Wednesday, 27 June 2012

अनिल देशमुख आज वर्धेत


वर्धा दि.27- अन्‍न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री अनिल देशमुख आज गुरवार दिनांक 28 जून रोजी सायंकाळी 7.00 वाजता नागपूरहून वर्धा येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमण व  किशोरजी माथनकर यांच्‍या कडील विवाह सोहळयास उपस्थित राहतील.स्‍थळ  हॉटेल विद्यादीप रिजेंसी,यशवंत महाविद्यालयामागे,सेवाग्राम रोड,वर्धा.त्‍यानंतर  सोईनुसार नागपूरकडे प्रयाण करतील.
                                                           00000

राखीव जागेच्‍या प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्‍यक


   वर्धा दि.27-  शैक्षणिक वर्ष 2012-13 मध्‍ये शासन पत्र दिनांक 3 जानेवारी 2012 नुसार मागासवर्गीय उमेदवारांना राखीव जागांवर प्रवेश घ्‍यावयाचा असल्‍यास जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य करण्‍यात आले होते.आता शासनाने शैक्ष्‍णिक वर्ष 2012-13 मध्‍ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी,औषधनिर्माण शास्‍त्र, वास्‍तुशास्‍त्र ,हॉटेल मॅनेजमेंट अॅण्‍ड  कॅटरिंग टेक्‍नॉलॉजी पदवी अभ्‍यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र तीन महिन्‍यांच्‍या आत सादर करण्‍यासंदर्भात रुपये 100-/ च्‍या स्‍टॅम्‍प पेपरवर हमीपत्र  घेण्‍याची पूर्वीची पध्‍दती चालू ठेवण्‍याचे निर्देश दिलेले आहे.
            या पार्श्‍वभूमीवर सदर अभ्‍यासक्रमास प्रवेश घेवू इच्छिणा-या ज्‍या मागासवर्गीय उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र,कागदपत्र पडताळणीचे वेळी उपलब्‍ध नसेल अशा विद्यार्थ्‍यांनी जात वैधता प्रमाणपत्र 3 महिन्‍यात सादर करण्‍याबाबतचे रु.100/- च्‍या स्‍टॅम्‍पपेपरवर हमीपत्र ,कागदपत्र पडताळणीच्‍या वेळी अर्ज स्विकृत केंद्रावर सादर करावे. हमीपत्राचा नमुना संचालनालयाच्‍या www.dte.org.in/fe2012 संकेतस्‍थळावर उपलब्‍ध करुन देण्‍यात आला आहे.
            मात्र पुढील शैक्षणिक वर्षी म्‍हणजेच 2012-13 मध्‍ये उपरोक्‍त प्रवेशासाठी प्रवेश अर्ज सादर करतेवेळीच जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील याची सर्व संबंधितांनी नोंद ध्‍यावी असे सहाय्यक आयुक्‍त, समाजकल्‍याण विभाग यांनी कळविले आहे.
00000

रोजगार मेळावा 28 जून रोजी


वर्धा दि.27-  जिल्‍हा रोजगार व स्‍वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र,वर्धा व पी.व्‍ही.टेक्‍स्‍टाईल्‍स लि.,जाम ता.समुद्रपूर यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने बेरोजगार उमेदवारासाठी दिनांक 28 जून,2012 रोजी सकाळी 11 वाजता पी.व्‍ही. टेक्‍स्‍टाईल्‍स लि. जाम येथे ता.समुद्रपूर  येथे रोजगार मेळावा आयोजित केला आहे.
            मेळाव्‍यासाठी सायडर (स्पिनींग)300 रिक्‍तपदे,इलेक्‍ट्रीकल मशीन ऑपरेटर 6 पदे व फिटर मशीन ऑपरेटर 30 पदे अशी एकूण 336 रिक्‍त पदे प्राप्‍त झालेली आहेत. या पदाकरीता किमान शैक्षणिक पात्रता एस.एस.सी. पास तसेच मशीन ऑपरेटर पदासाठी आयटीआय इलेक्‍ट्रीशियन किंवाफीटर परीक्षा उत्‍तीर्ण असणे आवश्‍यक आहे. या पदाकरीता वयोमर्यादा अट 18 ते 30 वर्षे आहे.निवड झालेल्‍या उमेदवारांना पहिल्‍या पहिल्‍या 6 महिन्‍यापर्यन्‍त रु.3000/- विद्यावेतन आणि त्‍यानंतर कंपनीच्‍या नियमानुसार मासिक वेतनात वाढ होईल. निवड झालेल्‍या उमेदवारांची कंपनीमार्फत  राहण्‍याची निशुल्‍क व्‍यवस्‍था करण्‍यात येणार आहे. तरी इच्‍छुक व पात्र उमेदवारांनी आपल्‍या शैक्षणिक पात्रतेच्‍या मूळ दाखला,प्रमाणपत्र व सेवायोजन नोंदणी कार्डासह वरील ठिकाणी उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्‍यावा असे आवाहन सहाय्यक संचालक,जिल्‍हा रोजगार व स्‍वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र , वर्धा यांनी केले आहे.
                                                        0000

