Saturday, 17 December 2011

सार्वजनिक सुट्टया–2012


        वर्धा,दि.17-महाराष्‍ट्र राज्‍यात सन 2012 सालासाठी खाली नमूद केलेले दिवस सार्वजनिक सुट्टया म्‍हणून जाहीर केले आहेत.
      प्रजासत्‍ताक दिन गुरुवार दि.26 जानेवारी 2012, महाशिवरात्री सोमवार दि. 20 फेब्रुवारी 2012, होळी (दुसरा दिवस) गुरुवार दि. 8 मार्च 2012, गुढीपाडवा शुक्रवार दि. 23 मार्च 2012, महावीर जयंती गुरुवार दि. 5 एप्रिल 2012, गुड फ्रायडे शुक्रवार दि.6 एप्रिल2012, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती शनिवार दि. 14 एप्रिल 2012, महाराष्‍ट्र दिन मंगळवार दि. 1 मे 2012, स्‍वातंत्र्य दिन बुधवार दि. 15 ऑगस्‍ट 2012, पारसी नववर्ष दिन (शहेनशाही) शनिवार दि.18 ऑगस्‍ट 2012, रमझान ईद (ईद-उल-फितर)(शव्‍वल-1) सोमवार दि. 20 ऑगस्‍ट 2012, गणेश चतुर्थी बुधवार दि. 19 सप्‍टेंबर 2012, महात्‍मा गांधी जयंती मंगळवार दि. 2 ऑक्‍टोंबर 2012, दसरा बुधवार दि. 24 ऑक्‍टोंबर 2012, बकरी ईद (इद-उल-झुआ)
शुक्रवार दि. 26 ऑक्‍टोंबर 2012, दिवाळी अमावस्‍या (लक्ष्‍मीपूजन) मंगळवार दि. 13 नोव्‍हेंबर 2012, दिवाळी (बलिप्रतिपदा) बुधवार दि.14 नोव्‍हेंबर 2012,गुरुनानक जयंती बुधवार दि.28 नोव्‍हेंबर 2012, ख्रिसमस मंगळवार दि. 25 डिसेंबर 2012.
बँकाना आपले वार्षिक लेखे पूर्ण करता येण्‍यासाठी सोमवार दि. 2 एप्रिल 2012, बँकाना आपले अर्ध-वार्षिक लेखे पूर्ण करता येण्‍यासाठी शनिवार दि. 29 सप्‍टेंबर 2012.ह्या दोन सुट्टया केवळ बँकांपुरत्‍याच मर्यादित राहतील. त्‍या  शासकीय कार्यालयांना लागू होणार नाहीत.  
 पुढील सण रविवारी येतात ईद-ए-मिलाद रविवार दि. 5 फेब्रुवारी 2012, छत्रपती शिवाजी महाराज जयंती रविवार दि. 19 फेब्रुवारी 2012, रामनवमी रविवार दि. 1 एप्रिल 2012, बुध्‍द पोर्णिमा रविवार दि. 6 मे 2012, मोहरम रविवार दि. 25 नोव्‍हेंबर 2012,  असे शासनाचे उप सचिव सि.म.इनामदार  यांनी शासनातर्फे जारी राजपत्राव्‍दारे कळविले आहे.

12 उत्‍तीर्ण युवक युवतींना टपाल एजन्‍सीची संधी


    वर्धा,दि.17- टपाल खात्‍यातर्फे सुशिक्षित युवकांना टपाल अभिकर्ता होण्‍यासाठी आमंत्रित करण्‍यात येत आहे.
     सदर एजन्‍सी 18 वर्षे पूर्ण झालेल्‍या  व 12 वी इयत्‍ता उत्‍तीर्ण असणा-या व्‍यक्‍तीला घेता येईल. या अंतर्गत सदर एजन्‍सीसाठी चांगली जागा असणे आवश्‍यक राहील. या ठिकाणी टपाल तिकिटे विकणे त्‍यासेाबतच रजिस्‍टर्ड पत्रांची नोंदणी तसेच मनी आूर्डर नोंदणी करणे आदींना येथे मंजूरी देण्‍यात येईल. यासाठी मंजूर दराने कमिशन दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी टपाल खात्‍याच्‍या मुख्‍य कार्यालयातील अधिक्षकांशी संपर्क साधावा. असे आवाहन टपाल अधीक्षक यु.एम.शहादे यांनी एका प्रसिध्‍दीपत्राव्‍दारे केले आहे.

