Wednesday, 24 February 2016

रस्‍ता सुरक्षा अभियानांतर्गत राबविले
विविध उपक्रम ; 25 चालकांची केली नेत्रतपासणी
       वर्धा,दि.24 - जिल्‍ह्यात  रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती व्हावी. अपघात होऊ नयेत. नियमांची माहिती व्हावी आदी उद्देशाने प्रभावीरित्‍या रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले. विविध उपक्रम राबवून सामान्य जनतेपर्यंत रस्ता सुरक्षेचा संदेश देण्यात आला. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील 125 वाहनचालकांची तपासणी करण्यात आली.
           अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये 82 वाहनांना, 68 ट्रॅक्टर-  ट्रॅालीला, 42 बैलगाडयांना परावर्तक लावण्यात आले. तसेच 12 ठिकाणी बॅनर्स लावले, 4 हजार 200 पत्रक वाटण्यात आले, 5 शालेय शिक्षक, ड्रायव्हिंग स्‍कूल असे एकूण 40 प्रशिक्षकांच्या कार्यशाळा घेण्यात आल्या. चित्रकला, निबंध, वक्तत्‍त्व स्पर्धाही घेण्यात आल्या. यामध्ये 200 स्पर्धकांनी सहभाग घेतला, 12 व्याख्याने घेण्यात आली. तर अतिभारासंदर्भात 46, लाल परावर्तक 146, वाहनांचे दिवे 146 आणि 55 अवैध प्रवासी वाहतुकीवर  कार्यवाही करण्यात आली असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी कळविले आहे.
                                                                         00000     

. प्र.प.क्र. 14२                  पुणे, सातारा येथे रक्षा पेंशन अदालत
          वर्धा, दि. 24 -  जिल्ह्यातील माजी सैनिक,विधवा, अवलंबितांनी दिनांक 7 व 8 एप्रिल 2016 रोजी पुणे येथे तसेच दिनांक 9 एप्रिल रोजी सातारा येथे पीसीडीए (पेंशन) अलाहाबाद यांचेमार्फत रक्षा पेंशन अदालत आयोजित केली आहे. ज्या माजी सैनिक, विधवा, अवलंबितांना निवृत्तीवेतनाबाबत काही समस्या असतील त्यांनी आपल्या समस्या नमुना फार्ममध्ये भरुन संबंधित कागदपत्रांसह आशिष सेन, पेंशन अदालत अधिकारी कार्यालय रक्षा लेखा प्रधान नियंत्रक (पेंशन) द्रौपदीघाट इलाहाबाद यांचेकडे दोन प्रतीत पाठविणे आवश्यक आहे. सदर नमुना फार्म जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, वर्धा येथे उपलब्ध आहे. तरी ज्यांना पेंशन संबंधित काही अडचणी असल्यास त्यांनी कार्यालयीन वेळेत (दुरध्‍वनी क्रमांक- 07152-248955) प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी फ्ला. ले. धनंजय सदाफळ यांनी केले आहे.
                                                               00000   
      



ग्रामपंचायत सार्वत्रिक पोटनिवडणुकीसाठी
मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर
        वर्धा, दिनांक 24 – राज्य निवडणूक आयोगाने मे ते ऑगस्ट 2016 पर्यंत मुदत संपणा-या तसेच नव्याने अस्तित्त्वात आलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक पोटनिवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
       ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदार यादी ग्राह्य धरण्याचा शनिवार, दिनांक 16 जानेवारी 2016 असून राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या तारखेस अस्तित्त्वात आलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरून ग्रामपंचायतीच्या निवडणुकांकरीता प्रभागनिहाय मतदान यादी मंगळवार, दिनांक 1 मार्च 2016 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.
       मतदार यादीसंदर्भात हरकती सूचना दाखल करण्याची गुरूवार, दिनांक 10 मार्च ते अंतिम तारीख असून मुंबई ग्रामपंचायत अधिनियमानुसार मतदार यादी गुरूवार दिनांक 17 मार्च 2016 रोजी जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात येईल अंतिम यादी प्रसिद्ध होईल, असे जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी कळविले आहे

000

Tuesday, 23 February 2016

विधानमंडळ महिला सदस्‍य संयुक्त समिती आज वर्ध्‍यात
               वर्धा,दि.23, वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पांढुर्णा येथील शासकीय आश्रमशाळा व वसतीगृहातील मुलीवर अत्‍याचार प्रकरणाची सखोल चौकशीसाठी बुधवार, दिनांक 24 फेब्रुवारी  रोजी विधानमंडळ महिला संयुक्‍त तदर्थ समितीची वर्धा येथे विश्रामगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.         दि.24 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता समिती प्रमुख तथा महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्यासह एकूण 13 महिला सदस्य, सचिवालयातील एकूण 8 अधिकारी, कर्मचारी नागपूर येथून वर्ध्यात शासकीय वाहनाने येणार आहेत.  सकाळी 11 ते 11.30 वाजता समितीचा वेळ राखीव असेल. सकाळी 11.30 ते 2.00 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह येथे आष्‍टी येथील शाळेत घडलेल्‍या घटनेसंबंधी संबंधित अधिका-यांबरोबर समिती चर्चा करणार आहे. दुपारी 2  ते 3 हा वेळ समितीने राखीव ठेवला आहे.  तसेच दुपारी 3  ते 5  वाजेपर्यंत समितीची घटनेसंबंधित पुढील चर्चा  होईल. सायंकाळी 5 वाजता समितीचे नागपूरकडे प्रयाण होईल.
            समितीत  अमिता चव्‍हाण, निर्मला गावित, सीमा हिरे, दीपिका चव्हाण, संगिता ठोंबरे, तृप्‍ती सावंत, मनिषा चौधरी, सुमनताई पाटील या विधानसभा सदस्यांचा तर निलम गो-हे, शोभाताई फडणवीस, विद्या चव्हाण, दिप्‍ती चवधरी या विधान परिषद सदस्यांचा समावेश आहे.
000000


