Monday, 16 May 2016

भारतीय नागरी सेवा स्पर्धेतील
खेळासाठी अर्ज करण्‍याचे आवाहन
वर्धा  दि,13 –    राज्‍य शासनाकडून सचिवालय जिमखान्‍यास अखिल भारतीय नागरी सेवा स्‍पर्धेसाठी महाराष्‍ट्र शासनाचा विविध खेळ प्रकारातील संघ निवडण्‍याची व त्‍यांच्‍या प्रशिक्षण शिबिराची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्‍यामुळे विविध कार्यालयातील खेळाडूंनी जिल्‍हा क्रीडा कार्यालय, वर्धा येथून आवेदन पत्राचा नमुना प्राप्‍त करुन तो कार्यालय प्रमुखाच्या मान्‍यतेने दि. 20 मेपर्यंत जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वर्धा यांचे कडे सादर करावा, असे आवाहन जिल्‍हा क्रीडा अधिकारी सुभाष रेवतकर यांनी केले आहे.
टेबल टेनिस, बॅडमिंटन, फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, व्‍हॉलिबॉल, जलतरण, बास्‍केटबॉल, ब्रीज, कॅरम, बुध्‍दीबळ ,अॅथेलॅटिक्‍स ,लघुनाटय, कबड्डी , वेटलिफ्टींग, पावरलिफ्टींग, शरीरसौष्‍ठव, कुस्‍ती, लॉन टेनिस, नृत्‍य व संगीत या खेळासाठी प्रस्ताव सादर करावेत. विविध खेळ प्रकारात अखिल भारतीय नागरी सेवा स्‍पर्धा आयोजित करण्यात येतात. केंद्रीय क्रीडा नियंत्रण मंडळाच्‍या प्रत्‍यक्ष नियंत्रणाखाली या स्‍पर्धा निरनिराळ्या राज्‍य शासनाच्‍या वतीने त्‍या त्‍या राज्‍यामध्‍ये आयोजित केल्‍या जातात. या स्‍पर्धासाठी विविध खेळ प्रकारातील महाराष्‍ट्र शासनाचा संघ निवड चाचणी घेऊन स्‍पर्धासाठी पाठविले जातात, असेही त्यांनी कळविले आहे.

*****
डॉ. बाबासाहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहचवा
-   निवृत्त न्यायमूर्ती सी.एल. थूल
-     विकास भवन येथे राजपत्रित अधिका-यांची कार्यशाळा
          वर्धा, दिनांक 12 – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विविध विषयांचा, घटकांचा अभ्यास करून राष्ट्र उभारणीत मोलाचे कार्य केले आहे. देशाच्या विकासात डॉ. बाबासाहेबांचे कार्य मोलाचे आहे. त्यांचे विचार पुढे नेण्याचे कार्य अधिका-यांनी प्रामाणिकपणे पार पाडून तळागाळातील लोकांचा विकास साधावा, असे विचार अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष तथा निवृत्त न्यायमूर्ती सी.एल. थूल यांनी मांडले.
           विकास भवन येथेजिल्हाधिकारी कार्यालय व सामाजिक न्याय विभागाच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त राजपत्रित अधिका-यांसाठी आयोजित कार्यशाळेत राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल, प्र. अपर जिल्हाधिकारी दीपक नलवडे, प्र. मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक इलमे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, उपवनसंरक्षक दिगांबर पगार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री. रामटेके, सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख, डॉ. सुभाष खंडारे, डॉ.चंद्रकांत हिवरे यांची उपस्थिती होती.
