Tuesday, 25 November 2014


                    राष्‍ट्रपतींच्‍या आगमनासाठी वर्धा नगरी सज्‍ज      
      
Ø  राष्‍ट्रपतींच्‍या वर्धा दौ-याची तयारी पूर्ण
Ø  विभागीय आयुक्‍तांनी घेतला आढावा
Ø  सेवाग्राम आश्रमात राष्‍ट्रपती करणार वृक्षारोपण
Ø आश्रम प्रतिष्‍ठानतर्फे राष्‍ट्रपतींचे स्‍वागत
Ø बजाजवाडीला भेट

वर्धा,दि.25 – राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्‍या वर्धा येथील कार्यक्रमाप्रसंगी अचूक नियोजन करुन  संपूर्ण कार्यक्रम यशस्‍वी करा अशा सुचना विभागीय आयुक्‍त  अनुपकुमार यांनी आज दिल्‍यात. वर्धा शहरातील सर्व रस्‍ते तसेच सेवाग्राम परिसरही संपूर्ण स्‍वच्‍छ राहील यासाठी नगर परिषदेने तात्‍काळ  उपाययोजना कराव्‍यात असेही त्‍यांनी यावेळी सांगितले.
राष्‍ट्रपती  यांच्‍या  वर्धा येथील आगमण तसेच विविध कार्यक्रमाच्‍या  नियोजना संदर्भात व सुरक्षेसंदर्भातील आढावा विभागीय आयुक्‍त अनुपकुमार तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक सुरक्षा जयजितसिंग, राज्‍य गुप्‍तवार्ता विभागाचे उप आयुक्‍त रंजन शर्मा,जिल्‍हाधिकारी  एन.नवीन सोना, जिल्‍हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्‍कर, मुख्‍य कार्यपालन अधिकारी  उदय चौधरी, शिक्षा मंडळाचे अधिकारी  संजय भार्गव, आश्रम प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष जयंत मटकर, निवासी उपजिल्‍हाधिकारी  संजय गाढे आदी वरिष्‍ठ अधिकारी उपस्थित होते.
राष्‍ट्रपती  प्रणव मुखर्जी यांचे बुधवार दिनांक 26 नोव्‍हेंबर रोजी दुपारी 2.15 वाजता आगमन होत असून, हेलीपॅडवर स्‍वागतासह कार्यक्रमस्‍थळी  जाण्‍याची व्‍यवस्‍था तसेच सुरक्षा व्‍यवस्‍था  आणि स्‍वागतासाठी  निमंत्रीतांची यादी  याबाबत विभागीय  आयुक्‍त  अनुपकुमार यांनी आढावा घेतला. राष्‍ट्रपती  बजाजवाडीला भेट देणार असून बजाजवाडी  येथील  ऐतिहासीक असलेले जमनालालजी बजाज या वास्‍तुला स्‍वातंत्र्य आंदोलनातील विविध महनीय व्‍यक्‍तींनी  भेट  दिली आहे. येथे  पंडित जवाहरलाल नेहरु  तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्‍यासाठी  विशेष खोल्‍या  आहेत. तसेच कमलनयन बजाज, डॉ. राजेंद्रप्रसाद, सरदार वल्‍लभभाई  पटेल, पंडित जवाहरलाल नेहरु, श्रीमती इंदिरा गांधी, आचार्य कृपलानी  यांचे दुर्मिळ  छायाचित्र या वास्‍तुत लावण्‍यात आले आहेत.
1938 मध्‍ये  कॉंग्रेस अध्‍यक्ष  सुभाषचंद्र बोस यांचे स्‍वागताप्रसंगी सरदार वल्‍लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरु, आचार्य कृपलानी यांचे दुर्मिळ छायाचित्र या वास्‍तुत असून राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी येथे भेट देणार आहेत. राष्‍ट्रपतींच्‍या  भेटीप्रसंगी करण्‍यात आलेल्‍या  व्‍यवस्‍थेचा आढावा घेवून विभागीय आयुक्‍त  अनुपकुमार यांनी घेतला. त्‍यानंतर   विज्ञान केंद्र  येथेही राष्‍ट्रपती  भेट देणार आहेत.
 शिक्षा मंडळाचा शतकमहोत्‍सवी  समारंभ जी.एस.कॉमर्स कॉलेजच्‍या प्रांगणात आयोजीत करण्‍यात आला आहे. येथे उभारण्‍यात आलेला भव्‍य सभा मंडप व सुरक्षेसंदर्भात करण्‍यात आलेली व्‍यवस्‍था निमंत्रितांसाठी तसेच राष्‍ट्रपती  यांच्‍या  कार्यक्रमानिमीत्‍त दिल्‍लीहून येणा-या वरिष्‍ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्‍या  आसन व्‍यवस्‍थेचाही  आढावा त्‍यांनी घेतला. राष्‍ट्रपती  यांच्‍या आगमणाप्रसंगी  प्रोटोकॉलनुसार करावयाच्‍या  सुविधा  तसेच वाहतूक, दूरध्‍वनी, आवश्‍यक सुरक्षा  आदी व्‍यवस्‍थेबाबतही  माहिती देण्‍यात आली.
                                    सेवाग्राम आश्रमाला भेट
            राष्‍ट्रपती  प्रणव मुखर्जी  सेवाग्राम येथील महात्‍मा  गांधी यांच्‍या आश्रमाला भेट देणार असून आदि निवास, बापू कुटी तसेच परिसरातील पाहणी करुन महात्‍मा  गांधी  यांच्‍या दैनंदिन वापरातील वस्‍तुंची  पाहणी करणार आहेत. तसेच प्रार्थनेतही  सहभागी होणार आहेत. आश्रम परिसरात राष्‍ट्रपतींच्‍या  हस्‍ते  वृक्षारोपण करण्‍यात येवून  जिल्‍हा प्रशासनातर्फे  तयार करण्‍यात आलेल्‍या  सेवाग्राम विकास आराखड्याची  माहिती  राष्‍ट्रपतींना देण्‍यात येणार आहे. सेवाग्राम विकास आराखड्याच्‍या अंमलबजावणीसाठी जिल्‍हा प्रशासनातर्फे सुरु असलेल्‍या  प्रयत्‍नांबाबतही  येथे जिल्‍हाधिकारी  एन.नवीन सोना सादरीकरण करणार आहेत.
सेवाग्राम आश्रम प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष जयंत मटकर तसेच सर्व पदाधिकारी राष्‍ट्रपतींचे  सुतमाला घेवून स्‍वागत  करतील व पुस्‍तकांची  भेट  देतील. यावेळी  राज्‍यपाल  सी. विद्यासागर राव, मुख्‍यमंत्री  देवेंद्र फडणवीस, केन्‍द्रीय  भुपृष्‍ठ  वाहतूक मंत्री  नितीन गडकरी आदी राष्‍ट्रपतींच्‍या  समवेत उपस्थित  राहणार आहेत.
जिल्‍हाधिकारी  एन.नवीन सोना व जिल्‍हा  पोलीस अधिक्षक अनिल पारस्‍कर यांनी राष्‍ट्रपतींच्‍या दौ-यानिमीत्‍त  प्रशासकीय  तसेच सुरक्षा व्‍यवस्‍थेसंबंधात केलेल्‍या  व्‍यवस्‍थेसंदर्भात  यावेळी  माहिती दिली.
सेवाग्राम आश्रम अभ्‍यागतांसाठी  बंद
            राष्‍ट्रपती  प्रणव मुखर्जी  बुधवार दिनांक 26 नोव्‍हेंबर रोजी  सेवाग्राम आश्रमाला भेट देणार असून सुरक्षेच्‍या  दृष्‍टीने  सेवाग्राम आश्रम सकाळी  10 ते सायंकाळ पर्यंत अभ्‍यागतांसाठी  बंद राहील. परंतू  सकाळची प्रार्थना व त्‍यानंतर आश्रम परिसर अभ्‍यागतांना पाहता येईल. राष्‍ट्रपती महोदयांच्‍या आगमणाप्रसंगी केवळ सुरक्षेच्‍या कारणास्‍तव व अभ्‍यागतांना त्रास होवू नये म्‍हणून  बंद राहणार असल्‍याची  माहिती  आश्रम प्रतिष्‍ठाणचे  अध्‍यक्ष जयंत मटकर यांनी  यावेळी दिली.
                                                                00000000



