Saturday, 14 January 2012

भाषेच्‍या बदलत्‍या प्रवाहात माय मराठी टिकून राहील - डॉ. खंडारे


      वर्धा,दि.14- माय मराठीचा उगम हा 6 व्‍या शतकापासून प्रारंभ झाला असून, ती भाषा विकसीत होत होत आज साडेसत्‍तावन टक्‍के लोकांची बोली भाषा झाली आहे. सुलभ सोयीने बोलणारी मराठी भाषा ही शहरापासून ते ग्रामीण लोकांपर्यंत बोली भाषा ठरली आहे. या भाषेवर किती आक्रमण व संक्रमण झाले असले तरी मराठी भाषेच्‍या बदलत्‍या प्रवाहात आपली माय मराठी भाषा टिकूण राहणार असल्‍याचे परखड मत डॉ. सुभाष खंडारे यांनी व्‍यक्‍त केले.
     ग्रंथोत्‍सवाच्‍या कार्यक्रमात काल मराठी भाषेचे बदलते स्‍वरुप, वर्तमान व भविष्‍य या परिसंवादामध्‍ये ते अध्‍यक्ष पदावरुन बोलत होते. या प्रसंगी प्रा. शेख हासम , प्रा. राजेंद्र मुंडे ,डॉ. सतिश पावडे, डॉ. वंदना पळसापुरे, डॉ. किरण नाकतोडे, डॉ. दिपक पुनसे, प्रा. सरोज देशपांडे, प्रा. दिगंबर साबळे, प्रा. सचिन सावरकर प्रामुख्‍याने मंचावर उपस्थित होते.
      वर्तमान व भविष्‍य काळात मराठी भाषा लूप्‍त होईल अशी भिती व चिंता करण्‍याचे कारण नाही असे सांगून प्रा. खंडारे म्‍हणाले की, मराठी ही बोली भाषा असल्‍यामुळे ती ग्रामीण भागात सर्वाधिक बोलल्‍या जाते. या भाषेचे जतन व संवर्धन मोठ्या  प्रमाणावर पूर्ण क्षमतेने समतेने ग्रामीण क्षेत्रात होत असते. ग्रामीण क्षेत्राच्‍या घडामोडी व व्‍यवहार याच भाषेतून होत असल्‍यामुळे ती भाषा जग असेपर्यंत जीवंत राहणार आहे. शहरात मात्र या मराठी भाषेत संक्रमण होत असून, त्‍यासाठी चिंता करण्‍याचे कारण नाही. मराठी मानसाकडे ही बोलीभाषा प्रकर्षाने बोलली जाते. सांस्‍कृतीक भाषा ही विशिष्‍ट लोकापुरती मर्यादित होती व आजही ती आहे. सामान्‍य लोकांची ती बोलीभाषा ठरलेली नसल्‍यामुळे अनेकांना ती अवगत झाली नाही. त्‍यामुळे याभाषेचे संवर्धन करणे ही काळाची गरज ठरते. देशात अनेक भाषा आहेत त्‍याचे दाखले देवून डॉ.खंडारे म्‍हणाले की, आजही अनेक प्रांतातातील आपआपल्‍या माय बोलीतून बोलून ती व्‍यक्‍ती स्‍वाभीमानाने व्‍यवहार करीत असते. मराठी भाषेला उदंड इतिहास असून, ही भाषा अधिक व्‍यापक व प्रगल्‍भ होण्‍यासाठी शिक्षक व प्राध्‍यापकांनी संशोधनात पुढाकार घेवून मराठी भाषेचे स्‍थान अधिक बळकट नव्‍हे तर विद्यार्थ्‍यांमध्‍ये रुजविण्‍यासाठी प्रयत्‍नीशिल असावे असेही ते म्‍हणाले.
     या परिसंवादात सर्व वक्‍त्‍यांचा  हाच सुर दिसून आला की मराठी भाषा प्रगल्‍भ होऊन त्‍याची व्‍याप्‍ती वाढविण्‍यासाठी प्रत्‍येकांनी मोलाचा वाटा उचलावा. मराठी साहित्‍याला वाचक वर्ग मिळवून देण्‍यासाठी मराठी मानसाने योगदान द्यावे. शैक्षणिक क्षेत्रात अनेक आमुलाग्र बदल होत असून, जागतिकीकरणामध्‍ये तसेच संगणकीय युगामध्‍ये मराठी साहित्‍याकडे दुर्लक्ष होत आहे. ही बाब सर्वांच्‍या चिंतनाची असली तरी संगणक युगात मराठीचे नवनवे संशोधन करुन मराठी भाषेला व्‍यापकता मिळवून देण्‍याची गरज आहे. शासनाचे उपक्रम मराठी भाषेतच राबविले जातात. ते अधिक लोकाभिमुख झाले पाहीजे. शासनाचे लोकराज्‍य मासिक नवनविन उपक्रम घेऊन वाचकांच्‍या ज्ञानात भर पाडते त्‍यांचे ते उपक्रम योजना मराठी माणसाला दिशादर्शक ठरतात. मराठी भाषेला अधिकाधिक प्रोत्‍साहन मिळावे यासाठी शासन स्‍तरावर प्रयत्‍न झाले पाहीजे असा अभिप्राय अनेक मान्‍यवरांनी व्‍यक्‍त केला. यामध्‍ये प्रा.शेख हासम, प्रा. राजेंद्र मुंढे, डॉ. सतीश पावडे, डॉ. वंदना पळसापूरे, डॉ. किरण नाकतोडे, डॉ. दिपक पुनसे , प्रा. राजेश देशपांडे, प्रा. दिगांबर साबळे यांचा समावेश आहे.
    या कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रा. सचिन सावरकर यांनी वक्‍त्‍यांच्‍या भाषणातून आषय काढून उपस्थितांसमोर त्‍याची बाजू ठेवली. यावेळी जिल्‍हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, ग्रंथपाल सुरज मडावी व विदर्भ साहित्‍य संघ वर्धा शाखेचे अध्‍यक्ष संजय इंगळे तिगांवकर, प्रदिप दाते, मुरलीधर बेलखोडे व साहित्‍यप्रेमी उपस्थित होते.
     तत्‍पूर्वी नवनित देशमुख यांच्‍या अध्‍यक्षतेखाली कथाकथनाचा कार्यक्रम संपन्‍न  झाला. यावेळी श्रोतेवर्ग उपस्थित होते.
                             000000

