Monday, 27 August 2012

पोथरा,लालनाला,नांद, निम्‍न वर्धा ओव्‍हर फ्लो सुरु


   वर्धा, दि. 27 – जिल्‍ह्यात सतत सुरु असलेल्‍या पावसामुळे सिंचन प्रकल्‍पातील जलसाठ्यात वाढ होत असून,  पोथरा सिंचन प्रकल्‍प  पूर्णपणे भरल्‍यामुळे  14 सेंटीमीटरचा विसर्ग सुरु आहे.  लालनाला सिंचन प्रकल्‍पात   87.81  टक्‍के उपयुक्‍त जलसाठी असून या प्रकल्‍पाच्‍या दोन दरवाजामध्‍ये 25 सेंटीमीटरचा तसेच नांद जलाशयातून 15 सेंटीमीटरचा विसर्ग सुरु आहे.
      जिल्‍ह्यातील निम्‍न वर्धा प्रकल्‍पामध्‍ये 57.24 टक्‍के जलसाठा असून या प्रकल्‍पातील तीन दरवाजे 10 सेंटीमीटरनी उघडण्‍यात आले आहे. जिल्‍ह्यातील इतर सिंचन प्रकल्‍पामध्‍ये उपलब्‍ध असलेला जलसाठा पुढील प्रमाणे आहे.
     धामप्रकल्‍प महाकाळी 14.94 द.घ्‍.मि. (23.90) टक्‍के, पोथरा प्रकल्‍प  34.72 द.घ.मि. (100 टक्‍के), बोर प्रकल्‍प 41.75 द.घ.मि. (32.79) टक्‍के , डोंगरगांव प्रकल्‍प 0.45 द.ल.घ.मि. (10.30) टक्‍के , पंचधारा प्रकल्‍प 1.95 द.घ.मि. (22.29 ) टक्‍के, मदन प्रकल्‍प 2.39 द.घ.मि. (22.67) टक्‍के , मदन उन्‍नई धरण 0.85 द.ल.घ.मि. (31.52) टक्‍के, लालनाला प्रकल्‍प 24.24 द.ल.घ.मिटर (87.81) टक्‍के , नांद प्रकल्‍प 17.10 द.ल.घ.मि. (83.87) टक्‍के , वडगाव प्रकल्‍प 112.92 द.ल.घ.मि. (83.3) टक्‍के , उर्ध्‍व वर्धा प्रकल्‍प 457.49 द.ल.घ.मि. (81.11) टक्‍के, वर्धा कार नदी प्रकल्‍प 12.23 द.ल.घ.मिटर (58.9) टक्‍के,
निम्‍न वर्धा प्रकल्‍प 59.12 द.ल.घ.मिटर (57.24) टक्‍के , बेंबळा प्रकल्‍प 112.9 द.ल.घ.मि. (37.1) टक्‍के, सुकळी लघु प्रकल्‍प 7.57 द.ल.घ.मिटर (7.78) टक्‍के .
                              0000000

जिल्‍हा कोषागार अधिकारी पदी शरद पराते रुजू


      वर्धा,दि.27- जिल्‍हा कोषागार अधिकारी या पदावर शरद पराते यांची नियुक्‍ती झाली असून, त्‍यांनी पदाची सुत्रे स्विकारली आहेत. यापुर्वी ते नांदेड जिल्‍हा परिषदेमध्‍ये वरिष्‍ठ लेखाधिकारी म्‍हणून कार्यरत होते.
      जिल्‍हा कोषागार अधिकारी शरद पराते यांची 1989 मध्‍ये लेखा व कोषागारे या विभागात सहाय्यक लेखाधिकारी म्‍हणून नियुक्‍ती झाली. त्‍यांनी विभागीय समाज कल्‍याण कार्यालय, नागपूर तसेच गडचिरोली कोषागार अधिकारी, चंद्रपूर येथे जिल्‍हा परिषदेमध्‍ये वरिष्‍ठ लेखाधिकारी, हातमाग महामंडळ नागपूर, व सिंधुदूर्ग येथेही  काम केले आहे.
                              00000