            श्री. थूल म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अष्टपैलू व सर्व गुणसंपन्न असे व्यक्तीमत्तव आहे. त्यांनी सर्व समाजांचा विचार करून वंचितांना विकासाच्या प्रवाहात आणले. भारतीय संविधानाचे शिल्पकार, मानववंशशास्त्र, अर्थतज्ञ, जलतज्ञ, मानवाधिकाराचे जनक, महिलांचे उद्धारक, ज्ञानपिपासू, उत्तम प्रशासक मंत्री आदींच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्र उभारणीत मोलाचे कार्य केले आहे. देशाच्या विकासासाठी त्यांनी योग्य प्रकारचे प्रशासकीय नियोजनाची घडी बसवून दिलेली आहेत्यांचे विचार समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी शिक्षितांची असून प्रत्येकाने ती प्रामाणिकपणे पार पडून देशाच्या विकासात मोलाचा वाटा उचलावावा. तसेच डॉ.बाबासाहेबांच्या विचारांची जयंती प्रत्येकाने साजरी करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
             जिल्हाधिकारी आशुतोष सलिल म्हणाले, प्रत्येक अधिका-यांनी मानवी दृष्टीकोनातून कार्य करावे. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासह योग्य वेळेत काम करावे. लोकांच्या हितासाठी अधिकारांचा उपयोग करून त्यांचा विकास साधावा, असे आवाहन यावेळी त्यांनी अधिका-यांना केले.
           
          जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचे विचार सर्वांनाच प्रेरक असून सामाजिक समतेसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले.
          डॉ. सुभाष खंडारे यांनी सामाजिक न्याय व समतेसाठी शासकीय अधिका-यांसमोरी आव्हाने या विषयावर मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रक्तांचा एक थेंबही न सांडवता  केलेली विश्वविख्यात क्रांती, भारतीय संविधान  आणि प्रशासकीय अधिकार याबाबत सविस्तर मांडणी केली. देशातील प्रत्येक मानवाला समान अधिकारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे प्राप्त झाला. समता, स्वातंत्र्य, न्याय, प्रतिष्ठा आणि बंधुत्वाची शिकवण त्यांनी समाजाला दिली. तसेच वंचितांना विकासाच्या प्रवाहात आणून जगात नावलौकिक मिळविला. त्यांच्या कार्याची दखल आता संयुक्त राष्ट्र संघटनेने घेऊन जगात 14 एप्रिल हा जागतिक ज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येत असल्याचे सांगत डॉ. बाबासाहेबांचे विचार प्रत्येकाला मार्गदर्शक असून त्यांच्या विचारांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले.
        कार्यशाळेत कार्यक्षमता व वृद्धी या विषयावर श्री. हिवरे यांनी तर समाजातील अंधश्रद्धा निर्मुलनासाठी अधिका-यांची भूमिका यावर अनिसचे जिल्हा संघटक पंकज वंजारे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची  सुरूवात महामानवांच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलनाने झालीकार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन दीपा हेरोळे यांनी मानले.
****


आज जागतिक परिचर्या दिन
वर्धा,दि.11-समाजात असे अनेक रुग्‍ण आहेत. ज्‍यांना सहानुभुतीपुर्वक शुश्रृषेची गरज आहे. सध्‍या कार्यरत असलेल्‍या परिचारिकांनी रुग्‍णांची प्रेमपुर्वक सेवा करावी. आरोग्‍य  सेवा देतांना प्रतिबंधात्‍मक, उपचारात्‍मक, सवंर्धनात्‍मक आणि पुनर्वसन या प्रकारच्‍या सेवा देणे गरजेचे आहे. समाजातील गरजवंत रुग्‍णांना या सेवांची गरज आहे. रुग्‍ण सेवा हीच खरी ईश्‍वरसेवा होय. हे बिद या दिनाच्‍या निमित्‍ताने मनी बाळगु या. आज जागतिक स्‍तरावर परिचर्या दिन पाळण्‍यात येतो. निस्‍वार्थ रुग्‍ण सेवेचे व्रत घेवून कार्यरत असणा-या परिचारीकांच्‍या कामाबद्दल समाजामध्‍येही आदर निर्माण झाला आहे.