डाक–अदालत


     वर्धा,दि.17- भारतीय डाक विभाग, वर्धा व्‍दारा दिनांक 30 डिसेंबर 2011 रोजी अधिक्षक डाकघर वर्धा
यांचे कार्यालयामध्‍ये सकाळी 11 वाजता डाक अदालत आयोजित करण्‍यात आली आहे. पोस्‍टाच्‍या कामासंबंधीच्‍या ज्‍या तक्रारीचे सहा आठवड्याचे आत निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्‍तर मिळाले नसेल अशा तक्रारीची डाक अदालत मध्‍ये दखल घेतल्‍या जाईल.
विशेषतः टपाल, स्‍पीड पोस्‍ट, काउंटर सेवा, डाक वसतू , पार्सल, बचत बँक व मनी आूर्डर संबंधीच्‍या तक्रारी विचारात घेतल्‍या जातील.
तक्रारीचा उल्‍लेख सर्व तपशील सह केलेला असावा. संबंधीतांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार अधीक्षक डाकघर,वर्धा  यांचे नावे दि. 23 डिसेंबर 2011 पर्यंत पोहोचेल अशा बेताने पाठवावी. त्‍यानंतर आलेल्‍या तक्रारीचा विचार केला जाणार नाही. तक्रार कर्त्‍यांना डाक अदालतसाठी स्‍वखर्चाने उपस्थित राहावे लागेल.असे अधिक्षक, डाकघर, वर्धा विभाग,वर्धा यांनी कळविले आहे.           

Friday, 16 December 2011

वीज बचत म्‍हणजे राष्‍ट्रास मदत !

घरात आयएसआय प्रमाणित तारांचा वापर आणि प्रमाणित उपकरणांचा वापर केल्‍यास वीज बचत व सोबतच पैशांची बचत होईल या उपायांनी राष्‍ट्रालाही मोठी मदत होवू शकेल. - प्रशांत दैठणकर
व्‍यय आणि अपव्‍यय यात संतुलन राखणे आपल्‍याला जमलं पाहिजे हे जमलं तर बचत आपली आणि आपल्‍या राष्‍ट्राचीच होणार आहे. विषय विजेच्‍या बचतीचा आहे. विज्ञानानुसार वीज ही निर्माण करावी लागते. वीज साठवून ठेवण्‍याच्‍या यंत्रणा महागड्या आहेत त्‍यामुळे वीज साठवून ठेवण्‍याला मर्यादा आहेत. या पार्श्‍वभूमीवर आपल्‍यापैकी प्रत्‍येक व्‍यक्‍तीने विजेची बचत कशी करता येईल याचा विचार करायला हवा.
विजेचे उत्‍पादन व आपल्‍या पर्यंतचे वहन यासाठी लाखो किलोमीटरचे वाहिन्‍यांचे जाळे आणि उपकेंद्रे निर्माण करावी लागतात. ज्‍या धातूमधून वीज वाहून नेली जाते त्‍या धातूमुळे काही प्रमाणात विजेची घट होत असते. आपण आपल्‍या घरापर्यंत आलेली वीज घरात सुव्‍यवस्थित पध्‍दतीने वापरायला हवी.
घरात विजेचा वापर करताना आयएसआय प्रमाणित तारांचा तसेच ऊर्जा बचतीचे प्रमाणपत्र लाभलेल्‍या उपकरणांचाच वापर करावा. स्‍वस्‍त आणि दर्जाहीन तारामुळे विजेचा सुयोग्‍य वापर शक्‍य होत नाही सोबतच आग लागण्‍याचाही मोठा धोका असतो. प्रमाणित उपकरणे वापरली तर बचत होत असते.
ज्‍या ठिकाणी शक्‍य आहे अशा सर्व ठिकाणी सोलार उपकरणांचा वापर जरुर करावा. घरात पाणी गरम करण्‍यासाठी विजेचा वापर करणे चुकीचे आहे. आपला देश हा भरपूर सूर्यप्रकाशाचा देश आहे त्‍यामुळे सोलर अर्थात सूर्याच्‍या उर्जेचा वापर करता येईल अशी यंत्रणा घरात बसवणं सहज शक्‍य आहे.
सायंकाळी दिवे लावल्‍यानंतर सर्व खोल्‍यांमध्‍ये रात्रभर दिवे चालू ठेवण्‍याचा प्रकार अनेक घरात दिसतो. यात ज्‍या खेालीत कुणीही नाही अशा खोल्‍यांमधील दिवे बंद ठेवले तरी पुरेशी बचत सहजपणाने आपण करु शकतो. अनेक ठिकाणी घरावरील टाकीत पाणी चढविले जाते. याकरिता विद्युतपंपांचा वापर होतो. टाकी भरुन वाहू लागते तरीही पंप सुरु राहतो असा प्रकार शहरी भागात हमखास दिसतो.टाकी भरत आल्‍यावर पंप बंद करणारी स्‍वयंचलित यंत्रणा बाजारात उपलब्‍ध आहे त्‍याचा वापर सर्वांनी सुरु केला तर हजारो युनिट वीज सहज वाचेल.
उत्‍पादनाचा खर्च वाढल्‍याने वीज महाग होत आहे. या पार्श्‍वभूमीवर वीज बचत करुन आपण स्‍वतःचा आणि राष्‍ट्राचा फायदा करु शकतो आणि तो आपण करावा.
प्रशांत दैठणकर

