Saturday, 26 November 2011

रोखा त्‍या एडसला !

एच.आय.व्‍ही. या विषाणुंची बाधा झाल्‍यावर होणारा आजार म्‍हणजे एडस. याचा झपाट्याने फैलाव होत आहे.मोठ्या प्रमाणावर जागरुकता निर्माण झाली तर हा फैलाव रोखता येईल. जागतिक आरोग्‍य संघटनेने यासाठी 1 डिसेंबरला जागतिक एडस दिवस जाहीर केलेला आहे.
- प्रशांत दैठणकर
गेल्‍या दोन दशकात संपूर्ण जगाला ज्‍याचा वेढा पडला आहे. आणि त्‍यात वाढच होत आहे तो आजार म्‍हणजे एडस् होय. एच.आय.व्‍ही. या विषाणुंच्‍या प्रादूर्भावामुळे हा आजार होतो. अक्‍वायर्ड इम्‍यून डिफिशिअन्‍सी सिंड्रोम असं याचं नाव आहे. हा विषाणू शरीरात दाखल झाल्‍यानंतर शरीराची असणारी सुरक्षा प्रणाली कमकुवत करण्‍याचं काम करतो.
आपल्‍या रक्‍तात लाल आणि पांढ-या पेशी असतात यापैकी पांढ-या पेशी हे आपल्‍या शरीराचं संरक्षणदल असतं. कोणताही आजार जिवाणू किंवा विषाणू यामुळेच होत असतो. जिवाणू किंवा विषाणू शरीरात दाखल झाल्‍यावर पांढ-या पेशी सक्रीय होतात व या परजीवीवर हल्‍ला करुन त्‍यांना संपवित असतात.
एचआयव्‍ही विषाणू शरीरात दाखल झाल्‍यानंतर तो ही सुरक्षा प्रणाली पूर्णपणे कमकुवत कमकुवत करतो. परिणामी क्षयरोगासारख्‍या पूर्ण पणे बरे होणा-या आजाराने देखील रुग्‍णाचा मृत्‍यू होवू शकतो. या एचआयव्‍ही विषाणूचे मुळ आफ्रिकेत आहे असे मानले जाते. या विषाणूंचा जगभरात प्रसार झाला असून ते लोण आता भारताच्‍या ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेले दिसते.

एच.आय.व्‍ही. चा प्रसार मुख्‍यत्‍वे करुन तीन प्रकारे होते. यापैकी एक म्‍हणजे रक्‍त संक्रमण होय. एच.आ.व्‍ही. बाधित व्‍यक्‍तीचे रक्‍त सामान्‍य व्‍यक्‍तीला दिल्‍यास एच.आय.व्‍ही.चा प्रसार होतो. दुस-या प्रकारात एचआयव्‍ही बाधित मातेकडून नव्‍याने जन्‍मणा-या मुलांना याची बाधा होवू शकते.
जगात झपाट्याने हा विषाणू पसरण्‍याचे कारण अर्थातच अनैतिक संबध हेच आहे. अनैतिक आणि असुरक्षित लैंगिक संबंधांमधून याचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला आणि तो वाढतच आहे. कधी धाडस म्‍हणून तर कधी गरज म्‍हणून अनेक स्त्रियांशी संबंध ठेवणा-या व्‍यक्‍तींना याची लागण होते आणि पुढे एच.आय.व्‍ही.ची बाधा झालेला रुग्‍ण एडसच्‍या आजाराने वेढला जातो.
जागतिक आरोग्‍य संघटना आपल्‍या स्‍तरावर याबाबत मोठया प्रमाणात प्रयत्‍न करीत आहे. सामाजिक जागृती करण्‍यात येत आहे. त्‍यासोबत ज्‍यांना एच.आय.व्‍ही.ची बाधा झाली अशा रुग्‍णांना समाजाच्‍या मुख्‍य प्रवाहात आणण्‍याचेही काम सुरु आहे. आपणापैकी प्रत्‍येकाने याबाबत माहिती घेऊन जागरुक नागरिकाप्रमाणे जगल्‍यास आपण एडसला सहजरित्‍या थांबवू शकतो.
- प्रशांत दैठणकर

सवयींचा आरोग्‍यावर परिणाम !