Friday, 13 January 2012

लोकांच्‍या समस्‍या ऑनलाईन स्विकारणारी लोकवाणी प्रणाली


       वर्धा,दि.13-जिल्‍ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील लोकांना त्‍यांच्‍या समस्‍याबाबत तक्रारी दाखल करण्‍यासाठी जिल्‍हाधिकारी कार्यालयात वारंवार प्रत्‍यक्ष यावे लागते. त्‍यामुळे त्‍यांचा वेळ व आर्थीक नुकसान सहन करावे लागते. करीता जनतेच्‍या सोईकरीता जिल्‍हाधिकारी कार्यालयात जनतेच्‍या तक्रारी नोंदविण्‍याकरीता ऑनलाईन लोकवाणी तक्रार प्रणाली सुरु करण्‍यात आली आहे.
     जनतेच्‍या तक्रारी नोंदविण्‍याकरीता अधिक्षक, जिल्‍हाधिकारी कार्यालय,वर्धा यांचेकडील दूरध्‍वनी क्रमांक 07152-243446 या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत दुपारी 12 ते 2 या कालावधीत स्विकारण्‍याची सुविधा उपलब्‍ध  करुन देण्‍यात आली आहे.
     जिल्‍ह्यातील सर्व जनतेस सुचित करण्‍यात येते की, जिल्‍हाधिकारी यांचेकडे सादर करावयाच्‍या तक्रारी वर नमूद केलेल्‍या  लोकवाणी तक्रार प्रणाली व्‍दारा दूरध्‍वनी क्रमांक 07152-243446 वर नोंदविण्‍या बाबतच्‍या सुविधेचा लाभ घ्‍यावा.
                                  00000

ग्रंथोत्‍सवाचे थाटात उदघाटन साहित्‍य वाचनातून अमृतानुभव स्विकारावी - डॉ. किशोर सानप


       वर्धा,दि.13- साहित्‍य वाचन अलिकडील काळात लोप पावत चालली असून, या वाचन संस्‍कृतीला नवसंजिवन देणे आवश्‍यक आहे. साहित्‍य हे समाजातील सर्व घटकांना उपयुक्‍त असेच आहे. ग्रंथोत्सवामुळे साहित्‍याच्‍या अभिरुचीत वाढ होण्‍यासाठी येथे साहित्‍याचे दालन उपलब्‍ध केले असून, साहित्‍य वाचनातून अमृतानुभव स्विकारण्‍याचे आवाहन ज्‍येष्‍ठ साहित्‍यीक व लेखक किशोर सानप यांनी केले.
  














