाफ्ट सह  अन्य महत्वाची कामे करण्यात आली आहेत. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून 5 वर्षात महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प आहे. मागील तीन वर्षात या अभियानाच्या माध्यमातून जिल्हयात निर्माण झालेल्या 95 हजार 473 हेक्टर  संरक्षित सिंचनामुळे शेतीला हक्काचे सिंचन मिळाले आहे.


                                                                                         मनीषा सावळे
                                                                               जिल्हा माहिती अधिकारी वर्धा



Tuesday, 31 October 2017



पणन महासंघामार्फत प्रतीचे सोयाबिन खरेदी सुरु
वर्धा, दि 31 (जिमाका)  पणन महासंघामार्फत प्रतीचे सोयाबिन खरेदी आधारभूत दराने सुरु करण्यात आली आहे. शेतक-यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अजय कडू यांनी केले आहे.
जिल्हयात आर्वी, कारंजा, पुलगाव, देवळी, वर्धा, हिंगणघाट, समुद्रपूर, सिंदी व सेलू येथे सोयाबिन खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. यासाठी शेतक-यांनी त्यांच्या जवळच्या खरेदी केंद्रावर किंवा कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी.  नोंदणी करण्यासाठी शेतक-यांनी 7/12 उतारा, आधार कार्ड व बँकेच्या पहिल्या पानाची झेरॉक्स  सोबत असणे आवश्यक आहे.  खरेदी केंद्रावर  केंद्र शासनाने  निश्चित केलेल्या वैशिष्टया प्रमाणे एफएक्यु प्रतीचे सोयाबिन आणावे. मालाची चाळणी करुन पुर्णपणे वाळवून ज्यामध्ये आर्द्रता (ओलावा) 12 टक्के पर्यंत असेल, असाच माल खरेदी केंद्रावर आणावा. शेतक-यांना शेतमाल खरेदीचा दिनांक व वेळ एस.एम.एस. व्दारे कळविण्यात येईल, जेणे करुन त्यांना प्रतिक्षा करावी लागणार नाही. शेतमाल खरेदी केल्यानंतर  शेतक-यांच्या बँक खात्यात एक आठवडयाच्या आत थेट रक्कम जमा करण्यात करण्यात येईल, असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी कळविले आहे.


                मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना
 वर्धा, दि 31 (जिमाका) मागासवर्गी विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणे सुलभ व्हावे म्हणुन शासकिय वसतीगृहाची व्यवस्था आहे मात्र विद्यार्थी संख्या आणि वसतीगृहाची क्षमता बघता अनेक विद्याथी्र यापासुन वंचीत राहत होते. अशा विद्यार्थ्याचा शिक्षणासाठी होणारा खर्च लक्षात घेऊन शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केली. यामध्ये अनुसुचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा उलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या  आधार संलग्नीत बँक खात्यात जमा केली जाते. यासाठी विद्यार्थ्यांनी 15 नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करावेत.
  या योजनेचा लाभ घेऊ ईच्छिणारा विद्यार्थ्यांना  इयत्ता  10 वी , 12 वी , पदवी , पदवीकामध्ये 60 टक्के  पेक्षा जास्त गुण  असणे आवश्यक आहे. अनुसुचित जाती व नवबौध्द  प्रवर्गातील  दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी  50 टक्के पेक्षा जास्त गुण आवश्यक राहील.
            शासकिय वसतीगृहात प्रवेशित नसणा-या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी  रक्कम अशी आहे.
अ.क्र.
खर्चाची बाब
मुबंई शहर, मुबंई उपनगर, नवी मुबंई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यासाठी रक्कम
इतर महसूली विभागीय शहरातील व उर्वरीत क वर्ग महानगरपालिका क्षेत्रातील उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी रककम
इतर जिल्हयाच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी रककम
1
भोजन भत्ता
32000/-
28000/-
25000/-
2
निवास भत्ता
2000/-
15000/-
12000/-
3
निर्वाह भत्ता
8000/-
8000/-
6000/-

एकुण
60000/-
51000/-
43000/-
वैद्यकिय व अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी याव्यतिरिक्त  5 हजार रुपये  व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना 2 हजार रुपये  शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येईल. या योजनेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष, अटी, व शर्ती  अर्जासोबत दिल्या आहेत. त्याचे विद्यार्थी व पालकांनी अवलेाकन करुन अर्ज भरावे.  अर्जाचा नमुना http://sjsa.maharashtra.gov.in   किंवा http://www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.  विद्यार्थ्यांकडे  ज्या जिल्हयातील जातीचे प्रमाणपत्र आहे. त्याच जिल्हयातील समाज कल्याण सहायक आयुक्त यांचे कडे अर्ज सादर करण्यात यावा. असे समाज कल्याण सहायक आयुक्तांनी कळविले आहे.


राष्ट्रीय एकात्मता दौडला उत्स्फुर्त प्रतिसाद
 वर्धा, दि 31 (जिमाका) लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती  राष्ट्रीय एकता दिवस म्हणुन  देशभर साजरा करण्यात आली.  या एकता दिनाचे औचित्य साधून जिल्हा क्रिडा मैदान येथून आयोजित एकात्मता दौडचे मध्ये  नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग घेऊन सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली वाहिली. या एकात्मता दौडला जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी  हिरवी झेंडी दाखवून दौडला प्रारंभ केला. यावेळी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा समत्वयक संजय माटे, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे  व शासकिय अधिकारी पोलिस विभागाचे अधिकारी , विद्यार्थी , खेळाडू उपस्थित होते.
            यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की,  वल्लभभाई पटेल यांनी देशाची अखंडता राखण्याचे महत्वपुर्ण काम केले. आज त्यांच्या नावाने संपूर्ण देशभर एकात्मता दौड आयोजित केली जात आहे. ही धाव राष्ट्रीय एकतेला, एकात्मतेला समर्पित आहे. सर्व वयोगटातील नागरिक यामध्ये सहभागी होऊन हा देश एक राहील. देशाची अखंडता कोणीही दूर करु शकत नाही. अशा प्रकारचा संदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल  यांनी यावेळी दिला. तत्पुवी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी उपस्थित सर्व मान्यवर व विद्यार्थी यांना एकात्मतेची शपथ दिली .
            सदर दौड झाशी राणी चौक – इतवारा चौक- सामान्य रुग्णालय – कच्छी लाईन – निर्मल बेकरी- गोल बाजार – सरदार वल्लभभाई पटेल चौक मार्गे जाऊन पुन्हा जिल्हा क्रिडा संकुल येथे या रॅलीचा समारोप झाला.
                                                            00000