Saturday, 7 January 2012

रेतीघाट लिलाव स्‍थगिती


    वर्धा,दि.7–वर्धा जिल्‍ह्यातील रेतीघाट लिलाव सन  2011-2012 दिनांक 9 जानेवारी 2012 रोजी ठेवण्‍यात आलेला होता. दि. 3 जानेवारी 2012 रोजी जिल्‍हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक आचार संहिता लागू झाल्‍यामुळे निवडणूक आयोगाकडे रेतीघाट लिलावाबाबत खुलासा मागविण्‍यात आला आहे. आयोगाकडून खुलासा प्राप्‍त  होईपर्यंत सदर रेतीघाट लिलावास याव्‍दारे स्‍थगिती देण्‍यात येत आहे. सर्व रेतीघाट लिलाव इच्‍छुकांनी याबाबतची नोंद घ्‍यावी. असे जिल्‍हाधिकारी, वर्धा यांनी कळविले आहे.
                       

मन: शांती आणि अपघात... !



     यांत्रिक चुकांपेक्षा मानवी चुकांनी अधिक अपघात होतात. या चुकांचे कारण मानवी मनाच्या वृत्तीत आणि काही सवयींमध्ये आहे. या मनावर ताबा मिळवता आला आणि शांतचित्त, प्रसन्न विचारांनी एकाग्रतेने व सावधपणे वाहन चालविले तर अपघात टळू शकतात. सुरक्षा सप्ताहानिमित्त हा खास लेख.
                                                -प्रशांत दैठणकर   
      रस्त्यावर होणा-या अपघातात यांत्रिकी चूका कमी आणि मानवी चूका अधिक असल्याचे दिसून येते. या चुका कधी मृत्यूचे कारण ठरतात तर कधी आयुष्यभराच्या अपंगत्वाच्या. या चुकांपैकी काही नेमकेपणाने सांगायच्या झाल्या तर यात पहिला क्रमांक मद्यपानाचा आहे. त्या सोबत वेगाचं असणारं वेड देखील अनेकदा अपघाताचं कारण ठरतं. माणसांकडून यात भर पडली आणि गेल्या काही वर्षात यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले ते मोबाईल फोनचा वापर करण्यामुळे.
       फाजिल आत्मविश्वास हे देखील अपघाताचे एक कारण ठरते. त्यासोबतच स्पर्धा करण्याची वृत्ती देखील अपघातास कारणीभूत असते. या दोन्ही बाबींप्रमाणे वेगाचं वेड हा देखील मानवी मनाचाच एक पैलू आहे. मनात वेगवेगळे विचार घोळत असतील तर त्या स्थितीत एकाग्रता न राहिल्यानेही अपघात होत असतो.
     आपल्याला सा-या जगाची घाई आहे अशा थाटात वाहन चालवण्याची सवय बहुतेक जणांना असते. अशी ही घाई आणि फाजिल आत्मविश्वास यामुळे गाडी ओव्हरटेक करताना गतीचा अंदाज चुकल्याने अनेक अपघात होतात. अनेकदा आपल्याला जे वाहन ओव्हर टेक करायचे आहे. त्याची लांबी आणि गती यामध्ये गल्लत करुन घेतल्याने अपघात होतात.
     उभ्या ट्रकवर पाठीमागून वाहन आदळण्याचे प्रमाण अपघातात खूप अधिक आहे. अशा प्रकारचे अपघात हे झोप येत असतानाही हट्टीपणा करुन गाडी चालवायची यामुळे होतो. जर ते वाहन उभे आहे तर आपण एकाग्रतेने लक्षपूर्वक गाडी चालवली तर असे अपघात कमी होतील. या अपघातांचे आणखी एक कारण म्हणजे प्रचंड गतीने वाहन चालवण्याची असणारी सवय. या गतीमुळे अचानक एखाद्या वळणावर समोर उभ्या वाहनावर आपले वाहन आदळून अपघात होवू शकतो याचं भान आपण ठेवायलाच हवं.
     अपघाताचं आणखी एक कारण म्हणजे अप्रशिक्षित व्यक्तीने वाहन चालवणे. गाडी पुसण्यासाठी असणारा क्लीनर आपल्याकडे ड्रायव्हर होताना दिसतो अशा पध्दतीने वाहनचालक होण्याचे योग्य प्रशिक्षण नसेल तर अनेकदा वाहन अनियंत्रित होण्याचे कारण कळत नसल्याने अशा व्यक्ती अपघात करतात.
     वाहन चालविणे ही एक कला आहे. वाहन चालवण्याचं प्रशिक्षण घ्यावं आणि सशस्त्र आणि प्रसन्न मनाने स्टिअरिंग हाती घेवून मनावर ताबा ठेवला तर निमे अपघात टळतील.
                                                     -प्रशांत दैठणकर