रशियाविरुध्‍द तुर्कस्‍तानमध्‍ये युध्‍द सुरु असतांना इ.स.1854 ते 1856 मध्‍ये जखमी सैनिकांची देखभाल करण्‍याची गरज लक्षात घेऊन एका 34 वर्षीय इटालियन तरुणीने स्‍वतःला युध्‍दात जखमी झालेल्‍या रुग्‍णांच्‍या सेवेत झोकून दिले. रात्रीच्‍या वेळी हातात कंदील(लॅम्‍प ) घेऊन अविरत रुग्‍णसेवेत स्‍वतःला झोकून दिले. त्‍या तरुणीचे नाव होते. फ्लोरेन्‍स नाईटिंगल, तिचा जन्‍म 12 मे 1820 रोजी इटालिीतील एका संपन्‍न कुटुंबात झाला. फ्लोरेन्‍स नाईटिंगल यांचा जन्‍म दिवस 12 मे जागतिक परिचारिका दिवस म्‍हणून साजरा केला जातो.
फ्लोरेन्‍स नाईटिंगल यांनी आपले संपूर्ण आयुष्‍य युध्‍दातील सैनिकांची विनावेतन सेवा करण्‍यासाठी समर्पित केले. परिचर्या शिक्षण हे शास्‍त्रोक्‍त असावे या दृष्टिने त्‍यांनी परिचर्या शिक्षणाचा अभ्‍यासक्रम सुरु केला. त्‍यांनी केलेल्‍या निस्‍वार्थ सेवेमुळे युध्‍दातील रुग्‍ण सेवेबद्दल त्‍यांना 50 हजार पौंड एवढी रक्‍कम बक्षिस देऊन त्‍यांना सन्‍मानित करण्‍यात आले. या रकमेतून त्‍यांनी जगातील पहिली परिचर्या शिक्षण संस्‍था सुरु केली. भारतातही प्रत्‍येक जिल्‍हयात अशा संस्‍था सुरु आहेत.  

                                                0000
   हेटीकुंडी येथे तलावाच्‍या खोलीकरणामुळे
 1 कोटी लिटर पाण्‍याचा संचय
·        गवळाऊ गाईच्‍या संगोपणाला सहाय्य
·        जानकी देवी बजाज संस्‍थेचा लोकोपयोगी उपक्रम
·        संपूर्ण तलावाचे सहा फुट खोलीकरण

       वर्धा,दि.11-   ब्रिटीश काळापासून अस्थित्‍वात  असलेल्‍या हेटीकुंडी येथील गौळाऊ गाय संवर्धन केद्राच्‍या अर्धा किलो‍मिटर परिसरातील तलावाचे खोलीकरणामुळे सुमारे 1 कोटी लिटर पाण्‍याचा संचय क्षमता निर्माण  झाली आहे.
         हेटीकुंडी येथील गौळाऊ गाय संवर्धन केद्रात 92 गायी असून गवळाऊ गाय हे वर्धेचे वैभव म्‍हणून ओळखले जाते. उन्‍हाळ्यात पिण्‍याच्‍या पाण्‍याची टंचाई निर्माण होत असल्‍यामुळे या परीसरातील नाला व जुन्‍या तलावाच्‍या खोलीकरणासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे जनकी देवी बजाज संस्‍थेला केलीली विनंती तात्‍काळ मान्‍य करुन केवळ पंधरा दिवसात नाला व तलावाचे खोलीकरण पूर्ण करण्‍यात आले आहे. गवळाऊ  गायीच्‍या संवर्धनासाठी व कायम पिण्‍याच्‍या  पाण्‍याची सुविधा निर्माण करण्‍यासाठी दिड किलोमिटर लांबीच्‍या नाल्‍याचे खोलीकरण पहिल्‍या टप्‍यात पूर्ण करण्‍यात आले. याच परिसरातील सुमारे अर्धा किलोमिटर असलेला  तलाव संपूर्ण गाळाणे भरल्‍यामुळे या तलावाची पाणी साठवण क्षमता संपली होती त्‍यामुळे पावसाचे संपूर्ण पाणी जंगलात वाहून जात होते.