                                               
                    राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे बुधवारी आगमण

                                    शिक्षा मंडळाचा शताब्‍दी समारोह
                             सेवाग्राम आश्रमाला भेट

वर्धा, दि. 24 – राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे बुधवार दिनांक 26 नोव्‍हेंबर रोजी दुपारी 2.15 वाजता  विशेष हेलीकॉप्‍टरने नागपूर येथून आगमण होत आहे.
राष्‍ट्रपती  दुपारी 14.30 वाजता बजाजवाडी येथे भेट देणार असून दुपारी 2.45 वाजता बजाज सायन्‍स सेंटर येथे आयोजीत प्रदर्शनाला भेट देवून पाहणी करणार आहेत. दुपारी 3.05 मिनीटानी जी.एस.कॉमर्स कॉलेजच्‍या प्रांगणावर आयोजीत वर्धा शिक्षण मंडळाच्‍या शताब्‍दी समारोह कार्यक्रमास उपस्थित राहून दुपारी 4.10 वाजता सेवाग्राम आश्रमाकडे प्रयाण करतील. दुपारी 4.10 ते 4.25 पर्यंत सेवाग्राम आश्रमाला भेट देतील तसेच सामुहिक प्रार्थनेत सहभागी होतील. राष्‍ट्रपतींच्‍या हस्‍ते वृक्षारोपण झाल्‍यानंतर  सेवाग्राम विकास आराखड्याची पाहणी करतील. दुपारी 4.25 वाजता सेवाग्राम आश्रम येथून हेलीपॅडकडे प्रयाण करतील व दुपारी 4.45 वाजता येथून विशेष हेलीकॉप्‍टरने नागपूरसाठी प्रयाण करतील.
                                                00000000
                           मुख्‍यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांचे
        बुधवारी आगमण
        वर्धा, दिनांक 24 – मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांचे बुधवार दिनांक 26 नोव्‍हेंबर रोजी  नागपूर येथून दुपारी  2.15 वाजता विशेष हेलीकॉप्‍टरने आगमण होईल.
          राष्‍ट्रपती  यांच्‍या  वर्धा येथील कार्यक्रमांना उपस्थित राहतील. दुपारी 3 वाजता बजाजवाडी येथे आगमण होईल. दुपारी 3.20 वाजता  बजाजवाडी येथून मा. राष्‍ट्रपती यांच्‍यासमवेत जी.एस.कॉमर्स कॉलेज येथील शिक्षा मंडळाच्‍या शताब्‍दी  समारोहास उपस्थित राहतील. दुपारी 4.15 वाजता सेवाग्राम आश्रम येथे भेट देतील व दुपारी 4.45 वाजता भारतीय हवाईदलाच्‍या विशेष हेलीकॉप्‍टरने राष्‍ट्रपती  महोदयांच्‍या  सोबत नागपूरसाठी प्रयाण करतील.
                                              0000000
                                     केन्‍द्रीय भुपृष्‍ठ परिवहन मंत्री
                         नितीन गडकरी यांचे आगमण
          वर्धा,दि. 24 – केन्‍द्रीय भुपृष्‍ठ  परिवहन मंत्री   नितीन गडकरी यांचे दुपारी 2.15 वाजता विशेष हेलीकॉप्‍टरने वर्धा येथे आगमण होत आहे. दुपारी  3 वाजता शिक्षा मंडळाच्‍या शताब्‍दी समारोहास उपस्थित राहतील. दुपारी  4.20 वाजता येथून हेलीकॉप्‍टरने नागपूरकडे प्रयाण करतील.