Friday, 6 January 2012

सुरक्षित वाहतुकीसाठी स्‍वयंशिस्त पाळावे - जयश्री भोज

             वर्धा,दि.6– अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाएत असून याला कारण वाहन चालकाचा बेजवाबदारपणा असणे. अपघातामुळे अनेकवेळा जीवीत हानी होत असून, अनेक प्रसंगी अपंगत्‍व सुध्‍दा येत असते. अपघाताला आळा घालण्‍यासाठी वाहनचालकांनी सुरक्षित वाहतुकी सोबत मनातील एकाग्रता आणि स्‍वंयशिस्‍त  पाळावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी याप्रसंगी केले.
पुस्‍तीकेचे विमोचन करताना जिल्‍हाधिकारी जयश्री भोज 
     जिल्‍हाधिकारी यांच्‍या कक्षात सुरक्षित वाहतूकीसाठी स्‍वयंशिस्‍त हाच पर्याय या विषयावर एक चार पानी पुस्‍तीका काढण्‍यात आली होती, त्‍या पुस्‍तीकेचे विमोचन जिल्‍हाधिकारी भोज यांच्‍या हस्‍ते संपन्‍न झाले त्‍याप्रसंगी त्‍या बोलत होत्‍या.
    यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्‍हाण, सहाय्यक परिवहन अधिकारी राजेंद्र निकोसे  व पोलीस निरीक्षक शशीकांत भंडारे आदि मान्‍यवर उपस्थित होते.
     वाहन चालविणे सुरक्षित तर जीवन सुरक्षित, असा अभिप्राय देवून जिल्‍हाधिकारी जयश्री भोज म्‍हणाल्‍या  की, नागरीकांनी वाहतूकीचे नियम काटेकोरपणे पाळल्‍यास अपघाताच्या  प्रमाणात नक्‍कीच  लक्षणीय घट होऊ शकते.
    यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चव्‍हाण म्‍हणाले की, `स्‍वयंशिस्‍त हाच पर्याय` या विषयावरील पुस्‍तकांमध्‍ये पादचारी, मोटार सायकल चालविण्‍या-या  मुलांना, सायकल स्‍वारांना , कार, ट्रक चालकासाठी तसेच मोबाईल धारकांसाठी आणि  सर्व वाहन चालकासाठी महत्‍वाच्‍या सुचना दिलेल्‍या असून, पावसाळ्यात वाहन चालकांनी घ्यावयाची काळजी याबाबत माहिती देण्यात आली आहे. सदर्हू पुस्तीका जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत मुलांच्या वाचण्यासाठी पाठविण्यात येणार आहे. या पुस्तकामुळे विद्यार्थ्याना वाचणातून मार्गदर्शन मिळून भविष्यात वाहन चालविणे सोयीचे होईल असे ते म्हणाले.
    यावेळी अधिकारी उपसिथत होते.
                              00000