मद्यपान, मांसाहार धुम्रपान आणि मेहनतीचा आभाव यामुळे विविध प्रकारच्‍या आरोग्‍य समस्‍या निर्माण होतात. आरोग्‍याची ही संपदा राखण्‍यासाठी प्रत्‍येकानं जागरुक रहायची गरज आहे.
- प्रशांत दैठणकर

भारतात गेल्‍या काही वर्षात आरोग्‍य सुविधांमुळे सरासरी आयुष्‍यमान उंचावले आहे मात्र दुस-या बाजूला नव्‍या प्रकारच्‍या आरोग्‍य समस्‍या समोर येत आहेत. यातील रक्‍तदाब तसेच हृदयविकार या समस्‍या नव्‍या जीवनशैलीमुळे वाढलेल्‍या आपणास दिसतील.
बहुतेक प्रकरणी आयुष्‍यात ताण-तणाव आल्‍याने या समस्‍या निर्माण होतात. त्‍याचसोबत व्‍यसनं आणि खाण्‍याच्‍या सवयी हे देखील एक कारण आहे. आजकाल यांत्रिक क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढली असल्‍याने शारिरीक श्रम कमी करावे लागतात त्‍यातूनही स्‍थुलता वाढते व या स्‍वरुपाच्‍या समस्‍या निर्माण होतात.
सतत मांसाहार तसेच मद्यपान, धुम्रपान गुटखा आदींचा एकत्रित परिणाम कधी ना कधी शरीर यंत्रणेवर होतो. प्रथम हृदयाची काळजी घ्‍यायला हवी. धुम्रपानाने हृदय तसेच फुफ्फुसांवर दिर्घकालीन परिणाम होतो. धुम्रपान करणा-यांना हृदयविकाराचा धोका तर असतोच सोबत कर्करोगाचाही धोका असतो.

हृदयविकारास कारणीभूत ठरणा-या घटकांपैकी एक म्‍हणजे चरबी होय. शरीरातील चरबीचे प्रमाण नियंत्रणात आहे की नाही याची सतत काळजी घेतली पाहिजे. साधारणपणे वयाची चाळीशी ओलांडल्‍यावर किमान वर्षातून एकदा संपूर्ण वैद्यकीय तपासण्‍या करुन घेतल्‍या पाहिजे.
सततचा मांसाहार हे चरबी वाढीमागचं एक कारण आहे. कारण मांसाहारातून आपणास प्रथिने मिळत असली तरी सोबत आपण भरपूर मसाले आणि तेलाचा वापर करतो. अशा आहाराचा उष्‍मांक (कॅलरी) अधिक असतो. त्‍या कॅलरीजचा वापर आपण केला नाही तर चरबीचे साठे जमायला सुरुवात होते. चरबी जमणं सोपं उतरवणं अवघड त्‍यामुळे लठ्ठपणा त्‍यापुढे रक्‍त दाब, हृदयविकार अशी मालिकाच सुरु होवू शकते.
आरोग्‍यम धनसंपदा असं म्‍हणतात ही संपदा जपावी हेच चांगलं.
- प्रशांत दैठणकर