                                                  00000000

Thursday, 20 November 2014

मुलांच्या सुरक्षिततेसाठी हे आपल्याला माहित असायलाच हवं........
वर्तमान पत्राचे पान उघडल्यावर रोज काही ना काही मुलांच्या सोबत घडणाऱ्या घटनांविषयी आपल्याला वाचायला मिळतंय....आता तर... आपण हे सर्व दूरदर्शन वर लाईव पाहायला सुद्धा शिकलो आहोत...कधी मुलींची छेडछाड, कधी अपहरण कधी बलात्कार...तर कधी छोट्या अर्भकांना बेवारस सोडून देणं तर कधी मुलांच्या हक्कांविषयी लढणाऱ्या कार्यकर्त्यांचे अभ्यासपूर्ण केस स्टडीज...आणि कधी कधी तर एखादा आशेचा किरण ज्यात सर्वस्वी मुलांच्या संरक्षणाचा विचार करीत घेत असलेल्या भूमिकांचा वेध.....हे सर्व आपल्याला वाचायला आणि बघायला मिळत आहे. मुळातच आपल्या सर्वांचा मुलांकडे बघण्याचा दृष्टीकोन आपण कसं विकसित करतो आहोत यावर बऱ्याचशा गोष्टी निर्भर आहेत.  आपण मोठी माणसे मुलांना काय समजतो ?  मुळात आपण मुलांना संरक्षित करण्यात आपली भूमिका स्पष्ट नसेल तर या आणि अशा प्रकारच्या शोषणाची मुलं बळी पडतात.  मुलांनी शोषणाचे बळी ठरू नये यासाठी जबाबदारी असते ती आपण सर्व मोठ्यांची ! मात्र मोठेच जर शोषण करीत असतील तर.....? तरीसुद्धा वेग वेगळ्या माध्यमातून मुलांचं संरक्षण करणाऱ्या व्यवस्थांची मदत घेत आपण मुलांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्यायला हवा.
आजघडीला बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम २००० आणि संशोधन २००६ नुसार यातील कलम २ (ट) नुसार मुलं म्हणजे वयाची १८ वर्षे पेक्षा कमी वयाची व्यक्ती असा केलाय याचा अर्थ मुल म्हणजे १८ वर्षे पूर्ण होई पर्यंत त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपण सर्व मोठ्यांनी पार पडायला हवी.
मुलांचं सर्व-प्रथम संरक्षण करणं ही जबाबदारी कुटुंबाची.  पण सगळ्याच कुटुंबात मुल सुरक्षित राहातच असं आम्हाला म्हणायचे नाही...तरी सुद्धा सर्वच कुटुंबात मुलं असुरक्षित असतात असं नाही.ज्या कुटुंबात मुलं सुरक्षित नाही त्या कुटुंबातून मुल शासकीय व्यवस्थेकडे सुरक्षिततेसाठी सोपवता येते.  म्हणजेच कुटूंब सक्षम  नसेल तर संरक्षणाची जबाबदारी शासनाची.  यासाठी मुलांच्या दृष्टीकोनातून सर्वांगाने मुलांच्या विकासाची भूमिका निभावणाऱ्या शासकीय यंत्रणांची मदत घेता येते आणि जेंव्हा या दोन्ही यंत्रणा संरक्षणासाठी सक्षम नसतील तेंव्हा सर्वस्वी जबाबदारी ‘समाजाची’ ठरते.  यासाठीच समाजमन तयार करणे आणि मुलांच्या सुरक्षितते साठी भूमिका जास्त संवेदनशीलपणे निभावणे गरजेचं आहे.
हे सर्व आताच सांगण्याची गरज का हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर आहे....बाल हक्कांची संहिता सर्व राष्ट्रांनी स्विकारून या वर्षी २५ वर्षे होत आहेत. २० नोव्हेंबर १९८९ रोजी संयुक्त राष्ट्र संघाने मुलांच्या अधिकाराविषयीच्या संहितेला मान्यता दिली होती. म्हणूनच २० नोव्हेंबर हा दिवस खऱ्या अर्थाने मुलांच्या अधिकाराचा दिवस ओळखला जातो.
