Saturday, 5 August 2017



                मुलींनी स्व -संरक्षणाचे धडे घेणे काळाची गरज
                                                       -शिक्षणाधिकारी

                      यशवंत विद्यालयात  महिला संरक्षण शिबीर
वर्धा दि 4 (जिमाका)  आज मुली शिक्षण व नोकरीसाठी बाहेर पडतात. वृत्तपत्रात  रोज घडणाऱ्या मुली व महिलांच्या अत्याचाराच्या  घटना वाचून मन धास्तावते. त्यामुळे आजच्या काळाची गरज म्हणून मुलींनी स्व- संरक्षणाचे धडे घेणे आवश्यक ठरत आहे असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी एल.एम. डूरे यांनी केले.
          राज्य महिला आयोगाच्या वतीने मुलींच्या स्वसंरक्षणासाठी 5 दिवसाचे कराटे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात येत आहे. यातील सेलू तालुक्यातील शिबीर यशवंत विद्यालायत घेण्यात येत आहे. याच्या  शुभारंभ  प्रसंगी  श्री डूरे बोलत होते.  यावेळी  जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, राज्य महिला आयोगाच्या जिल्हा समन्वयक संगीता वानखडे,  विद्यालयाच्या  मुख्याध्यापिका रंजना दाते, पर्यवेक्षिका, तसेच कराटे प्रशिक्षण देणारी कराटे पटू सायली वाघ आणि तिची चमू उपस्थित होती.
पुढे बोलताना श्री डूरे म्हणाले,  ग्रामीण भागातील मुली शाळेत जाण्यासाठी बस, ऑटोरिक्षा इत्यादी साधनांचा वापर करतात. अशावेळी त्यांच्यासोबत गैरप्रकार होत असतात. या कारणांमुळे अनेक मुलींना उच्च शिक्षणासाठी बाहेर गावी पाठविण्यास पालक धजावत नाही.  पण मुलींनी स्व संरक्षणाची  माहीत करून घेतल्यास  त्या स्वतःचे संरक्षण स्वत: करू शकतील. या एका प्रशिक्षणामुळे मुलींमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होऊन त्या आलेल्या प्रसंगांना धाडसाने सामना करतील असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी बोलताना मनीषा सावळे म्हणाल्या,  पूर्वीच्या काळातही महिला, मुली घराबाहेर पडल्यात की त्यांना पाहून शेरेबाजी व्हायची, आणि आजही होते. याचा अनुभव प्रत्येक महिलेला आयुष्यात एकदातरी येतोच.  आज ग्रामीण भागातील मुलींचे शिक्षणासाठी बाहेर पडण्याचे  प्रमाण वाढले आहे. त्यांना सुरक्षित वातावरणाची गरज आहे. पण विकृत प्रवृत्तीमुळे आज मुली, महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे स्वत:चे संरक्षण करण्याची जबाबदारी  घेऊन मुलींनी कराटे प्रशिक्षण शिकून घ्यावे.  संरक्षित भविष्यासाठी  आज ही काळाची गरज बनली आहे.  असे मत त्यांनी व्यक्त केले.
संगीता वानखेडे यांनी राज्य महिला आयोगाला मुलींच्या संरक्षणाची काळजी आहे म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मुलींनाच स्व संरक्षणाचे धडे देण्याचे काम महिला आयोगाने हाती घेतले आहे ,असे सांगितले.  यासाठी जिल्ह्यात हिंगणघाट, सेलू, आणि देवळी या तीन तालुक्यात असे प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे.  याचा लाभ मुलींनी करून घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
रंजना दाते यांनी या प्रशिक्षणाचा लाभ शाळेतील इयता 9 वी आणि 10 वी च्या 200 विद्यार्थिनींना होणार आहे. शाळेत 10 ते 15 किलोमीटर अंतरावरून मुली शाळेत येतात. अशावेळी अशाप्रकारचे प्रशिक्षण मुलींना कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याचा आत्मविश्वास मिळवून देते. प्रशिक्षणासाठी यशवंत विद्यालयाची निवड केल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. काराटेपटू सायली वाघ आणि तिच्या चमूने शाळेतील 200 विद्यार्थिनींना प्रशिक्षण देणार आहे. तसेच दिपचंद शाळेतील विद्यार्थिनी सुद्धा याचा लाभ घेतील. अशाच प्रकारचे प्रशिक्षणही हिंगणघाट आणि देवळी तालुक्यातही आयोजित केले आहे.