भारताचे संविधान दिन मोठया उत्साहात साजरा


     वर्धा,दि.26- 26 नोव्हेंबर हा दिवस भारताचे संविधान दिन मोठया उत्‍साहात साजरा करण्‍यात आला येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या पुतळयाजवळ सामाजीक न्‍याय विभागा अंतर्गत कार्यरत शाळा व महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच मागासवर्गीय मुला व मुलींच्‍या वस्‍तीगृहाचे विद्यार्थी एकत्र येऊन भारताचे संविधानाचा जयघोष केला. तसेच अप्‍पर जिल्‍हाधिकारी एस.एम.भागवत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्‍या पूर्णाकृती पुतळयाला माल्‍यर्पन करुन भावपूर्ण आदरांजली वाहीली.
     यावेळी अप्‍पर जिल्‍हाधिकारी भागवत यांनी भारताचे संविधानाचे उद्देशीकेचे वाचन करुन उपस्थीतांकडून ते वदवून घेण्‍यांत आले.
     यावेळी प्रा. निरंजन ब्राम्‍हणे, प्राचार्य मिलींद सवई, प्रा. डॉ.रफीक शेख, प्राचार्य सुनिल तोतडे, प्राचार्य डॉ. केशव वाळके, प्रा. ओमप्रकाश चांडक, प्रा. विशाखा काळे प्रा. विजयंता विटणकर, माधुरी झाडे, प्रा. अरविंद पाटील, गृहपाल अंबादे, शिक्षण व शिक्षकेत्‍तर कर्मचारी मोठया संख्‍यने उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रकाश भेले यांनी केले यावेळी मोठया संख्‍येने विद्यार्थी उपस्थित होते. 

Friday, 25 November 2011

वायगांव येथे बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार मेळावा



     वर्धा, दि. 25- जिल्‍हा रोजगार व स्‍वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, वर्धा व मे. संस्‍कार अॅग्रो प्रोसेसर्स प्रा. लि. वायगांव (निपाणी), ता. वर्धा यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने ट्रेनी वर्कर व मशिन ऑपरेटर पदांसाठी जिल्‍हयातील बेरोजगार उमेदवारांसाठी दि. 30 नोव्‍हेंबर 2011 रोजी सकाळी 11 वाजता संस्‍कार  अँग्रो. प्रोसेसर्स प्रा.लि.देवळी रोड, वायगांव (निपाणी), ता. वर्धा येथे आयोजीत केला आहे.
  तरी किमान एस.एस.सी. पास किंवा आय.टी.आय.(इलेक्‍ट्रीशियन किंवा फिटर ट्रेड पास) आणि 18 ते 35 वर्षे वयोमर्यादेच्‍या उमेदवारांनी आपल्‍या शैक्षणिक पात्रतेच्‍या व सेवायोजन कार्डाच्‍या मूळ प्रतिसह मुलाखतीसाठी वेळेवर उपस्थित रहावे. असे सहाय्यक संचालक, रेाजगार व स्‍वयंरोजगार, वर्धा कळवितात.
                     00000

राजमाता जिजाऊ स्‍वावलंबन पुरस्‍कार योजनेसाठी प्रस्‍ताव आमंत्रित


    वर्धा,दि.25- स्‍वर्ण जयंती ग्राम स्‍वरोजगार योजनेच्‍या माध्‍यमातून निर्माण झालेल्‍या  दारिद्रय रेषेखालील आदर्श व सक्षम स्‍वयंसहायता गटांना प्रोत्‍साहीत करण्‍यासाठी राजमाता जिजाऊ स्‍वावलंबन पुरस्‍कार  योजना विभाग, जिल्‍हा व तालुका स्‍तरावर सुरु आहे.
     स्‍वर्ण जयंती ग्राम स्‍वरोजगार योजनेच्‍या प्रसार व यशस्‍वीतेमध्‍ये प्रसिध्‍दीचा मोलाचा वाटा असतो. जिल्‍हा  स्‍तरावर स्‍वर्ण जयंती ग्राम स्‍वरोजगार योजनेस व्‍यापक प्रमाणावर प्रसिध्‍दी देवून येाजनेच्‍या अंमलबजावणीत हातभार लावणा-या जिल्हयातील वृत्‍तपत्राचा प्रस्‍ताव त्‍यांनी प्रसिध्‍दी केलेल्‍या बातम्‍या, फोटो, चित्र, कार्य त्‍यांचे उपक्रम व लेखमाला यासह जिल्‍हा  ग्रामीण विकास यंत्रणा, वर्धा या कार्यालयास दि. 25 डिसेंबर 2011 पर्यंत सादर करावे. असे प्रकल्‍प संचालक, जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणा वर्धा कळवितात.