Tuesday, 26 June 2012

आभार सर्वांचे

हा एक प्रयोगात्मक ब्लॉग वर्धेकरांसाठी सादर केला याला आज एक वर्ष पुर्ण होत आहे. या काळात २२ हजारांहून अधिक जणांनी भेट दिली व यावरील माहितीचा वापर केला याचा खास आनंद वाटतो. या पुढील काळातही आपण याचा लाभ घ्यावा ही विनंती करीत आभार व्यक्त करतो.


प्रशांत दैठणकर
जिल्हा माहिती अधिकारी, बुलडाणा...

साभार

अनिल गडेकर
जिल्हा माहिती अधिकारी, वर्धा

२७ जून २०१२

प्रत्‍येक कार्यालयातील अग्‍नीषमन यंत्रणा अद्ययावत ठेवा - राजेन्‍द्र मुळक

            जनतेसाठी सेतुकेंद्रात विशेष कक्ष
31 ऑगष्‍ट पर्यन्‍त अर्ज,धारिका स्‍वीकारणार
शासनाकडे पाठविलेल्‍या धारकांची यादी

वर्धा दि.26- मंत्रालयाच्‍या  ईमारतीला लागलेल्‍या आगीत  ज्‍या विभागाच्‍या फाईल नष्‍ट झाल्‍या त्‍या विभागाशी संबंधित जनतेच्‍या प्रकरणाची माहिती अर्ज स्‍वीकारण्‍यासाठी प्रत्‍येक तालुक्‍याच्‍या सेतू केंद्रात विशेष व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. जनतेनी मंत्रालया संदर्भात प्रलंबित प्रकरणाची असलेली माहिती अथवा प्रस्‍ताव सेतू केंद्रात सादर करावे असे आवाहन पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी केले आहे.
वर्धा जिल्‍ह्यात शासनाकडे मंजूरीसाठी  प्रलंबित असलेल्‍या प्रकरणासंदर्भात वर्धा व हिंगणघाट येथे प्रत्‍येकी   एक   तक्रार दाखल झाली आहे. जनतेकडून 31 ऑगष्‍ट पर्यंत अर्ज स्‍वीकारण्‍यात येणार असून मंत्रालयातील संबंधित विभागाकडे पाठविण्‍यात येईल असेही  यावेळी पालकमंत्र्यांनी  सांगितले.
 वर्धा जिल्‍ह्यातील विभाग प्रमुखांनी मागील तीन वर्षात शासनाकडे प्रस्‍ताव पाठविले आहेत त्‍याची यादी तयार करावी अशी सूचनाही यावेळी त्‍यांनी  केली.
जिल्‍ह्यातील जिल्‍हाधिकारी  कार्यालयातील 17 व पोलीस विभागा संदर्भतील 7 प्रकरणे  मंत्रालयात मान्‍यतेसाठी प्रलंबित असल्‍याची माहितीही जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांनी दिली. विधीमंडळा संदर्भातील सर्व प्रश्‍न, तारांकित पश्‍न व आवश्‍यक माहिती तात्‍काळ पाठवावी असेही त्‍यांनी   सांगितले.
                        सर्व ईमारतीवर सुरक्षा यंत्रणा
जिल्‍ह्यातील सर्व महत्‍वाच्‍या ईमारतीमध्‍ये अग्निशमन तसेच अन्‍य सुरक्षा यंत्रणाची तपासणी करावी तसेच ज्‍या ईमारतीमध्‍ये आवश्‍यक यंत्रणा नाहीत तेथे तात्‍काळ लावण्‍यात याव्‍यात अशी सूचना यावेळी पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी केली.
  सुरक्षा यंत्रणा निश्चित केलेल्‍या मानकानुसार असावी तसेच जिल्‍हा व तालुका रुग्‍णालय, जिल्‍हाधिकारी कार्यालय, जिल्‍हा परिषद व जेथे जनतेची वर्दळ आहे अशा ठिकाणी सुरक्षा यंत्रणा सज्‍ज  ठेवावी  तसेच नगर परिषदांनी अग्निशमन यंत्राणा सदैव सज्ज  राहील याची दक्षता घ्‍यावी. अशा सूचनाही सर्व विभाग प्रमुखांना पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी दिल्‍यात.
  प्रारंभी जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांनी स्‍वागत करुन जिल्‍ह्यात सुरु असलेल्‍या उपाय योजनांची माहिती दिली.
                                                              00000