मुलांच्या अधिकारांविषयी महाराष्ट्र शासन संवेदनशील आहे, म्हणूनच सर्वच्या सर्व जिल्ह्यात मुलांसाठी त्यांच्या संरक्षणासाठी विविध यंत्रणा उपलब्ध आहेत.  या यंत्रणा समजून घेऊन या यंत्रणांच्या सहकार्याने आपल्याला काय उपाय योजता येतील याची माहिती आपल्या प्रत्येक संवेदनशील नागरिकांना माहित होणं आवश्यक आहे.  यासाठी आपल्या जिल्ह्यात ‘बाल कल्याण समिती’ ज्या मध्ये ५ सदस्यांचा समावेश असतो. ही समिती जिल्ह्यातील सर्व काळजी आणि संरक्षणाची गरज असणाऱ्या मुलांबाबत मुलांच्या हिताचे निर्णय घेणारी यंत्रणा आहे.या समितीला प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांचे अधिकार आहेत.  या समितीचे आपल्या जिल्ह्यातील सदस्य कोण आहेत.  त्यांच्यासमोर आपल्या जिल्ह्यातील बळीत, दुर्लक्षित, मोठ्या माणसांच्या शोषणाचे बळी ठरलेल्या सर्व मुलांच्या केसेस कलम ३२ (बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम ) नुसार कुणीही घेऊन जाऊ शकतो. या बाल कल्याण समितीने आठवड्यातून किमान ३ वेळा नियोजित वेळेत आणि दिवशी आपली कार्यवाही करणे अपेक्षित आहे. मग शोध घ्या आपल्या जिल्ह्यात मुलांच्या संरक्षणासाठी  एव्हढी मोठी यंत्रणा कार्य करतेय कशी ? बाल कल्याण समिती चांगले काम करत असल्यास त्यांना सोबत करा, आणि करत नसल्यास त्यांना कामाला कसं लावता येईल हे पहा....! यंत्रणा माहित नाही म्हणून मुलांना असुरक्षित वातावरणात ढकलण्याचा किंवा ठेवण्याचा आपल्याला काहीएक अधिकार नाही. आणि हो...ही यंत्रणा आपल्या जिल्ह्याच्या बालगृहात / निरीक्षण गृहात बसत असते हे लक्षात असू द्यात....म्हणजे काम करणे सोप्पं होईल.
बाल कल्याण समितीच्या सोबतच आपल्या जिल्ह्यात बाल न्याय मंडळ कार्यरत आहे का ते पहाच ! या बाल न्याय मंडळाकडे गुन्ह्याचं कृत्य केलेल्या विधि संघर्ष ग्रस्त मुलांना पोलिस उभं करतात.  या बाल न्याय मंडळात ३ सदस्य असतात.  हे तीनही सदस्य खंडपीठ म्हणून विधि संघर्ष ग्रस्त मुलांसाठी निर्णय घेतात. विधि संघर्ष ग्रस्त मुलांना खरं तर कलम १२ नुसार पोलिस, पोलिस ठाण्यातच जामीन देऊ शकतात. या मुलांना संरक्षित करणं तेवढच महत्वाचे आहे.
याच सोबत आपल्या जिल्ह्यात जिल्ह्याधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ‘ बाल मजुरी निर्मुलन कृती दल’ स्थापण्यात आले आहे का ? याची माहिती घ्या, असल्यास या कृती दलाचे कोण सदस्य आहेत त्यांची नाव जवळ ठेवा. जेणेकरून जिल्ह्यात बालमजुरी निर्मुलनासाठी आपला कृतीशील सहभाग राहील हे आवश्यक.. यासाठी की  मुलांची पिळवणुकीतून आणि आर्थिक शोषणातून मुक्तता करणं ही आपल्या सर्वांची सामुहिक जबाबदारी आहे.  या कृती दलात आपणही सहभागी होऊ शकता हे लक्षात असू द्यात...

आपल्या जिल्ह्यात ‘विशेष बाल पोलिस पथक’ आणि जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात ‘बाल कल्याण अधिकारी’ यांची नियुक्ती झालेली आहे का. याचीही खातरजमा आपण करून घ्यायला हवी. नियुक्ती झाली असल्यास या यंत्रणांची मदत घ्यायला हवी. नियुक्ती झाली नसल्यास यासाठी संबंधितांकडे आग्रह धरावयास हवा. आपल्या जिल्ह्यात ‘जिल्हा बाल संरक्षण कक्ष’ ज्या मार्फत मुलांच्या संरक्षणाची यंत्रणा आपल्याला सदैव मदत करण्यास उपलब्ध आहे. या किमान गोष्टी आपल्याला माहित असायला हव्यात या केवळ त्वरित उपलब्ध यंत्रणेविषयी आपण माहिती घेतली या यंत्रणांची मदत घेत नक्कीच आपण मुलांच्या सुरक्षिततेबद्दल प्राधान्य देऊ शकतो...न्हवे,,,,ते आपण द्यायला हवं...नाहीतर मुलांची पीढी आपल्याला कधीही माफ करणार नाही....तेंव्हा आताच ही माहिती करून घेत कामाला लागूयात.....