             जिल्‍हा पशुसंवर्धन अधिकारी व या केद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. सतिश राजू यांनी हेटीकुंडी येथील पिण्‍याचा प्रश्‍न कायम स्‍वरुपी सुटावा यासाठी जानकीदेवी बजाज संस्‍थेचे संचालक कर्नल विनोद देशमुख जिल्‍हा समन्‍वयक विनेश काकडे यांना  तलाव खोलीकरणाबाबत विनंती केली होती. संस्‍थेने गायीच्‍या संवर्धनासाठी उपयुक्‍त असलेले काम विनामुल्‍य पूर्ण करण्‍यासंदर्भात प्रस्‍ताव तयार करुन तात्‍काळ कामाला सुरुवात केली. तलावातील गाळ व खोलीकरणानंतर दगड व माती काढण्‍यासाठी पोकलॅड व तीन मोठे ट्रक च्‍या सहाय्याने सतत 13 ते 14 दिवस खोलीकरणाचे कार्य पूर्ण केल. या कामावर सुमारे 35 लक्ष खर्च उपेक्षित होता. या खोलीकरणामधून सुमारे 3 हजार 300 ट्रक माती व दगड काढण्‍यात आले आहेत. खोलीकरणानंतर तलावात जिवंत पाणी लागले आहे. गावळाऊ गायी सोबत वन्‍य प्राण्‍याचा  पिण्‍याच्‍या  पाण्‍याचा प्रश्‍न सुद्धा  या उपक्रमामुळे  सुटण्‍यास   मदत झाली आहे.
          गवळाऊ  प्रजातीच्‍या गायीचे संवर्धन व संगोपणासाठी राज्‍य शासनाने 1986 मध्‍ये हेटीकुंडी येथे 324 हेक्‍टर जागेवर प्रक्षेत्र  निर्माण केले. गोवंशातील गवळाऊ  हे अधिकृतरित्‍या नोंदणीकृत झालेले असून संपूर्ण देशात वेगळी ओळख्‍ आहे. गवळी समाजाने  शेतकरी बांधवांनी अत्‍यंत देखन्‍या गवळाऊ  गोवंशाचे  परंपरागत पद्धतीने संरक्षण व संवर्धन केले आहे. त्‍यामुळे आर्वी, कारंजा ,सेलू  तसेच जिल्‍ह्याच्‍या सिमावर्ती भागात  या वंशाच्‍या गायीचे अस्तित्‍व  आहे.या प्रजातीच्‍या गायीचे संवर्धन अत्‍यंत आवश्‍यक आहे.  
              गवळाऊ गायवर्ग नोंदणी व विकास सहकारी संस्‍था स्‍थापन करुन या संस्‍थेद्वारे देशी जातीच्‍या  जनावरांचे संरक्षण व संवर्धन  करण्‍यासंदर्भात शासकीय धोरण ठरविणे व प्रस्‍ताव सादर करण्‍याची जबाबदारी ठरविण्‍यात आली.वर्धा जिल्‍ह्याचे वैभव असलेल्‍या गवळाऊ  प्रजातीच्‍या संवर्धनासाठी पशुसंवर्धन आयुक्‍त विश्‍वास भोसले, उपायुक्‍त डॉ.प्रविण तिखे, जानकी देवी बजाज संस्‍थेचे कर्नल विनोद देशमुख, विश्‍वास सोहणी यांच्‍या मागदर्शनाखाली तलाव खोलीकरणाचे काम यशस्‍वीपणे पूर्ण झाले आहे.