एलपीजीचा वाहनासाठी वापर अयोग्‍य !

स्‍वयंपाकाचा गॅस अर्थात एलपीजी चा वाहनाच्‍या इंधनाच्‍या रुपात अनेक ठिकाणी गैरवापर होताना दिसत आहे. ही अतिशय गंभीर बाबत आहे. यातून अनेक समस्‍या तर निर्माण होत आहेतच सोबत अपघातांचा धोकादेखील वाढत आहे. याबाबत हा विशेष लेख. - प्रशांत दैठणकर

सध्‍या ऊर्जा बचत हा कळीचा मुद्दा बनला आहे. पेट्रोल आणि डिझेल यांची दरवाढ होत आहे सोबतच येणा-या काळात गॅसचेही दर वाढण्‍याची शक्‍यता आहे. या सर्वांमागे दळणवळणाच्‍या किंमतीत होणारी वाढ अधिक कारणीभूत आहे.
नैसर्गिक वायू आपण प्रक्रिया करुन वाहनात इंधन म्‍हणून वापरतो त्‍याच प्रमाणे घराघरात एलपीजीच्‍या रुपात स्‍वयंपाकाचा गॅस म्‍हणूनही याचा वापर होतो. या गॅसची किंमत पेट्रोल आणि डिझेलच्‍या तुलनेत सध्‍या कमी भासते याला कारण ही जीवनावश्‍यक बाब मानून त्‍यावर मोठ्या प्रमाणावर सबसिडी दिली जाते व त्‍याच्‍या दरांवर अद्यापही शासनाने नियंत्रण ठेवलेले आहे.
वाहनात सीएनजी ऐवजी एलपीजी वापरण्‍याचा प्रकार वाढला असल्‍याने सबसिडीपायी शासकीय निधी त्‍यात जातो परिणामी शासकीय कंपन्‍यांचा तोटा दिवसेंदिवस वाढत आहे असं निदर्शनास आलं आहे.
वाहनासाठी जो गॅस वापरला जातो तो वेगळ्या प्रकारचा असतो. तिथं एलपीजी वापरणं घातक आहे. मुळात हा वायू अत्‍यंत ज्‍वलनशील आहे. गॅसच्‍या टाकीतून गाडीच्‍या टाकीत भरताना वायूगळती तसेच स्‍फोट होणे आदी अपघातांची शक्‍यता असते.
पेट्रोल- डिझेल ऐवजी गॅसचा इंधन म्‍हणून वापर करण्‍यासाठी स्‍वतंत्र यंत्रणा बसवावी लागते. हे गॅस किट देखील अनेकजण प्रमाणित वापरत नाहीत. या चुकीच्‍या किंवा दर्जाने सुमार असलेल्‍या गॅसकिटमुळे गळती होवून वाहने जळाल्‍याच्‍या घटना आपण माध्‍यमातून वाचतो परंतु करताना तिच चूक केली जाते. यामुळे आता अपघातांचा धोकादेखील वाढला आहे.
एलपीजीचा गैरवापर थांबला नाही तर त्‍यावरील सबसिडी बंद करायचा निर्णय शासनाला घ्‍यावाच लागेल. त्‍या स्थितीत गॅसची किंमत आता आहे त्‍यापेक्षा दुप्‍पट होवू शकते त्‍यामुळे आपण गॅसचा योग्‍य वापर केला पाहिजे.
वाहनात गॅसचा वापर करायचा असेल तर आयएसआय आणि आरटीओव्‍दारा प्रमाणित असेच गॅसकिट वापरावे जिथे उपलब्‍ध आहे तिथेच अशा किटचा व त्‍यात फक्‍त सीएनजीचा वापर करावा.
घरातील गॅस हा गृहिणींचा जिव्‍हाळ्याचा विषय असतो त्‍या विषयाला आपण घरातच ठेवावे व वाहनाचे इंधन म्‍हणून एलपीजीचा वापर टाळावा हेच चांगलं.
प्रशांत दैठणकर