Wednesday, 4 September 2013

शेवगा बहरला बांधावर...

वर्धा, दिनांक 5 – शेवग्याला (मुंगना) बाजारात  मोठ्याप्रमाणात  मागणी  आहे. राज्‍यासह  आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्‍यांतही  शेवग्‍याच्‍या  शेंगांना  असलेली  मागणी  लक्षात  घेवून  वर्धा  जिल्‍ह्यातील  शेतक-यांनी शेवग्‍याची  लागवड करावी यासाठी  प्रायोगिक  स्‍तरावर  सात गावातील सुमारे  300 शेतक-यांनी  शेताच्‍या  बांधावर शेवग्याची लागवड केली आहे. बांधावरील शेवग्‍याची  लागवडीला आता बहारु लागली आहे.
       आमगाव जंगली या आदिवासी गावात 95 शेतक-यांनी सुमारे 7 हजार  शेवगा आपल्‍या बांधावर लावला आहे. कृषी विभागातर्फे  शेवग्याच्‍या बिया मोफत उपलब्‍ध करुन दिल्‍यामुळेच येथील शेतक-यांनी  आपल्‍या  शेताच्‍या बांधावर  शेवग्‍याची  लागवड केली आहे. दौलतराव कुळमेथे  या आदिवासी  शेतक-याने  बांधावर  50 झाडे  लावली  असून, आज ती  डौलाने  उभी  आहेत. शेवग्‍याच्‍या  शेंगा  कधीही  न पाहिलेल्‍या  या आदिवासी  शेतक-यांनी  यशस्‍वीपणे  लागवड करून  आज ते प्रत्‍येक  झाडाचे संगोपन करत आहेत.  अडीच ते तीन महिन्‍यांनी  या झाडाला  शेंगा लागून उत्‍पन्‍न  येईल, अशी  त्‍यांना खात्री आहे.
          सेलू तालुक्‍यातील  रिदोरा, वडगाव जंगली, नवरगाव, आमगाव जंगली, सोंडी, शिवणगाव  आदी या सात गावातील  300 शेतक-यांनी  सुमारे  20 हजार  झाडे आपल्‍या  शेताच्‍या  बांधावर लावली  आहेत. ही  झाडे आज दोन ते अडीच फुटापर्यंत वाढली आहेत. जिल्‍हा  अधीक्षक कृषी  अधिकारी भाऊसाहेब  ब-हाटे,  तालुका कृषी  अधिकारी  श्री. नानोटे  तसेच कृषी सहायकांच्‍या  मार्गदर्शनाखाली  ही लागवड  यशस्‍वी  होत आहे.
          महात्‍मा  ज्‍योतिबा फुले  जलभूमी  अभियानांतर्गत  विदर्भात  शेवगा लागवडीचा  अभिनव प्रयोग  राबविण्‍यात आला आहे. अहमदनगर येथून  तीन हजार रुपये किलोप्रमाणे शेवग्‍याच्‍या  बिया  खरेदी  करुन  15 किलो बिया  प्रायोगिक  तत्‍त्‍वावर  सेलू  तालुक्‍यातील  300 शेतक-यांना   मोफत  वितरित करण्‍यात  आल्‍या आहेत.  सरासरी  एका झाडासाठी  केवळ  एक रुपया खर्च  आलेला आहे. कृषी  विभागाने  शेतक-यांच्‍या  शेतात  पाणी साठविण्‍यासाठी  खोल समतल सलग चर खोदले आहेत. चर खोदतानाच  बांध तयार झाले असून, या बांधावर शेवग्‍याची  लागवड  करण्‍यात आली आहे.
शेवग्‍याला मिळणार बाजारपेठ
          विदर्भात  पहिल्‍यांदाच  शेवगा लागवडीचा उपक्रम राबविण्‍यात येत असून, या लागवडीनंतर  सुमारे  दीड ते  दोन हजार क्विंटल  शेवग्‍याच्‍या  शेंगा  विक्रीसाठी  उपलब्‍ध  होणार आहेत. कृषी  विभागातर्फे  शेतक-यांना  विक्रीची व्‍यवस्‍थासुध्‍दा  करण्‍यात येणार आहे. आमगाव जंगली या गावात  प्रगतीशील  शेतकरी   श्‍यामराव  चावरे , बबनराव येवले, दत्‍तूजी चावरे, वसंतराव जावरे, प्रमोद येवले, श्री. चारोडे  आदी  शेतक-यांनी  या उपक्रमामध्‍ये  सहभागी  होवून  ही  लागवड  यशस्‍वी  केली आहे.
          शेवग्‍याच्‍या  शेंगांना नागपूरसह विदर्भातील सर्वच बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी  आहे. परंतु अत्‍यंत  कमी प्रमाणात शेवग्‍याच्‍या शेंगा बाजारात उपलब्‍ध  होतात. त्‍यामुळे  चांगला भावसुद्धा  शेतक-यांना मिळतो. शेताच्‍या बांधावरसुद्धा  शेवग्‍यामुळे  उत्‍पादन घेणे शक्‍य  होत आहे. इतर पिकांसोबत  शेतक-यांना आर्थिक  उत्‍पन्‍नाचे  स्‍त्रोत उपलब्‍ध  होणार आहेत. विदर्भात  पहिल्‍यांदाच  अशाप्रकारची  लागवड  झाल्‍यामुळे   शेतक-यांनाही  शेवग्‍याच्‍या  शेंगाबद्दल  चांगलीच  उत्‍सूकता  आहे. जिल्‍हा अधीक्षक कृषी  अधिकारी भाऊसाहेब  ब-हाटे  आणि सर्व कृषी  अधिकारी  शेवगा लागवडीच्‍या  यशस्‍वीतेसाठी  शेतक-यांना  नियमित  मार्गदर्शन करीत आहेत. त्‍यामुळे  बांधावर शेवग्‍याची लागवड हा प्रयोग  निश्चितच यशस्‍वी  होणार आहे.
                                 -अनिल गडेकर,
                                    9890157788
                                      