                                                       000000     
   

                     
महात्‍मा गांधी तंटामुक्‍त गाव मोहीम
 पुरस्‍कार प्रवेशिका स्वीकारणे सुरू
Ø 15 जूनपर्यंत प्रवेशिका सादर स्वीकारणार
             वर्धा, दि. 10 – महात्‍मा गांधी तंटामुक्‍त गाव मोहीम 2015-16 अंतर्गत प्रसिद्धीसाठी बातमीदार, माध्‍यम प्रतिनिधींना जिल्‍हा, विभाग आणि राज्‍यस्‍तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्‍कार देण्‍यात येणार आहेत. या पुरस्‍कारासाठी प्रवेशिका  सोमवार, दिनांक 15 जूनपर्यंत पाठवाव्‍यात, असे आवाहन जिल्‍हाधिकारी आशुतोष सलील यांनी केले आहे.
               लहानसहान कारणांवरून निर्माण होणारे तंटे सामोपचाराने सुटावेत. गावागावात शांतता नांदावी, याकरीता माध्‍यमे अत्‍यंत महत्‍त्‍वपूर्ण भूमिका बजावत असतात. ही बाब लक्षात घेऊन शासनाने महात्‍मा गांधी तंटामुक्‍त गाव मोहिमेच्‍या प्रभावी अमलबजावणीसाठी प्रसिद्धी देणा-या पत्रकारांना पारितोषिक जाहीर केलेले आहे.  जिल्‍हास्‍तरावरील प्रथम पुरस्‍कार 25 हजार, द्वितीय 15 हजार आणि तृतीय 10 हजार रूपये आहे. विभागीय स्‍तरावर प्रथम 1 लक्ष रूपये तर राज्‍यस्‍तरावर 2 लक्ष 50 हजार रूपयांचा प्रथम पुरस्‍कार आहे. जिल्‍हास्‍तरावरील प्रथम पुरस्‍काराची प्रवेशिका विभागस्‍तरावर पात्र ठरेल. मोहिमेंतर्गत  दिनांक 2 मे 2015 ते 1 मे 2016 या वर्षात प्रसिद्ध झालेल्‍या बातम्‍या, लेख, यशकथा अथवा  या मोहिमेत सहभागाबद्दल पुरावे छायाचित्रांसह संपूर्ण कात्रणांची फाईल प्रवेशिकेसह जिल्‍हा माहिती अधिकारी यांचे कार्यालयात सोमवार, दिनांक 15 जून 2016 पर्यंत पाठवावयाची आहे.
                 पुरस्‍काराच्‍या पात्रतेसाठी वृत्‍तपत्रे, नियतकालिके यातून प्रसिद्ध मराठी, हिंदी आणि इंग्रजी साहित्‍याचा विचार करण्‍यात येईल. पुरस्‍कारासाठी वृत्‍तपत्र बातमीदार, स्‍तंभलेखक, मुक्‍त पत्रकार पात्र असतील. प्रवेशिका ज्या स्‍तरावरील पारितोषिकांसाठी अर्ज करावयाचा आहे. त्‍या स्‍तरावरील समितीच्‍या सदस्‍य सचिवाकडे अर्ज करता येईल. मात्र, कोणत्‍याही एका पारितोषिकासाठीच अर्ज करता येईल. पारितोषिकासाठी विहित मुदतीत वैयक्‍तीक केलेले अर्ज विचारात घेण्‍यात येतील.  
एका वृत्‍तपत्राच्‍या एका आवृत्‍तीतील  एकाच पत्रकाराचा अर्ज संपादकांमार्फत स्‍वीकारण्‍यात येईल. जर एका वृत्‍तपत्राच्‍या एकापेक्षा जास्‍त पत्रकार सहभागी होऊ इच्छित असतील तर त्‍यांनी केलेल्‍या अर्जांपैकी एकाच पत्रकारांच्‍या साहित्‍याची निवड संबंधित संपादक संबंधित समितीकडे पाठवतील.