Thursday, 15 December 2011

डिसेंबर 2011 महिन्‍याचे शिधावाटप परिमाण


        वर्धा, दि.15- जिल्ह्यातील सर्व कौटुंबिक शिधा पत्रिका धारकांना माहे   डिसेंबर 2011 महिन्‍याकरीता स्वस्त धान्य दुकानातून शिधा वस्तू वाटपाचे परिमाण  पुढील प्रमाणे निश्चीत करण्यात आलेले आहे. प्रत्यक्ष  धान्य साठा व साखरेच्या उपलब्धतेनुसार वितरण करण्यात येईल.
          दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी बीपीएल कार्ड धारकांना 25 किलो गहू प्रतीकिलो 5 रु. दराने, तांदूळ 19 किलो प्रतीकिलो 6 रु. दराने, साखर प्रति व्यक्ती 500 ग्राम 13.50 प्रती किलो दराने मिळेल.अंत्योदय कार्ड    धारकांना  25 किलो गहू 2 रु. प्रती किलो दराने, 19किलो तांदुळ प्रती किलो   3 रु. दराने, प्रति व्यक्ती 500 ग्राम साखर 13.50 रुपये प्रती किलो दराने मिळेल. अन्नपूर्णा कार्ड धारकांना 5 किलो गहू व 5 किलो तांदूळ विनामुल्य दराने मिळेल. एपीएल कार्ड    धारकांना 10 किलो गहु 7.20 रुपये दराने, 5 किलो तांदूळ 9.60 रुपये   दराने मिळेल.
   तालुकानिहाय खापरी डेपोतून वितरीत झालेल्या केरोसीनचे किरकोळ विक्री दर प्रति लिटरचे दर कंसाबाहेर दिले असून, बोरखेडी डेपोतून वितरीत होणारे केरोसीनचे दर कंसामध्ये पुढील प्रमाणे दर्शविण्यात आले आहे.
  वर्धा14.55(14.48),देवळी14.81(14.75),सेलू14.67(14.62),आर्वी14.74(14.69),आष्टी 14.95(14.97),कारंजा14.84(14.93),हिंगणघाट 14.75(14.63),समुद्रपूर 14.49 (14.40) आहे.
          शहर विभाग व तालुका मुख्यालयी प्रति व्यक्ती 2 लिटर प्रमाणे जास्तीत जास्त 20 लिटर व ग्रामीण भागात 15 लिटर केरोसिनचे वाटप करण्यात येईल.असे  जिल्हा पुरवठा अधिकारी, वर्धा यांनी कळविले आहे.

परिक्षा केंद्रावर 144 कलम लागू

         वर्धा,दि.15-महाराष्‍ट्र राज्‍य लोकसेवा आयोगाच्‍या  लिपिक पदाच्‍या पूर्व परिक्षा दि. 18 डिसेंबर 2011 रोजी जे.बी.सायन्‍स कॉलेज,वर्धा,जी.एस.कॉमर्स कॉलेज वर्धा, यशवंत महाविद्यालय वर्धा, केसरीमल गर्ल्‍स  हायस्‍कूल वर्धा या परीक्षा केंद्रावर घेण्‍यात येणार आहे.

     परीक्षा सुरळीतपणे पार पडाव्‍या  यासाठी जिल्‍हा दंडाधिकारी जयश्री भोज यांना प्राप्‍त  अधिकारान्‍वये या परीक्षा केंद्रावर सीआरपीसी 144 कलम लागू करण्‍यात आले असून, दि.18 डिसेंबर 2011 रेाजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत परीक्षा केंद्राच्‍या 100 मीटर वरील परिसरात दोन किंवा त्‍यापेक्षा अधिक व्‍यक्‍तींना एकत्रीत येण्‍यावर प्रतिबंध करण्‍यात आले आहे. तसेच झेरॉक्‍स, फॅक्‍स , मोबाईल फोन, ई-मेल व इंटरनेट आदी सेवेवर प्रतिबंध करण्‍यात आले आहे.