आपत्‍ती व्‍यवस्‍थापनासाठी यंत्रणा सज्‍ज ठेवा - राजेंद्र मुळक


             
*  जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापनाचा आढावा
*  जिल्‍हा व तालुकास्‍तारावर 24 तास नियंत्रण कक्ष सुरु 
* विविध विभागाच्‍या समन्‍वयाने आपदा निवारण 
*  पुराचा धोका असलेल्‍या  65 गावासाठी विशेष उपाययोजना
*  नदीकाठावरील 201 गावांमध्‍ये जनजागृती
*  3 बोट, लाईफ जॉकेट,जिवनरक्षक साहित्‍य.

            वर्धा, दि.26- अतिवृष्‍टी, पूर तसेच इतर नैसर्गिक आपत्‍तीचा सामना करण्‍यासाठी जिल्‍हा व तालुका स्‍तरावर तात्‍काळ नियंत्रण कक्ष कार्यरत  करुन  विविध विभागाच्‍या  समन्‍वयाने कुठल्‍याही आपत्‍तीचा सामना करण्‍यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा अशा सूचना अर्थ व नियेाजन राज्‍यमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी आज दिल्‍यात.
           जिल्‍हाधिकारी  कार्यालयाच्‍या सभागृहात जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन व नैसर्गिक आपत्‍ती निवारणार्थ करावयाच्‍या उपाययोजनांचा आढावा पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी घेतला त्‍याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
          यावेळी जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे, नगराध्‍यक्ष आकाश शेंडे, जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज, मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने , अप्‍पर जिल्‍हाधिकारी संजय भागवत, अपर जिल्‍हा पोलीस अधिक्षक टी.एस.गेडाम तसेच विविध विभागाचे वरिष्‍ठ अधिकारी उपस्थित होते.
          जिल्‍ह्यात नैसर्गिक आपत्‍तीचा सामना करण्‍यासाठी जिल्‍हा स्‍तरावर नियंत्राण कक्ष सुसज्‍ज ठेवतांना जिल्‍ह्यातील प्रतयेक गावाशी संपर्क असणारी यंत्राणा निर्माण  करुन ही यंत्रणा चोवीस तास सुरु राहील याची दक्षता  घेतांनाच  नियंत्रण कक्षामध्‍ये जिल्‍ह्यातील आपत्‍ती व्‍यवस्‍थापनाशी संबंधित सर्व विभागाच्‍या  अधिका-यांचे दूरध्‍वनी असलेली अद्ययावत यादी तयार ठेवावी व विभागाशी समन्‍वय ठेवावा अशी सूचनाही यावेळी पालकमंत्र्यांनी केली.
          आपत्‍ती व्‍यवस्‍थापना संदर्भात विभागांची पूर्वतयारी, प्रशिक्षण , मॉकड्रील तसेच पेालीस, आरोग्‍य , महसूल , जलसंपदा विभागातील आपत्‍ती नियंत्रण संदर्भातील केलेल्‍या  उपाययोजनाची माहिती नियंत्राण कक्षात एकत्र ठेवावी असेही त्‍यांनी  सांगितले.