Thursday, 5 January 2012

राष्‍ट्रीय ग्राहक दिन उत्‍साहात साजरा


    वर्धा,दि.5–तहसिल कार्यालय, अन्‍न नागरी पुरवठा विभाग व ग्राहक चळवळीतील संधटना यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने नुकताच (दिनांक 26 डिसेंबर) राष्‍ट्रीय ग्राहक दिन मोठ्या उत्‍साहाने साजरा करण्‍यात आला.
     याप्रसंगी मंचावर जिलहा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्‍यक्ष आर.बी.सोमानी, जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे  सुषमा जोशी अखिल भारतीय ग्राहक कल्‍याण परिषद विदर्भ विभागाचे सचिव अजय भोयर व अधिष्‍ठाता अशोक पावडे आदी मान्‍यवर उपसिथत होते.
     ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी ग्राहकांनी सतर्कता बाळगण्‍याची गरज आहे. उत्‍पादन विक्रेत्‍या सोबत ग्राहकांनी खरेदी केलेली वस्‍तू योग्‍य व वाजवी दरांमध्‍ये आकारली असल्‍याचे विक्रेत्‍याकडून ग्राहकांनी पावती घेणे आवश्‍यक आहे. यावेळी ग्राहकांचे हक्‍क याविषयी मार्गदर्शन उपस्थित पाहूण्‍यांनी केले.
     यावेळी वजनमापे व अन्‍न  व औषधी विभागातर्फे प्रदर्शनी लावण्‍यात आली.
     या कार्यक्रमाला महाविद्यालयीन विद्यार्थी, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.
                              00000

युवकांनो व्‍हाय धीस कोलवरी .....!


     व्‍यक्‍ती संपन्‍न तर राष्‍ट्र संपन्‍न असं सूत्र आहे. आजची युवक पिढी एका बाजूला कोलवरी डी म्‍हणत फेसबूक वापरत आहे. दुस-या बाजूला नोकरीची मानसिकता सर्वांमध्‍ये दिसते. संपत्‍तीची संकल्‍पना (Concept of wealth ) युवकांनी समजून घेऊन त्‍यानुरुप वाटचाल केली तरच देश संपन्‍न बनेल. राष्‍ट्र महासत्‍ता बनेल असं चित्र आहे. 12 जानेवारीच्‍या युवक दिनानिमित्‍त काही विचार.
                                     - प्रशांत दैठणकर                                                        
      येणा-या  काळात आपला देश आर्थिक महासत्‍ता बनणार आहे. या वाक्‍याला आधार अर्थात आजची युवा पिढी. युवक ही शक्‍ती  आहे. आणि आजमितीस आपला देश सर्वाधिक युवकांचा देश आहे. युवक राष्‍ट्र घडवतात. या पिएीची आजची स्‍वतःची अशी कहाणी आहे. एका बाजूला तंत्रज्ञानाच्‍या प्रगतीतून अनेक बाबी साध्‍य करताना जग बोलवतय तर दुस-या बाजूला प्रगतीचे मार्गच सापडत नाही अशा मार्गावर आजचा युवक दिसतो.
     फेसबूकवर अनेक जण पडीक आहेत. इंटरनेटचा नेमका वापर अभ्‍यासाऐवजी मनोरंजनासाठी होताना दिसतोय. एमबीएचे कोर्स शोधण्‍याऐवजी `कोलवरी डी` मध्‍ये अधिक जणांचे लक्ष आहे की काय अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आपणास दिसते.
     तारुण्‍य, चैतन्‍याचा एक झरा, मंतरलेले दिवस एक कैफ, धुंदी, मस्‍ती आणि यात बुडवून घेण्‍याचा काळ हे चैतन्‍य सकारात्‍मक असलं पाहिजे. 15 ऑगस्‍टला स्‍वातंत्र्य दिन साजरा करताना ही पिढी कुठे आहे याचा शोध घ्‍यावाच लागतो. न्‍यू इअर आणि व्‍हॅलेंटाईन डे जल्‍लोषात साजरा करणारे 15 ऑगस्‍टला पिकनिक करताना दिसतात हे दुर्दैव आहे.
     राष्‍ट्र घडवायचं तर राष्‍ट्र आणि त्‍याचा इतिहास जाणून घ्‍यायला पाहिजे. फेसबूकवर टिका करणे किंवा फोटो पोस्‍ट करणे या माध्‍यमातून देशभक्‍ती दाखवणे ही राष्‍ट्रभक्‍ती होत नाही. आपण राष्‍ट्राला महाशक्‍ती किंवा महासत्‍ता बनवायचं स्‍वप्‍न बघतोय तर आपली कृती देखील त्‍याच दिशेने जाणारी हवी.
     राष्‍ट्राला पुढे नेताना राष्‍ट्रीय तसेच आंतरराष्‍ट्रीय घटना घडामोडींची माहिती घेणं त्‍याचं विश्‍लेषण करणे आपल्‍याला शिकावं लागेल. अर्थकारण आणि व्‍यवहारज्ञान आपणास असलं पाहिजे. अमूक एकच पद मिळाल्‍याने देशाची सेवा असलं पाहिजे. अमूक एकच पद मिळाल्‍याने देशाची सेवा होते असं नाही तर कोणतेही काम देशाच्‍या प्रगतीला हातभार लावणारे आहे अशी सकारात्‍मक मानसिकता आपण बाळगायला हवी.