 काल न्‍यु इंग्लिश हायस्‍कूलच्‍या प्रांगणात ग्रंथोत्‍सवाचे उदघाटन त्‍यांचे हस्‍ते संपन्‍न झाले त्‍यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्‍यक्ष प्रा. शेख हाशम होते तर मंचावर जिल्‍हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, विदर्भ साहित्‍य संघाचे वर्धेचे अध्‍यक्ष संजय इंगळे तिगांवकर, प्रदिप दाते व जिल्‍हा ग्रंथपाल सुरज मडावी उपस्थित होते.
     मराठी भाषेच्‍या साहित्‍याच्‍या परंपरेत ज्ञानोबा, विठोबा, एकनाथ, नामदेव यांचे स्‍थान मोठे असून, योगदानही लक्षणीय असल्‍याचे सांगून सानप म्‍हणाले की, मराठी साहित्‍याला जात व धर्म नसतो. अभिसंतानी बहूजनांवर लादलेले साहित्‍य दिर्घकाळ टिकत नाही. मराठी भाषा हे जगातील दहाव्‍या क्रमांकाची भाषा आहे त्‍यामुळे त्‍याची व्‍यापकता अधिकाधिक दिसून येते.
      मराठी भाषेच्‍या ज्ञानाच्‍या कक्षा वृध्‍दांवत असून, मराठी भाषा लोप पावेल ही सर्व साधारण लोकांना वाटणारी भिती निश्चितच चिंता करणारी नाही. काळानुरुप मराठी भाषेत संक्रमत झाले तरीपण जी भाषा सहजतेने बोलता व समजता येते तीच आपली माय बोली संपर्क भाषा म्‍हणून असते. समाजाच्‍या संस्‍कृतीन्‍वये भाषा बोलल्‍या जातात. मात्र त्‍या भाषेतही मराठी भाषा प्रामुख्‍याने असते. भाषेचे ज्ञान प्राप्‍त करण्‍यासाठी अलिकडील युगात तंत्रज्ञानाचा सुध्‍दा वापर होत असतो परंतू बालपणावर कोरलेली मराठी भाषा प्रदिर्घ काळ टिकून राहत असते हे तेवढेच सत्‍य आहे.
      वाचनाची संस्‍कृती वाढविण्‍यासाठी प्रत्‍येकांनी आपल्‍या उत्‍पन्‍नाचा 1 टक्‍का रक्‍कम पुस्‍तके खरेदीसाठी करण्‍यात यावा.मराठी साहित्‍याचे पुस्‍तके व ग्रंथ कपाटात अनेक वर्ष बंदीस्‍त असली तरी हे साहित्‍य  सर्वकाळ जिवंत व टिकून राहते. मराठी भाषेची चिंता करण्‍याचे अजिबात कारण नसून, मराठी भाषेला व्‍यापकाता, सृजनशिलता मिळवून देण्‍यासाठी शासनाने घेतलेला उपक्रम निश्चितच गौरवपूर्ण आहे असेही ते म्‍हणाले.  
     अध्‍यक्ष पदावरुन बोलतांना प्रा. हासम म्‍हणाले की, मराठी भाषा संक्रमण अवस्‍थेतून जात आहे. पूर्वी अभिजनांनी बहूजनांवर थोपलेले भाषा दिर्घकाळ टिकाव धरु शकली नाही याकडे लक्ष वेधून मराठी भाषेची व्‍यापक संवर्धन, प्रचार व प्रसार करण्‍यासाठी शासनाने घेतलेले उपक्रम अभिनंदनीय असल्‍याचे ते म्‍हणाले.
     प्रास्‍ताविक करताना दैठणकर यांनी तीन दिवशीय कार्यक्रमाची माहिती विषद करुन ग्रंथोत्‍सवाच्‍या आयोजनाची भूमिका सांगितली.
     ग्रंथोत्‍सवाचे उदघाटन दिप प्रज्‍वलाने झाले. तसेच साहित्‍य प्रदर्शन, बचतगट व खाद्य पदार्थाचे स्‍टॉलचे उदघाटन मान्‍यवरांचे हस्‍ते करण्‍यात आले.
    या कार्यक्रमाचे सुत्र संचालन ज्‍योती भगत व प्रा.अजय येते  यांनी संयुक्‍तपणे केले. यावेळी मोठ्या संख्‍येने साहित्‍य प्रेमी व नागरीक उपस्थित होते.
                                  000000