         जिल्‍ह्यात आपत्‍ती  व्‍यवस्‍थापना अंतर्गत ग्रामीण भगातील जनतेमध्‍ये जनजागृती सुरु असून विविध विभागातील 405 व्‍यक्‍तींना प्रशिक्षण देण्‍यात आले आहे. जिल्‍ह्यात 3 बोटी असून दोन आर्वी व अेक बोरधरण येथे सज्‍ज ठेवण्‍यता आली आहे. हिंगणघाट तालुक्‍यासाठी  अेक बोट येत्‍या पंधरा दिवसात खरेदी करण्‍याच्‍या सूचनाही यावेळी पालकमंत्र्यांनी दिल्‍यात.
            आपत्‍ती निवारणार्थ 37 लाईफ जॉकेट, 28 लाईफ बॉईज, फटपंप, टॉर्च, दोर तसेच इतर साहित्‍य खरेदीसाठी 40 लाख रुपये  उपलब्‍ध झाल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री  भोज यांनी दिली.
            नदी काठावरील गावांना पूराच्‍या धोक्या संदर्भात पूर्व सूचना देण्‍यासाठी एसएमएस सेवा तसेच जलसंपदा विभागांनी सिंचन प्रकल्‍पातील पाण्‍याच्‍या पातळी संदर्भातील माहिती दररोज नियंत्रण कक्षाला द्यावी असेही यावेळी त्‍यांनी सांगितले.
            आपत्‍ती व्‍यवस्थापना अंतर्गत दोनशे स्‍वयंसेवकांना प्रशिक्षण देण्‍यात आले आहे. आपत्‍तीचा सामना करण्‍यासाठी त्‍यांच्‍या सेवा उपलब्‍ध होणार असून, त्‍यांची संपूर्ण माहिती तहसिलदाराकडे उपलब्‍ध करुन देण्‍यात यावी. विदृयुत विभागांनी विद्युत तारा तुटणे, खांब पडणे तसेच नैसर्गिक आपत्‍ती निर्माण होणार नाही यासाठी   उपाययोजना तयार ठेवावी अशी सूचनाही यावेळी केली.
              पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग , अग्निशमन यंत्रणा, नगर परिषदा, सिंचन विभाग यांनी सदैव तत्‍पर असावे त्‍यादृष्‍टीने मनुष्‍यबळ व यंत्रणा सज्‍ज  ठेवावी अशी सूचनाही पालकमंत्री राजेद्र मुळक यांनी यावेळी केली.
            जिल्‍हा परिषदेतर्फे नियंत्रण कक्ष सुरु करण्‍यात आला असून, प्रत्‍येक गावामध्‍ये नैसर्गिक आपदेचा सामना करण्‍यासाठी  खंडविकास अधिकारी यांनी गावनिहाय आराखडा तयार केला आहे. जिल्‍ह्यातील  पूरनियंत्राणासाठी 35 गावे तसेच 30 गावात यात्रा भरते अशा गावात वैद्यकिय सुविधेसह आवश्‍यक उपाययोजना केल्‍याची माहिती जिल्‍हा परिशदेचे मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने यांनी दिली.
         प्रारंभी जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांनी स्‍वागत करुन जिल्‍हा आपतती व्‍यवस्‍थापना अंतर्गत करण्‍यात आलेल्‍या उपाययोजनांची माहिती दिली.
                                                            0000