          

Tuesday, 3 September 2013

पर्यावरणपूरक गणेशोत्‍सव मंडळांसाठी स्‍पर्धा

जिल्‍हा माहिती कार्यालय,सा‍माजिक वनीकरण विभागाचा उपक्रम


             वर्धा, दि.3- सार्वजनिक गणेश मंडळांनी पर्यावरणपूरक गणेशोत्‍सव साजरा करावा. तसेच देखाव्‍यांच्‍या माध्‍यमातून पर्यावरण संवर्धनात्‍मक जनजागृती करावी, या उद्देशाने जिल्‍हा माहिती कार्यालय व सा‍माजिक वनीकरण विभागाच्‍या संयुक्‍त विद्यमाने पर्यावरणपूरक गणेशोत्‍सव 2013 या स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले आहे. वर्धा जिल्‍हयातील सर्व सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांसाठी या स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले आहे.
         सार्वजनिक गणेशोत्‍सवाच्‍या माध्‍यमातून पर्यावरण संवर्धनाला चालना मिळावी. तसेच श्री गणेशोत्‍सव आयोजना सोबतच पर्यावरणासाठी जनतेचाही सहभाग वाढावा यासाठी या स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले आहे. स्‍पर्धेत उत्‍कृष्‍ठ ठरणा-या मंडळांना रोख पारितोषिके स्‍मृतीचिन्‍ह देऊन गौरविण्‍यात येणार आहे.   श्रीगणेशाची स्‍थापना केवळ पर्यावरण पूरक,मा‍तीच्‍या मूर्तीच्‍या माध्‍यमातून व्‍हावी. तसेच गणेशोत्‍सवातील देखावेसुद्धा पर्यावरण संवर्धन पूरक असावेत, ही या स्‍पर्धेची प्रमुख अट राहील.
          स्‍पर्धेसाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी स्‍पर्धेत भाग घेण्‍यासाठी श्री गणेश मूर्तीचा फोटो त्‍यासोबत  पर्यावरण संवर्धनासाठी केलेल प्रयत्‍न, मंडळाच्‍या प्रमुखांची नावे, पत्‍ते आणि संपर्क क्रमांकासह दि. 15 सप्‍टेंबर 2013 पर्यंत संपूर्ण माहिती जिल्‍हा माहिती कार्यालय, प्रशासकीय भवन, दुसरा माळा, वर्धा तसेच उपसंचालक, सामाजिक वनीकरण विभाग,वर्धा यांच्‍या कार्यालयात कार्यालयीन वेळेत पाठविणे आवश्‍यक आहे.  स्‍पर्धेसाठी कोणतेही शुल्‍क आकारण्‍यात येणार नसून प्रवेशिकेवर सार्वजनिक गणेश मंडळाने पर्यावरणपूरक देखावा आणि मूर्तीबाबत थोडक्‍यात माहिती लिहावी. सार्वजनिक गणेश मंडळाचे संपूर्ण नाव, पत्‍ता आणि संपर्क क्रमांकही लिहावयाचा आहे.  त्‍याचबरोबर मूर्ती, देखाव्‍याचे रंगीत छायाचित्रही प्रवेशिकेसोबत जोडावे लागणार आहे. प्रवेशिकेवरील माहिती को-या कागदावर सुवाच्‍च हस्‍ताक्षरात किंवा टंकलिखित स्‍वरूपात मंडळाच्‍या अध्‍यक्ष व सचिवांच्‍या स्‍वाक्षरीने दाखल करावयाची आहे.  स्‍पर्धेसाठी आलेल्‍या प्रवेशिकांतून पर्यावरणप्रेमी संस्‍थांचे प्रतिनिधी, कार्यालयीन प्रतिनिधी असलेल्‍या निवड समितीद्वारे विजेत्‍यांची निवड करण्‍यात येणार आहे. निवड समिती प्रत्‍यक्ष गणेश मंडळांच्‍या देखाव्‍यांची, मूर्तींची पाहणी करणार आहेत. पाहणीनंतर तीन विजेत्‍यांची निवड करण्‍यात येणार आहे. प्रथम विजेत्‍या स्‍पर्धकाला रूपये 1001, द्वितीय स्‍पर्धकास 701 आणि तृतीय स्‍पर्धकाला 501 रूपयांचे रोख पारितोषिक, स्‍मृतीचिन्‍ह आणि प्रमाणपत्र एका विशेष समारंभ देऊन गौरविण्‍यात येणार आहे. त्‍याचबरोबर बालगणेशोत्‍सव मंडळांचाही पर्यावरण संवर्धनात वाटा असावा, या उद्देशाने बाल गणेश मंडळांनाही विशेष पुरस्‍कार देऊन गौरविण्‍यात येणार आहे. 
         निवड समितीने दिलेला निकाल हा अंतिम असेल. त्‍यावर कोणत्‍याही आक्षेपाचा विचार करण्‍यात येणार नाही, याची स्‍पर्धकांनी नोंद घ्‍यावी.  तसेच या सामाजिक उपक्रमात, स्‍पर्धेत अधिकाधिक सार्वजनिक गणेश मंडळांनी सहभागी होऊन पर्यावरणपूरक गणेशोत्‍सव साजरा करावा, असे आवाहन जिल्‍हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक प्रवीणकुमार बडगे यांनी केले आहे.