नवीन शाळेच्‍या मान्‍यतेसाठी प्रस्‍ताव संकेत स्‍थळावर उपलब्‍ध


      वर्धा,दि.27- जिल्‍ह्यातील खाजगी प्राथमिक शाळांनी शाळा मान्‍यतेसाठी सादर केलेल्‍या अर्ज व स्‍वप्रतीज्ञापत्र जिल्‍ह्याच्‍या  www.nic.wardha.in  या संकेतस्‍थळावर प्रसिध्‍द करण्‍यात आले असल्‍याची माहिती शिक्षणाधिकारी प्राथमिक   यांनी दिली आहे.
                         00000 

बुधवारी सामाजिक ऐक्‍यासाठी सदभावना दौड


       वर्धा,दि.27- सामाजिक ऐक्‍य पंधरवडा साजरा करण्‍याचे निमित्‍ताने  दिनांक 29 ऑगस्‍ट 2012 रेाजी सदभावना शर्यत जिल्‍हा क्रीडा संकुल, वर्धा येथुन सकाळी 8 वाजता सुरु होणार आहे. या स्‍पर्धेचे घोषवाक्‍य भारत-निरोगी आणि समर्थ हे आहे. तसेच राष्‍ट्रीय क्रीडा दिन हॉकीचे जादुगार (मेजर ध्‍यानचंद) यांचा जन्‍मदिवस सकाळी 9 वाजता साजरा करण्‍यात येणार आहे.
     सर्व शाळा, महाविद्यालये, तसेच खेळाडू, क्रिडा प्रेमी, सर्व क्रिडा पुरस्‍कार विजेते, नेहरु युवा केन्‍द्र, भारत स्‍काऊट आणि गाईड्स, युथ होस्‍टेल असो. ऑफ इंडिया, राष्‍ट्रीय सेवा योजना व युवक बिरादरी यांनी सहभागी होण्‍यासाठी जिल्‍हा क्रीडा संकुल, वर्धा येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्‍हा क्रिडा अधिकारी वर्धा यांनी केले आहे.
                      00000

सार्वजनिक उत्‍सवासाठी वर्गणी गोळा करताना परवानगी आवश्‍यक


       वर्धा, दि. 27- सार्वजनिक गणेश उत्‍सव, दुर्गा उत्‍सव, शारदा उत्‍सव साजरा करण्‍याकरीता वर्गणी गोळा करण्‍यासाठी मुंबई सार्वजनिक विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था अधिनियमा अंतर्गत  परवानगी आवश्‍यक असल्‍याची माहिती सहाय्यक धर्मदाय आयुक्‍त पी.पी.शर्मा यांनी दिली.
     सार्वजनिक उत्‍सव आयोजनासाठी वर्गणी गोळा करण्‍यासाठी आवश्‍यक परवानगी साठीचा अर्ज सहाय्यक धर्मदाय आयुक्‍त यांच्‍या कार्यालयात उपलब्‍ध असून, अर्जाची किंमत तीन रुपये आहे. सार्वजनिक मंडळानी  मुंबई सार्वजनिक विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था अधिनियम 1950 चे कलम 41 (क) नुसार परवानगी घ्‍यावी, असे आवाहनही सहाय्यक धर्मदाय आयुक्‍त पी.पी.शर्मा यांनी केले आहे.
       अर्जासोबत मंडळाचा ठराव ज्‍यामध्‍ये मंडळाचे नाव ठरविणे, मंडळाचे कार्यकारी मंडळ ठरविणे, ज्‍या ठिकाणी मुर्तीची स्‍थापना करावयाची आहे ती जागा ठरविणे या बाबतचा उल्‍लेख असावा. मागील वर्षाचा हिशोब, ज्‍या जागेवर मुर्तीची स्‍थापना करावयाची आहे त्‍या जागेच्‍या मालकाचे मुर्ती स्‍थापनेसाठी व उत्‍सव साजरा करण्‍याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र, सार्वजनिक जागेत उत्‍सव साजरा करणा-या मंडळांकरीता ग्राम पंचायत किंवा नगर परिषद यांचे ना हरकत प्रमाणपत्र,प्रतिज्ञापत्र , हद्दीतील सक्षम पोलीस स्‍टेशनचे ना हरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्‍यक आहे. कार्यालयाने कुठल्‍याही त्रयस्‍त इसमास या कामासाठी नेमलेले नाही. अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा. 
                           00000   