Wednesday, 12 July 2017



                                 सेतू केंद्र तपासणीसाठी विशेष पथकाची नियुक्‍ती
            वर्धा, दि, 12,(जिमाका):-  जिल्‍हयातील नागरिकांना विविध प्रमाणप्रत्रासाठी जिल्‍हयात तालुका स्‍तरावर  सेतू केंद्र तसेच गावपातळीवर आपले सरकार सेवा केंद्रसुरु करण्‍यात आले. काही केद्रांवर मध्‍यस्‍थामार्फत जास्‍तीची रक्‍कम घेतली जात असल्‍याचे निदर्शनास आल्‍याने जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी विशेष पथकाची नेमणूक केली आहे. यापथकामध्‍ये सहाय्यक जिल्‍हाधिकारी एस.बी. पांचाळ, जिल्‍हाधिकारी कार्यालयातील अधिक्षक प्रमोद कदम यांचा समावेश आहे.
सदर पथकाने पुलगाव आर्वी येथील केंद्रावर तपासणी करुन कारवाई केली. सदर तपासणी पथक जिल्‍हयातील सर्व केंद्रावर केव्‍हाही अचानक भेट देऊन  खोटेपणा आढळून आल्‍यास त्‍या ठिकाणी सुध्‍दा संबं‍धितांवर कारवाई करेल. तसेच सेतू, सुविधा, केंद्र महा ई-सेवा केंद्र तसेच आपले सरकार सेवा केंद्राची परवाणगी रद्द करण्‍यात येईल. 
        या केंद्रावरुन नागरिकांना विविध सेवा पुरविण्‍यात येतात. प्रत्‍येक सेवेसाठी शासनाने निश्चित शुल्‍क ठरवून दिले आहे. आकारुन दिलेल्‍या निश्चित शुल्‍कापेक्षा सेतू केंद्र चालकाव्‍दारे किंवा आपले सेवा केंद्राव्‍दारे पुरविण्‍यात येणा-या सेवेसाठी जास्‍त शुल्‍क आकारल्‍यास नागरिकांनी लेखी तक्रार पुरव्‍यासह अथवा 18002332383 या टोल फ्री क्रमांकावर दाखल करावी, असे आवाहन  जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.


399                                                                 12 जुलै 2017
बनावट जातीचे प्रमाणपत्र बनवून
 देणाऱ्या केंद्रावर कारवाई
Ø दोघांना अटक, गुन्हा दाखल
वर्धा, दि, 12,(जिमाका):-  उपविभागीय अधिकारी आणि तहसीदार यांच्या बनावट सह्या वापरून जातीचे दाखले आणि नॉन क्रिमिलीयेर सारखे  प्रमाणपत्र बनवून देणाऱ्या एका केंद्राचा जिल्हाधिकारी कार्यालयातील पथकाने धाड टाकून पर्दाफाश केला. त्या केंद्रावरील सर्व साहित्य जप्त  करून केंद्र मालक आणि सहका-यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

            सविस्तर वृत्त असे.  देवळी नगरपरिषदच्या बाजूला विना परवाना सामूहिक सुविधा केंद्र चालविण्यात  येत होते. आकाश खंडाते यांच्या मालकीच्या या  केंद्रामार्फत दुसऱ्याच ग्रामस्तरीय उद्योजकांचा परवाना वापरला जात होता. या केंद्रामार्फत एक दिवसात   नागरिकांना सर्व प्रकारचे  बनावट सह्यांचे  दाखले देण्याचे काम होत होते. 10 जुलै रोजी तहसीलदार श्रीमती भगत यांच्याकडे एका  प्रकरणात खोटे जातीचे प्रमाणपत्र आढळून आले. त्यांनी सदर प्रकरणातील व्यक्तीला बोलावून त्याची चौकशी केली असता आकाश खंडाते यांचे नाव समोर आले. तात्काळ त्यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना सांगितले. जिल्हाधिकारी यांनी महाऑनलाईन चे प्रतीक उमाटे यांना तपासणीसाठी पाठविले.  प्रतीक उमाटे यांनी तात्काळ देवळी गाठून सायंकाळी 7 च्या सुमारास सदर केंद्रावर धाड टाकली.

            यावेळी तिथे असलेल्या संगणकामध्ये सुमारे 2 हजार विविध  प्रमाणपत्रे होती . या सर्व प्रमाणपत्राचे बारकोड तपासल्यावर त्यामध्ये अनेक बारकोड खोटे असल्याचे आढळून आले. बनावट सह्या वापरलेले तसेच  पूर्वीच्या उपविभागीय अधिकारी यांच्याही सह्यांचे प्रमाणपत्र आढळून आले. रात्री साडेदहा पर्यंत कागदपत्रे तपासल्यावर तलाठी  आणि पोलीस यांच्या उपस्थितीत  संगणक सील करून सर्व कागदपत्रे जप्त  करून केंद्र सील करण्यात आले.   तसेच आकाश खंडाते आणि सहकारी  धर्मपाल कांबळे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर भां.द.वी च्या कलम 420, 465,466,468,471, 484, 186, 197, 34 तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील  कलम  66   74 या कलमातर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.