ग्रंथोत्‍सवात रंगले कविसंम्‍मेलन


       वर्धा,दि.13-मराठी भाषा अधिक साहित्‍य समृध्‍द होण्‍यासाठी ग्रंथोत्‍सवात काल सायंकाळी कविसंम्‍मेलन संपन्‍न झाले. या कवी सम्‍मेलनात ज्‍येष्‍ठ कवियत्री पासून महाविद्यालयीन तरुण कवी सहभागी झाले होते. त्‍यांनी आपले कविमत यावेळी मोकळे केले. या कविसम्‍मेलनाचे अध्‍यक्ष प्रख्‍यात कवी अशोक बुरबुरे हे होते तर सुत्र संचालन संजय इंगळे तिगांवकर यांनी केले.
    यावेळी मुकुंद देशपांडे यांनी संसारीक जीवनावर, जयश्री कोटगिरवार यांनी सैतानी सुनामी, संजय ओरके यांनी रोहणी महत्‍व व आपण, दिपक विरखेडे यांनी मुडद्याला कट मारतांना, शोभा कदम यांनी शेतकरी आत्‍महत्‍या, गंगाधर पाटील यांनी भेटीत शतभराची गझल, संजय भगत यांनी वाटेतून चालतांना छंद अगळा, प्रा. राजेश डंभारे यांनी मातृत्‍व, गार्गी गायधनी यांनी निसर्ग कविता, माधव तेलरांधे यांनी गाणे तूझीचे गाणे, अशोक बुरबुरे यांनी बाजारवेध, डॉ. पुरुषोत्‍तम माळोदे यांनी शोध, प्रशांत ढोले यांनी जेथे, दिलीप गायकवाड यांनी पुन्‍हा एकदा, प्रशांत झिलपे यांनी भयभित, नंदा कुलकर्णी यांनी आपली बाग, प्रशांत दैठणकर यांनी चिमणी, यशवंत भवरे यांनी नुतन वर्ष , भुषण रामटेके यांनी तुटलेल्‍या लोकांची कविता व संजय इंगळे तिगांवकर यांनी दान या शिर्षकाच्‍या कविता सादर करुन उपस्थित कविप्रेमींना मंत्रमुग्‍ध केले.
     यावेळी सर्व कवींचे स्‍मृतीचिन्‍ह देवून सत्‍कार करण्‍यात आला.
      या कार्यक्रमाला साहित्‍य प्रेमी उपस्थित होते.
                             000000

सोमवार 6 फेब्रुवारीचे लोकशाही दिन होणार नाही


      वर्धा, दि.13 – राज्‍यात जिल्‍हा परिषदा व त्‍या अंतर्गत असलेल्‍या  पंचायत समित्‍यांच्‍या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम जाहिर झाला असून, राज्‍यात दिनांक 3 जानेवारी 2012 पासून आचार संहिता लागू करण्‍यात आली आहे व ती दिनांक 8 फेब्रुवारी 2012 पर्यंत अंमलात राहणार आहे.
      त्‍यामुळे जिल्‍हा परिषद व त्‍या अंतर्गत असलेल्‍या पंचायत समित्‍यांच्‍या निवडणूक आचार संहितेच्‍या कालावधीत माहे फेब्रुवारी 2012 मध्‍ये दि. 6 फेब्रुवारी 2012  सोमवारी होणा-या लोकशाही दिन आयोजित करण्‍यात येणार नाही. याबाबत  जिल्‍ह्यातील नागरीकांनी नोंद घ्‍यावी. असे जिल्‍हाधिकारी, वर्धा यांनी कळविले आहे.
                          0000