Sunday, 30 June 2013

लोकशाही वार्ता. प्रकाशित दिनांक.27 जून 2013

लोकशाही वार्ता, दिनांक 27 जून 2013 रोजी प्रकाशित वृत्‍त   

Friday, 17 May 2013

लोकनायक बापुजी अणे व ग.त्र्य. माडखोलकर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारसाठी 31 मे पर्यंत प्रवेशिका स्वीकारणार


              वर्धा,दि. 17: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन आणि उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार तसेच अमरावती विभागीय स्तरावरील लोकनायक बापुजी अणे पुरस्कार स्पर्धेसाठी  1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2012 पर्यंतच्या कालावधीमधील प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम 31 मे 2013  पर्यंत प्रवेशिका स्वीकारण्यात येणार आहे.
            2012 या कॅलेंडर वर्षात प्रसिध्द झालेले विकासविषयक लेख, विशेष वृत्त व वृत्त मालिका, वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या संदर्भात त्यांची संबंधित वर्षात प्रसिध्द झालेली  विकासविषयक छायाचित्रे यांचा विचार करण्यात येईल. स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून  व वृत्त शाखा, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने शासनाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहेत.
       पुरस्कार व स्वरूप पुढीलप्रमाणे -  राज्यस्तर (मराठी) बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार-51 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र;  राज्यस्तर(इंग्रजी) अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; राज्यस्तर (हिंदी) बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र,  राज्यस्तर (उर्दू) मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; शासकीय गट (मराठी) यशवंतराव चव्हाण पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पु.ल.देशपांडे पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र;  तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार-मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व 41 हजार रुपये आणि केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट  (मा. व ज.) 41 हजार  रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे स्वरूप आहे.          
       अमरावती विभागीय स्तरावरील  लोकनायक बापूजी अणे पुरस्कार-41 हजार रुपये,मानचिन्ह व प्रशस्तीपत्र आणि  नागपूर विभागस्तरीय ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे विभागीय पुरस्कारांचे स्वरूप आहे. प्रवेशिकेसोबत मूळ लिखाणाचे कात्रणांच्या 2 प्रतींसह पाठवून मूळ लिखाणावर लेखकाचे नाव नसल्यास, ज्या नियतकालिकात हा लेख प्रसिद्ध झाला असेल, त्या नियतकालिकाच्या संपादकांचा दाखला प्रवेशिकेबरोबर जोडलेला असावा. अन्यथा त्या प्रवेशिकेचा विचार केला जाणार नाही.                                                 
             पत्रकारांच्या गटात भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी शासन अथवा शासकीय महामंडळाच्या सेवेत नसल्याचे प्रतिज्ञापत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे. तसेच पुरस्कार स्वीकारण्याची संमती कळविणे आवश्यक आहे.  अर्जदारांनी राज्य व विभागीय पातळीवरील प्रवेशिका नागपूर येथील संचालक (माहिती), अमरावती येथील विभागीय उपसंचालक (माहिती) किंवा जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे थेट पाठवाव्यात. प्रवेशिकेसोबत जिल्हा माहिती अधिकारी किंवा पत्रकार संघटनांच्या शिफारसपत्राची आवश्यकता नाही.
          जे पत्रकार बृहन्मुंबई, नवी मुंबई  (कोकण),  कोल्हापूर,  नागपूर,  अमरावती,  नाशिक,  पुणे आणिऔरंगाबाद या विभागातील असतील, त्यांना त्या विभागासाठी असलेल्या विभागीय स्पर्धेतच भाग घेता येईल. मात्र त्यांचे लेखन अन्य कोणत्याही विभागातील वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले असेल तरी ते ग्राह्य मानण्यात येईल.                  