प्रकरण कसे उघडकीस आले .
तहसीलदार श्रीमती भगत यांचेकडे नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र बनविण्यासाठी एक व्यक्ती आली होती. त्यावेळी तिने सादर केलेल्या प्रमाणपत्रात जातीचे  प्रमाणपत्र खोटे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सदर व्यक्तीला कार्यालयात बोलावून  जातीचे प्रमाणपत्र कोठून मिळाले याची प्राथमिक चौकशी केली असता सदर व्यक्तीने  केंद्राचे नाव सांगितले.
एका प्रमाणपत्रासाठी 2000 रुपये

नागरिकांना तुमचे काम लगेच कोणत्याही कागदपत्राशिवाय  करून देतो असे सांगून  लोकांकडून पैसे घेऊन जातीचे प्रमाणपत्र व इतर दाखले केवळ संगणकावर  खोट्या सह्या वापरून बनवून दिले जात होते.  कोणत्याही कागदपत्रांशीवाय बनविलेल्या  प्रमाणपत्रासाठी 2 हजार रुपये नागरिकांकडून घेण्यात येत होते.


Thursday, 18 May 2017



प्र..क्र- 291                                                                      18 मे 2017
राज्‍य युवा पुरस्‍कारासाठी 17 मे पर्यंत अर्ज करण्‍याचे आवाहन 
 वर्धा,दि 18- जिल्‍हा, राज्‍य व राष्‍ट्रीय पातळीवर युवकांच्‍या विकासासाठी राष्‍ट्रीय व सामाजिक क्षेत्रात उल्‍लेखनीय कार्य करणा-या 13 ते 35 वयोगटातील युवक, युवती व स्‍वयंसेवी संस्‍थांना शासनामार्फत राज्‍य युवा पुरस्‍कार प्रदान करण्‍यात येतो. सन 2016-17 या वर्षाकरिता राज्‍य युवा पुरस्‍कारासाठी इच्‍छुक व्‍यक्‍तींनी दि.20 मे 2017पर्यंत विहित नमुन्‍यात अर्ज सादर करण्‍याचे  आवाहन जिल्‍हा  क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.
                                                0000
प्र.प.क्र- 292                                                     18 मे 2017
जिल्‍ह्यात कलम 36 जारी
        वर्धा, दि. 18 – जिल्‍हयात शेतकरी 1 जुन पासुन पेरणी बंद आंदोलन तसेच सावंगी पोळ येथील शेतकरी जलसमाधी आंदोलन करणार आहे.  यासाठी जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था कायम राहण्‍यासाठी जिल्‍हा पोलिस अधिक्षक  निर्मलादेवी एस.   यांनी जिल्ह्यात दिनांक 30 मे 2017 पर्यंत कलम 36 जारी केली  आहे. आदेशान्वये मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 36 पोटकलम अ ते फ पर्यंतचे कलम जारी करण्‍यात आले आहे. या आदेशाचा भंग करणा-या व्‍यक्‍तीविरुद्ध मुंबई पोलिस अधिनियम 1951 कलम 134 अन्‍ये कार्यवाहीस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्‍यात आलेले आहे. 
                                                                        0000












प्र..क्र- 293                                                                      18 मे 2017
बेशिस्‍त वाहन चालविणा-यावर  सीसीटीवी कॅमे-याची नजर
 
 वर्धा,दि 18-वाहन चालक वाहतुकीच्‍या नियमाचे उल्‍लघन करणा-या तसेच बेधडकपणे वाहन चालविणाचा बेशिस्‍त वाहन चालकांविरुध्‍द कारवाई करण्‍यासाठी शहरात सीसीटीवी कॅमेरे लावण्‍यात आले आहे. या कॅमे-याच्‍या माध्‍यमाने वाहतुक शाखेने तसेच उपप्रादेशिक परिवहन विभागाने बेशिस्‍त वाहन चालविणा-यांवर कारवाई करण्‍याचे निर्देश जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहे.
शहरातील प्रत्‍येक चौकामध्‍ये सुरक्षेच्‍या दृष्‍टीने सीसीटीवी कॅमेरे लावण्‍यात आलेले आहे. या सीसीटीवी कॅमे-याच्‍या माध्‍यमाने वाहतुकीवर सुध्‍दा नजर ठेवण्‍यात येणार आहे. वाहतुक व्‍यवस्‍था  सुरळीतपणे व नियमांचे पालन करुनच व्‍हावी व कुठेही अवैध वाहतुक, बेशिस्‍तपणे वाहन चालवणा-यांची नोंद सीसीटीवी कॅमेरामध्‍ये होणार आहे. याबाबतची माहिती वाहतुक विभाग व उपप्रादेशिक परिवहन विभागास नियमित उपलब्‍ध होणार आहे. या उपलब्‍ध झालेल्‍या माहितीवरुन संबंधित विभाग कॅमे-यातून घेतलेल्‍या सीसीटीवी फुटेजच्‍या आधारे वाहन चालकावर दंडात्‍मक करवाई करण्‍याच्‍या सुचना जिल्‍हाधिकारी यांनी दिल्‍यात. वाहन चालकांनी नियमाचे पालन करुनच वाहन चालवावे असे आवाहनही जिल्‍हाधिकारी यांनी केले आहे.
                                                       0000