समाजातील गरीब व दूर्बल घटकापर्यन्‍त योजनांचा लाभ पो‍हचवा -राजेंद्र मुळक


   
                                                      
* सामाजिक न्‍याय दिन उत्‍साहात साजरा
* राजश्री छत्रपती शाहू महाराजांना विनम्र अभिवादन
* गुणवंत विद्यार्थ्‍यांचा सत्‍कार, शिष्‍यवृत्‍तीचे वाटप
* घरकुल योजनेच्‍या खर्चाची मर्यादा वाढविणार

वर्धा दि.26- राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी उपेक्षितांना न्‍याय व समाजा‍तील दुर्बल घटकांना समानतेची वागणूक देवून राज्‍याला सामाजिक समतेचा विचार दिला. त्‍यांच्‍या या महान कार्याची प्रेरणा घेवून राज्‍यात विविध कल्‍याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरु करुन समाजातील गरीब व दूर्बल घटकापर्यन्‍त  विविध  सामाजिक योजनांचा लाभ पोहचवा असे आवाहन पालकमंत्री राजेन्‍द्र मुळक यांनी आज येथे केले.
            राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा जन्‍मदिन सामाजिक न्‍याय दिन म्‍हणून साजरा करण्‍यात आला. त्‍याप्रसंगी प्रमुख पाहुने म्‍हणून बोलतांना  ते  बोलत होते.
            डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्‍याय  भवन येथे आयोजित कार्यक्रमास जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे, उपाध्‍यक्ष संजय कामनापुरे,नगराध्‍यक्ष आकाश शेंडे, जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज, मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने, जिल्‍हा परिषदेचे सभापती नंदकिशोर कंगाले,प्रा. उषाकिरण थुटे, गोपाल कालोरकर, श्रीमती निर्मलाताई बिजवे, तसेच अप्‍पर पोलीस अधिक्षक श्री. गेडाम आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
            सामाजिक समतेचा विचार समाजात रुजवितांनाच गरीब विद्यार्थ्‍यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी शिष्‍यवृत्‍ती देवून तसेच उच्‍च शिक्षणाच्‍या संधी उपलब्‍ध करुन देण्‍यात येत असल्‍याचे सांगतांना पालकमंत्री राजेंद्र मुळक म्‍हणाले की, शिक्षणासोबतच रमाई घरकुल योजने अंतर्गत हक्‍काचे घर मिळवून देण्‍यासाठी  अर्थसहाय्य  करण्‍यात येत आहे.  बांधकाम साहित्‍याच्‍या किंमतीत वाढ झाल्‍यामुळे लाभार्थ्‍यांना दिल्‍या जाणा-या अनुदानात भरीव वाढ करण्‍यात येणार असल्‍याची घोषणाही यावेळी त्‍यांनी केली.
            शेतक-यांना अत्‍याधुनिक पध्‍दतीने शेती करण्‍यासाठी आवश्‍यक साहित्‍यासह सिंचनाच्‍या सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात येत असून  शेतकरी बांधवांनी  योजनांचा लाभ घेवून आर्थिक व सामाजिक विकासाचे धेय्य साध्‍य करावे असे आवाहन करतांनाच राज्‍यातील उत्‍पन्‍न वाढविण्‍या सोबतच सामाजिक सहाय्याच्‍या योजनांना अधिक निधी उपलब्‍ध करुन देण्‍याची ग्‍वाही पालकमंत्र्यांनी दिली.
            जात वैधता प्रमाणपत्र अभावी विद्यार्थ्‍यांना प्रवेशासाठी येणा-या अडचणी संदर्भात शासनाने येत्‍या तीन महिन्‍यात वैधता प्रमाणपत्र सादर करण्‍याची अनुमती दिली. असल्‍याचे सांगतांना पालकमंत्री पुढे म्‍हणाले की, समाजातील दुर्बल घटकांच्‍या सर्वागिंन विकासाच्‍या नियोजनाचा लाभ पोहचविण्‍यासाठी अधिका-यांनी पुढाकार घ्‍यावा असेही त्‍यांनी सांगितले.
            पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी प्रारंभी राजश्री छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तसेच ज्‍योतीबा फुले यांच्‍या प्रतिमेस पुष्‍पहार अर्पण करुन सामाजिक न्‍याय  दिनाचे दिप प्रजवलित करुन उदघाटन केले.
          यावेळी  जिल्‍ह्यात बारावीच्‍या परिक्षेत प्रथम आलेला विपीण  भोईते  यांचेसह गुणवंत विद्यार्थ्‍यांना प्रमाणपत्र व पुष्‍पगुच्‍छ देवून गौरव केला. जिल्‍ह्यात  प्रथम आलेल्‍या विद्यार्थ्‍यांना शाहू महाराज गुणवंत शिष्‍यवृत्‍ती सावित्रीबाई फुले शिश्‍यवृत्‍ती , घरकुल योजने अंतर्गत अनुसरुन  मोटारवाहन प्रशिक्षण घेतलेल्‍या विद्यार्थ्‍यांना प्रमाणपत्र, शेतक-यांना सिंचन विहीरीचे मंजूरी आदेश तसेच मतिमंदाचे पालकत्‍व स्विकारणा-या पालकांचा गौरव यावेळी करण्‍यात आला.
            प्रमुख पाहुणे म्‍हणून बोलतांना जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे यांनी समाजातील वंचितांना शिक्षणाच्‍या सुविधा निर्माण केल्‍यामुळे सामाजिक समतेचा विचाराचा प्रसार होत असल्‍याचे सांगितले.
              प्रारंभी समाज कल्‍याण सहाय्यक आयुक्‍त किशोर भोयर यांनी स्‍वागत करुन प्रास्‍ताविकात सामाजिक न्‍यायाच्‍या विविध योजनांची माहिती दिली. प्रा. प्रविण वानखडे यांनी छत्रपती शाहू महाराजांच्‍या कार्याची माहिती दिली.
             कार्यक्रमाचे संचलन प्रा. ओमप्रकाश चांडक यांनी तर आभार जिल्‍हा समाज कल्‍याण अधिकारी जया राऊत यांनी मानले.
                                                            00000