औद्योगिक क्षेत्रामध्‍ये वृक्ष लागवड करण्‍याचे आवाहन


     वर्धा,दि.25- वृक्ष तोडीमुळे मोठ्या प्रमाणावर जंगलांचा -हास झाला असून, शासनाने पुढील वित्‍तीय वर्षासाठी जिल्‍ह्यातील सर्व विभागांना वृक्ष लागवडीचे लक्ष निर्धारीत केले आहे. यामध्‍ये औद्योगिक क्षेत्राचा समावेश केलेला असून, उद्योजकांनी निर्धारीत केलेल्‍या लक्षांकानुसार औद्योगिक क्षेत्रामध्‍ये वृक्ष लागवड करावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी केले आहे.
     आज येथील जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या सभागृहात जिल्‍हा उद्योग मित्र समितीची आढावा बैठक संपन्‍न झाली त्‍याप्रसंगी त्‍या बोलत होत्‍या.
     या बैठकीमध्‍ये जिल्‍हा उद्योग केंद्राचे व्‍यवस्‍थापक अे.पी.धर्माधिकारी,औद्योगिक विकास महामंडळाचे नागपूरचे प्रादेशिक अधिकारी,एम.एस.ई.बी.चे अधिक्षक अभियंता बोरीकर, एस.टी.विभागाचे विभाग नियंत्रक पंचभाई, लघू  उद्योग भारतीचे भुषण वैद्य, एम.आय.डी.सी.चे अध्‍यक्ष प्रविण हिवरे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
     एम.आय.डी.सी.मधील जी लेआऊट भुखंड धारकाशी संवाद साधून उद्योग सुरु करण्‍यास इच्‍छूक  असल्‍याची खात्री करुन त्‍याची सभा बोलाविण्‍याचे निर्देश देवून जिल्‍हाधिकारी भोज म्‍हणाल्‍या की, औद्योगिक क्षेत्रामध्‍ये अतिरिक्‍त पायाभूत सुविधेसाठी शासनाकडे प्रस्‍ताव सादर करण्‍यात यावा. वर्धा व देवळी एम.आय.डी.सी.क्षेत्रातील दृतगतीने विकास साधण्‍यासाठी आवश्‍यक त्‍या उपाययोजना कराव्‍या असेही त्‍यांनी निर्देश दिले.
                                  00000

26 नोव्‍हेंबर संविधान दिन


    वर्धा,दि.25-भारताच्‍या संविधानाबाबत जनजागृती व्‍हावी यादृष्‍टीने विविध कार्यक्रमाचे आयोजन शाळा, महाविद्यालयामध्‍ये करण्‍यात येणार आहे. संविधान दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्‍यासाठी भारतीय संविधानाच्‍या प्रास्‍ताविकेचे होर्डिंग शासकिय कार्यालयाच्‍या परिसरात दर्शनी भागात लावायचे आहे. लोकांना त्‍यांच्‍या मुलभूत हक्‍काची जाणीव संविधानामुळे प्राप्‍त झाली असून, 26 नोव्‍हेंबर हा दिवस संविधान दिन म्‍हणून सजरा करण्‍यात येणार आहे.
 भारतीय संविधानाबाबत समाजात जागृती निर्माण व्‍हावी या उद्देशाने महाविद्यालय व शासकिय वसतिगृहातील विद्यार्थी व विद्यार्थीनींसह उद्देशपत्रिकेचे वाचन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सकाळी 9 वाजता करण्‍यात येणार आहे. वर्धा जिल्‍ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयामध्‍ये  उद्देशपत्रिकेचे वाचन आपल्‍या शाळा,महाविद्यालयामध्‍ये करावे, असे आवाहन विशेष जिल्‍हा समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर यांनी केले आहे.
                        0000