Friday, 24 August 2012

सोयाबीनला सांभाळा जैवीक व रासायनीक औषधी उपलब्‍ध


      
        वर्धा,दि.24- सोयाबीन, कापूस तसेच तुरीच्‍या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवत असल्‍यामुळे  शेतक-यांनी  पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी  तात्‍काळ उपाययोजना करणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. कृषी  विभागातर्फे गळीत धान्‍य विकास कार्यक्रमाअंतर्गत  जैवीक व रासायनीक औषधांचा पुरवठा तालुका स्‍तरावर उपलब्‍ध  करुन दिला असून,  शेतक-यांना  आवश्‍यकतेनुसार 50 टक्‍के अनुदानावर पुरवठा  करण्‍यात येत आहे.
           जिल्‍ह्यात  केन्‍द्र पुरस्‍कृत   गळीत धान्‍य विकास कार्यक्रमा अंतर्गत सोयाबीन पिकांची  56 प्रकल्‍प राबविण्‍यात येत आहेत. या प्रकल्‍पा अंतर्गत सोयाबीनवर येणा-या  किड रोगाच्‍या नियंत्रणासाठी रासायनीक व जैविक औषधे  उपलब्‍ध   करुन देण्‍यात आली आहेत. यामध्‍ये  अॅझाडीरेक्‍टीन  1500 पीपीएम चा  1 हजार 120 लिटरचा पुरवठा, बिव्‍हेरीया बॅसियाना चा 4 हजार 480 किलोचा पुरवठा, सुडोमोनास  2 हजार 240 किलो व वहर्टीसिलीयम  4 हजार 480 किलोचा पुरवठा करण्‍यात आला आहे.
         सोयाबीन या पिकासाठी जैविक किड नियंत्रणा अंतर्गत बिव्‍हेरीया 2 हजार 464 किलो व  व्‍हर्टीसिलीयमचा 1 हजार 232 किेलोचा पुरवठा ही उपलब्‍ध करुन देण्‍यात आला आहे. शेतक-यांच्‍या मागणीनुसार  पीक संरक्षण औषधी  चा पुरवठा सुध्‍दा उपलब्‍ध  झाला आहे. केन्‍द्र पुरस्‍कृत गळित धान्‍य  विकास कार्यक्रमा अंतर्गत बिव्‍होरीया बासीयानाचाही  पुरवठा करण्‍यात येत आहे.
         पिकावरील किड रोग संरक्षण व सल्‍ला प्रकल्‍पाबद्दल  कापूस व सोयाबीन पिकाकरीता  1 हजार 344 थेरोमन सापळे (कामगंध सापळे) व 7 हजार 296 स्‍पोडो त्‍पेराही उपविभागीय स्‍तरावर उपलबध करुन देण्‍यात आला आहे. तसेच विभागीय स्‍तरावरुनही किटकनाशकांचा पुरवठा करण्‍यात येणार आहे.
          सोयाबीन पिकांवर  उंट अळी , तंबाखूवरील पाने खाणारी अळी व चक्रभुंगा किडीच्‍या नियंत्रणासाठी जैवीक व रासायनीक औषधांचा निश्चितच लाभ होणार आहे. शेतक-यांनीही किड नियंत्रणासाठी तात्‍काळ उपाययोजना करावेत तसेच तालुका कृषि अधिकारी यांचेकडून बिव्‍हेरीया, बॅसीयाना या जैविक किटक नाशकाची मागणी  तात्‍काळ नोंदवावी त्‍यामुळे सोयाबीन पिकाचे संरक्षण करणे निश्चितच सुलभ होणार आहे.
                                                             0000