                       बातमीदाराचे साहित्‍य अनेक वृत्‍तपत्रातून प्रसिद्ध झालेले असेल तर त्‍यासंबंधित एकत्रित अर्ज  संपादकांपैकी कोणतेही एक संपादक संबंधित समितीकडे पाठवतील. जिल्‍हास्‍तरीय पारितोषिकांसाठी संबंधित जिल्‍ह्यातून प्रसिद्ध होणारी वृत्‍तपत्रे, नियतकालिके यांच्‍या प्रत्‍येक आवृत्‍तीच्‍या एकाच पत्रकारास संबंधित आवृत्‍तीत प्रसिद्ध साहित्‍यासंदर्भात अर्ज करता येईल. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रसिद्ध करण्‍यात आलेल्‍या अ, ब, क वर्गवारीतील वृत्‍तपत्रे नियतकालिकातून प्रसिद्ध साहित्‍याचाच पारितोषिकांसाठी विचार होईल. पुरस्‍कारासाठी गठित निवड समितीतील सदस्‍य या स्‍पर्धेत सहभागी होऊ शकणार नाहीत.
          प्रवेशिका अर्जदारांनी विहित नमुन्‍यातील अर्ज  तीन नमुन्‍यात मुदतीत सादर करावेत. जिल्‍हास्‍तरीय समिती प्राप्‍त प्रवेशिकांच्‍या साहित्‍याचे निर्धारित निकष व द्यावयाचे गुण यानुसार परीक्षण करून निकाल जाहीर करील. अर्जदारांनी साहित्‍य, कात्रणे स्‍वच्‍छ को-या कागदावर एकाच बाजूने चिकटवावेत. त्‍यावर वृत्‍तपत्राचे नाव, प्रसिद्धीचा दिनांक नमूद करावा. तसेच संपादकांची स्‍वाक्षरी व शिक्‍का प्रमाणित अर्जासह प्रवेशिका जिल्‍हा माहिती अधिकारी, जिल्‍हा माहिती कार्यालय, प्रशासकीय भवन, वर्धा येथे मुदतीत सादर करावी. सदर प्रवेशिका जिल्‍हाधिकारी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली गठित करण्‍यात आलेल्‍या समितीसमोर ठेवण्‍यात येईल. परीक्षणानंतर जिल्‍हाधिकारी, वर्धा हे स्‍पर्धेतील निवड झालेल्‍या स्‍पर्धकांचे नावे जाहीर करतील. या महात्‍मा गांधी तंटामुक्‍त गाव मोहीम पुरस्‍कार योजनेत सर्व माध्‍यमांच्‍या प्रतिनिधींनी सहभागी व्‍हावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी आशुतोष सलील व जिल्‍हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी केले आहे. 

                                                0000
अनुसूचित जाती,जमाती आयोगाचे
अध्यक्ष सी.एल. थूल वर्धा जिल्ह्याच्या दौ-यावर
        वर्धा, दिनांक 10 – अनुसूचित जाती, जमाती आयोगाचे अध्यक्ष सी.एल. थूल वर्धा जिल्ह्याच्या दौ-यावर गुरूवार, दिनांक 12 रोजी येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

          नागपूर येथून डी.व्ही.कारने दिनांक 12 रोजी सकाळी 8.30 वाजता वर्धाकडे प्रयाण. सकाळी 9.30 वाजता विश्रामगृह येथे आगमन. सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत जिल्हाधिकारी  सामाजिक न्याय विभागाच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती मार्गदर्शन. सायंकाळी वर्धा येथून नागपूरकडे प्रयाण.