प्रवेशिकेवर राज्यस्तर/विभागीयस्तर तसेच प्रवेशिका कोणत्या भाषेकरिता आहे याचा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे. तसेच प्रवेशिका राज्यस्तरासाठी किंवा विभागीय स्तरासाठी व कोणत्या भाषेकरिता आहे, याबाबतचा स्पष्ट उल्लेख असावा. एकाच पत्रकाराला सलग दोन वर्ष पुरस्कार प्राप्त झाल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका विचारात घेतली जाणार नाही. प्रत्येक गटासाठी व भाषेसाठी संबंधित पत्रकारांनी एकच प्रवेशिका पाठवावी. एकापेक्षा जास्त प्रवेशिका पाठविल्यास, त्याचा विचार केला जाणार नाही.
इलेक्ट्रॉनिक्स मिडियातील पत्रकारांसाठी स्पर्धा
इलेक्ट्रॉनिक्स मिडियातील पत्रकारांसाठी उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पु.ल.देशपांडे पुरस्कार देण्यात येतो. ही स्पर्धा मराठी भाषेतील वृत्तकथेसाठी असून दूरदर्शन, खासगी चित्रवाहिन्या, स्थानिक केबल न्यूज व शासकीय  उपक्रम  यांना यामध्ये सहभाग घेता येईल. पुरस्काराचे स्वरुप 41,000 रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे आहे. वृत्तकथाचित्रे ही स्पर्धेच्या संबंधित वर्षात तयार केलेली व प्रसारित झालेली असावीत. वृत्तकथा किमान 3 मिनिटे असावी. प्रवेशिका पाठवितांना संबंधित प्रतिनिधीची माहिती तसेच वृत्तकथा कोणत्या तारखेस प्रसारित झाली,याबाबतचे संबंधित संस्थाप्रमुखांचे प्रमाणपत्र असावे. स्थानिक केबलच्या बाबतीत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांचे नोंदणीपत्र सादर करणे आवश्यक आहे.  प्रवेशिकेसोबत संबंधित वृत्तकथेची सीडी, कॅसेट थेट त्या त्या विभागातील उपसंचालक/जिल्हा माहिती अधिकारी यांचेकडे तर मुंबईकरिता मा.महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला,मंत्रालय, मुंबई-32 यांचेकडे पाठविण्यात यावी. मराठी वृत्तकथाचित्र राज्यस्तरीय पुरस्कारासाठी थेट प्राप्त झालेल्या नावांमधून पुरस्कारपात्र विजेत्यांची निवड करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स मिडियातील तज्ज्ञ व्यक्तींची परिक्षण समितीवर नियुक्ती करण्यात येईल. तसेच याशिवाय अटी नियम पुस्तिकेतील क्रमांक 6आणि अन्य संबंधित अटी या गटासाठीही लागू राहतील.               
छायाचित्रकार पुरस्कार
तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार 41 हजार रुपये, उत्कृष्ट छायाचित्रकार स्पर्धा मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू भाषेतील वृत्तपत्रातील पूर्णवेळ छायाचित्रकारांसाठी आहे. केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार, शासकीय गट (मावज) 41 हजार रुपये, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये छायाचित्रकार म्हणून काम करणारे कर्मचारी या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात. उत्कृष्ट छायाचित्रकार स्पर्धा मराठी,इंग्रजी, हिंदी, उर्दू भाषेतील दैनिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या छायाचित्राकरिता आहे. या पुरस्कारासाठी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2012 या कालावधीत प्रसिद्ध झालेले महाराष्ट्र शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांवरील छायाचित्र ग्राह्य मानण्यात येईल. मात्र हे छायाचित्र मूळ स्वरुपातील असावे.
पुरस्कारासाठी छायाचित्रकारांची मागील 5 वर्षाची कामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकास विषयक कामाच्या प्रसिद्धीसाठी जनतेमधील जाणिवांच्या जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी याचा विचार केला जाईल.एकाच छायाचित्रकाराला सलग दोन वर्ष पुरस्कार प्राप्त झाल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका विचारात घेतली जाणार नाही.
पुरस्कारासाठी पाठवावयाच्या प्रवेशिकेसोबत मूळ छायाचित्रे पाठविण्यात यावीत. ज्या नियतकालिकातछायाचित्र प्रसिद्ध झाले असेलत्या नियतकालिकाच्या संपादकांचा दाखलातारीख नियतकालिकाचे नावप्रवेशिकेसोबत जोडलेले असावे. अन्यथा त्या  प्रवेशिकेचा विचार केला जाणार नाही.या  स्पर्धेविषयींची माहिती आणि अर्जाचे नमुने माहिती  जनसंपर्क महासंचालनालयाच्या                                          www. dgipr.maharashtra.gov.in तसेच  शासनाच्या  www.maharashtra.gov.in या  संकेतस्थळावर  उपलब्ध  आहेत. 
            या स्पर्धेत राज्यातील पत्रकारांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावेअसे आवाहन  माहिती  जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने करण्यात येत आहे.
                                                                     00000000