     अमेरिका हे संपन्‍न राष्‍ट्र आहे कारण संपत्‍ती कशी कमवावी हे तेथील प्रत्‍येक नागरिक जाणतो. संपत्‍ती अर्थात वेल्‍थ कशी वाढता येईल याचा विचारच आपणाकडे नाही 90 टक्‍के युवक आजही शिक्षण झाल्‍यावर  नोकरीचा विचार करताना दिसतात नोकरी अर्थात पोटपाणी (ब्रेडअँन्‍ड बटर) या नोकरीतून आपण संपत्‍ती जमा करु शकत नाही.

     नोकरीमध्‍ये महागाई आणि पगार यांचा मेळ बसविण्‍यात निवृत्‍ती  कधी येते तेच कळत नाही अशी स्थिती आहे. जागतिकीकरणानंतर मागणी आणि पुरवठ्याच्‍या गणितात पेट्रोल, वीज, अन्‍नधान्‍य आदींच्‍या किंमत सतत वाएणार आहेत. यापुढेही ही वाढ सुरुच राहील. या चक्रातून बाहेर पडायचं असेल तर आपणास संपन्‍न व्‍हावं लागेल. संपत्‍तीची संकल्‍पना जाणून सर्वांनी त्‍या दृष्‍टीने प्रयत्‍न करायला लागेल. अशाच प्रकारे व्‍यक्‍ती संपन्‍न झाल्‍या तरच राष्‍ट्र संपन्‍न होईल याची जाण आणि भान सर्वांनी ठेवण्‍याची गरज आहे.

     शेतीप्रधान देशात आपण शेती व त्‍यावर आधारित उद्योगांवर भर देणे, पारंपरिक शेती सोडून बाजारपेठेत काय बदल झालेत याचा विचार करुन शेती करणे काळाची गरज झाली आहे. आपण आपल्‍या देशाचे चित्र बघितल्‍यास पंजाबमध्‍्ये  शेती अतिशय चांगल्‍या  प्रकारे केली जाते मुळात मानसिकता नोकरीची असेल तर शेती कधीच फायद्याची वाटणार नाही. परंतू शेती व्‍यवसायच आपल्‍या देशाला संपन्‍नतेकडे नेवू शकतो. संपन्‍न राष्‍ट्राच्‍या निर्मितीत शेतीचा वाटा मोठा असतो हे जगभरातील सर्व संपन्‍न अशा राष्‍ट्रांनी सिध्‍द करुन दाखवलं आहे.

     आजचा युवक आपल्‍या कृतीतून हे चित्र निश्चितपणानं बदलू शकतो इतकी ताकद या पिढीत जरुर आहे.