शंभर वर्ष जुने सागाचे विशाल वृक्ष
ग्‍लोरी ऑफ वर्धाचे संवर्धन
Ø    14.20 मीटर लांबी, 3.20 मीटर गोलाई
Ø    वर्धा वन विभागाचे प्रतिनिधीत्‍व करणारे सागवान
Ø    ढग्‍याच्‍या राखिव जंगलात पूर्ण वाढ 
Ø    वर्धा वनविभागाच्‍या ‘राम’आता वन संग्राहलयात
वर्धा,दि.6 - वन विभागाच्‍या ढगाच्या राखीव वनक्षेत्रात वादळामुळे उन्‍मळून पडलेल्‍या आणि शंभर वर्षाचे आयुष्‍य असलेल्‍या विशाल सागवान वृक्षाचे संवर्धन करुन वनसंग्रहालयात ठेवण्‍यात येणार आहे. ग्‍लोरी ऑफ वर्धा म्‍हणून ओळख असलेल्‍या सागवान वृक्षाची लांबी 14.20 मीटर असून छाती उंचीवर 3.20 मीटर गोलाई आहे. सध्‍या सागवान वृक्ष बांगडापूर येथील वन विभागाच्‍या परिसरात ठेवण्‍यात आले आहे.
अत्‍यंत दूर्मिळ अशा सागवान वृक्ष 214 क्रमांकाच्‍या ढगा बीटच्‍या नाल्‍याच्‍या काठावर मागील वादळी पावसात पडले होते. या महाकाय वृक्षाचे संवर्धन करुन अभ्यासकांसाठी वनसंग्रहालयात ठेवण्‍यात येणार असल्‍याची माहिती उपवनसंरक्षक दिगंबर पगार यांनी दिली.
वर्धा वनक्षेत्रात मोठ्याप्रमाणात सागवान प्रजातीचे वृक्ष असून वर्धेच्‍या सागवानासंदर्भात बोलताना उपवनसंरक्षक श्री. पगार म्‍हणाले की, खरांगना , ढगा हे समृध्‍द क्षेत्र आहे. येथील सागवानाच्‍या लाकडाच्‍या बुंधा हा पोकळ असतो. वादळात पडलेल्‍या सागवान वृक्षासह बुंधासुध्‍दा खोदून काढून मुळासह काढण्‍यात आले आहे. ढगा येथून बांगडापूर येथील वन डेपोपर्यंत वाहतुकीसाठी 20 वन कामगार, 20 अधिकारी व कर्मचारी यांच्‍या तब्‍बल 12 ते 13  तासाच्‍या प्रयत्‍नाने लांब 18 चाकाच्‍या ट्रक ,ट्रॅक्‍टर व क्रेनच्‍या सहाय्याने रात्री 11 वाजता बांगडापूर शेडमध्‍ये ठेवण्‍यात यश आले. या महाकाय वृक्षाचा बुंधासुद्धा वन निरीक्षण कुटीत ठेवण्‍यात आला आहे. या सागवानाची किंमत पाच लाखापेक्षा जास्‍त असून वाहतुकीसाठी 42 हजार रुपये खर्च आला आहे.
                                   
जिल्‍हयात पाच जैवविविधता पार्क
वर्धा जिल्‍हयातील समृध्‍द वनसंपदेची माहिती व्‍हावी तसेच वनसंवर्धन व संगोपनासाठी लोकसहभाग वाढावा यासाठी पाच जैवविविधता पार्क तयार करण्‍यात येणार आहेत. जैवविविधता पार्क सेलूकाटे, ढगा, सारंगपूरी, बोरधरण व पवनार येथे होणार आहेत. प्राईड ऑफ वर्धा हे सागवनाचे वृक्ष जैवविविधता पार्कात ठेवण्‍यात येणार आहे.
वर्धा वनक्षेत्रात सागवानाचे वृक्ष मोठ्याप्रमाणात असले तरी शंभर वर्ष आयुष्‍य व लांबी आणि रुंदी असलेले हे महाकाय वृक्ष एकमेव आहे. त्‍यामुळे याचे वनसंग्रहालयात संवर्धन करण्‍यात येणार आहे. प्राईड ऑफ वर्धाचे ढगा ते बांगडापूर ऑपरेशनसाठी वनक्षेत्र अधिकारी व्‍ही. व्‍ही. तळणीकर, एस.बी.तळवतकर, श्री.बोबडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली यशस्‍वी करण्‍यात आले.
                                                            00000