गॅस सिलेंडर संख्‍येची शिधापत्रिकेवर नोंदणी


    वर्धा, दि.13- जिल्‍ह्यातील सर्व शिधापत्रिका धारकांचे सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेअंतर्गत संपुर्ण यंत्रणेची संगणीकृत आज्ञावली तयार करण्‍याची कार्यवाही सुरु असून, सर्व गॅस एजन्‍सीमध्‍ये गॅस स्‍टँपींगचे काम प्रगती पथावर आहे.
     सर्व जनतेस जाहिर आवाहन करण्‍यात येते की, त्‍यांनी आपल्‍या शिधापत्रिका संबंधित गॅस एजन्‍सीमध्‍ये जावून शिधापत्रिकेवर एक किंवा दोन गॅस सिलेंडरची नोंद करुन घ्‍यावी. तसेच ज्‍यांचेकडे शिधापत्रिका नाही त्‍यांनी विहित नमुन्‍यातील बंधपत्र संबंधित गॅस एजन्सीमध्‍ये जमा करुन आपला दुरध्‍वनी क्रमांक वा भ्रमणध्‍वनी क्रमांक नोंद करुन घ्‍यावा.
    ज्‍या गॅस धारकांनी आपल्‍याकडील गॅसची नोंद शिधापत्रिकेवर वा बंधपत्रावर घेतली नसेल अशा गॅस धारकांना त्‍यांचेकडील रिकामे झालेले सिलेंडर भरुन मिळणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्‍यावी. असे आवाहन जिल्‍हा पुरवठा अधिकारी वर्धा यांनी केले आहे.
                                00000

Thursday, 12 January 2012

वर्धेत तीन दिवसीय ग्रंथोत्‍सवाला प्रारंभ


    वर्धा,दि.12–महाराष्‍ट्र  राज्‍य साहित्‍य व संस्‍कृती मंडळ आणि जिल्‍हा माहिती कार्यालय,जिल्‍हा शासकिय ग्रंथालय व विदर्भ साहित्‍य संघ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने वर्धेत तीन दिवसीय ग्रंथोत्‍सवाला मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला.पालखीमध्‍ये भारतीय संविधान व ग्रामगिताचे ग्रंथ ठेवण्‍यात आले होते.

     या ग्रंथोत्‍सवा निमित्‍ताने शासकिय ग्रंथालयापासून ग्रंथदिंडी काढण्‍यात आली. या दिंडिचे विधीवत पुजा व हार अर्पन अप्‍पर जिल्‍हाधिकारी संजय भागवत व निवासी उपजिल्‍हाधिकारी राजेश खवले यांचे हस्‍ते करण्‍यात आले.
     प्राचार्य पद्माकर बाविस्‍कर व प्रदिप दाते यांच्‍या संयोजनाने काढण्‍यात आलेल्‍या ग्रंथदिंडीमध्‍ये जिल्‍हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, शासकिय जिल्‍हा ग्रंथपाल सुरज मडावी व विदर्भ साहित्‍य संघाचे अध्‍यक्ष संजय इंगळे तिगांवकर,डि.एड.चे प्रा. रविंद्र रमतकर, प्रा.शेख हाशम, बाळकृष्‍ण हांडे,प्रा.हर्षबोधी आदी मान्‍यवर सहभागी झाले होते.
     शासकीय ग्रंथालया पासून काढण्‍यात आलेली ही ग्रंथदिंडी बजाज चौक, बडे चौक व ठाकरे मार्केट या मार्गावरुन मार्गस्‍थ होऊन न्‍यु इंग्लिश विद्यालयाच्‍या प्रांगणात नेण्‍यात आली. या दिंडीमध्‍ये रेणूका माता व दुर्गामाता भजणी मंडळ, राष्‍ट्रसंत तुकडोजी कनिष्‍ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी, महात्‍मा गांधी कनिष्‍ठ महाविद्यालय  व डि.एड. प्रशिक्षणाचे विद्यार्थी तसेच शिक्षक व कर्मचारीवृंद मोठ्या संख्‍येने सहभागी झाले होते.
                         00000