                                              - प्रशांत दैठणकर

अपघात आणि नागरिक


    रस्‍त्‍यावर वाहनांच्‍या धडकण्‍यामुळे पादचा-यांनाही मोठा धोका असतो. रस्‍त्‍यावर चालायचे कसे आणि काय काळजी घ्‍यायची याची माहिती असल्‍यास असे अपघात आपण सहजरित्‍या टाळू शकतो.
                                   - प्रशांत दैठणकर                                                        
अपघात ही देखील एक आपत्‍ती आहे. या आपत्‍तीचे व्‍यवस्‍थापन आपण विविध प्रकारे करु शकतो. त्‍यात अपघात झाल्‍यावर करण्‍याच्‍या सर्व उपाय योजनांपेक्षा अधिक जोर आपण अपघाताच्‍या प्रतिबंधावरच द्यायला हवा.
     रस्‍ता ओलांडताना वाहनाने धडक देणे त्‍याचप्रमाणे वाहन पादचा-यांच्‍या अंगावर येवून आदळणे या प्रकारातून रस्‍त्‍यांवर चालणा-या नागरिकांना देखील अपघाताला सामोरं जावं लागतं. या दोन्‍ही प्रकारच्‍या अपघातात प्राण गमावणा-यांचे त्‍याचप्रमाणे  अपंग होणा-यांचे प्रमाण मोठे आहे.
     रस्‍त्‍यावर होणा-या या अपघातांप्रमाणेच भारतात रेल्‍वे रुळ ओलांडताना रेल्‍वेखाली मरण पावणा-यांची संख्‍या देखील खूप मोठी आहे. रेल्‍वे स्‍थानकांवर या फलाटावरुन त्‍या फलाटावर जाण्‍यासाठी दादरे उपलब्‍ध करुन देण्‍यता आलेले आहेत मात्र वेळ वाचवण्‍यासाठी रुळ ओलांडण्‍याची असणारी मानसिकता अशा अपघातांचे कारण ठरत असते.
     रस्‍त्‍यांवरुन चालताना रस्‍त्‍याच्‍या कडेने चालणे महत्‍वाचे असते. आपण महामार्गावरुन पायी जात असाल तर शक्‍यतो डांबरी रस्‍त्‍यावर येवू नका. चालण्‍याची दिशा देखील वाहनांच्‍या दिशेच्‍या विरुध्‍द असावी जेणेकरुन आपणास समोरुन येणारे वाहन दिसत राहते. वाहने ज्‍या दिशेने जातात त्‍या दिशेने चालल्‍यास मागून कोणते वाहन येत आहे आणि त्‍याची गती नेमकी किती आहे हे आपणास समजू शकत नसते.
     शहरी भागात मॉर्निंग वॉक तसेच जॉगिंग करणारे अनेक आहेत. काही जण सकाळच्‍या वेळी धावण्‍याचा सराव देखील होतो. या सर्वांसाठी महामार्गाचा तसेच शहरातील मुख्‍यरस्‍त्‍यांचा वापर टाळलेला बरा. बहूतेक अपघात हे याच वेळात होतात याची जाणीव आपणास असली पाहिजे.
     हिवाळ्याच्‍या दिवसात सकाळच्‍या वेळी अनेकदा दाट धुके असते. असा प्रकार उत्‍तर  भारतात मोठ्या प्रमाणावर आहे. या प्रकारच्‍या धुक्‍यामुळे समोर काय आहे हे दिसत नाही व त्‍यामुळेच वाहनांचे अपघात होतात. धुक्‍यात रस्‍ता दिसावा यासाठी विशिष्‍ट अशा `फॅग लाईटचा `वापर वाहन धारकांनी केल्‍यास अपघाताची शक्‍यता कमी होईल. अशा अंधुक प्रकाशात वाहनाची गती देखील कमी ठेवायला हवी.
     रस्‍ते  ओलांडताना झेब्रा क्रॉसिंगचा वापर आपण करायला हवा तो लोक करीत नाहीत. ते देखील अपघाताचे कारण ठरते. हे टाळल्‍यास आपण अपघातांचे प्रमाण निश्चितपणे कमी करु शकू.  
                                            - प्रशांत दैठणकर

Wednesday, 4 January 2012

फिरते नांव नोंदणी पथकाचा दौरा


     वर्धा,दि.4-जिल्‍हा रोजगार व स्‍वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, वर्धा या कार्यालयाचे फिरते नाव नोंदणी पथकाचा दौरा जानेवारी 2012 मध्‍ये पुढील प्रमाणे आहे.
     दि. 6 जानेवारी 2012 पंचायत समिती आष्‍टी, दि. 7 जानेवारी 2012  पंचायत समिती, कारंजा, दि. 10 जानेवारी 2012 पंचायत समिती आवी, दि. 12 जानेवारी 2012 पंचायत समिती सेलू, दि. 15 जानेवारी 2012 पंचायत समिती समुद्रपूर, दि. 16 जानेवारी 2012 पंचायत समिती हिंगणघाट, दि. 18 जानेवारी 2012 नगर परिषद पुलगाव, दि. 19 जानेवारी 2012 पंचायत समिती देवळी.
     उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेच्‍या व जातीचे मुळ प्रमाणपत्रासह उपस्थित राहून आपल्‍या नावाची नोंदणी सकाळी 11 ते सायं.5 वाजेपर्यंत करुन घ्‍यावी.