नागभुषण पुरस्‍काराचे रविवारी वितरण


                           
       वर्धा, दि. 24- ज्‍येष्‍ठ गांधीवादी विचारवंत व अर्थशास्‍त्राचे गाढे अभ्‍यासक प्रा. ठाकुरदास बंग यांना यावर्षीचा नागभूषण पुरस्‍कार रविवार दिनांक  26 ऑगस्‍ट रोजी दुपारी 4 वाजता सेवाग्राम आश्रम येथे आयोजीत विशेष समारंभात देण्‍यात येणार आहे.
          नागभूषण अवार्ड फाऊंडेशनच्‍या वतीने दिल्‍या जाणा-या नागभुषण पुरस्‍कारामध्‍ये  1 लाख रुपये , सन्‍मान चिन्‍ह, शाल व श्रीफळ  यांचा समावेश आहे. ज्‍येष्‍ठ  गांधीवादी नेते नारायणभाई देसाई यांच्‍या हस्‍ते ठाकुरदासजी बंग यांना नागभूषण पुरस्‍कार दिल्‍या जाणार असून या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी  सर्वोदय संघाच्‍या अध्‍यक्षा राधाबहन भट्ट राहणार  आहेत.  यावेळी  सेवाग्राम आश्रम प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष मा.म.गडकरी  प्रमुख पाहुणे म्‍हणून उपस्थित   राहणार असल्‍याची माहिती नागभुषण  अवार्ड फांऊडेशनचे प्रमुख गिरीश गांधी  यांनी दिली.
      विदर्भाच्‍या विकासात मोलाचे योगदान देणा-या किंवा विदर्भाचा नावलौकीक राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर वाढवणा-या  सन्‍माननीय व्‍यक्‍तींना  दरवर्षी   हा नागभुषण पुरस्‍कार देऊन गौरविण्‍यात येतो.  नागभूषन अवार्ड फाऊंडेशनचे अध्‍यक्ष प्रभाकरराव मुंडे, उपाध्‍यक्ष सत्‍यनारायण नुवाल, सचिव गिरीश गांधी, कोषाध्‍यक्ष  ब्रिजकिशोर अग्रवाल तसेच सदस्‍य म्‍हणून  सुरेश शर्मा, अजयकुमार संचेती, डी.आर.माली, राजेंद्र पुरोहीत, सागर मेघे, मोहन अग्रवाल व विलास काळे हे सुध्‍दा या कार्यक्रमास उपस्थित   राहणार आहेत. नागभूषन वितरण समारंभास  उपस्थित राहण्‍याचे आवाहन नागभूषण अवार्ड फाऊंडेशनचे महासचिव गिरीश गांधी यांनी केले आहे.
       ज्‍येष्‍ठ स्‍वातंत्र्य सैनिक , भुदान चळवळीचे कार्यकर्ते व लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्‍या संपूर्ण क्रांतीचे प्रमुख कर्णधार असलेले गांधीवादी विचारवंत ठाकुरदास बंग हे 1942 मध्‍ये  महात्‍मा गांधी यांनी  गोवालीया टँक मैदानावर केलेल्‍या करा वा मरो च्‍या आवाहनानंतर आपल्‍या नोकरीचा राजीनामा देऊन  स्‍वातंत्र्य आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी त्‍यांना  दोन वर्षे सक्‍त मजूरीची शिक्षाही झाली होती. प्रो.बंग हे जहाल अहिंसक  सत्‍याग्रही म्‍हणूनही ओळखले जात होते.  
           आचार्य विनोबा भावेंच्‍या आवाहनानंतर ठाकूरदासजी बंग यांनी 1957 मध्‍ये भूदान पदयात्रा काढली. महात्‍मा गांधी  सोबत स्‍वातंत्रय आंदोलन, विनोबा भावे यांचेसोबत सर्वोदय आंदोलन व जयप्रकाश नारायण यांचे सोबत संपूर्ण क्रांती आंदोलन या तीनही राष्‍ट्रीय आंदोलनामध्‍ये त्‍यांचा सहभाग राहीलेला आहे.
                                                     000000