वर्धेच्या 5 निर्मलग्राम संघांचा मुख्यमंत्र्यांच्याहस्ते गौरव
विभागीय महिला मेळाव्यास 5 हजार महिलांचा सहभाग
             वर्धा, दिनांक 22 – राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेंतर्गत विभागीय महिला मेळाव्यात जिल्ह्यातील बचत गटाच्या 6 हजार महिलांनी  सहभाग घेतला होता. जिल्ह्यातील या मेळाव्यात शौचालय बांधकाम केलेल्या पाच निर्मलग्राम संघाचा गौरव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आला.
             जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागीय आयुक्त कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने नागपूर येथे विभागीय महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. बचत गटांच्या महिलांना दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेंतर्गत मार्गदर्शन करण्यात आले होते. वर्धा जिल्ह्यातून 6 हजार बचत गटाच्या महिलांनी उपस्थित राहून जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध उपक्रमांबद्दल आपला वेगळा ठसा उमटविल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद पवार यांनी दिली.
             निर्मलग्राम संघाच्या माध्यमातून बचतगटाच्या सदस्यांनी सुमारे 9 हजार शौचालयाचा उपयोग प्रत्यक्ष कुटुंब करत आहे. एका संघामध्ये दहा बचत गटांचा समावेश असून प्रत्येक बचत गटामध्ये 100 ते 150 महिलांचा समावेश आहे. महिला बचत गटाच्या सदस्यांनी निर्मल बचत गट ही संकल्पना राबविल्याबद्दल वाघोलीच्या (देवळी) दीपग्राम संघ, नाचणगावच्या भगिनी ग्राम संघ, पडेगाव (वर्ध्याच्या) संत गाडगेबाबा ग्राम संघ, सावंगी मेघेच्या एकता ग्राम संघ, आंतरगावच्या सृष्टी ग्राम संघ, आमगावच्या विदर्भ ग्राम संघाच्या निर्मल ग्राम संघामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गौरव करण्यात आला.
              293 युवकांना मिळाला रोजगार
बचतगटांच्या माध्यमातून आर्थिक उन्नतीसोबतच बचतगट कुटुंबातील युवक युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन क्षमता वृद्धी करण्याचा विशेष कार्यक्रम जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत सुरू करण्यात आला आहे. प्रशिक्षणानंतर बचत गटातील सदस्यांना औरंगाबाद, पुणे, नागपूर आदी ठिकाणच्या औद्योगिक आस्थापनांमध्ये 293 युवक युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती प्रकल्प संचालक प्रमोद पवार यांनी दिली.
       बचतगटातील कुटुंबांना व्यावसायिक प्रशिक्षणामुळे राजणगावच्या ॲलोकान ॲटोमोबाईल, औरंगाबाचे सिपेट, तसेच नागपूरच्या साईराजइंडिया कंपन्यात सरासरीत 8 ते 10 हजार रुपयांच्या नोक-या उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रमोद पवार यांनी दिली.

00000
गवळाऊ जनावरांचे द्वितीय विदर्भस्तरीय प्रदर्शन आज तळेगावात
Ø  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते रविवारी प्रदर्शनाचे उद्घाटन
           वर्धा, दिनांक 20 विदर्भस्तरीय गवळाऊ जनावरांचे द्वितीय प्रदर्शनाचे आर्वी तालुक्यातील तळेगाव रघुजी येथे रविवार, दिनांक 21 रोजी सकाळी 11 वाजता अर्थ, नियोजन वनेमंत्री तथा वर्धा जिल्हा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते होणार असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सतीश राजू यांनी सांगितले आहे.  
           गवळाऊ जनावरांच्या संवर्धनासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनासाठी जनावरांची नोंदणी  सकाळी 7 ते 10 यावेळेत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. तसेच उत्कृष्ट पशुवैद्यक पुरस्कार, पुस्तकाचे विमोचन, गवळाऊ गायीचे संवर्धन संरक्षणाकरीता मोलाचे योगदान दिल्याबाबत पुरस्कार, बक्षीस वितरणही प्रदर्शनात आयोजित कार्यक्रमात करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष चित्रा विरेंद्र उर्फ राणा रणनवरे राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त विश्वासराव भोसले, नागपूरच्या पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. आदित्यकुमार मिश्रा असतील. प्रमुख अतिथी  म्हणून खासदार रामदास तडस, विधान परिषद सदस्य नागोजी गाणार, मितेश भांगडिया, देवळी विधानसभा क्षेत्राचे आमदार रणजीत कांबळे, आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार अमर काळे, समुद्रपूर-हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार, वर्धा विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीणा, नागपूरचे प्रादेशिक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. अनिल कुंभरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास कांबळे, पशुसंवर्धन दुग्धशाळा समितीच्या सभापती शामलता . अग्रवाल, सर्व विषय समितीचे सभापती उपस्थित राहणार आहेत.
                 सर्व पशुपालकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेऊन अधिकाधिक जनावरांची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य गोपाळराव कालोकर, गजानन गावंडे, मोहन शिदोडकर, प्रमिला करपाते, आशाताई खेरडे, चंद्रमणी भगत, भीमराव फुलझेले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सतीश राजू, आर्वीचे पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. अनिरूद्ध पाठक, गट विकास अधिकारी प्रवीण वानखेडे, सहायक गट विकास अधिकारी विजय धापके यांनी केले आहे.

00000